Thursday, October 6, 2011

सीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)

६ ऑक्टोबर २०११:   आज विजयादशमी - दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!  विचारांच सोन लुटायच असेल तर आपला मित्र परिवार मोठा असला पाहिजे.   आठवड्यातुन नाहीतर किमान महिन्यातुन एक तरी नविन ओळखं किंवा मित्र जोडायलाच पाहिजे असा नियमच केला पाहिजे. आणि जर नविन ओळखं नाही झाली तर आपल्या जुन्या मित्रां पैकी एकाला तरी आठवणीने आतमीयतेन आणि प्रेमाने भेटलं पाहिजे.  आपण एक पाउल पुढे टाकुन सीमोल्लघंन तर करुया!  मित्रांची बॅंन्क बॅलन्स ही खरी दौलत असते अस मी समजते.  बघा तुम्हाला पटतं का?    "सीमोल्लंघन" - हा माझा सगळ्यात आवडता लेख वाचकांसाठी पुन्हा देत आहे.  घन्यवाद.  

*****************

‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणजे नेमकं काय हे आपण मागील लेखात (१४ सप्टेंबर) वाचलंत. आपण नेहमी आपला ‘बँक बॅलन्स’ बघतो, आपल्या उद्योगाची किंवा व्यवसायाच्या जमा-खर्चाची ‘बॅलन्सशीट’ बनवितो आणि त्याचं नेटवर्थ बघतो, तसं आपण आपल्या ‘बिझनेस नेटवर्क’चे नेटवर्थ बघतो का? नाही! कारण आपण आपल्या ‘नेटवर्क’ला एक ‘अ‍ॅसेट’ म्हणून कधीच बघत नाही. आपण आपल्या दाग-दागिन्यांची यादी करतो, त्याचे वेळोवेळी मूल्यांकन करतो; पण आपल्या नेटवर्कमध्ये असलेल्या माणसांची साधी यादी तरी करतो का? नाही! अनेक चांगल्या माणसांना आपण रोज भेटतो, पण कामाशिवाय त्यांची साधी माहितीसुद्धा आपण काढत नाही.  
अगदी या क्षणाला आपल्यापैकी अनेकांना बँकेतून कर्ज मिळविण्यासाठी नेमकं कोणाला भेटायचं, याची माहिती हवी असणार. आपली उत्पादनं विकायला मोठय़ा कंपनीत थेट कोणाला भेटायचे याची माहिती आपण शोधत असणार? उद्योगाला लागणारा कच्चा माल कोणाकडे चांगल्या भावात मिळेल? चांगली उत्पादने असणाऱ्यांना एखादा चांगला पार्टनर कसा मिळणार? कुणाला चांगले अनुभवी आणि विश्वासू कर्मचारी पाहिजे असतात, कुणाला इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, एक्साइजची नोटीस आली, की ओळखीचा इन्स्पेक्टर हवा असतो, आज प्रत्येक कामासाठी आपल्याला कुणाचा तरी रेफरन्स लागतोच. ज्याला आपण पूर्वी ‘चिठ्ठी’ म्हणत असू! अशा रोजच्या अनेक प्रश्नांसाठी आपल्याला उपयुक्त ‘लोकांची’ माहिती हवी असते आणि ती मिळविण्यासाठी आपण कित्येक लोकांशी संपर्क साधतो, धडपड करतो. म्हणजे रोज आपण ‘माणसां’च्या शोधात असतो!

पण ज्या शेकडो माणसांना आजपर्यंत आपण भेटलो आहोत, त्यांच्यापैकी किती लोकांशी आपण चांगले संबंध प्रस्थापित करू शकलो? त्यांच्यापैकी आपण किती लोकांची साधी माहिती तरी काढायचा प्रयत्न केला? त्यांचे घेतलेले बिझिनेस कार्ड तरी आपण नीट ठेवलेले आहे का? दिवसामागून दिवस, महिने आणि वर्ष निघून जातात आणि मग वाटतं, की ती व्यक्ती आज आपल्याला ओळख तरी दाखवेल का? जाऊ दे! आपल्याला वाईट वाटतं आणि एका चांगल्या व्यक्तीचा परिचय होऊनसुद्धा ती आपल्या अपरिचयाची होऊन बसते! त्यानंतरही आपण आपले जुने परिचय परत मिळविण्यासाठी काही ठोस करीत नाही! खरं तर एखादी ओळख जुनी झाली तरी परत ती नव्याने करता येते आणि तसं करायला काहीही हरकत नाही. हे असं का होत असावं? कारण आपण आपल्या ‘नेटवर्क’चं ‘नेटवर्थ’ कधी समजून घेत नाही म्हणून! सोप्या भाषेत सांगायचं तर आपण माणसांची किंमत ओळखलेली नसते. एक तर आपण गांभीर्याने घेतलेलं नसतं वा थोडा ‘आळस’ करतो, नाही का?

‘बिझनेस नेटवर्किंग’ची सुरुवात आपलं ‘बिझिनेस कार्ड’ देताना होत असते. कार्ड साधं, स्वच्छ व त्यातील मजकूर हा सहज वाचता आला पाहिजे. आज प्रत्येकाकडे बिझनेस कार्ड व त्यावर स्वत:चा कुठलाही ई-मेल आयडी असणं फारच गरजेचं आहे, मग तुम्ही एखाद्या उद्योगाचे मालक असा किंवा सव्‍‌र्हिस सेक्टरमध्ये एखादी कुठलीही सव्‍‌र्हिस देणारे कुशल कर्मचारी, प्रश्नेफेसरपासून ते पंखा रिपेअर करणारे इलेक्ट्रिशियन, टी. व्ही. कलाकार ते बॅक स्टेज टेक्निशियन! जपानमध्ये कार्ड देतानासुद्धा ते दोन्ही हातात धरून हळुवारपणे देण्याची पद्धत आहे व कार्ड घेतानासुद्धा ते हळुवारपणे घेऊन, शांतपणे वाचून, मग ते खिशात ठेवले जाते. कार्ड देताना-घेताना आपण त्याचं महत्त्व जाणतो, असं दर्शविणं गरजेचं असतं. कुठल्याही कामात अशा प्रकारे प्रश्नेफेशनल अ‍ॅप्रश्नेच आणल्याशिवाय व आपण स्वत:हून मोठय़ा प्रमाणात लोकांना भेटल्याशिवाय, त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय त्यामधून निर्माण होत असलेल्या नवीन संधी समजणार नाहीत. तसंच आपण ज्याला भेटतो तो एखाद्या कंपनीचा चेअरमन असो, की साधा मॅनेजर, त्याला प्रेमानंच भेटावं. जर आपल्याला वाटलं, की आपण एखाद्या चुकीच्या माणसाला भेटत आहोत, तरी त्याची ओळखसुद्धा आत्मीयतेने व्हायला पाहिजे, त्याची विचारपूसदेखील प्रेमानेच केली पाहिजे! कुठल्याही व्यक्तीला आपण पहिल्यांदा एक ‘माणूस’ म्हणून भेटणं फार गरजेचं आहे! आपला पैसा, मान, पोझिशन, पत वगैरे हे सगळं नंतर येतं.

मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी ‘बिझनेस नेटवर्किंग’साठी खास प्रयत्न करणे गरजेचं आहे. आज महाराष्ट्रात मराठी उद्योजकांसाठी, ज्या संस्था (मोजक्याच) आहेत, त्यात शक्य झाल्यास प्रत्येकाने जास्तीत जास्त सभासद व्हायला पाहिजे. त्यांच्या वेळोवेळी सभा, संमेलनं होतात, त्यात सहभागी व्हायला पाहिजे. आता संस्था म्हटल्यावर कार्यक्रम आयोजनात काही त्रुटी असणं किंवा पदाधिकाऱ्यांत थोडय़ा कुरबुरी असणं हे आलंच. म्हणून लगेच त्या संस्था सोडण्याची गरज नसते. आपली बांधीलकी ही आपल्या मराठी समाजातील उद्योगाशी आहे, आपल्या व्यवसायाशी आहे व त्यासाठी मिळेल तेथून आपल्याला नेटवर्किंग करायचं आहे, माणसं जोडायची आहेत हे मूळ सूत्र विसरता कामा नये. प्रत्येक कार्यक्रमात किमान पाच ते दहा व्यक्तींची नीट ओळख आणि एक चांगला विचार मिळाला, तरी पैसे आणि वेळेचा सदुपयोग झाला, असं समजावं. तसेच निरनिराळी औद्योगिक प्रदर्शनं असतात, त्यांना भेट देऊन, त्या उद्योजकांची ओळख होऊ शकते, नवीन उत्पादनाची माहिती मिळते. उच्चभ्रू लोकांच्या काही सामाजिक संस्था आहेत, समाजसेवेबरोबर त्यांच्या सभासदांचं मोठय़ा प्रमाणात प्रश्नमुख्याने नेटवर्किंगसुद्धा होत असतं, हे लक्षात घ्या. मी तर म्हणेन प्रत्येक उद्योजकाने किंवा व्यावसायिकाने विविध व्यावसायिक संघटनांचे आणि किमान दोन तरी अशा चांगल्या सामाजिक संस्थांचे (त्यात एखादी इतर भाषिकांची असली तर उत्तम म्हणजे इतर समाजात काय चाललंय हेसुद्धा आपल्याला कळतं) सभासद होऊन निदान पाच वर्ष त्यांच्या विविध उपक्रमात सहभागी व्हायला काहीच हरकत नाही. त्या निमित्ताने समाजाची सेवासुद्धा घडते आणि आपलं नेटवर्कदेखील सहजपणे वाढत जातं. ‘बिझनेस पाटर्य़ा’ हा शब्द आपल्या समाजात थोडा बदनाम झाला आहे, तरी पण निदान व्यावसायिकांनी व्यावसायिक कारणासाठी दिलेल्या पाटर्य़ाना हमखास हजेरी लावलीच पाहिजे.

विविध संस्थांच्या सभा-संमेलनात जाताना आपल्याला वाटत असतं की, आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. निदान आपलं कार्ड तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न हवा. सुरुवातीला असं करणं मुळीच चुकीचं नाही. पण कालांतराने अशा ठिकाणी गेल्यावर, साधारणपणे पहिली १५-२० मिनिटे तिथं कुठल्या प्रकारची माणसं आलेली आहेत याचा अंदाज घेऊन, आपल्या व्यवसायाशी थेट निगडीत लोकं कोण आहेत, असे दहा ते पंधरा लोक हेरून त्यांना भेटण्याचा व तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर साधारणपणे आणखी तितक्याच लोकांना आपले कार्ड द्यावे, म्हणजे एका भेटीत तुम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस लोकांना भेटू शकता. ज्यांची कार्ड आपण घेतो त्यांना एक साधं पत्र किंवा मेल ई-मेल करून आपली चांगली ओळख करून द्यावी; शक्य असल्यास फोन करून भेटण्यासही जावं. नेटवर्किंगमध्ये भेट घेण्याचा पहिला अलिखित नियम म्हणजे वयाने किंवा अनुभवाने मोठय़ा असलेल्या व्यक्तीला त्यांची वेळ मागून त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला जाणं हे अपेक्षित आहे. जाण्या-येण्याचा कितीही त्रास होणार असेल तरीसुद्धा! अशा भेटीत तुमच्याबद्दल नेमकी काय माहिती सांगायची आहे ते ठरवून गेलेलं केव्हाही चांगलं. पहिल्या भेटीत एकमेकांची नेमकी माहिती मिळवली तरी पुष्कळ. दुसऱ्या भेटीसाठी थोडं राखून ठेवायला काय हरकत आहे.

अजूनही आपल्या मराठी समाजात इंटरनेटचा वापर लोक मोठय़ा प्रमाणात करताना दिसत नाहीत. निदान प्रत्येकाचं एक इमेल अकाऊन्ट असायलाच पाहिजे, त्याच्याद्वारे जगातील लोकांशी संपर्कात राहणं फार सोपं असतं. आज www.bloggerspot.com वर स्वत:च्या नावाची छोटीशी वेबसाईट मोफत बनवता येते, त्याचा उपयोग करायला काय हरकत आहे? इंटरनेटवर असलेल्या विविध नेटवर्किंग साईटस्च्या साहाय्याने किंवा स्वतंत्रपणे कित्येक क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांची पूर्ण माहिती मिळविता येते, त्यांच्याशी संपर्क साधता येतो.

