Monday, December 14, 2009

मराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची!

ज्ञानी, प्रतिभासंपन्न आणि अनुभवी अशा अनेक दिग्गजांना महाराष्ट्राने जन्म दिला! महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध क्षेत्रातील अशा उत्तुंग व्यक्तींनी त्यांच्या जवळ असलेल्या ज्ञान आणि अनुभवांच्या झऱ्यांचे अमृतकुंभ तयार करावेत अशी विनंती आणि प्रेमाचा आग्रह करण्यासाठी हा लेखप्रपंच! आपल्या प्रतिभा आणि कर्तृत्वाला व्यावसायिक संस्थात्मक रूप दिलं तर त्याचा लाभ मराठी तरुणांना मिळेल व या प्रतिभावंतांनाही! या निमित्ताने एक नव्याने उपक्रम सुरू करण्याचा आनंद आणि समाजाच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याची संधी त्यांना लाभू शकते! 

Wednesday, December 9, 2009

महाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे - नितीन पोतदार

एकेकाळी बहुतांश उद्योगात महाराष्ट्र हे देशातील आघाडीवरील राज्य होते. आज निदान एका तरी क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर अत्युच्च स्थान महाराष्ट्राने मिळविले पाहिजे. आय.टी. आणि ऑटो या दोन क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळविण्याची संधी जरी हैदराबाद आणि चेन्नईने घेतली, तरी शिक्षणाच्या क्षेत्रात भविष्यकाळात येणारी संधी महाराष्ट्राने सोडता कामा नये, असे प्रतिपादन ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र (ऐम)’ या उद्योजकांच्या नव्या संघटनेच्या दिनांक ५ डिसॆंम्बर ०९ रोजी उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रसिद्ध कॉर्पोरेट विधिज्ज्ञ नितीन पोतदार यांनी केले.