Monday, December 14, 2009

मराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची!

ज्ञानी, प्रतिभासंपन्न आणि अनुभवी अशा अनेक दिग्गजांना महाराष्ट्राने जन्म दिला! महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध क्षेत्रातील अशा उत्तुंग व्यक्तींनी त्यांच्या जवळ असलेल्या ज्ञान आणि अनुभवांच्या झऱ्यांचे अमृतकुंभ तयार करावेत अशी विनंती आणि प्रेमाचा आग्रह करण्यासाठी हा लेखप्रपंच! आपल्या प्रतिभा आणि कर्तृत्वाला व्यावसायिक संस्थात्मक रूप दिलं तर त्याचा लाभ मराठी तरुणांना मिळेल व या प्रतिभावंतांनाही! या निमित्ताने एक नव्याने उपक्रम सुरू करण्याचा आनंद आणि समाजाच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याची संधी त्यांना लाभू शकते! 

नाटक, सिनेमा, संगीत, क्रीडा याव्यतिरिक्त कमर्शियल आर्टिस्ट (चित्रकला) अशा कुठल्याही कलेत अथवा ब्रॅन्ड मेकिंग, अ‍ॅडव्हर्टाझिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर, इंटीरियर डिझायनर, कॉम्प्युटर प्रोग्रामर्स, आर्थिक सल्लागार, पत्रकारिता, वास्तुशास्त्र, फेंगशुई, ज्योतिषी, हेल्थ आणि फिटनेस, केटरिंग इत्यादी अशा कुठल्याही व्यवसायात मोठं नाव कमावलेल्या व्यक्तींनी त्यांच्याच व्यवसायात काहीतरी वेगळं करावंसं वाटत असणार! म्हणून सगळ्यात प्रथम थोडासा वेळ काढून त्यांनी मिळविलेले ज्ञान, कौशल्य आणि अनुभव चांगल्या प्रकारे डॉक्युमेंट करून ते चिरकाल जिवंत ठेवणं महत्त्वाचं आहे! त्याचबरोबर त्याला जर संस्थात्मक रूप देऊन इतरांना उपलब्ध केलं तर एक नवीन विश्व तयार होऊ शकतं, स्वयंरोजगाराच्या नवीन वाटा तयार होऊ शकतात. अशा प्रकारे चांगल्या प्रमाणात यशस्वी प्रयोग करणारं पहिलं नाव म्हणजे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर! त्यांची ‘शामक दावर परफॉर्मिग आर्ट’ ही संस्था आज जगप्रसिद्ध आहे. हजारो मुलांना आपली कला शिकवून मोठं केलं आणि मुलांबरोबर ते स्वत:सुद्धा मोठे झाले.

क्रिकेटवीर दिलीप वेंगसरकर यांनी ‘दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन’ ही होतकरू तरुणांना क्रिकेटचं मार्गदर्शन करणारी संस्था गेल्याच वर्षी पुण्यात सुरू केली, मुंबईत त्यांची ‘एल्फ क्रिकेट अ‍ॅकॅडमी’सुद्धा बरीच र्वष चांगलं काम करीत आहे. नवीन होतकरू गायकांसाठी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकरांची अ‍ॅकॅडमी आहे, (www.sureshwadkarmusic.com) त्याचबरोबर प्रसिद्ध संगीतकार यशवंत देव आणि अशोक पत्की हेसुद्धा सुगम संगीत शिकवण्याचं काम करीत आहेत. डॉ. रविराज आहिरराव यांच्या ‘वास्तुशास्त्र एज्युकेशन अ‍ॅण्ड फाऊंडेशन’ (www.vasturaviraj.co.in) या संस्थेमार्फत जवळपास ३००० विद्यार्थ्यांनी वास्तुशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि १२०० मुलांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. ज्येष्ठ फोटोग्राफर श्रीकांत मलुष्टे हे त्यांच्या क्लासेसद्वारा कित्येक र्वष विद्यार्थ्यांना दृष्टी देण्याचे काम करीत आहेत. हिंदी सिनेमातले प्रसिद्ध नट अनुपम खेर यांची 'Actor Prepares' ही संस्था २००५ पासून कार्यरत आहे. त्यांची वेबसाईट (www.actorprepares.net) तर फारच सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. आपल्या लाडक्या प्रशांत दामले यांना हजारो फॅन आहेत. ‘प्रशांत दामले फाऊंडेशन’ आज संगीत आणि कला क्षेत्रात मोठं काम करीत आहे (www.prashantdamle.com.) हे लिहीत असतानाच एक बातमी वाचली की प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ एक ‘कम्युनिकेशन अ‍ॅकॅडमी’ सुरू करणार आहेत. गाडगीळांनी आजपर्यंत केलेल्या सूत्रसंचालन, निवेदन, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या घेतलेल्या मुलाखतींचे टॉक शो, वर्तमानपत्रातले स्तंभलेखन व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या अनुभवांवर या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. आर्थिक विषयाचे सल्लागार चंद्रशेखर टिळक यांनी अर्थसंकल्पावर विविध ठिकाणी मराठीत व्याख्यानं देऊन हजारो लोकांना मंत्रमुग्ध केले. मराठी माणसांना शेअरबाजार (स्टॉक एक्स्चेंज), कमॉडिटी एक्स्चेंज, डेट मार्केट, त्यातील व्यवहार आणि एकूणच आपल्या समाजाला आर्थिक विषयाचं ज्ञान देणारी एखादी अ‍ॅकॅडमी/ कार्यशाळा ते नक्कीच काढू शकतात. कित्येक मॅनेजमेंट गुरूंनी आज लिडरशिप आणि मराठीत मॅनेजमेंट शिकवण्याच्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. उदा. समीर सुर्वेची ‘पथिक’, उद्योजकांसाठी ‘लक्ष्यवेध’ हा उपक्रम चालविणारी अतुल राजोळींची Born2Win ही संस्था, तसेच स्नेहल कृष्णा यांची SCF Management ही मराठीतून मॅनेजमेंटचे धडे देणारी संस्था. अशा संस्थांनी पुढाकार घेऊन विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांचं व्यासपीठ उपलब्ध केलं तर त्यांच्या स्वत:च्या कक्षादेखील मोठय़ा होतील. रिटायर्ड पोलीस किंवा लष्करी अधिकारी महाराष्ट्रात कमी नाहीत. त्यांनी जवळच्या व्यायामशाळेतील मुलांना ‘सेक्युरिटी सव्हिसेस्’साठी लागणारं प्रशिक्षण द्यायला काय हकरत आहे? हेल्थ आणि फिटनेसमध्ये ‘तळवलकर’ हे नावं आज महाराष्ट्राला नवीन नाही. त्यांची सेक्युरिटी गार्डस्साठी लागणारं प्रशिक्षण देणारी स्वत:ची अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था आणि खरं तर स्वत:ची सेक्युरिटी गार्डस् पुरविणारी एखादी व्यावसायिक संस्थाच का असू नये?

‘प्रतिभावंतांच्या उद्योजकतेचं’ उत्तम उदाहरण म्हणजे आपले प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई! त्यांनी त्यांचं काम केवळ सिनेमापुरतं मर्यादेत न ठेवता स्वत:चा मोठा स्टुडिओ उभारला. आपल्या प्रतिभेला संस्थात्मक रूप दिले. त्यामुळे त्यांचा स्वत:चा व्यवसाय वाढलाच पण कित्येक शिकलेल्या आर्किटेक्टस् आणि होतकरू तरुणांनाही काम करता करता त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ दिला. या एका उदाहरणावरून कळेल की, प्रतिभावंतांनी त्यांच्या कलेला व्यावसायिक संस्थेचं रूप दिलं तर स्वत: त्यांना आणि समाजालासुद्धा त्याचा किती फायदा होऊ शकतो. कलावंत म्हणजे केवळ कलेच्या आनंदात मग्न आणि आर्थिक व्यवहाराच्या वस्तुस्थितीपासून थोडा दूर असा एक समज आहे व पूर्वी खरोखरच कलाकारांची वृत्ती तशी असायची. आजचे कलाकार मात्र याबाबत जागरूक आहेत. पण त्यापलीकडे जाऊन खरा मुद्दा आहे तो या प्रतिभावंतानी उद्योजक होण्याचा! नितीन देसाईंनी स्टुडिओ उभारणीसाठी कोटय़वधींचं भांडवल उभारलं आणि प्रोफेशनल व्यवस्थापन आणून स्टुडिओ यशस्वीपणे चालवून दाखवला. महाराष्ट्राला गरज आहे अशा ‘प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची!’ अशा उपक्रमातून नकळतपणे एक नवीन महाराष्ट्र घडतो आहे, त्याला उत्तेजन मिळणे गरजेचं आहे.

आज महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत चांगल्या प्रकारे नावाजलेल्या शेकडो व्यक्ती कार्यरत आहेत आणि ते सहजपणे त्यांच्या क्षेत्रात एखादी स्वत:च्या नावाची अ‍ॅकॅडमी, संस्था किंवा कार्यशाळा सुरू करू शकतात. ज्या जिद्दीने त्यांनी नाव कमावलं त्याच जिद्दीने जर थोडा प्रयत्न केला तर स्वत:चं एक छोटंसं नवीन पण इतरांसाठी एक मोठं विश्व ते सहज उभारू शकतात. खासगी अ‍ॅकॅडमी किंवा कार्यशाळा सुरू करण्यासाठी कुठलीही सरकारी परवानगी लागत नाही की सरकारी कागदपत्र तयार करावे लागत नाहीत.
अ‍ॅकॅडमीला स्वत:चं नाव किंवा एखादं चांगलंसं नाव ठरवून सुरुवात करता येऊ शकते. अभ्यासक्रम मात्र व्यवस्थित आखणं गरजेचं आहे. सुरुवात अगदी छोटय़ा चर्चासत्रांनी किंवा कार्यशाळांनीसुद्धा होऊ शकते. अभ्यासक्रमाअंतर्गत मूळ विषयांबरोबर कुठल्याही पुस्तकात न मिळणारं असं प्रॅक्टिकल नॉलेज, कौशल्य आणि अनुभव, त्यांची वाटचाल, येणाऱ्या अडचणी, भविष्यातील आव्हाने व इतर गोष्टींवर मोलाचं मार्गदर्शन होऊ शकतं. अभ्यासक्रमाचा कालावधी अगदी एक किंवा दोन दिवसांच्या चर्चासत्रापासून, सलग पाच ते १० आठवडय़ांपर्यंत किंवा अगदी तीन ते चार महिन्यांचादेखील असू शकतो. सुंदर आणि माहितीपूर्ण वेबसाईट बनवायला मात्र विसरू नये, कारण वेबसाईटमुळे आज हजारो-लाखो लोकांपर्यंत एका क्लिकद्वारे सहजपणे माहिती आणि विचार पोहोचवता येतात. www.blogspot.com वर कुठलीही वेबसाईट अगदी सहजपणे कुठल्याही टेक्निकल मदतीशिवाय आणि मुख्य म्हणजे फुकट बनविता येते. अभ्यासक्रमात/ कार्यशाळेला लागणारा अभ्यासक्रम आणि इतर उपयुक्त माहिती इंटरनेटवर मिळू शकते. अभ्यासक्रमाच्या व्हिडीओ सीडी रेकॉर्ड करून एकापेक्षा जास्त वर्ग सहजपणे चालवता येऊ शकतात. तशाच पद्धतीने इतर मान्यवरांच्या विचार किंवा मुलाखती रेकॉर्ड केल्या तर त्यांनासुद्धा प्रत्येक वेळी वेगळा वेळ द्यावा लागणारा नाही. आज इंटरनेटच्या युटय़ूब (http://youtube.com) वर तर असे कित्येक व्हिडीओज बघायला मिळतात. अशा अ‍ॅकॅडमी किंवा कायशाळेच्या क्लासेससाठी लागणारी जागा आणि मुलांचा प्रश्न एखाद्या शाळा किंवा कॉलेजच्या प्रिन्सिपॉलशी चर्चा करून सोडविता येऊ शकतो. अगदी नाहीच काही जमलं तर राहत्या घरीच क्लास सुरू करायला काय हरकत आहे? आणि जागेचा प्रश्न मुंबईत जास्त बिकट आहे. पण इतरत्रही अशा संस्थांची गरज आहे. उदा. : नागपूर, पुणे, नाशिक, अकोला, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी अशा शहरांत संस्था निघाल्या तर त्या त्या शहरातील तरुणांना त्याचा खूप फायदा होईल.
मराठी नाटक आणि सिनेमाच्या क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, कला, गीतकार, संगीतकार, गायक अशा प्रत्येक विषयात कित्येकांनी मोठं काम केलेलं आहे व त्यांच्या अनुभवांमुळे पुढच्या पिढीला चांगले मार्गदर्शन होऊ शकतं. जर एखाद्या व्यक्तीला हे कठीण वाटत असेल तर त्याच क्षेत्रातल्या तीन-चार मान्यवरांनी एकत्र येऊन काम करायला काय हरकत आहे. बरं अशा अ‍ॅकॅडमीज/ कार्यशाळा फक्त सेलिब्रेटींनीच काढायला पाहिजे असा काही नियम नव्हे. ज्ञान, कौशल्य आणि अनुभव असलेली कुठलीही व्यक्ती ते देण्यासाठी पुढे येऊ शकते. पूर्वी चार मराठी लेखक एकत्र आले की दिवाळी अंक काढत, आता चार कलाकार एकत्र येऊन एखादी अ‍ॅकॅडमी/ कार्यशाळा का काढू शकत नाहीत? मुंबईतल्या पु. ल. देशपांडे अकादमीने पुढाकार घ्यायला काय हरकत आहे, त्यांच्याकडे मुबलक जागा आहे, चांगलं मिनी थिएटरसुद्धा आहे.