जर आपण विविध क्षेत्रातील दहा लोकांना चांगल्या प्रकारे ओळखत असू व त्यांच्याकडे त्यांच्या व्यवसायाचा जर दहा वर्षाचा अनुभव असेल, तर याचा अर्थ, आपल्या परिचित अशा या दहा लोकांमुळे आपल्याजवळही त्या दहा विविध क्षेत्रात काम न करताही शंभर वर्षाचा अनुभव असल्यासारखे आहे. पण प्रश्न असा आहे की इतरांकडे असलेले ज्ञान आणि अनुभव आपण वेळोवेळी घेत आहोत का? ते ज्ञान आणि अनुभव मिळविण्यासाठी आपण खास असे काय प्रयत्न करतो? ते आपल्याला योग्यवेळी मिळणार आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्या दहा लोकांशी किती चांगल्या प्रकारे आपले संबंध प्रस्थापित करू शकतो त्यावर अवलंबून आहे. कित्येक वेळी आपण नुसत्या साध्या तोंडओळखीच्या जोरावर मदतीची अपेक्षा करतो, आणि ती पूर्ण झाली नाही तर निराश होतो. अपेक्षा करणं चुकीचं नसलं तरी ती पूर्ण न झाल्यास निराश होता कामा नये! इतरांकडून ज्ञानाची किंवा त्यांच्या नेटवर्कची अपेक्षा करताना, आपण आपल्याकडील ज्ञान आणि नेटवर्कमध्ये इतरांना सहभागी करून घेतो का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भेटलेल्या प्रत्येक माणसांबरोबर कदाचित आपले जुळू शकेलच असं नाही, पण तिचं आपली परीक्षा आहे असं समजा. बऱ्याच वेळी माणसं ओळखताना आपण घाईने निर्णय घेतो. एकदा आपले विचार जुळले, नव्हे आपला तसाच प्रयत्नच असायला हवा, की प्रत्येकाकडे असलेलं ज्ञानाचं भांडार आपोआप उघडलं जातं, आणि मग खऱ्या अर्थाने आपल्या नेटवर्कच नेटवर्थ आपल्याला कळतं.

चला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या परिचितांची एक यादी तरी बनवू या, जमल्यास त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा पत्र किंवा निदान एक फोन तरी करायला काय हरकत आहे? एकदा ही यादी तयार झाली की त्याच नेटवर्थ तुम्हाला आपोआपच कळू शकेल. दिवाळीपूर्वी कमी वेळ असेल, तरी तयारी करायला काय हरकत आहे? १ जानेवारीला नवं वर्ष येतंच आहे, तेव्हा उपयोग करता येईल! भारतीय संस्कृतीचा एक फायदा म्हणजे वर्षभर सण असतात आणि आपण हल्ली वेस्टर्न कल्चरसुद्धा पाळतो, म्हणजे एकमेकांना भेटायला, फोन करायला भरपूर कारणं आहेत.

आज विजयादशमी म्हणजे दसरा. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. सीमोल्लंघन करण्याचा दिवस! कृती करण्याचा हा दिवस! स्वत:भोवती असलेली सर्व प्रकारची कुंपणे झुगारण्याचा हा दिवस. एक नवीन विचार घेऊन पुढे जाण्याचा हा दिवस. मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता, आत्मविश्वासाने आणि परिस्थितीवर मात करून व जिंकण्याच्याच इर्षेने आजपासून बिझनेस नेटवर्कमध्ये सीमोल्लंघन करण्याचा दिवस! जागतिक उद्योगात स्वत:च असं एक स्थान बनवण्याचा हा दिवस! वाटा आपोआप तयार होतात, पण आपण पाऊल उचलले तरच!

नितीन पोतदार - कॉर्पोरेट लॉयर/ ९९३०९५४७४७

No comments: