Monday, July 13, 2009

'भारत निर्माण' - करोडों रुपयां पेक्षा गरज आहे स्वच्छ हातांची!

'भारत निर्माण’ हे यंदाच्या अर्थसंकल्पाचे मुख्य आकर्षण. त्यावरच भर देऊन, अर्थसंकल्पाच्या आकडेमोडीत न जाता काही मूलभूत प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी व सकारात्मक काही तरी घडावं अशा अपेक्षेने केला गेलेला लेख प्रपंच..

केंद्रीय अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी २००९-२०१० सालासाठीचा अर्थसंकल्प संसदेला सादर करून आज एक आठवडा उलटलेला आहे. दरवर्षीप्रमाणे गेली साठ वर्षे अशा चर्चेत, सरकारी पक्ष अर्थसंकल्पाची स्तुती करतो, विरोधी पक्ष त्याच्या विरोधात बोलतो, मोठे उद्योगपती अर्थमंत्र्यांच्या गुड बुकमध्ये राहण्यासाठी त्याला गुड म्हणतात. सामान्य माणसं वृत्तपत्रांत काय काय वस्तू स्वस्थ होणार याची यादी तपासून बघतात. यापलिकडे काहीही घडत नाही. काल झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण तरुण खासदारांना निवडून दिलं, पण त्यातला एकाही खासदार अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना दिसला नाही, ही फारच निराशाजनक गोष्ट आहे. अशा या गदारोळात मराठी माणसांसाठी चांगलं काय घडलं असेल तर मी म्हणेन की सर्व इंग्रजी खासगी वृत्तवाहिन्यांपेक्षा मराठी वृत्तवाहिन्यांवरची (आणि मराठी वृत्तपत्रांतीलही) अर्थसंकल्पाविषयीची चर्चा आणि विश्लेषणं फारच उच्च दर्जाची होती. खास करून बजेट जितके मोठय़ा उद्योगपतींसाठी असते तितकेच ते सामान्य माणसांसाठीसुद्धा असते अशा जाणीवेने त्यांनी चर्चा केली म्हणून आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पुढील वर्षी अर्थसंकल्पाच्या निदान एक आठवडाआधी अशी चर्चा सुरू व्हावी अशी अपेक्षा आहे.