Wednesday, December 9, 2009

महाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे - नितीन पोतदार

एकेकाळी बहुतांश उद्योगात महाराष्ट्र हे देशातील आघाडीवरील राज्य होते. आज निदान एका तरी क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर अत्युच्च स्थान महाराष्ट्राने मिळविले पाहिजे. आय.टी. आणि ऑटो या दोन क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळविण्याची संधी जरी हैदराबाद आणि चेन्नईने घेतली, तरी शिक्षणाच्या क्षेत्रात भविष्यकाळात येणारी संधी महाराष्ट्राने सोडता कामा नये, असे प्रतिपादन ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र (ऐम)’ या उद्योजकांच्या नव्या संघटनेच्या दिनांक ५ डिसॆंम्बर ०९ रोजी उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रसिद्ध कॉर्पोरेट विधिज्ज्ञ नितीन पोतदार यांनी केले. 
याप्रसंगी प्रमुख पाहुणे नितीन पोतदार यांच्या हस्ते ‘ऐम’ची वेबसाइट- www.mahaim.org चेही उद्घाटन करण्यात आले. ‘ऐम’चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद आघरकर या प्रसंगी बोलताना म्हणाले की, उद्योजकांच्या समस्या उद्योजकच चांगल्या प्रकारे समजू शकतात. म्हणून त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यात लघू आणि मध्यम उद्योजकांना त्यांच्या समस्यांवर वेळीच मार्गदर्शन मिळणे खूपच महत्त्वाचे असते. सरकारी धोरण ठरविताना त्यात लघू व मध्यम उद्योजकांच्या गरजा, अडचणी सरकापर्यंत जाणे गरजेचे आहे. उद्योगधंद्यांचा एक कोष तयार करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. संस्थेच्या सल्लागार मंडळावर अतुल देऊळगावकर, अविनाश धर्माधिकारी, विकास गायतोंडे, अच्चुत गोडबोले, उत्तरा गोगटे, धनंजय कर्णिक, राजीव खांडेकर, गिरीश कुबेर, जयराज साळगावकर, पदमिनी ख्ररे कैचकर अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा समावेश आहे.

श्री. पोतदार पुढे म्हणाले की आज आर्थिक मंदीच्या फयानाला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी प्रत्येक उद्दोजकांनी आपल्या क्षेत्रात टेक्नॉलॉजीत होणाऱ्या बदलांकडे काळजीपुर्वक लक्ष ठेवण्याची गरज आहे. जसं पेजरची जागा मोबाईल ने घेतली, आणि पोस्टाची जागा इमेलने घेतली, तसचं आज प्रिटींग आणि फुड प्रोसेसिंगच्या टेकनॉलॉजीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. आणि अशा अनेक बदलांमुळे व्यवसायाची गणितं सततं बदलत राहणार. ह्यावरून अशा बदलांवर लक्ष ठेवणं किती आवश्यक आहे ते समजुन घेणं गरजेच आहे. त्याच बरोबर आजच्या जिवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी प्रत्येक उद्दोजकांनी इतरांशी वेगवेगळ्या स्तरावर ’कोलॅबोरेशन्स’ म्हणजेच ’सहकार्य’ करण्याकडे कल ठेवला पाहिजे.

संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाळंदे यांनी कोणत्या उद्योगावर ‘ऐम’चे लक्ष केंद्रित राहील याचा आपल्या भाषणात उहापोह केला. उल्लेखनीय बाब म्हणजे उद्घाटनाच्या दिवशीच संघटनेच्या पुढील संपूर्ण वर्षाचा तारखांसहित विविध कार्यक्रमाची रूपरेषा सहसचिव नीलेश मराठे यांनी जाहीर केली. उद्घाटनाच्या दिवशीच ‘ऐम’चे महाराष्ट्राच्या विविध भागातून १०१ सभासद झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. संस्थेच्या कोषद्यक्ष सुबोध मुळे यांनी आभार प्रदर्शन केले.

सौजन्य लोकसत्ता मुंबई वृत्तांत - ०९/१२/०९

No comments: