Sunday, February 27, 2011

माझं Tweet.....मराठी मिल्यनेयर! जय हो!!

२७ फेब्रुवारी २०११:  मित्रांनो आज २७ फेब्रुवारी "मराठी दिन"!   सगळीकडे मराठी कार्यक्रमांची रेलचेल, भाषणांचा पाऊस,  आणि घोषणांचा पुर!  मात्र मराठी भाषा कोरडीच!  आजच्या दिवशी जास्त काही लिहीत नाही.   याच दिवशी २००९ साली लोकसत्तेसाठी लिहीलेला लेख आज पुन्हा देत आहे.  याच कारणं माझे माझ्या मराठी भाषे विषयी असलेलं मत अजुनही तेच आहे.   प्रगतीचा एक्सप्रेस वे! या माझ्या पुस्तकात सुद्दा हा लेख आहे.   शेवटी एवढचं म्हणेन....

कळेल ती भाषा, मिळेल ते काम
पडेल ते कष्ट, तेंव्हाच होईल....... जय महाराष्ट्र! 

सौजन्य लोकसत्ता: 

‘‘जी कळते ती खरी भाषा, अशी वृत्ती ठेवून वागले पाहिजे,’’ हे उद्गार आहेत प्रसिद्ध निसर्गकवी ना। धों। महानोर यांचे. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी दिन’ या दिवशी ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा ‘जनस्थान पुरस्कार’ स्वीकारताना मराठी भाषेच्या आजच्या स्थितीबद्दल महानोर असं म्हणाले की, ‘‘मराठी भाषेत काही चुकीच्या कल्पना रुजल्या आहेत. शब्द कुठल्या भाषेतून आला, त्यापेक्षा तो सर्वसामान्याला कळतो की नाही, हा निकष महत्त्वाचा आहे.’’ ‘‘भाषाशुद्धीपेक्षा भाषावृद्धी महत्त्वाची आहे.’’ माझ्या मते इतकी सरळ आणि सगळ्यांना सहज समजेल अशा शब्दात मराठी भाषेची व्याख्या आजपर्यंत कोणीही केलेली नाही. महानोरांनी केलेल्या मराठी भाषेच्या अशा ‘प्रोग्रेसिव्ह व्याख्ये’मुळे नकळतपणे जगभरातील मराठी बांधवांना मनांनी एकत्र आणलं आहे! म्हणून त्यांचे अभिनंदन आणि त्रिवार धन्यवाद!

आजच्या इंटरनेट, ब्लॉग्स, ईमेल्स, मल्टिप्लेक्स, रिमिक्स, प्रायव्हेट टीव्ही चॅनेल्स व शेवटी इंग्लिश माध्यमांच्या आयबी स्कूल्सच्या युगामध्ये शुद्ध मराठी भाषेचा जीव घुसमटून जातोय की काय, अशी भीती आपल्या सर्वाना लागून राहिलेली आहे। परिस्थिती नक्कीच गंभीर आहे! पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये लोक ब्लॉग्सच्याच भाषेत बोलणार आणि लिहिणार, वाहतं पाणी आहे! निदान एका गोष्टीचे समाधान मानू या की आज जगभरातून कितीतरी मराठी तरुण-तरुणी आपले विचार मराठीत या अशा ब्लॉग्सद्वारे जगासमोर मांडताना दिसत आहेत, एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करत आहेत, हेही नसे थोडके! अगदी अलीकडेपर्यंत कॉम्प्युटरवर मराठी हे इंग्लिश भाषेसारखे रोमन लिपीतून लिहावे लागायचे. आज सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कॉम्प्युटरवर देवनागरीत मराठी लिहिता येणे शक्य झाले व आता युनिकोडमुळे हे आणखी सोपे झाले आहे. जशी माध्यमे बदलणार, तशी भाषा थोडीफार बदलणारच. मराठी भाषेची नुसती काळजी करून किंवा नवीन माध्यमांना व पिढीला व पालकांना दोष देऊन हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. यासाठी आपल्याला ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करावाच लागेल, मोकळ्या मनाने नवीन पिढीचे मूलभूत प्रश्न समजून घ्यावे लागतील, त्यांच्या विचारांचा आदर ठेवून, प्रेमाने जवळ करावे लागेल।
मला वाटतं की, मराठी भाषेसंदर्भात काही विचार मांडण्याआधी थोडे मुंबई आणि जवळच्या परिसरातल्या मराठी माणसांच्या मानसिकतेविषयी विचार करणे महत्त्वाचे आहे।

सर्वसाधारणपणे बघितले तर मुंबईत मराठी माणसांचा एक वेगळा भावनिक मुद्दा आहे, त्याची विचारपूर्वक व समजुतीने दखल घेण्याची गरज आहे. मुंबई म्हणजे (''Land of Opportunities'') अनेकांना संधी देणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, खुद्द इथल्या मराठी माणसाला मात्र आपण मेनस्ट्रीमपासून बाजूला फेकलो गेलो आहोत असे वाटते. हळूहळू पुणे, नागपूर आणि इतर भरभराटीच्या मार्गावर असलेल्या शहरांतील मराठी लोकांतही हीच भावना घर करत आहे आणि हे लोण पसरतच जाईल. आज मुंबईत इतर लोकांचे वर्चस्व वाढलेले आहे, ते आपल्या हातात असावे असे इथल्या मराठी समाजाला मनोमन वाटते. इतर राज्यांतील, इतर समाजांतील सामान्य लोक इथे येतात, खूप प्रगती करतात, भरमसाट पैसा मिळवतात, पण आपल्याला मात्र किरकोळ नोकरी, कामधंदा करण्यासाठीसुद्धा झगडा करावा लागत आहे, अशी त्यांची खंत आहे व त्याला स्वत:साठी एक छोटंसं घरदेखील घेता येत नाही हे पाहून तो जास्त वैफल्यग्रस्त होतो। इथला भूमिपुत्र असल्याने इथे होणाऱ्या प्रत्येक प्रगतीत त्याचा सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि त्यात त्यालाच प्रथम संधी मिळायला पाहिजे असे त्याला मनापासून वाटते! त्याच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि जे आजपर्यंत गमावलेले आहे ते साध्य करण्यासाठी त्याने संघर्ष सुरू केलेला आहे. पण दुर्दैवाने मराठी माणसांच्या या प्रश्नावर कुठल्याही प्रकारचा राजकीय अथवा सामाजिक समाधानकारक तोडगा दिसत नसल्यामुळे काही वेळा नकळतपणे आपण या मराठी समाजाच्या होत असलेल्या आर्थिक पीछेहाटीच्या विषयाची गल्लत करून मराठी भाषा, साहित्य, मराठी अस्मिता व मराठी संस्कृती मागे पडत आहे, अशी टीका करतो आणि त्यात काही इतर भावनिक मुद्दे आणून आपण जास्त वैफल्यग्रस्त होतो. त्यातच साधी राहणी, उच्च विचारसरणी, प्रचंड पैसा कमवायचा असेल तर तो वाईट मार्गानेच मिळवता येतो, असे काही गैरसमज आपल्या समाजात प्रचलित करणारे लोक अजूनही आहेत। मराठी माणसांनी आर्थिक यश कसं मिळववं हा जरी आपला आज विषय नसला तरी त्याची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मराठी समाज आर्थिक दृष्टीने समृद्ध होणार नाही तोपर्यंत समाजाच्या सगळ्या थरांतील लोक मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी मनापासून सहभागी होणार नाहीत. सर्वप्रथम सगळे भावनिक मुद्दे सोडून आर्थिक दृष्टीने मराठी समाज स्वावलंबी होणे फार गरजेचे आहे व त्या दृष्टीनेच तीव्र प्रयत्न व्हायला पाहिजे!

आर्थिक प्रगतीसाठी आज मुख्य प्रश्न असा आहे की, आपली मराठी भाषा ज्ञानभाषा कशी करता येईल? मराठी ज्ञानभाषा करण्यासाठी उच्चशिक्षण मराठी माध्यमातून उपलब्ध करणे हा एकमेव मार्ग नव्हे. सुरुवात आपल्याला मराठीतील ज्ञानभंडार वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात विज्ञान आणि तंत्रज्ञानकोश तयार करावा लागेल. मोठय़ा प्रमाणात भाषांतराचे काम हाती घ्यावे लागेल व हे काम खूप मोठं आहे, व्यापक आहे. प्रत्येक विषयाची पुस्तके मराठीतून उपलब्ध होणे हे गरजेचे आहे. इंटरनेट मराठीतून सर्च करता येणे व त्या विषयाबाबतचा मजकूर नेटवर मराठीतून उपलब्ध होणे हे व्हायला पाहिजे. आज इंटरनेटमुळे संपूर्ण जगातल्या मराठी माणसांपर्यंत अगदी एका क्लिकने हे मराठी ज्ञानभंडार पोहोचवता येईल. विज्ञान विषयातील संज्ञा, संकल्पना, व्यक्ती आणि संस्था यावर साडेतीन हजार नोंदींचा समावेश असलेला कोश मराठी विज्ञान परिषद आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित करीत आहे, त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करू या. असं असताना आज महाराष्ट्रामध्ये मराठी भाषांतराची परिस्थिती फार समाधानकारक नाही. उदा. उच्च न्यायालयाची भाषा आपण मराठी पाहिजे असं म्हणतो, पण त्यांना पुरेसे मराठी टंकलेखक, लघुलेखक आणि भाषांतर करणारे मिळत नाहीत. अजूनही कायद्याच्या संज्ञा व संकल्पना मराठी भाषेमध्ये उपलब्ध नाहीत. आज आमच्या कॉर्पोरेट लॉमध्ये ग्लॅमर, पैसा आणि प्रतिष्ठा असूनही मराठी समाजामध्ये वकिली व्यवसायाकडे तरुणांचा कल दिसत नाही आणि पर्यायाने इतर भाषेतील लोक या व्यवसायामध्ये पुष्कळ प्रमाणात आलेले आहेत व रोज येत आहेत. त्यामुळेही मराठी भाषा ही न्यायालयात पूर्णपणे येऊ शकत नाही. मला असं वाटतं की, जागतिकीकरणामुळे निदान ज्या विविध सेवा (सव्‍‌र्हिस) क्षेत्रामध्ये तांत्रिक भाषेची जास्त गरज भासत नाही, निदान त्या त्या क्षेत्रामध्ये तरी मराठी तरुणांनी येऊन स्वत:च्या प्रगतीबरोबर मराठी भाषेचाही प्रसार केला पाहिजे. उदा. बांधकाम व्यवसाय, इन्शुअरन्स, फॅशन डिझाइनिंग, मीडिया आणि एन्टरटेनमेंट, ट्रॅव्हल आणि टुरिझम, ़इव्हेंट मॅनेजमेंट व इतर. पण त्यासाठी नुसतं डॉक्टरकी आणि इंजिनीयरिंगकडे आपली मुलं पाठवून चालणार नाही! आणि मग त्या त्या क्षेत्रामध्ये आपोआपच मराठी भाषेचा वापर वाढेल, तसेच मराठी भाषा ही ‘मायबोली’वरून ‘ज्ञानबोली’ होत जाईल! शेअर बाजारात गुजराती लोक बहुसंख्येने आहेत, म्हणून आपोआपच मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत शेअर बाजारातील व्यवहार गुजरातीत होतात! आपण व्यवहार त्यांच्याकडून कधी शिकणार आहोत?

भाषेसंबंधी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण बदलत्या काळाबरोबर भाषाही बदलतच जाणार हे सत्य मान्य करतो, तसच कुठलीही भाषा स्थिर राहूच शकत नाही, हेही मान्य करतो. एकीकडे माणसांच्या प्रवाही जीवनात भाषा ही लवचिकच असायला पाहिजे असं आपण मानतो, तर मग दुसरीकडे ज्ञानासाठी इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेमध्ये वापरणे म्हणजे अपराध आहे असं का समजतो? इंग्लिश भाषेमध्ये दर वर्षी जवळजवळ काही लाख नवीन शब्द येतात आणि हेच तिचे बलस्थान आहे. जरा अभ्यासपूर्वक पाहिलं तर आपल्यला असं आढळेल की, इंग्लिश भाषेमध्ये फ्रेंच, जर्मन, डच, लॅटिन, ग्रीक, स्पॅनिश, पर्शियन, इटालियन, अरेबिक, रशियन, संस्कृत, हिंदी व बऱ्याच अन्य भारतीय भाषांतील शब्द घेऊन त्यांनी इंग्लिश शब्दकोश तयार केला. तसे आपण इतर भाषेतील काही शब्द जे आपल्या मराठीत चांगलेच प्रचलित आहेत, त्यांना मराठी म्हणून मान्यता का देऊ नये? उदा. फोन, फोटो व सिनेमा यांना मराठीत अनुक्रमे शब्द आहेत दूरध्वनी, छायाचित्र व चित्रपट. हे शब्द खास विचार करून बनवण्यात आलेले आहेत. ते मराठी भाषेत आधी नव्हते. ते लिहिण्यात काही वेळा वापरले जातात, पण बोलताना कितीजण हे शब्द किती वेळा वापरतात? बहुसंख्य लोक फोन, फोटो व सिनेमा हेच शब्द वापरतात. म्हणजे नवे शब्द आपण बोलीभाषेत रुजवू शकलो नाही. मग याबाबत काय भूमिका घ्यावी हे ठरवले पाहिजे. उलट आपण सर्रास टेबल म्हणतो, त्याला आधी मराठी शब्द होता व आहे मेज. नव्या पिढीला हा शब्द माहीतही नसेल. काळाच्या ओघात असे काही शब्द मागे पडून त्या त्यागी इंग्लिश शब्द येणार. याचा अतिरेक होऊन ‘मी वॉकला गेलो होतो’ असे बोलू नये हे मान्य. पण रुळलेल्या शब्दांबाबत व तांत्रिक शब्दांबाबत आपण भूमिका घ्यायला पाहिजे. कोणी बोलताना असे तांत्रिक शब्द इंग्लिशमधील वापरले तर त्याला आक्षेप असू नये. ज्ञान मिळवण्यासाठी एखाद्या ब्रेन सर्जन, नोबेल पुरस्कार विजेता अर्थशास्त्रज्ञ किंवा नामवंत सिनेमा दिग्दर्शकाला भाषणासाठी बोलवयचे व त्याच्या भाषणातून ज्ञान घेण्याऐवजी त्यातले इंग्लिश शब्द शोधून त्यावर टीका करायची, ही वृत्ती संपूर्णपणे चुकीची आहे. एक प्रोग्रेसिव्ह मराठी समाज घडविताना ‘प्रोग्रेसिव्ह मराठी’ भाषेची कास धरावीच लगेल! मग त्यात इंग्लिश काय किंवा इतर कुठल्याही भाषेच्या शब्दांचा आधार घ्यावा लगला तरी तो तसा घेण्याची आपली मानसिकता असली पाहिजे।

त्याच अनुषंगाने मुलांच्या शिक्षणाचे माध्यम मराठी असावे की इंग्लिश हा वाद आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मातृभाषा- मराठी माध्यमच हवे असे टोकाची आग्रही भूमिका असलेले अनेक त्यावर नेहमी वर्तमानपत्रातून लिहीत असतात. निदान ज्यांची मुलं इंग्लिश माध्यमात आहेत त्यांनी तरी याविषयी बोलून दुटप्पीपणा करू नये. याबाबत मला वाटतं की कुठलीही आग्रही भूमिका मांडण्याआधी, आपण विचार करायला पाहिजे की आपला मराठी समाज आज खेडय़ात आहे, शहरात आहे, महराष्ट्राबाहेर आहे, परदेशात आहे. जीवनशैलीत फरक असलेले, अभिरुचीत फरक असलेले असे अनेक घटक एकाच वेळी आपल्या समाजात आहे. वादात नेहमी येणारे मुद्दे टाळून असे म्हणता येईल, मुलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावं की इंग्लिश माध्यमाच्या, हा प्रश्न सर्वस्वी, मुलांच्या करिअर प्लॅनिंगचा आहे व हा प्रत्येक माणसाचा स्वतंत्र विचारसरणीचा आहे असं आपण का समजत नाही? करिअर प्लॅनिंग दहावीनंतर सुरू होत नाही तर ते मूल पहिल्या दिवशी शाळेत जाते तेव्हा सुरू होत व तसा विचार करूनच आज कित्येक पालक निर्णय घेतात, नव्हे त्यांनी तो तसा घेतलाच पाहिजे!

मराठी भाषेसंदर्भात विजय तेंडुलकरांची एक मुलाखत ग्रंथाली चळवळीच्या रूची अंकामध्ये पुनर्मुद्रित केली आहे, ती फारच बोलकी आहे. त्यात ते म्हणतात की‘‘ ज्यांच्याविषयी विचार करायला पाहिजे असे याहून गंभीर प्रश्न असताना ते सोडून तुम्ही भाषेचा प्रश्न सुप्रीम का मानताय मला कळत नाही. बरे, टेक्नॉलॉजी आणि इतक्या नव्या गोष्टी येताहेत की मराठी शुद्ध राहणे शक्य नाही. त्यात अनेक शब्द, अनेक वाक्यं इंग्रजी येतील यात दु:ख करण्यासारखे काय आहे? मला वाटते, हे सगळे भलतेच कुठेतरी चाललेले आहे.  छोटय़ा माणसाचे आज काय होते आहे, त्याला भवितव्य आहे की नाही, याविषयी नाही बोलायचे? ते मुळात त्यांना माहीत नसावे.’’ तेंडुलकर पुढे असेही म्हणतात, ‘‘आमची पोरे आम्ही कुठे शिकायला पाठवली यावर मराठीचे भवितव्य कसे काय अवलंबून आहे?’’

याबाबत आपण थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मराठी माध्यमातून शिकलेले लोकच मराठी टिकवतील ही कल्पनाच साफ चुकीची आहे व इंग्लिश माध्यमातून शिकलेले लोक मराठी बुडवतील असं समजण्याचं कारण नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले पण पुढच्या आयुष्यात त्यांचा व मराठीचा फक्त घरी मराठीत बोलणे इतकाच मराठीशी संबंध आहे. ते कधी मराठी वृत्तपत्र, मराठी पुस्तक किंवा मासिक वाचत नाहीत, मराठी सिनेमा/नाटक पाहात नाहीत, मराठी चॅनेलदेखील पाहात नाहीत. तर दुसरीकडे मराठी माध्यमातून न शिकलेले व तरीदेखील मराठीत कविता करणारे, विविध विषयांवर मराठीतून लेख लिहिणारे, कित्येक लोक आहेत. मराठीतील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार या संगीतकाराचे शिक्षण इंग्लिश माध्यमातून झाले, पण ते अभिमानाने मराठी संगीतक्षेत्रात काम करत आहेत. एकूणच मराठी माध्यम विरुद्ध इंग्लिश माध्यम असा वाद घालत न बसता, अधिक मोकळ्या मनाने आणि संयमाने विचार करूया. आज खरी गरज आहे ती मराठी माध्यमांच्या शाळेत अगदी इयत्ता पहिलीपासून चांगलं दर्जेदार इंग्लिश शिकवण्याची व महाराष्ट्रात प्रत्येक इंग्लिश शाळेत इयत्ता पहिलीपासून दर्जेदार मराठी शिकवण्याची आणि मुख्य म्हणजे प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या मुलांना सुंदर आणि दर्जेदार मराठी साहित्य आपल्या घराघरात उपलब्ध करून देणं हाच त्यावर एक उपाय आहे. मार्ग काढण्यात आपला विजय आहे, तो बंद करण्यात नव्हे!

आपण बघितलं की प्रगत मुद्रण तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर व शिक्षणाचे प्रमाण वाढल्यानंतर, वृत्तपत्रे, पुस्तके यामार्फत मराठीचा प्रसार होण्यास चालना मिळाली. आजच्या काळाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे इलेक्ट्रॉनिक माध्यम- टी. व्ही.! एक वेळ अशी होती की सरकारी एक मराठी चॅनेलसुद्धा धड चालत नव्हतं, आज पाच मराठी टी. व्ही. चॅनेल्स आहेत आणि मुख्य म्हणजे सर्व नफ्यात आहेत. त्यांच्या कार्यक्रमातील मराठी भाषा ही काही वेळा अगदी अचूक नसेल, ते धडपडत शिकतील, पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की, आज मोठय़ा प्रमाणात मराठी समाज हा हिंदी आणि इंग्रजी माध्यमांची टी. व्ही. चॅनेल्स सोडून, रोज सकाळी भविष्य ऐकायला बसतो, मराठी सारेगमपची मराठी गाणी ऐकत बसतो. मुलांच्या सारेगमपने लोकांना किती वेड लावले ते आपण अनुभवलेले आहे, त्याला फार दिवस झालेले नाहीत. या सारेगमपमुळे घराघरात इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनीही ढिपाडी ढिपांगच्या तालाबरोबर, ज्ञानेश्वराचे आणि तुकारामाचे अभंगसुद्धा त्याच तन्मयतेने ऐकले. इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे मराठीचा इतका प्रसार झाला, हे माझ्या मते त्या माध्यमाचे सर्वात मोठे यश आहे. हे माध्यम अगदी दुर्गम भगातही पोहोचले आहे आणि आता तर ते सातासमुद्रापलीकडेदेखील पाहिले जाते व ते पाहणाऱ्या लोकांची संख्या काही कोटींच्या घरात आहे. या माध्यमामुळे मराठीचा नकळत का होईना पुष्कळ प्रसार झाला आहे. या प्रभावी माध्यमामध्ये काम करणाऱ्यांनी जाणीवपूर्वक काम केले पाहिजे व तशी आपली नम्र विनंती व आग्रह असला पाहिजे।

तेच मराठी सिनेमाबाबत म्हणता येईल. मल्टिप्लेक्समुळे उच्चभ्रू मराठी समाजाची एक पिढी मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग म्हणून तयार झालेली आहे आणि ‘श्वास’च्या मोठय़ा यशाने मराठी चित्रपटसृष्टीनेसुद्धा एक नवीन श्वास घेतला आहे. अजून कितीतरी दर्जेदार मराठी साहित्य असं आहे, की त्यावर चित्रपट निर्मिती होऊ शकते व ते आपल्या या नवीन पिढीसमोर आणि जगभरातील मराठी माणसांपुढे ठेवता येईल. आपल्या या प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटांबरोबरच इतर भाषेमधील चांगले चित्रपट मराठी भाषेत डबिंग करून प्रदर्शित व्हायला पाहिजेत, म्हणजे आपली ही पिढी एक चांगला चोखंदळ प्रेक्षक म्हणून तयार तर होईलच, पण मराठी भाषेचा प्रसार चांगल्या प्रकारे होऊ शकेल।

येणाऱ्या गुढीपाडव्याला मराठीची पताका घेऊन कुठलाही न्यूनगंड न बाळगता, प्रचंड आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद बाळगून, आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारून आपले तरुण, तरुणी आणि संपूर्ण मराठी समाज उदंड उत्साहात, एका नव्या उमेदीने आणि निश्चयाने रस्त्यारस्त्यावर उतरलेला दिसेल! मराठी दिन किंवा कुठलाही मराठी सण हे फक्त मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्यापुरते मर्यादेत न ठेवता, त्याला एक प्रोग्रेसिव्ह मराठी समाज घडविण्याच्या दृष्टीने एक निर्णायक पाऊल म्हणून बघायला पाहिजे. ‘प्रोग्रेसिव्ह मराठी समाज’ हेच आपले स्वप्न असायला पाहिजे! ज्या वेळी आपला संपूर्ण मराठी समाज अशा ‘विचाराने’ मिल्यनेअर होईल, त्या दिवशी मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी साहित्याला ऑस्कर मिळेल! आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून येईल- जय हो!!

1 comment:

Anonymous said...

संवादाची गरज भीसली तरच भाषेचा विचार होऊ शकतो.