Monday, June 8, 2009

जय महाराष्ट्र!


१ मे २००९ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेला ४९ वर्षे पूर्ण होऊन महाराष्ट्राने ५०व्या वर्षांत पदार्पण करीत असताना राज्याच्या माहिती आणि नियोजन विभागाने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेवर जागतिक मंदीचा मोठा परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढला. शेती व औद्योगिक उत्पादनातही मोठय़ा प्रमाणात घट झालेली आहे. त्यात दाखवलेली खरी


धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन दशकांत मराठी माणसांची राज्यातील टक्केवारी जवळपास आठ टक्क्यांनी घसरून ६८.८ वर आलेली आहे, त्या वेळी हिंदी भाषिकांची लोकसंख्या दुपटीहून अधिक म्हणजे पाच टक्क्यावरून ११ टक्क्यांवर गेली आहे. जशा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कटू आठवणी अजूनही विसरता येत नाहीत, त्यातच वरील आकडेवारीने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. पण त्यापेक्षाही दु:खद गोष्ट कोणती असेल तर गेली ४९ वर्षे आपल्या तथाकथित विचारवंतांनी आपल्या समाजाविषयी काही अतिशय नकारात्मक प्रतिमा निर्माण करून ठेवल्या आहेत व त्या त्रिकालाबाधित सत्य असल्यासारख्या आपण त्यांनाच कवटाळून बसलो आहोत. मराठी माणूस चाकरमानी आहे, नव्हे त्याची प्रवृत्तीच चाकरमानीपणाची आहे, उद्योगात पडण्याची त्याची इच्छा नसते, गाव सोडून कुठे जात नाही, त्याला इतर समाजातील लोक ‘डाऊन मार्केट’ समजतात. तसेच सतत आपणच आपल्या मराठी बांधवांना आळशी, संकुचित वृत्ती असलेला, मराठीपणाविषयी आणि भाषेविषयी न्यूनगंड असलेला म्हणून हेटाळणी करत आहोत. दुर्दैवाने अशा प्रकारचे लेख पन्नास वर्षांनंतर आजही वाचायला मिळतात.

(संपुर्ण लेख वाचण्यासाठी लेखाच्या शिर्षकावर क्लिक करा...........)

वरील टीका ही प्रामुख्याने पुण्या- मुंबईच्या मराठी समाजाला नजरेसमोर ठेवून केलेली असते. मराठी समाज फक्त पुण्या-मुंबईत नसून खरा महाराष्ट्र ग्रामीण भागात आहे, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्याचबरोबर परदेशात वास्तव्य करणारी मराठी माणसे देखील आहेत. काही वर्षांपूर्वी आपल्या काही माणसांच्या बाबतीत ही मते खरीदेखील असू शकतात, पण संपूर्ण मराठी
समाजाला सतत एकाच ब्रशने रंगवणे संपूर्णपणे चुकीच नव्हे तर अन्यायकारक आहे. समाजसुधारकांच्या या महाराष्ट्रात जेव्हा समाजातील विचारवंत आणि लेखक सामान्य माणसांना रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांचा किंवा कुठल्याही विषयाचा नीट अभ्यास न करता टीका करतात तेव्हा समाजाला दिशा देण्यापेक्षा ते समाजाला दिशाहीन करीत असतात. मराठी माणसांच्या सुदैवाने महाराष्ट्राच्या वास्तूने अशा टीकेवर तथास्तु म्हटले नाही! अशा काही मुद्यांचा आणि त्याचबरोबर मुंबईतल्या मराठी माणसांच्या काही मूलभूत समस्या आहेत त्याचा वस्तुनिष्ठपणे ऊहापोह करणे जरूरीचे आहे म्हणून हा लेखप्रपंच. पहिला मुद्दा आहे मराठी माणूस चाकरमानी आहे, नव्हे त्याची प्रवृत्तीच चाकरमानीपणाची आहे, उद्योगात पडण्याची त्याची इच्छा नसते. सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की, जगातल्या कुठल्याही समाजात १०० टक्के लोक व्यापारी असू शकत नाहीत, अगदी गुजराती समाजातसुद्धा हे होत नाही. जे गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोक मुंबईत आणि महाराष्ट्रात व्यापारासाठी आले ते मुळात व्यापारीच होते! त्यामुळे मुंबईत या समाजातील लोक जास्त प्रमाणात व्यापारी वर्गात मोडतात. खरं तर आपल्या समाजातसुद्धा व्यापारी आणि उद्योगपती आहेत व ते फार चांगल काम करतात हे मी ठामपणे सांगू शकतो. कित्येकांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढय़ादेखील उद्योगांत आहेत.


१९६० आणि १९७० चे दशक आणि आज २००० च्या दशकात जमीनअस् मानाचा फरक आहे. या काळात सामाजिक, आर्थिक आणि उद्योगजगतात मोठे बदल झालेले आढळतात, आणि त्याचा मराठी समाजाच्या मानसिकतेतसुद्धा बदल झालेला पाहायला मिळतो, याची नोंद घेणे फार आवश्यक आहे. पूर्वी उद्योगांना मॅन्युफॅक्चरिंगशिवाय पर्याय नव्हता. ज्याला करोडो रुपयांचे भांडवल लागत होते, पण गेल्या दशकात जागतिकीकरणामुळे आणि संगणकीकरणामुळे सव्‍‌र्हिस सेक्टरमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या व त्यामध्ये स्वप्न साकारायला कल्पनाशक्ती हेच मुख्य भांडवल होते! या काळात माहितीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर मराठी माणसांनी त्यांच्या स्वकष्टाने मोठे यश मिळवले आहे. खालील दिलेल्या काही उदाहरणावरून हे स्पष्ट होईल. पूर्वी प्रख्यात मराठी नावे म्हणजे उद्योगपती म्हणून किर्लोस्कर, सिनेजगतात चित्रपती व्ही. शांताराम आणि गानकोकिळा लता मंगेशकर व क्रीडाक्षेत्रात क्रिकेटवीर सुनील गावसकरच्या पुढे मराठी नावेच जात नव्हती! आज २००९ साली आपल्याकडे, हिंदी चित्रपट क्षेत्रात नट- नटय़ांसाठी Dream Director बनलेले आशुतोष गोवारीकर आहेत, तर प्रत्येक डायरेक्टरचा बिग बजेट Dream Project फक्त नितीन चंद्रकांत देसाईच उभारू शकतात ही वस्तुस्थिती आहे! इतर दिग्दर्शकांना ‘वास्तव’ दाखवणारे महेश मांजरेकर आणि आपल्या पहिल्याच सिनेमातून सर्व ताऱ्यांना जमिनीवर आणणारे अमोल गुप्ते व नवीन नटांमध्ये श्रेयस तळपदे तळपताना दिसतात. तसेच २००४ मध्ये ‘श्वास’ने ऑस्कपर्यंत मारलेल्या मुसंडीनंतर आपल्या तरुण दिग्दर्शकांनी ‘डोंबिवली फास्ट’, ‘टिंग्या’ आणि ‘वळू’सारखे नवीन प्रयोग केले व भरपूर यश मिळवलं. फॅशन डिझायनिंगच्या जगात सर्व विक्रम मोडणारे विक्रम फडणीस! जाहिरात क्षेत्रातले भरत दाभोळकर सुनील गावसकरनंतर सचिन तेंडुलकरनी इतका विक्रम केलेला आहे की पुढच्या ५० वर्षांत तो कोणी मोडू शकणार नाही! आज जगातील आयटी क्षेत्रातल्या ५० शिल्पकारांत डॉ. विजय भटकरांचं नाव खूप मोठं आहे व त्यांचं आयटी क्षेत्रात योगदान हे प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद आहे. त्याचबरोबर टाटा इंडस्ट्रीजसारख्या बलाढय़ उद्योगसमूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर किशोर चौकर, भारतातील मर्सिडीज कंपनीचे डायरेक्टर सुहास कडलास्कर, भारतातील अग्रगण्य एचडीएफसी इन्श्युरन्सचे दीपक सातवळेकर, आयसीआयसीआय बँकेत कालपर्यंत असलेल्या ललिता गुप्ते आणि आताच्या विशाखा मुळ्ये, इंग्रजी टीव्ही न्यूज चॅनेलचे राजदीप सरदेसाई व इंग्रजी स्तंभलेखिका शोभा डे, तर लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे सीएफओ वाय.एम. देवस्थळी, रात्रीचा दिवस करून रेकॉर्ड वेळेत मुंबईचा पहिला स्कायवॉक बांधणारी ‘दास ऑफशोर’ ही कंपनी आपल्या सांगलीच्या अशोक खाडे यांची, तर प्रायव्हेट कुरीयरमध्ये सगळ्या मल्टिनॅशनल कंपन्यांना विचार करायला लावणारे ‘विचारे कुरियर’. अशी आणखी बरीच नावे आहेत, ज्यांचा उल्लेख जागेअभावी देत नाही. गेल्या दशकात सव्‍‌र्हिस सेक्टरमध्ये ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम व आय.टी.पासून बांधकाम व्यवसाय ते अत्याधुनिक इंजिनीयरिंगपर्यंत, फॅशन डिझायनिंगपासून इव्हेन्ट मॅनेजमेंटपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या, कल्पकतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर जागतिक स्पर्धेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.


दुसरा मुद्दा सांगितला जातो, मराठी समाजाला इतर लोक डाऊन मार्केट समजतात. कारण त्यांची खरेदीशक्ती कमी असते. अशी टीका करणाऱ्यांना हे माहीत असलं पाहिजे की १९८० च्या दशकात जिथं सरकारी एक मराठी चॅनेलसुद्धा धड चालत नव्हतं, तिथे आज डझनभर मराठी टीव्ही चॅनेल्स आहेत आणि मुख्य म्हणजे बिगर मराठी माणसांची आहेत व सर्व नफ्यातदेखील आहेत! मराठी समाज जर डाऊन मार्केट असता तर झी आणि स्टारने मराठीत प्रत्येकी तीन चॅनेल्स सुरू केले नसते! तसेच आज झी सिनेमा आणि रिलायन्ससारखे मोठे उद्योगसमूह मराठीत सिनेमा तयार करायला तयार झाले नसते! मराठी माणसांच्या खरेदीशक्तीच्या तुलनेत गुजराती समाजाची खरेदीशक्ती नक्कीच जास्त आहे, तर मग गुजराती वृत्तपत्रांना व अंकांना जास्त जाहिराती का मिळत नाहीत? त्यांचे आज किती टीव्ही चॅनेल्स आहेत? सगळ्यात जास्त जाहिराती इंग्रजी वृत्तपत्रांना मिळतात त्याची कारणे वेगळी आहेत व त्याचा एकूणच मराठी समाजाच्या खरेदीशक्तीशी काही संबंध नाही. काही मल्टिनॅशनल कंपन्यांच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांशी मी याविषयी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, भारत सरकार जे सेन्सेसचे आकडे जाहीर करतं ते कुठल्याही समाजाच्या आधारावर कधीच करत नाही. त्यांच्या मते कुठलाही मार्केटिंग प्लॅनर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल इतकंच विचार करतो, व हे करताना मराठी, गुजराती, मद्रासी असा वेगवेगळा विचार कधीच करत नाही. प्रोडक्ट मार्केटिंगसाठी लोकांचं वर्गीकरण हे श्रीमंत, मध्यमवर्ग आणि गरीब अशा प्रकारे केलं जातं, त्यांची जात किंवा भाषा बघून हे केलं जात नाही.

तिसरा मुद्दा सांगितला जातो की, आपण गाव सोडून कुठे जात नाही. हा तर आजच्या काळात निखालस चुकीचा मुद्दा आहे. आज केवळ दिल्लीत लाखाच्यावर मराठी लोक चांगलं काम करत आहेत. कित्येक मराठी माणसांनी अमेरिका आणि युरोपच्या आयटी, वैद्यकीय आणि फायनान्सच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात यश संपादन केलं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या सिटी बँकेचे ग्लोबल सीईओ विक्रम पंडित! हजारो मराठी इंजिनीयर्स, डॉक्टर्स व इतर प्रोफेशनल्स आज कित्येक र्वष परदेशात यशस्वीपणे व्यवसाय करत आहेत. आपले हेच मराठी बांधव आपली भाषा, सण आणि संस्कृती टिकून राहावी म्हणून प्रत्येक सणवार आपापल्या परीने उत्साहात साजरे करतात व महाराष्ट्राच्या सामाजिक आणि साहित्यिक चळवळींशी इमेल्स आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून संबंध टिकवताना दिसतात. त्यांचं तोंड भरून कौतुक न करता त्यांच्या या प्रयत्नांवर टीका करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे.

आज इतकं यश आपण पाहिलं असताना मिळालेल्या यशाचे कौतुक करून व त्याच्या यशातून प्रेरणा घेण्याचं सोडून मराठी माणूस व्यापारात मागे का अशी चर्चा वृत्तपत्रातून काही लोक सतत करीत असतात. वस्तुस्थितीचा नीट अभ्यास न करता मराठी माणसांवर सतत टीकाच करण्यापेक्षा आजची परिस्थिती पाहता आपण सगळ्यांनी मिळून मराठी समाजाच्या विविध स्तरांतील लोकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच ही टीका करताना ती समाजाच्या कोणत्या वर्गासाठी आहे, तो वर्ग एकूण मराठी समाजाच्या किती टक्के आहे याचाही खुलासा लेखकांनी केला पाहिजे. आणि या वर्गासमोर जगासमोर केलेली टीकासुद्धा फार संयमाने आणि सकारात्मक दृष्टीनेच व्हायला पाहिजे. विचारवंताच्या प्रत्येक टीकेतसुद्धा काहीतरी निर्माण करण्याचं सामथ्र्य असलं पाहिजे!

तसेच इंग्रजी भाषेच्या भीतीमुळे मराठी मुले अनेक क्षेत्रात मागे पडतात आणि म्हणून त्यांच्यात व एकूणच मराठी समाजात न्यूनगंड आहे अशी टीका केली जाते. आज जागतिकीकरणाच्या आणि संगणकीकरणाच्या लाटेत इंग्रजीला नको इतके महत्त्व प्राप्त झालेले आहे व त्यामुळे जगातल्या हजारो इतर भाषांचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे व त्यामुळे जगातल्या हजारो इतर भाषांचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे व त्याला मराठी अपवाद नाही. मराठी ही भाषा ज्ञानभाषा करण्याकडे आपला कल असायलाच हवा आणि नवीन आणि सकस मराठी साहित्यसुद्धा निर्माण व्हायलाच पाहिजे, पण आज जर जगात इंग्रजी भाषाच व्यवहाराची भाषा म्हणून वापरात येणार असेल आणि इतर समाजातील लोक इंग्रजीचा वापर करून स्वत:ची प्रगती साध्य करून घेत असतील, तर निदान व्यवहारात यश मिळविण्यासाठी तरी आपल्याला इंग्रजीचा वापर करावाच लागेल यात कुणाचेही दुमत असू शकत नाही. खरी गरज आहे ती मराठी माध्यमांच्या शाळेत अगदी इयत्ता पहिलीपासून चांगले दर्जेदार इंग्लिश शिकविण्याची व महाराष्ट्रात प्रत्येक इंग्लिश शाळेत इयत्ता पहिलीपासून दर्जेदार मराठी शिकविण्याची. इंटरनेट आणि दूरदर्शनसारख्या प्रभावी माध्यमांचा मराठी भाषेचा चांगल्या प्रकारे प्रसार करण्यासाठी झाला पाहिजे. मराठी भाषेसंदर्भात याच महिन्यात विजय तेंडुलकरांची एक मुलाखत ग्रंथाली चळवळीच्या रूची अंकामध्ये पुनर्मुद्रित केली आहे, ती फारच बोलकी आहे. त्यात ते म्हणतात की‘‘ ज्यांच्याविषयी विचार करायला पाहिजे असे याहून गंभीर प्रश्न असताना ते सोडून तुम्ही भाषेचा प्रश्न सुप्रीम का मानताय मला कळत नाही. बरे, टेक्नॉलॉजी आणि इतक्या नव्या गोष्टी येताहेत की मराठी शुद्ध राहणे शक्य नाही. त्यात अनेक शब्द, अनेक वाक्यं इंग्रजी येतील यात दु:ख करण्यासारखे काय आहे? मला वाटते, हे सगळे भलतेच कुठेतरी चाललेले आहे.
छोटय़ा माणसाचे आज काय होते आहे, त्याला भवितव्य आहे की नाही, याविषयी नाही बोलायचे? ते मुळात त्यांना माहीत नसावे.’’ तेंडुलकर पुढे असेही म्हणतात, ‘‘आमची पोरे आम्ही कुठे शिकायला पाठवली यावर मराठीचे भवितव्य कसे काय अवलंबून आहे?’’


मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा विचार करताना मुंबईतील मराठी माणसांची दुखरी नसदेखील समजावून घेतलीच पाहिजे. मुंबई म्हणजे अनेकांना संधी देणारे, त्यांची भरभराट करणारे शहर आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, खुद्द इथल्या मराठी माणसाला मात्र आपण मेनस्ट्रीमपासून बाजूला फेकलो गेलो आहोत असे वाटते व त्यासंबंधीच्या प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. आणि येत्या ५० वर्षांत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जर टिकवायचा असेल तर मुंबईतल्या मराठी माणसांच्या हातात चांगल्या प्रमाणात आर्थिक सत्ता, अधिकार आणि हक्काचे घर येणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने तीन गोष्टी करण्याची नितांत गरज आहे :

(१) मराठी तरुण- तरुणींना चांगल्या करियरसाठी लागणाऱ्या योग्य मार्गदर्शनासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे. मी तर म्हणेन की आपल्या अभ्यासक्रमातच इयत्ता आठवीपासून करियरसंबंधीची उपयुक्त माहिती देणे गरजेचे आहे.


(२) नोकऱ्या किंवा किरकोळ व्यवसायापलीकडे जाऊन मराठी माणसांना मोठय़ा प्रमाणात उद्योगात कसे आणता येईल व जे आज उद्योगात आहेत त्यांना आणखी मोठे कसे करता येईल याचा गांभीर्याने विचार करणे. करिअर मार्गदर्शन किंवा उद्योजकांना लागणारी मदत ही आंबा महोत्सवासारखी हंगामी स्वरूपाची असून चालणार नाही, ती कायमस्वरूपाचीच असायला हवी व ती देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. आणि शेवटी

(३) मुंबईत अजूनही चाळीचाळीत, दहा बाय दहाच्या खोलीत गेल्या ५० ते ६० वर्षांपासून राहणाऱ्या मराठी बांधवांना चांगले घर देऊन त्यांच्या पुढच्या पिढीला त्याच ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत राहता येईल अशी व्यवस्था करणे. जे मराठी बांधव मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीतून संक्रमण शिबिरात (ट्रान्झिट कॅम्पमध्ये) मुंबईतून बाहेर फेकल्या गेले आहेत त्यांना त्यांच्या पूर्वीच्याच जागेत घर मिळाले पाहिजे. आज म्हाडाच्या काही शेकडा घरांसाठी लाखोंच्या संख्येने फॉर्मस् मराठी लोकांनी भरले यावरून प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येत. कापड गिरण्यांच्या जमिनींच्या विकासाच्या नावाखाली संपूर्ण मध्य मुंबईत मॉल उभे राहिले आणि उरलासुरला गिरणी कामगार बाहेर फेकला गेला. आता Cluster Development च्या नावाखाली काही बिगरमराठी बिल्डर्स संपूर्ण मुंबईच विकत घेण्याची तयारी करीत आहेत. इथे जे इमले उभे राहतील त्यात मराठी माणसांना घर घेण्याची ऐपत असली तरी, मांसमच्छी खाणारे म्हणून त्यांना दूर ठेवण्यात येईल हे लक्षात घ्या. पारसी समाजाने जर १९३४ साली कुलाबा येथे ‘खुसरो बाग’, भायखळा येथे ‘रुस्तम बाग’, नेपियन्सी रोडवरील ‘गोदरेज बाग’ व ताडदेव आणि दादरला ‘पारसी कॉलनीज्’च्या नावाने हजारो पारसी लोकांसाठीच घरांच्या कॉलनीज् बांधल्या, तर मराठी म्हणजे फक्त मराठी माणसांसाठीच मुंबईमध्ये राहायला कॉलनीज् महाराष्ट्र सरकार का बांधू शकत नाही? कदाचित १९५० ते १९६५ सालापर्यंत असे करण्याची गरज नव्हती, पण आज जेव्हा मराठी माणसांना साधे वन रूम किचन घेण्यासाठीसुद्धा जर कर्जत, कसारा आणि वसई, विरारला जावे लागत असेल, तर अशा वेळी मुंबईतील ठराविक चटई क्षेत्र फक्त मराठी माणसांसाठीच राखून ठेवायला काय हरकत आहे? सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर मध्य मुंबईत आणि दक्षिण मुंबईत जिथे मूळ मराठी माणसं होती तिथे मोठय़ा प्रमाणात त्यांच्यासाठी उंच वसाहती का बांधल्या जाऊ नयेत? जर संपूर्ण धारावी आणि भिवंडी अनधिकृतपणे बांधल्या जाऊ शकतात तर कशाला आपणोरक चं गणित करतोय? मुंबईशी काडीचाही संबंध नसताना ज्या परप्रांतीयांनी मुंबईतील सर्व फूटपाथ व मोठमोठय़ा सरकारी जमिनीवर अनधिकृत झोपडपट्टय़ा बांधून त्याच्याच बदल्यात आज मुंबईत फुकट जागा मागणार असतील तर कुठल्या डेव्हलपमेंट प्लानचा आपण विचार करतोय?


चार पिढय़ा इथं राहिलेल्या मराठी माणसांना हक्काने जागा मिळत नसताना कुणीही यावे आणि म्हाडा किंवा MMRDA च्या घरात राहावे हे कसे शक्य आहे? MMRDA ने बांधलेल्या प्रत्येक घरात फक्त मराठी माणसांचेच १०० टक्के रिझव्‍‌र्हेशन असायला पाहिजे. मुंबईच्या पुनर्रचनेत इथे पिढय़ान्पिढय़ा राहणाऱ्या मराठी माणसांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी आपल्या सगळ्यांचीच भूमिका असली पाहिजे. ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे निर्णायकी पाऊल असेल हे लक्षात घ्या! खरं तर सर्व मराठी बिल्डर्सनीच एकत्र येऊन क्लस्टर विकासासाठी ‘ना नफा ना नुकसान’ या तत्त्वावर मराठी माणसांसाठी घरे बांधायला पुढे यायला पाहिजे. आज वजनदार मराठी नेते सर्वच पक्षांमध्ये आहेत व त्यांना मुंबईतल्या मराठी माणसांचे प्रश्न चांगलेच माहीत आहेत, त्यांनी हा प्रश्न राजकारणापलीकडे जाऊन एकदा तरी पाहावे. निवडणुका येतील आणि जातील मतांचे राजकारण करण्यासाठी इतर पुष्कळ विषय आहेत! खरे तर या प्रश्नावर पहिले आंदोलन हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात होणे गरजेचे आहे, रस्त्यावर नव्हे, कारण रस्त्यावरची लढाई जिंकून तहात हरणे आपल्याला परवडणारे नाही! आज गरज आहे ती फक्त एका
जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची!

काही वर्षांपूर्वी मराठी दूरदर्शनवर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे नेते एसेम जोशी यांना तुम्हाला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवता आला का? असा थेट प्रश्न माधव गडकरींनी विचारला होता. त्यावर एसेम म्हणाले की, ‘आजचे प्रश्न कदाचित उद्या सुटतील, उद्या नवीन निर्माण होतील, समाज हा बदलतच राहणार, सगळे प्रश्न सुटलेला समाज माझ्या माहितीप्रमाणे जगात कुठेही नाही.’ संतांच्या आणि समाजसुधारकांच्या या भूमीत आज पोटतिडकीने आपले प्रश्न सोडवण्यासाठी एसेमसारखी ऋषितुल्य माणसे आपल्यात नसली तरी सुदैवाने मराठी समाजाची प्रतिभा अजून शाबूत आहे, गरज आहे ती स्वच्छ प्रतिमा असलेल्या राजकर्त्यांची! जय महाराष्ट्र!!

Nitin Potdar : 99309 54747

3 comments:

नरेन्द्र प्रभू (Narendra Prabhu) said...

मराठी मनाला उभारी देणारा दर्जेदार लेख, सद्यपरीस्थीतीचं यथायोग्य परिक्षण. छान लिहीत रहा.

Vijay Deshmukh said...

khupach chaan... asech lihit raha

shubheccha

jayant said...

Your article in Loksatta on 4th Jan,2010 was very nice . We should have a group to help this networking

Jayant Vidwans