आज महाराष्ट्रात कित्येक नावाजलेले कमर्शियल आर्टिस्टस्, चित्रकार, व्यंगचित्रकार, कला दिग्दर्शक आहेत. त्यांना अशा कार्यशाळा सहज घेता येण्यासारखा आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचं शिक्षण प्रत्येक मुलाला मिळू शकत नाही पण अशा कार्यशाळेतून निदान चांगलं मार्गदर्शन होऊ शकतं. आपल्याकडे मोठ-मोठे गणेश उत्सव, नवरात्री मंडळं आहेत त्यांनी पुढाकार घ्यायला काय हरकत आहे. दहा दिवस रिमिक्स गाण्यांचे कार्यक्रम करण्यापेक्षा विविध विषयांवर तांत्रिक शिक्षणाच्या चांगल्या कार्यशाळा घेतल्या तर तिथल्या बेकार मुलांना वर्षभर दोन पैसे तरी कमावता येतील. अशा प्रयत्नांना नक्कीच गजाननाचे आणि आई जगदंबेचे पूर्ण आशीर्वाद असतील!

एकीकडे अमेरिकेच्या आणि एकूणच जागतिक आयटी क्षेत्रात मराठी इंजिनीअर्स आणि तज्ज्ञांनी मोठं नाव मिळवलेलं आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात कित्येक व्यावसायिकांची आणि मोठय़ा कलाकारांची साधी वेबसाईटसुद्धा नाही की त्यांना साधं ई-मेल म्हणजे काय हे ठाऊक नाही! लाखो मुलांनी अजूनही ‘कॉम्प्युटर’ या मशीनला हातसुद्धा लावलेला नाही! आयटी क्षेत्रातल्या दिग्गजांनी आपल्या हजारो पदवीधर मराठी तरुणांना थोडंसं आयटीचं ज्ञान उपलब्ध करून दिलं तर महाराष्ट्रात क्रांती होऊ शकते. प्रत्येक तरुणाचं एका संस्थेत रूपांतर होऊ शकतं! नोकरी मागणारे हात आपोआपच नोकरी देणारे हात होऊ शकतील! प्रत्येक शाळा आणि कॉलेजच्या मुलांसाठी व्यावसायिक तत्त्वावर कायमस्वरूपी कॉम्प्युटर साक्षरता मोहीम राबविता येऊ शकते.
पुण्यात होणाऱ्या ८३ व्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष सतीश देसाई यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, खासगी आणि महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांतल्या किमान आठवी ते दहावीच्या मुलांना साहित्य संमेलनात सहभाग होण्यासाठी ‘एक शाळा एक लेखक’ अशी संकल्पना राबवण्यात येणार आहे. निवडलेल्या लेखकांच्या साहित्यावर वक्तृत्व, निबंध स्पर्धा व जमल्यास लेखकाची प्रत्यक्ष भेट असा कार्यक्रम होणार आहे. अशाच धर्तीवर मराठी शाळांनी नुसतंच मुलांना साक्षर करण्यापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक शाळांनी निदान विविध क्षेत्रांतील त्यांचेच माजी विद्यार्थी, ज्यांनी स्वत:चं असं मोठं नाव कमावलं आहे त्यांना हक्काने बोलावून शाळेच्या आजच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे ज्ञान उपलब्ध करून दिले पाहिजे. आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी एक सेलची स्थापना नुकतीच केली, त्यात ते होतकरू विद्यार्थ्यांना करिअर मेंटॉरशिप प्रोग्राम राबविणार आहेत.

प्रत्येक असामान्य व्यक्तींनी ज्ञान, कौशल्य आणि अनुभव हे अपार कष्ट करून मिळविलेले आहे. त्याला संस्थात्मक रूप देऊन येणाऱ्या पिढय़ांसाठी चांगल्या स्वरूपात जतन करणं महत्त्वाचं आहे. कालच्या चुकांची पुनरावृत्ती टाळता आली, तर सुवर्णाला सुगंधाची जोड मिळेल!

नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर, सोमवार, १४ डिसेंबर २००९
Cell: ९९३०९५४७४७
Email: nitinpotdar@yahoo.com
सौजन्य लोकसत्ता

4 comments:

Anonymous said...

नमस्कार,
मी आपला लेख लोकसत्ता मध्ये वाचला व सरळ नेट लावून, आपला blog शोधला. आपला लेख फ़ार छान वाटला व पटला. आपण फ़ार छान लिहता.

Corporate Lawyer (India) said...

आपले मन:पुर्वक धन्यवाद!

Anonymous said...

Nice one!

Vijay Manohar Deshmukh said...

खरच खुप छान लिहिलय. असं झालं तर ....

पेक्षा... अस करुया ...

धन्यवाद.