Thursday, October 29, 2009

‘अर्थक्षेत्रातील मराठी तारे’; प्रेरणादायी व माहितीचा खजिना असलेले पुस्तक - लेखक उदय कुलकर्णीसामान्य माणसाचा अर्थक्षेत्राशी मुख्यत: संबंध येतो ते जवळच्या पैशांची गुंतवणूक कुठे व कशी करावी या संदर्भात. पण अर्थक्षेत्र म्हणजे केवळ गुंतवणुकीचे शास्त्र नाही. उद्योगजगताचा तर ते कणा आहे व अर्थक्षेत्राच्या अनेक शाखा आहेत. अर्थक्षेत्रातील अशा अनेकानेक शाखांतील उच्चपदस्थांच्या मुलाखतीवर आधारित लेख लोकसत्तामधून दोन-तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध होत होते. ‘अर्थक्षेत्रातील मराठी तारे’ या नावाने ही मालिका प्रसिद्ध होत होती. या सर्व मुलाखती घेऊन त्यावर आधारित लेख लिहिले होते उदय कुलकर्णी यांनी. हीच लेखमाला आता त्याच नावाने प्रसिद्ध झाली आहे.
अर्थक्षेत्रात अनेक शाखा आहेत असे आपण म्हणतो, त्यात बँकिंगचे उदाहरण बघू. बँका म्हणजे लोकांचे, कंपन्यांचे अकाऊंटस्, कर्ज देणे-घेणे ही ढोबळ समजूत झाली. पण बँकिंगमध्ये ज्याला ‘नॉन-बँकिंग’ म्हटले जाते अशा अनेक शाखा आहेत. उदा.- बँकेचे ट्रेझरी खाते हे महत्त्वाचे खाते आहे व बँकांना सर्वात जास्त नफा याच खात्यातून मिळतो. बँकेच्या या खात्याची सविस्तर माहिती मिळते ती बीएनपी पारिबा बँकेच्या मनोज राणे हे विक्रम कदम यांच्या मुलाखतीतून. त्याचप्रमाणे बँकेत चीफ इकॉनॉमिस्ट हे पद महत्त्वाचे असते. धोरणे ठरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. बँक ऑफ बडोदाच्या चीफ इकॉनॉमिस्ट डॉ. रुपा रेगे-नित्सुरे यांच्या मुलाखतीतून त्याविषयी माहिती मिळते.

एचडीएफसी बँकेने अल्पावधीत जी मोठी मुसंडी मारली, विस्तार केला तो कसा ते या बँकेचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट नंदकिशोर देसाई यांच्या मुलाखतीतून कळते.
म्युच्युअल फंड हा आज मोठा उद्योग. साधारण सात लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अ‍ॅसेट सर्व म्युच्युअल फंड मिळून मॅनेज करतात. डेट फंड व इक्विटी फंड असे याचे दोन मुख्य प्रकार आहेत. इतक्या प्रचंड मोठय़ा रकमेचे व्यवस्थापन कसे केले जाते, या रकमेची गुंतवणूक करण्याचे निर्णय कसे घेतले जातात, छोटय़ा गुंतवणूकदारांकडून हा पैसा जमा झालेला असतो. दुसऱ्याच्या पैशाची गुंतवणूक करून त्यावर चांगले रिटर्न द्यायचे त्याचा किती ताण असतो, मार्केट खाली येते तेव्हा कशी परिस्थिती असते या सगळ्यावर प्रकाश पडतो, डेट फंड मॅनेजर समीर कुलकर्णी व इक्विटी फंड मॅनेजर संजय डोंगरे व देवेंद्र नेवगी यांच्या मुलाखतीतून.

एलअ‍ॅण्डटी ही एक अजस्र कंपनी. वायएमडी या नावाने उद्योगजगतात प्रसिद्ध असलेले वाय. एम. देवस्थळी हे या कंपनीचे चीफ फायनान्शियल ऑफिसर, एक सीनियर व ज्ञानी व्यक्तिमत्त्व. त्यांची मुलाखत विलक्षण महत्त्वाची आहे. ९० नंतर आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण सुरू झाले असे आपण म्हणतो. त्यानंतर वित्तक्षेत्रात कसे बदल होत गेले, कंपनीतील सीएफओंच्या कामाचा आवाका कसा वाढत गेला, ते खऱ्या अर्थाने जागतिक परिणाम असलेले कसे झाले, ते त्यांच्या मुलाखतीतून उलगडत जाते.

शिपींग उद्योगात किती प्रकार आहेत, कंटेनर वाहतूक म्हणजे काय, शिपिंग कंपन्यांचा कारभार कसा चालतो याची माहिती मिळते, श्रेयस शिपिंगचे सीएफओ विनय क्षीरसागर यांच्या मुलाखतीतून. व्हेंचर फंडिंग म्हणजे उद्योजकांना, उत्तम आयडिया किंवा बिझनेस प्लॅन असेल तर विनातारण भांडवल मिळण्याची सोय. त्याबद्दल माहिती मिळते, रवी म्हात्रे व येन मॅनेजमेंटचे सीएमडी सुनिल शिरोळे यांच्या मुलाखतीतून.

