Monday, May 4, 2009

मराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स!

मागील लेखात येत्या १० वर्षांत ‘मोस्ट पॉवरफुल’ सीईओंच्या यादीमध्ये किमान १० सीईओ हे मराठी असायला हवेत आणि १०० अग्रगण्य भारतीय कंपन्यांच्या यादीमध्ये किमान पाच मराठी उद्योगसमूहांचा समावेश असायला हवा आणि निदान त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत असा विचार मी मांडला। मराठी उद्योगजगतात फर्स्ट जनरेशन उद्योजक/ प्रोफेशनल्स मग ते मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील असो की कुठल्याही सव्र्हिस इंडस्ट्रीजमधील आज त्यांची झेप मोठी नसली तरीही त्यांचा कामाचा झपाटा फार मोठा आहे. एका जिद्दीने ते उभे आहेत व एक दिवस आपला येईल या दृढ विश्वासावर ते जगत आहेत. कुठलीही चर्चा करण्यापूर्वी आपल्या या फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्सचं आपण मनापासून अभिनंदन आणि कौतुक करायला पाहिजे.  (संपुर्ण लेख वाचण्यासाठी लेखाच्या शिर्षकावर क्लिक करा...........)मध्यम आकाराच्या उद्योगांत मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा सव्र्हिस इंडस्ट्रीजचा वाटा मोठा आहे व त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे। आपल्या जीडीपीत सव्र्हिस इंडस्ट्रीचा वाटा १९५० मध्ये केवळ १५ टक्के इतकाच होता. तो २००८ मध्ये वाढून ५७ टक्के झाला हे फारच महत्त्वाचं आहे. सव्र्हिस इंडस्ट्रीमध्ये आयटी, मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट (टीव्ही चॅनेल्स ते इव्हेंट मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशन्सपर्यंत), हॉस्पिटॅलिटी (ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम हॉटेल्स), बँकिंग, रिटेल, इन्शुरन्स, बांधकाम व्यवसाय ही क्षेत्रे खूप वेगाने वाढत आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीबद्दलची चांगली आणि उपयोगी माहिती http://business.mapsofindia.com/ वर उपलब्ध आहे. सव्र्हिस इंडस्ट्री मुख्यत्वेकरून नॉलेज बेस्ड आहे व त्यात आपले मराठी तरुण शिक्षणात, गुणवत्तेत आणि कल्पकतेत कुठेही कमी पडत नाहीत. म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी नोकरीसाठी धडपड करत बसण्यापेक्षा सव्र्हिस इंडस्ट्रीत येऊन एखादा प्रोजेक्ट करायला काही हरकत नाही. आज इन्टरनेटच्या युगात माहितीचा पूर आलेला आहे. प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान कॉम्प्युटरच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्याचा पुरेपूर वापर झालाच पाहिजे.

फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्सना सुरुवातीच्या काळात भेडसावणारे सगळे प्रश्न अगदी टाटापासून रिलायन्सपर्यंत आणि आजच्या आघाडीच्या इन्फोसिसलासुद्धा त्यांच्या सुरुवातीच्या काळात भेडसावले होते! त्याचा बारीक अभ्यास व्हायला पाहिजे. त्यांनी असं काय केलं की ते आज टॉपला आहेत हे शोधून काढलं पाहिजे! यशाचं गमक जर एकाच शब्दात द्यायचं झालं तर मी पुन्हा म्हणेन ‘प्रोफेशनल अप्रोच’ ज्याला आपण ‘व्यावसायिक दृम्ष्टिकोन’ असं म्हणतो! सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ‘चलता है’ अॅटिटय़ूडने तुमचा उद्योग फक्त चालतच राहणार. तो प्रगतीच्या एक्स्प्रेसवेवर कधीच धावू शकणार नाही. प्रोजेक्ट कितीही चांगला वाटला तरी त्याला अमलात आणण्यासाठी लागणारी कल्पकता, शास्त्रोक्त व्यावसायिक ज्ञान आणि अनुभव असणं फार गरजेचं आहे. तपशीलवार नियोजन - डिटेल्ड प्लानिंगमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आज मॅनेजमेंटची भरपूर इन्स्टिटय़ूट्स आहेत, पुस्तकं आहेत, मॅनेजमेंट कंसल्टंट्स आहेत. त्यांचा पुरेपूर उपयोग मराठी उद्योजकांनी केला पाहिजे. उत्तुंग इमारतींचे मजले हे शास्त्रोक्त पद्धतीनेच चढवले जातात व जितकी उंच इमारत तितका पाया खोल!

प्रोफेशनल अॅप्रोचची सुरुवात ही कुठल्याही उद्योग किंवा व्यवसायाच्या नावापासून होते. आपण म्हणतो नावात काय आहे! औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीचा काळ वेगळा होता, म्हणून माणसांच्या नावांनीच उद्योग सुरू झाले. उदा फोर्ड, ओटीस, मर्सडिस, टाटा, गोदरेज, बजाज; पण आज मार्केटिंगचं युग आहे. आज प्रोडक्ट्सना व उद्योगाला साजेल अशा नावानेच उद्योग सुरू करावा लागेल. मुख्य प्रोडक्टस्च ब्रॅण्ड आणि कंपनीचं नावदेखील तेच असेल तर मार्केटिंगवर दुप्पट खर्च होणार नाही. उदा. कोलगेट, LG, Samsung. तेच नाव प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर असणार म्हणजे तुमच्या उद्योगाचं/ प्रोफेशनल मार्केटिंग हे नकळतपणे तुमच्या प्रत्येक भेटीपासून सुरू होत जातं. प्रत्येक वेळी तुम्हाला फोन करताना तुमचं ‘व्हिजिटिंग कार्ड’ बघितलं जातं. म्हणजे ‘व्हिजिटिंग कार्ड’ हे एका अर्थानं तुमच्या उद्योगाचं ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर म्हणून काम करणार आहे! यावरून तुमच्या लक्षात येईल की क्षुल्लक वाटणारं व्हिजिटिंग कार्डसुद्धा चांगलं असणं किती महत्त्वाचं आहे. छोटी छोटी कामेसुद्धा तपशीलवार करणे गरजेचं आहे. नव्हे तशी सवयच तुमच्या हातांना असली पाहिजे. त्यावरून तुमची काम करण्याची पद्धत लोकांपुढे नकळतपणे ठेवली जाते.

मार्केटिंगच्या आजच्या युगातील आणखी एक महत्त्वाचं टुल म्हणजे वेबसाइट। तुमचा उद्योग किंवा प्रोफेशन कितीही लहान असो, तुमची स्वत:ची पूर्ण माहिती देणारी व आकर्षक अशी वेबसाइट असणं फार गरजेचं आहे. जागतिक बाजारपेठेत वेबसाइट ही तुमच्या उद्योग/ प्रोफेशनचं एक व्हिजिटिंग कार्ड आहे असंच समजा! वेबसाइटवर किती डेटा अपलोड केलेला आहे. त्यापेक्षा तुमची स्वत:ची वेबसाइट व तुमच्या कर्मचाऱ्यांचे ईमेल अकाऊंट असणं हेच फार महत्त्वाचं आहे. मीडिया अॅण्ड इंटरटेन्मेंटमधील प्रत्येक मराठी सेलिब्रेटींनीसुद्धा स्वत:ची वेबसाइट करावी. स्वत:चं बेंचमार्क स्वत:च ठरवणं फार महत्त्वाचं आहे! वेबसाईट अपडेट करत राहायला मात्र विसरू नका.

फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशल्सना सुरुवातीच्या काळात भेडसावणारे मुख्य प्रश्न म्हणजे, (१) भांडवल (२) मनुष्यबळ आणि (३) जनसंपर्क (Public Relations).

भांडवलासाठी कुणाकडेही जाताना सर्वप्रथम प्रोजेक्ट बिझिनेस प्लॅन हे फायनान्शियली व्हायेबल आहे की नाही हे तपासणं फार महत्त्वाचं आहे। हे करताना सरकारच्या वेगवेगळ्या टॅक्स बेनिफिट्स आणि इन्सेंटिव्ह योजना आहेत त्या नीट समजून घ्या। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर लागणारी अंगमेहनत आणि पैसा याला योग्य मोबदला मिळणार नसेल तर प्रोजेक्ट हे फायनान्शियली व्हायेबल नाही म्हणून समजा. एखादा प्रोजेक्ट मनापासून आवडला म्हणून करू नका, be objective and more practical! इथं इमोशनल होऊ नका. आज भांडवलासाठी पारंपरिक कर्जाशिवाय प्रायव्हेट इक्विटीचा आणि व्हेन्चर कॅपिटलचा पर्याय उपलब्ध आहे, पण त्यांच्या अटी नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्याच बँकात SME लोन आणि मायक्रो फायनान्स उपलब्ध आहे. कुठल्याही भांडवलासाठी पेपरवर्क जरी किचकट असलं तरी ते पूर्ण करावंच लागेल. इन्व्हेस्टर न आवडणारे प्रश्न विचारणारच, तो त्याचा अधिकारच आहे. कठीण प्रश्न म्हणजे तुमच्यावर अविश्वास किंवा तुमचा अपमान नव्हे! तुमची आणि प्रोजेक्टविषयीची तो पूर्ण माहिती मागणारच. भांडवलाबरोबर शिकलेली, अनुभवी, प्रामाणिक आणि मेहनती अशी सर्व गुणसंपन्न माणसं सुरुवातीला मिळणं थोडं कठीण आहे. पण जर चांगला दृष्टिकोन (राइट अॅटिटय़ूड) व प्रामाणिकपणे काम करणारी माणसं मिळाली तर त्यांना शिकवता येतं. अनुभव देता येतो हे लक्षात घ्या. अशा ह्य़ूमन कॅपिटलवर वेळ आणि पैसा इन्व्हेस्ट केला तर रिटर्न हमखास चांगले मिळणार याची खात्री बाळगा. सव्र्हिस सेक्टरमध्ये ह्य़ुमन कॅपिटल हे तुमचं प्लांट आणि मशीनरी आहेत! माणसं नुसती घडवून चालणार नाही, तर घडवलेली माणसं टिकवता आली पाहिजे. मनुष्यबळाला तुमच्या नेतृत्व गुणांनी सतत प्रेरित ठेवावं लागेल व योग्य व्यक्तीला योग्य प्रोत्साहन, मोबदला आणि सन्मान हा व्यवसायाचा नियमच असला पाहिजे.

मराठी उद्योजक हा इतर समाजातील उद्योजकांच्या तुलनेत जनसंपर्कात कुठेतरी कमी पडतात असं वाटतं. त्यामुळे नकळतपणे उद्योगाच्या यशात मुख्य असलेल्या मार्केटिंगवर त्याचा परिणाम होतो. तुम्ही किती लोकांना भेटता यापेक्षा कोणाला भेटता हे महत्त्वाचं आहे. इथं मला मुद्दाम नमूद करावंसं वाटतं की गुजराथी लोकांचा मोकळेपणा, मदतशीलता आणि आदरातिथ्य आपण शिकलं पाहिजे. फोनवरून प्रेमाने आणि आदराने बोलायला अधिक पैसे लागत नाहीत! तोंडातून निघालेल्या प्रत्येक शब्दातून आणि हाताने केलेल्या प्रत्येक कृतीतून माणसं जोडली गेली पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीचा आणि त्याच्या विचारांचा आदर हा व्हायलाच पाहिजे. आज जगात कसं वागावं याचंसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण उपलब्ध आहे. यशासाठी असं ज्ञान जर इतर समाजातील लोकं मिळवत असतील तर ते आपण का आत्मसात करायचं नाही? वाईट अनुभव सगळ्यांच्याच वाटय़ाला येतात, कदाचित तुमच्या वाटेला ते जास्त असतील, म्हणून भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अगदी काटेकोरपणे तपासूनच घेतलं पाहिजे असा नियम करू नका.

आज भांडवल, मनुष्यबळ, जनसंपर्क, मार्केटिंग, टेक्निकल कोलॅबरेशन्स आणि इतर गोष्टींसाठी बरेच प्रोफेशनल सल्लागार कार्यरत आहेत पण खरं तर मराठी उद्योजकांसाठी हक्काची अशी एक कायमस्वरूपी व्यवस्था असणं फार गरजेचं आहे जी माफक दरात चांगला सल्ला देऊ शकेल व त्यांचा व्यवहार पारदर्शक असेल। त्याचबरोबर आज कुठल्याही टेक्निकल नॉलेजपेक्षा मराठी उद्योजकांना थोडं प्रोत्साहन, त्यांच्या मेहनतीचं व गुणांचं कौतुक आणि आपुलकीचे दोन शब्द जरी मिळाले तरी ते जग जिंकू शकतात, कुठल्याही स्पर्धेला आणि संकटांना तोंड देऊ शकतात.

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे आज आघाडीवर जाण्यासाठी (१) लेटेस्ट प्रोडक्टस् (२) अग्रेसिव्ह मार्केटिंग आणि (३) प्रोफेशनल मॅनेजमेंटसाठी स्वत: जातीनं लक्ष द्यावं लागेल. पण सुपरलेटिव्ह ग्रोथसाठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्सना कल्पक विचारशक्ती creative thinking चा वापर करावाच लागेल. सुपरलेटिव्ह ग्रोथचे जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे वॉल्ट डिस्नेनी १९२८ मध्ये एका कागदावर काढलेलं मिकी माऊसचं साधं कार्टून! आज हाच किमी माऊस वॉल्ट डिस्ने कंपनीसाठी करोडोंचा व्यवहार करतो व लाखो लोकांचे पोट भरतो. कल्पकतेचं दुसरं उदाहरणं म्हणजे मद्रासचे सी. के. रंगनाथन, ज्यांनी १९८३ साली १५००० रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेली केविनकेयर ही कंपनी आज ५०० कोटींची आहे! त्यांनी श्रीमंत लोकांचा श्ॉम्पू एक रुपयाच्या छोटय़ा सॅशे (पाऊच) मधून मार्केट करून करोडो मध्यमवर्गातील लोकांना तो वापरायला लावला आणि श्ॉम्पू बनविणाऱ्या सगळ्या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या मार्केटिंगचे कायदे बदलवून टाकले. म्हणजे प्रोडक्ट एक व मार्केट दोन उच्च आणि मोठा मध्यमवर्ग! तसंच आज आपल्याकडे केसरी टुर्सनी ‘माय फेयर लेडी’ ही एक इनोव्हेटिव्ह थीम आणून स्त्री पर्यटकांचं एक नवीन सेगमेंटच तयार केलं, त्याचबरोबर सचिन ट्रॅव्हल्स सेलिब्रेटिजना घेऊन वेगवेगळ्या टुर्स आयोजित करताना दिसतात. अशा नावीन्यपूर्ण मार्केटिंगमुले प्रवास करणाऱ्यांमध्ये एक उत्साह तर निर्माण होतोच पण व्यवसायाला एक वेगळी प्रतिष्ठा पण मिळते. कालच एक बातमी वाचली की हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेता टॉम ऑल्टर हा मराठी रंगभूमीवर काम करणार आहे. आज आपल्याकडे समृद्ध नाटय़सृष्टी व एक डझन मराठी टिव्ही चॅनेल्स आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात चांगले मराठी लेखक, तंत्रज्ञ आणि कलाकारांची एक नवीन पिढी तयार झालेली आहे. आज ते इतर भाषेमध्ये थोडं काम करतात पण जर आपल्या मराठी कलाकारांनी मराठीबरोबर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्सवर त्यांची पकड घट्ट केली तर त्यांना आणखी ३५ ते ४० चॅनेल्सचं मोठं विश्व सहज उपलब्ध होऊ शकतं! खरं तर सुपरलेटिव्ह ग्रोथ हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

आज इतकंच म्हणता येईल की प्रगतीच्या एक्स्प्रेसवेवर यशस्वी होण्यासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे की वेटिंग पिरियड आणि स्ट्रगल- संघर्ष हा प्रत्येकाच्याच वाटेला आलेला आहे आणि तो यापुढेही प्रत्येकाच्या वाटेला येणारच आहे। वयाच्या ६७ व्या वर्षी थॉमस एडिसनची कंपनी संपूर्ण जळून खाक झाली तरी न डगमगता ते म्हणाले की, ‘बरं झालं माझ्या सगळ्या चुका जळून गेल्या आता मी एक नवीन सुरुवात करू शकतो!’ व तीन आठवडय़ांनंतर त्यांनी ग्रामोफोनचा शोध लावला! यशस्वी माणसं चमत्काराची वाट बघत बसत नाही तर ते धैर्य आणि कर्तृत्वाने चमत्कार घडवतात! मराठी उद्योग मागे का पडतात याविषयी लिहायचं म्हटलं तर पु. ल. देशपांडेंच्या भाषेत शाई आणि कागदाचे असंख्य कारखाने चालू शकतील. पण मला खात्री आहे की आपल्या नवीन पिढीचे तरुण उद्योजक आणि प्रोफेशनल्स स्वकर्तृत्वाने असे कारखाने पूर्णपणे बंद करतील! आज संपूर्ण मराठी समाज तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून ‘चल लढ म्हणायला’ तयार आहे! मार्केटिंगच्या भाषेतच बोलायचं झालं तर Nike च्या ब्रीदप्रमाणे just do it!

नितीन पोतदार

2 comments:

मराठी आवाज said...

अगदी योग्य मुद्दे मांडलेत. आवडलं मला.

MeeKuchin said...

Dhanyawad Nitin sir. This article really inspired me. I would start working towards fulfilling my old dream - my own industry.