सी. बी. भावे आज सेबीचे चेअरमन आहेत ही आपल्या सर्वासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मुलाखतीचे ‘शेअरबाजारातील आमूलाग्र बदलाचे शिल्पकार’ हे शीर्षकच सर्व काही सांगते. त्यांनी किती अफाट केले आहे त्याची मुलाखतीतून जाणीव होते.

अशा एकूण सत्तावीस अर्थताऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यावर आधारित लेख या पुस्तकात आहेत. प्रत्येकाचा उल्लेख इथे करणे शक्य नाही. या लेखांमधून अर्थक्षेत्रातील अशा विविध शाखांची माहिती, कामाचे स्वरूप, निर्णय प्रक्रिया यांची माहिती मिळते, त्याचबरोबर या उच्चपदस्थांचे शिक्षण, त्यांचा इतक्या उच्चपदापर्यंतच जाण्याचा प्रवास, त्यांचे ताणतणाव, त्यांचे छंद याचीही माहिती मिळते.

विनय क्षीरसागर सीएफओ आहेत, पण इतके व्यस्त असूनही ते पंडीत भीमसेन जोशी यांचे कट्टर भक्त आहेत. स्त्री म्हटल्यावर करिअर व घर दोन्हीचा समतोल कसा साधला हा नेहमीचा प्रश्न असतो.

विशाखा मुळ्येंनी हा समतोल इतका सहज व सुंदर साधला आहे की हा प्रश्नच गैरलागू वाटावा. डॉ. आनंद तेलतुंबडे हे डाव्या विचारांचे. त्यांच्या मुलाखतीमुळे त्या विचारांनाही पुस्तकात प्रतिनिधित्व मिळते, त्याचबरोबर खेडय़ातील शेतमजूराच्या मुलाचा प्रवास एमडी या पदापर्यंत कसा झाला ते वाचायला मिळते. जगाच्या औद्योगिक नकाशात भारताला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले ते आयटीमुळे. आयटी व वित्त यांच्या मिलाफाचे चित्र संदीप फणसगावकर यांच्या मुलाखतीतून उभे राहते. रोहित अंबेकर हे सीएफओ, सीईओ अशा उच्चपदस्थांची प्लेसमेंट करणारे, तिही जागतिक पातळीवर. त्यांच्या मुलाखतीतून अशा उच्चपदावरील व्यक्ती आक्रमक असतात की नाही याचे उत्तर मिळते. परदेशात जन्म जाऊनही रोहित हिंदी सिनेमाचे जबरदस्त शौकिन आहेत.

उच्चपदावरील व्यक्तींबाबत सतत नकारात्मक विधाने आपल्याला वाचायला मिळतात. त्या अतिशय व्यस्त असतात, त्यामुळे कौटुंबिक सुखाला पारख्या असतात, गळेकापू स्पर्धा असते इत्यादी. हे गैरसमज दूर करून, अशा सर्व नकारात्मक विचारांना पळवून लावणारे हे पुस्तक आहे. त्यांची बुद्धिमत्ता,

निर्णय घेण्याची क्षमता व धडाडी, संधीचा उपयोग करणे, शिक्षण असे या व्यक्तींचे काही पैलू या लेखांतून दिसून येतात. डॉ. अमर भिडे हे अमेरिकेत अर्थतज्ज्ञ म्हणून नाव कमावून आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके तिथे गाजत आहेत. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, मराठी माणूस उद्योगात मागे का प्रश्नच चुकीचा आहे. खरा प्रश्न आहे, मराठी उद्योजक खूप मोठे का होत नाहीत. उद्योगात मोठे यश मिळवण्यासाठी काय करावे ते त्यांनी सांगितले आहे.

पुस्तकाच्या शेवटी या सर्व अर्थताऱ्यांचे शिक्षण, पद असा विश्लेषणात्मक तक्ता दिलेला आहे. नोटांनी गती दिलेले उद्योगचक्र व त्यात मध्ये मराठी फेटा असे सूचक मुखपृष्ठ आहे. पुस्तकांची किंमत रु. १५० ही फार आकर्षक आहे. पुस्तक केवळ मोठय़ा माणसांनी वाचण्यासाठी नाही, तर लहान, तरुणांनीही ते वाचावे. त्यांना माहिती व प्रेरणा मिळावी यासाठी इतक्या स्वस्त किंमतीत हे अतिशय उपयुक्त आहे. शाळा-कॉलेजच्या वाचनालयात तर हे हमखास हवेच. हे पुस्तक प्रसिद्ध करून लेखक व प्रकाशकांनी मराठी समाजासाठी भरीव काम केले आहे, त्यांचे अभिनंदन!

पुस्तक : अर्थक्षेत्रातील मराठी तारे
लेखक : उदय कुलकर्णी, मुंबई (Contact : 9869672696 or Resi 022 28649815)
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई (Contact: 28645212)
पृष्ठे : १७१; किंमत रु. १५०/-

(सौजन्य लोकसत्ता दैनिक)

No comments: