Sunday, December 26, 2010

माझं Tweet.....जन.गण.मन - राष्ट्रगीताचे शताब्दीवर्ष!

२६ डिसेंबर २०१०:   माझी शाळा Sampson English High School एक इस्राईली बाईने म्हणजे Late S. S. Sampsonने सुरु केली.  तिला आम्ही "Madam" म्हणतं असु.   शाळेत रोज सकाळी "जन.गण.मन" हे राष्ट्रगीत म्हटंल्यानंतरच वर्ग सुरु होत.    माझी मॅडम राष्ट्रगीताच्या प्रत्येक शब्दाच्या उच्चराबद्दल खुपच आग्रही असायची.  मला  आठवतं एकदा त्यातील काही  शब्द  आमच्या  कडुन नीट न उच्चारल्यांमुळे जवळ जवळ सात ते आठ वेळा आमच्या कडुन संपुर्ण जन.गण.मन तिने म्हणुन घेतलं होते.   बाई खुपच कडक शिस्तीची.  शाळेत लेट झालो की पायावर केनचे फटके. तुमचा विश्वास बसणार नाही पण रोज सकाळी शाळेतील प्रत्येक  विध्यार्थी तिच्या समोरुन वर्गात जाणार, मग ती आमचे कपडे, बुट, बॅग, डोक्यावरचे केस, सगळं तपासुन ती आम्हाला वर्गात सोडतं.   आज अशी शिस्त ऎकायला सुद्दा मिळतं नाही.   शाळेपेक्षा मला माझ्या मॅडमची खुप आठवण येते.   अजुनही मी स्वपनात किती वेळा तिच्या हातुन पायवार केनचे  फटके खातो.   आजही केस कापताना कानावरचे केस कमी कर हे मी नाव्याला सांगायला विसरत नाही.   मॅडमच्या प्रत्येक फटक्याने मी घडत गेलो.   तिच्या आठवणीने मन परत शाळेत जातं...... ...... असो.

Tuesday, December 21, 2010

माझं Tweet.....सचिन तेंडुलकर! स्पर्धा स्वत:शीच.

२१ डिसेंबर २०१०:  सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक  नोंदवण्याचा पराक्रम केला.  सचिनच्या प्रत्येक कामगिरीमुळे प्रत्येक क्रिकेटप्रेमी ला मनापासुन आनंद झाला.   त्याच कौतुक करताना शब्द कमी पडतात.... म्हणुन फक्त त्याचे काही स्नॅप्स ..........                                          
                                                    

यशासाठी लागते.........एकाग्रता!
Wednesday, December 15, 2010

माझं Tweet.....शिस्त+संयम=प्रगती

१५ डिसेंबर २०१०:  आज १० दिवसांचा माझा पॅरिस, मिलान आणि लंडन असा युरोप दौरा संपला, उद्या लवकर मुंबई गाठायची!  घरी जायचं.   म्हणुन आज शांतपणे झोपायच ठरवलं तरी झोप येईना म्हणुन आजच ट्विट लिहायला घेतलं.  या दौऱ्यात दोन अनुभव मनात घर करुन राहिले ते इथं देत आहे.   सुरुवातीलाच लंडन ते पॅरिस हे माझं विमान स्नोफॉल मुळे रद्द झालं आणि मला लंडन विमानतळानजीकच्या हॉटेल मधे राहण्याची पाळी आली.   खराब हवामानामुळे हिथ्रोएअर पोर्टवर बरीच विमान रद्द झाल्यामुळे  लोकांचे खुप हाल होतील असं वाटल होतं.  पण आश्चर्य म्हणजे,  British Airwaysने सगळ्यांची चांगली सोय केली होती.   त्यांच्या प्रत्येक काऊंटर वर लोकांची प्रचंड गर्दी होती तरी मला त्यांचा संयम बघुन आश्चर्याचा सुखद: धक्का बसला.   म्हातारी माणसं, बायका, लहान मुलं मुली सगळे निमुटपणे चार ते पाच तास रांगेत शांतपणे उभं राहुन दुसऱ्या विमानासाठी आपली तिकीटं बदलून घेतं होती.  कित्येकांच दुसरं विमान सकाळी लवकर असल्यामूळे त्यांनी विमानतळावरचं राहण्याचा निर्णय  घेतला.   त्यांना विमानतळ अधिकाऱ्यांनी ब्लॅकेट्स आणि पाण्याच्या छोट्या बॉटल्स दिल्या.   प्रत्येक  passengerला अधिकारी वर्ग आणि विमनतळ कर्मचारी परिस्थिती नीट समजावुन सांगत होते, त्यांची विचारपुस करीत होते.   तर द्सरीकडे विमानतळावर रात्री एक किंवा दोनच कॉफीशॉप्स उधडी असल्या मुळे तिथं ही पुन्हा मोठी रांग.......कुठेही गडबड नाही, धक्काबुकी नाही!   अशा परिस्थितीत आपण रागावतो, ओरडतो, चिडतो  थोडक्यात मोठा तमाशा करतो...... ....

Friday, December 10, 2010

माझं Tweet.....मराठी न बोलणारा श्रीनिवास कुलकर्णी

९ डिसेंबर २०१०: पॅरिसच्या आयफेल टॉवरचे मी माझ्या ब्लॅकबेरीवर फोटो घेतले आणि बस मधे शिरताना नजर एका भारतीय वाटणाऱ्या सावळ्या तरूणाकडे गेली.   मला तो चेहरा फारच परिचयाचा वाटला, मनात म्हंटल असेल कुणीतरी.  बस सुरु झाली आणि दोन मिनीटात मागुन आवाज आला "Are you Indian"  त्या भारतीय दिसणाऱ्या तरूणाने मला विचारलं.  मी म्हटंल येस.  तो पटकन माझ्या रिकाम्या असलेल्या बाजुच्या सीट वर येउन बसला.  हॅलो म्हणत मी  हॅन्ड शेक साठी हात पुढे केला.   मी म्हणालो What about you?  मोठ्या स्माईलने तो म्हणाला "I am Shrinivas Kulkarni!  "कुलकर्णी म्हणजे तु मराठी आहेस?  अरे मग मराठीत बोलुया."  मी आनंदात त्याला सांगितलं.  'सर मी म...रा.ठी आ...हे प्प...ण म..ला...जा...स.त.. बो..ल..त.ता...ये..त..न.ना.ही.’  त्याने तुटक शब्दात सांगितल.  Which part of the India you come from? मी विचारलं.   "I am from Dharwad a place from Karnataka, me and my wife speak fluent Tamil"  "In fact I can speak 13 foreign languages, but not Marathi."  तो सांगत होता.  "Sir I am really happy to meet you because I am realy bored.  Since last 7 days there is no one to talk"  तो म्हणाला.   "How long are you going to be in Paris?"  मी विचारलं.   "For one month.  Paris is the headquarters of my present Job and I head the  ITSM & Quality for Sodexo Globally"  श्रीनिवास ने सांगितलं. 

Sodexo group च्या  आयटी आणि क्वालिटी कंट्रोलचा हेड एक मराठी तरूण.  मला खुपच त्याचा अभिमान वाटला.    "Congratulations!   which means you are the boss!'  मी त्याच्या पाठीवर हात ठेवतं म्हटंल.   त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावेना.  "I am really pround of you my dear!"  मी पुन्हा त्याची पाठ थोपटली कारण मला खरचं त्याचा अभिमान वाटला.   "How come you don’t speak Marathi?" मी कुतुहुलाने पुन्हा त्याला विचारलं.  "At home we speak Kannada for generations, I speak Marathi but not fluently, also because I have been travelling ever since I passed out my college."    त्याचं कर्तृत्व बघुन मी त्याच्या भाषेच्या जास्त खोलात जायचं नाही अस ठरवलं आणि आम्ही बोलत सुटलो....

आम्ही दोन दिवसांच सिटी टुर बसचं तिकीट घेतलं होतं मग जवळपास अर्धा दिवस आम्ही मनसोक्त पॅरिस फिरलो.  गलेरी लफायत  य़ा पॅरिसच्या सगळ्यात मोठ्या मॉलला भेट दिली.  नंतर दोघांनाही खुप भुक लागली होती.   मी म्हटंल चल जवळच जेवायला जाऊया.   "मी नॉन वेज खात नाही, आपण इथं असलेल्या "सरवणा-भवन" ला जाऊया जवळच आहे,  ट्युब ट्रेन ने तर १५ मिनीटे लागतील."  श्रीनिवासने सांगितलं.   नॉन वेज खात नाही म्हटंल्या वर मी जरा गोंधळलोच.   म्हटंल चल तुझी मर्जी.   पटकन  आम्ही  सरवणाभवन गाठलं, तु काय घेणार मी विचारलं - सर साऊथ इंडियन थाळी, तुम्ही - मी म्हटंल पंजाबी (मराठी थाळी हा प्रकार जगात अजुन जायचा आहे!).    बाहेरची थंडी आणि पोटातली अग्नि शांत झाल्यावर - म्हणजे थोडं जेवल्यावर स्वत:ला सावरत मी त्याला विचारलं तुझ वय काय आहे बॉस?  तो म्हणाला गेस - मी म्हटंल ४०, आणखी एक चान्स मी म्हटंल ३५.  मी फक्त २८ वर्षाचा आहे!  - श्रीनिवास.  काय सांगतो?  खरचं सर मी वयाच्या फार लवकर कामला लागलो.   माझं मलाच समजेना की इतक्या लहान वयात माणुस इतका मोठा कसा होऊ शकतो? 

इतका प्रोग्रेस कसा केलास मी कॅफी घेत त्याला विचारलं.  "It is not difficult sir.  once you decide to work hard then you must really work hard"  त्याने यशाची साधी व्यख्या मला सांगितली.  "Sir I run my blog titled "Live Life to the FULLEST" web address is  http://www.shrinivaskk.blogspot.com/.  Recently I posted an article on 'Excellance', I began by asking What matters for success Skill or Attitude?  मी म्हटंल "Attitude",  सर यहीं तो लोग समझते नही ना! और दु:खी होते है!   श्रीनिवास म्हणाला (त्याचं हिंदी बर आहे).   Ok Lets tweek this Is excellance a skill or attitude?  मी पुन्हा म्हणालो Attitude!  Sir Great.  मग आम्ही Success, Attitude, आणि Excellance या माझ्या आवडत्या विषयांवर एक तास नॉन स्टॉप बोलत होतो........खुपच बरं वाटलं.   इतक्या लहान वयात विचारांची झेप बघुन मी थक्क झालो.  "I have no words to describe you my dear!"  मी पुन्हा त्याची पाठ थोपटली.   मी म्हटंल आपल हे बोलण माझ्या ब्लॉग वर टाकतो, तो नम्रपणे म्हणाला "सर I am really not that great!",   मी म्हटंल Boss let my readers decide!   "अरे सरजी please dont embarass me."   शेवटी तो म्हणाला Sir I remember the dialogue from 3 idiots, where Chanchad baba says “Strive for Excellence, Success will automatically fall at your feet”.  I am trying my best.....

एव्हाना स्नो फॉल सुरु झाला होता, थंडी खुपच वाढली.  दिवसभर त्याने माझे  आग्रहाने फोटो  काढ्ले आणि  इमेलवरून पाठवीन म्हणाला.   मला वाटतं तुम्ही त्याची साईट बघा आणि त्याने लिहिलेले सगळे ब्लॉगस जरुर वाचा...उशीरपण झाला होता.   आम्ही एकमेकांना पुन्हा मुंबईला भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला.  

आयफेल टॉवर खाली भेटलेला हा असा २८ वर्षीय यशस्वी मराठी तरूण श्रीनिवास कुलकर्णी  - खोल विचारांचा, मोठ्या मनाचा, मेहनती आणि सतत आनंदी.    श्रीनिवासच्या कर्तृत्वाची उंचीचा विचार केल्यावर आयफेल टॉवर मला खुपच लहान वाटला.............आणि मनात पुन्हा म्हटंल श्रीनिवास I am proud of you my dear!

Sunday, December 5, 2010

माझं Tweet.....नटसम्राट नाना पाटेकर!

३ डिसेंबर २०१०:   आमिर खानने लगान मधे साकारलेला "भुवन"च्या भुमिकेत शाहरुख खान असता तर?   आणि दुसरीकडे स्वदेस मधे शाहरुखच्या भुमिकेत अमिर खान!  अमिरचा "गजनी" आपल्या सन्नी देओलने जास्त चांगला केला असता.   शारुखखानने अमिताभचा  "डॉन" करण्यापेक्षा १९६० सालचा दिलीपकुमारचा "नया-दौर"  आज इन्टर्नेटच्या युगातला करायला पाहिजे होता.   अमिरखान ने मनोजकुमारचा "पुरब और पश्चिम" करावा ही माझी मनापासुनची इच्छा आहे!  त्याच बरोबर "शोले" पुन्हा कुणीही करण्याच्या भानगडीत पडु नये अगदी अमिताभ, धर्मेंद्रने आणि हेमाने सुद्दा;  हे ही मला तेवढंच मना पासुन वाटतं!  कतरीना ने चित्रपटात काम करण्यापेक्षा "बिग बॉस" मधे काम कराव अशी इच्छा बऱ्याच लोकांची आहे म्हणजे तिला भरपुर काम करायला मिळेल?  मराठी चित्रपटांच विचाराल तर मला वाटतं दादा कोंडक्यांचे चित्रपट कुणीही करण्याचा प्रयत्न करू नये!  कारण दादा पुन्हा होणे नाही!  तुम्ही म्हणाल हा आज मी काय विषय घेउन माझं Tweet लिहितोय?  विषय कसा आला सांगतो.....
मराठी नाटकांच्या बाबतीत मला खुप दिवसांपासुन वाटतं होत की नाना पाटेकरांनी वि. वा. शिरवाडकरांच अजरामर पात्र आप्पासाहेब बेलवलकर केलं तर?  आणि ही बातमी आली की खरचं नाना पाटेकर नटसम्राट करणार आहेत!  (आता आमचे मित्र संजय गोविलकर असते तर पटकन म्हणाले असते क्या बात है!)   माझ्यासकट नानांच्या असंख्य फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी  असणार आहे.   पण त्यात एक थोडी गफलत अशी आहे की नटसम्राट हा चित्रपट येतोय आणि तो बनविणार आहे महेश मांजरेकर.   मला नटसम्राट नाना पाटेकर मोठ्या पडद्या पेक्षा शिवाजी मंदीरात किंवा आमच्या रविंद्रमधे बघायला जास्त आवडले असतं.

Monday, November 22, 2010

माझं Tweet.....वाह ताज! वाह टाटा!!

२२ नोव्हेंबर २०१०: गेल्या आठवड्यात सर. रतन टाटांनी गौप्यस्फोट केला की दहा वर्षांपुर्वी त्यांनी घरी बसणं पसंत केले पण १५ कोटीची लाच देऊन स्वत:ची एअरलाईन्स सुरु केली नाही.  त्या नंतर लगेचच पंतप्रधान मन मोहन सिंग यांना सुद्दा टेलिफोन घोटाळा प्रकरणी टीका सहन करावी लागली म्हणुन मी थोडा बेचैन होतो.   असो.  लोकसत्ताचे श्री. सुधीर जोगळेकरांनी "ब्रॅण्ड ताज" या शीर्षकाखाली रतन टाटांनी त्यांच्या "द ताज पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट" फंडाने घरोघरी जाऊन दोन कोटींच्या वर रक्कम २६ नोव्हेंबर २००८च्या दहशतवादी हल्यामधे होरपळलेल्या मुंबईच्या दुर्दैवी कुटूंबीयांना दिली, त्याची संपुर्ण माहिती कालच्या रविवार लोकसत्ता पुरवणीत दिली आहे.   त्यातील काही भाग इथं देत आहे.    एक व्यक्ती!  अनेक आदर्श!  सर. रतन टाटांच्या या कामगिरीला संपुर्ण देशाचा मनापासुन सलाम! 

मनोज ठाकूर. वय र्वष २९. कुलाबा कॉजवेजवळच्या ताज समूहाशेजारी असलेल्या एका छोटय़ा दुकानात काम करणारा तरुण.  लिओपोल्ड कॅफेत झालेल्या गोळीबारात जखमी झालेला. त्यानं आजवर ताजबद्दल फक्त ऐकलं होतं की तिथं  चहाचा कप ९०० रुपयांचा असतो.  आपण असा एखादा चहाचा कप पिणं सोडून द्या, नुसता पाहू तरी शकू का, असा प्रश्न त्याला पडत असे.. ....२६/११ला जखमी झालेल्या मनोजला उपचारादाखल द ताज पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट फंडानं पहिले सहा महिने दरमहा ५००० रुपये दिले.   मनोज बरा झाला. ताजनं त्याला तीन महिन्यांचं प्रशिक्षण दिलं.   नंतर ताजच्याच फूड अ‍ॅण्ड बीव्हरेजेस विभागात स्टायपेंडवर मनोजला नोकरी लागली.  ट्रस्टनं त्याच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तर उचललीच आहेच, पण त्याच्या शिक्षिका पत्नीला पुढचं शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्तही केलं आहे....

Monday, November 15, 2010

माझं Tweet.....१४ नोव्हेंबर - बालक दिन!

१४ नोव्हेंबर २०१०:  बालक दिन!  पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२१व्या जयंती.   दर वर्षी  आजच्या दिवशी सरकार मोठ मोठ्या जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करते.   तरी देशातील लाखो निष्पाप मुलांची परिस्थिती "जैसे थे"!   मनसोक्त खेळायच्या वयात ती मुल देश उभारणीचा भार उचलतात!त्यांना आपण अजुनही प्राथमिक शिक्षणं देवू शकलो नाही? तरी ही या मुलांच्या तोंडावर नेहमी हास्य असतं.
त्यांना डोक्यावर एक साधं छ्प्पर मिळू नये का?  देवा तुझ्या शरणात तरी त्यांना सुखरूप ठेव! हीच प्रार्थना! 

Tuesday, November 9, 2010

माझं tweet.....अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामां!

९ नव्हेंबर २०१०:  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी मिशेल तीन दिवसांचा दौरा आटपून आशिया खंडाच्या पुढच्या प्रवासाला आज जातील.   त्यांच्या वर पहिल्या दिवशीच पाकिस्तानवर तोफ डागली पाहिजे होती इंथ पासुन ते अमेरिकेचे सेल्समेन आहेत आणि भारताला त्यांच्या कडुन काहीही फायदा होणार नाही, आज मंदीच्या काळात अमेरिकेला आपली गरज जास्त आहे आपल्याला नव्हे!  इथं पर्यंत सगळ्यांनी टीका केली,  आणि त्यांच्या भेटीचे कवित्व अजुन काही दिवस आपला मिडीय़ा जिवंत  ठेवतील यात काही शंका नाही.   ओबामांनी आपल्याला रस्ते, वीज, पाणी, अन्न, वस्त्र आणि निवारा या सगळ्यांसाठी कुठल्याही अटी शिवाय सढळ हस्ते मदत करावी, भरपुर पैसे द्यावेत आणि त्यावर आपल्यासाठी पाकिस्तानला सुद्दा सज्जड दम भरावा अशी काहींची अपेक्षा होती.   अमेरिका असो  किंवा इतर कुठलाही देश असो त्यांचे राष्ट्राध्यक्ष काही ब्लॅन्क (Blank) चेक बुक घेऊन कुठेच जात नाही!   अशी टीका करणाऱ्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या राज्यकर्त्यांनी गेली ६३ वर्ष आपल्या देशासाठी काय केल?    आपल्या राज्यकर्त्यांनी कुठला "आदर्श" जनतेपुढे ठेवला हे आपल्याला चांगल माहित आहे?

Wednesday, November 3, 2010

माझं tweet.....शुभ दिपावली! २०१०

३ नोव्हेंबर २०१०:  दिपावली म्हटंल की आनंदाचा, उत्साहाचा आणि भरपुर कार्यक्रम activityचा सण! दिपावलीच्या शुभेच्छा कार्डस तयार करणे (कालपर्यंत विकत घेत होतो - आता आपण ई-ग्रीटिंगस पाठवितो), कंदिल  बनविणे (हल्ली फोल्डिंगचे विकतं घेतो), फराळ बनविणे (हल्ली तोही विकत मिळतो - त्यातच डायट आणि शुगर फ्री फराळ देखिल मिळतो!), फटाके घ्यायला जाणे (ते थोडं कमी झालंय), मित्रांच्या घरी जाणे (हल्ली एखाद्या मॉलला भेट देतो), नविन कपडे आपल्या नेहमीच्या शिंप्याला शिवायला देणे (हल्ली रेडी मेड ब्रॅण्डेड कपडे घेतो), मित्रांना फोन करणे (हल्ली फेसबुक, ट्विटर   आणि SMS वरून मेसेज पाठवितो), दिवाळीची नवीन खरेदी (त्यात मोबाईलचा हॅन्डसेट बदलणं हे हमखास असतं). मी दिपाली साजरी करण्याच्या पद्दतीवर मुळीच टीका करीत नाही, तशी इच्छा देखिल नाही, फक्त दिवाळी साजरी करताना होत गेलेला फरक मांडण्याचा प्रयत्न केला!  मला माहित आहे की ’बदल’ हीच अशी गोष्ट आहे की ती  ’कायम’ असते!  

Monday, November 1, 2010

उद्योगाचा शुभारंभ!

‘मंगेश (म्हणजे पूर्वीचा मोरू) अरे यंदाच्या दिवाळीला पदवीधर होऊन तुला सहा महिने झाले, अजूनही तू तुझा बायोडेटा तयार केलेला नाहीस. त्याशिवाय तू नोकरीसाठी अर्ज कसा करणार?’ मंगेशचे पप्पा (म्हणजे पूर्वीचा मोरूचा बाप) मंगेशला उद्देशून म्हणाले, ‘नाही! काय वाटेल ते झालं तरी मी नोकरीसाठी अर्ज तयार करणार नाही आणि कुणाला नोकरीसाठी भेटणारसुद्धा नाही, मग ती मॅनेजरची का असेना.’ इति मंगेश. मंगेशचे पप्पा चकीत झाले, डोक्यातला संताप लपवत, दिवाळीच्या तोंडावर वाद नको म्हणून विनोदाने घेत म्हणाले, ‘का बरं लॉटरी वगैरे लागली आहे का? की कोणी घरजावई करून घेणार आहे?’ ‘मला स्वत:चाच एक उद्योग उभारायचा आहे, पप्पा! मी दर महिन्याला इतर कोणाकडून ठरावीक दिवशी ठरावीक पगार घेणार नाही तर एक माणसाला का होईना पण मी पगार देणार! हे लक्षात ठेवा.’ मंगेश आवेशात पप्पांना म्हणाला. ‘अरे मंगेशा, मग इतका शिकलास कशाला? आणि हो अरे पैसे कुठून आणणार आहेस?’ मंगेशचे पप्पा मंगेशला काळजीच्या स्वरात म्हणाले, ‘अहो पप्पा, तुमची पिढी काय फक्त शंकाच काढत बसणार का? मनोज तिरोडकरांना कोणी पैसे दिले होते? पण ते तर त्यांच्या जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून अनिल अंबानीची कंपनी विकत घ्यायला निघाले होते.’ मंगेश चढय़ा स्वरात म्हणाला. ‘असं म्हणतोस? खरे तर मलाही नोकरीऐवजी उद्योग करायची सुप्त इच्छा होती. पण त्या वेळी फार विरोध झाला असता, शिवाय माहिती मिळणं सोपं नव्हतं, इतरांची मोनापोलीच असल्यासारखं होतं. आता बराच बदल झाला आहे, असं वाटतंय. चल तू प्रयत्न कर. मी तुझ्या पाठीशी आहे.’ मंगेशचे पप्पा म्हणाले.

मंगेश व त्याच्या पप्पांमधील हा संवाद काल्पनिक असला तरी आज मोठय़ा प्रमाणात मराठी घरात तो नक्कीच होतो आहे. मराठी तरुणांच्या व त्यांच्या कुटुंबाच्याही मानसिकतेत हा सुखद बदल होताना दिसतोय. आज जवळपास प्रत्येक मराठी वृत्तपत्रात दर आठवडय़ाला एक करिअरसंबंधी स्पेशल पुरवणी असते. त्यात मुख्यत: स्वयंरोजगार उद्योगाविषयी सविस्तर माहिती असते. शिवाय इतर किती तरी मराठी मासिके आज उद्योग, व्यापार, व्यवसाय, स्वयंरोजगार याविषयी निघतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज मराठी नाटकांच्या आणि सिनेमांच्या जाहिरातीबरोबर मराठीत मॅनेजमेंटचे धडे, यशाचा महामंत्र, सक्सेसचा- ब्ल्यू प्रिंट, यशस्वी मराठी उद्योजकांच्या मुलाखती, तसेच व्यवसाय आणि उद्योगासंबंधी मार्गदर्शनाचे तीन-तीन तासांचे आणि काही तर दिवसभराचे कार्यक्रम आज शिवाजी मंदिर, कर्नाटक संघ हॉल, रवींद्र नाटय़ मंदिरात होत असतात आणि ५०० रुपयांची तिकिटं घेऊन ते बघायला आणि ऐकायला मोठय़ा प्रमाणात मराठी तरुण येत आहेत, पण बघायला आणि ऐकायला येत आहेत म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणे होईल! कारण पुढे जाऊन हे धडे अंमलात आणण्याच्या निश्चयाने ते अशा कार्यक्रमांना जातात. त्यांचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन खरंच वाखाणण्याजोगा आहे. मला वाटतं अशा मुलांच्या पाठीशी त्यांच्या पालकांनी आणि खरं तर संपूर्ण मराठी समाजानेच खंबीरपणे उभं राहायला हवं.

Sunday, October 24, 2010

माझं tweet.....हत्ती! राष्ट्रीय़ वारसा.

२४ ऑक्टोबर २०१०:   मागच्या महिन्यात बंगालच्या मोराघाटच्या जंगलात सात हत्तींचा एका मालगाडीच्या धडकेने मृत्यु झाला तर एक हत्ती गंभीर जखमी झाला.  ह्या बातमीने सारा देश हळहळला नसता तरच नवलं.   तीन महिन्याआधी अशाच प्रकारे त्याच ठिकाणी एक हत्ती रेल्वेगाडीच्या  खाली  आल्याने मृत्यु झाला होता.   अपघाताची   नेहमी प्रमाणे चौकशी सुरु आहे?  त्या जंगलातुन जाताना आता रेल्वे गाडीचा स्पीड कमी करणार आहेत.   त्या बातमी नंतर आपल्या कडे गणपती आले आणी मला हत्तीविषयी जाणुन  घेण्याची  मना पासुन खुप इच्छा झाली.   गणपतीने माझी हाक ऎकली आणि या महिन्याच्या ४ तारखेला

Monday, October 18, 2010

माझं tweet.....उल्हास दिलसे!

१८ ऑक्टोबर, २०१०:    बाराखडी दिलसे टीम आणि बॉर्न-टु-विन... ....
प्रिय उल्हास,

दसरा असूनही तुझ्या प्रेमळ आग्रहाखातर "स्वप्न बघा स्वप्न जगा" कार्यक्रमासाठी दामोदर हॉल परळ येथे उपस्थित राहिलो आणि वाटले इथेच मला विचारांचे सोने लुटायला मिळाले!   मला खरचं पुण्याला जायच होतं पण मी ते शेवटच्याक्षणी टाळलं आणि तुझ्यासाठी आलो

उल्हास तुला "नाही" म्हणता येत नाही रे राजा!   याच पहिलं कारण म्हणजे तुझा प्रेमळ आणि मृदु स्वभाव; आणि दुसरं तुझी "बाराखडी दिलसे"ची संपुर्ण टीम एका धेयाने प्रेरित होऊन काम करीत आहे अस मला वाटतं.   तूम्ही तरूण आहात,  तुम्हाला सुद्दा करिअर करायच आहे,  इतरांसारखे पैसे कमवायचे आहेत,  पण हे करीत असताना तुम्ही मराठी तरूणांना एक दिशा देण्याच काम करीत आहेत;  समाज घडवतं आहात,  म्हणुन तुमच्या कामाला मना पासुन सलाम! 

Saturday, October 16, 2010

माझं tweet.....आज रावणवध अशक्य?

१७ ऑक्टोबर २०१०:  दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा!  दसरा म्हटंल की आपल्या आठवण होते ती - रामाने केलेल्या रावणवधाची!  दृष्टांचा संहार!  परंतु दुदैवाने आज सगळीकडे रामाच्या वेषात रावणच राज्य करीत  असल्या मुळे राम कोण आणि रावण कोण हेच समजत नाही,  म्हणजे आजतरी रावणवध अशक्य दिसतो!  बरं खऱ्या रावणाला दहा तोंड होती म्हणुन रामाला तो सहज ओळखता आला, आजचा राणाला एकच तोंड आहे, पण तो खातो मात्र शंभर तोंडाने!   त्यांना बघायच असेल तर अगदी सोप आहे,  काही रावण वर्षभर नाक्या नाक्यावर आपल्या वाढदिवसाची मोठमोठी पोस्टर्स, ऊंच कटआऊट्स लावतात!  

Sunday, October 10, 2010

माझं tweet.....आपण देणाऱ्याचे हात केंव्हा घेणार!

१० ऑकटोबर २०१०:  गेल्या आठवड्यात श्रीलंकेत असताना तेथील दैनिक वृतपत्रात एक बातमी वाचली की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळविलेल्या बिल गेटस् वा दुसऱ्या क्रमांकावरील वॉरन बफे यांनी चायनामधील श्रीमंत उद्दोगपतींची भेट घेतली आणि त्यांनी कमविलेल्या मालमत्तेपैकी काही पैसे सामाजिक कार्यासाठी देण्याचे आवाहन केले.   आता ते दोघेही आपल्या भारतातील श्रीमंत उद्दोगपतींची लवकरच भेट घेणार आहेत.  या संदर्भात काल दैनिक लोकसत्ताच्या आर्थिक पुर्वणीत श्री. प्रसाद केरकरांनी "भारतासही एक बिल गेटस हवेत" ह्या शीर्षकाचा एक लेख आहे तो खाली देत आहे.   आपल्या देशात Corporate Social Responsibility वर आपण फक्त कृतीहीन चर्चा करायला सदैव तयार असतो, हे ह्या देशाच दुर्दैव आहे! 
मला आठवतं एकदा एका भारतीय उद्दोजकाला एका पत्रकाराने विचारलं की,  वॉरेन बफे सारखं आपण समाजासाठी केंव्हा दान देणार,  तर तो साठीतला उद्दोगपती म्हणाला की समाजासाठी काम करायला माझ वय तितकसं परिपक्व झालेल नाही.  अजुन मी तरूण आहे!  ते म्हणाले ते अगदी खर आहे,  बरीच माणसं फक्त वयाने मोठ होतात मनाने नाही!  देशातील फक्त ५० श्रीमंत कुटुंबांनी ठरवलं तर देशातील प्रत्येक माणसाला माणुस म्हणुन जगाता येईल इतकी साधन संपती आपल्या देशात आहे.  प्रश्न असा आहे की आपण देणाऱ्याचे हात केंव्हा घेणार? 

Monday, September 20, 2010

उद्योगाचे वारसदार!

सुमारे ११४ कंपन्या मिळून ७१ अब्ज डॉलर एवढी उलाढाल करणाऱ्या ‘टाटा ग्रुप’ या देशातील मोठय़ा उद्योगसमूहाने दुसऱ्या पिढीच्या रतन टाटांचा वारसदार शोधण्याची जंगी मोहीम आखलेली आहे. त्यांच्या पाठोपाठ ‘इन्फोसिस’ या अग्रगण्य आयटी कंपनीचे मूळ संस्थापक नारायण मूर्तीनासुद्धा आपला वारसदार हवा आहे. या दोन उदाहरणांवरूनही पुढचा वारदार कोण असावा? ही समस्या किती गंभीर आहे, याची कल्पना येते. तीन पिढय़ांनंतर सुद्धा जे उद्योग अजूनही भक्कमपणे उभे आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे मोठय़ा विश्वासाने नेतृत्व बहाल केलेलं दिसतं; तर दुसरीकडे नेतृत्व कुणाकडे असावे यावरून वाद विकोपाला जातो आणि शेवटी उद्योगाचे तुकडे होतात! हे चित्र फक्त मराठी उद्योगांचेच नसून अगदी गुजराती-मारवाडय़ांमध्ये सुद्धा दिसतं. ज्या तीन पिढय़ांबाबत हे चित्र असेल, त्यावर थोडं विचारमंथन करुया.

Monday, September 13, 2010

माझं tweet.....जय गजानन!

१२ स्पटेंबर २०१०:  संत गजानन महाराज संजीवन समाधीला कालच्या ऋषिपंचमीला शंभर वर्ष पुर्ण झाले!   गजानज महाराज संस्थान शेगाव हे एकच अस क्षेत्र आहे जिथं लाखो भक्त येतात, संस्था करोडोंचा खर्च करते, तरी कुठल्याही प्रकारच कमर्शियलाझेशन तिथं झालेल नाही.  मी शेगावला गेली ३० वर्ष, वर्षातुन एकदा तरी भेट देतो.   कालचा उत्सव हा अप्रतिम सोहळा झाला असणार यात शंकाच नाही.  ‘गण गण गणात बोतें’ या जयघोषांनी अवघा आसमंत निनादला असेल.  शेकडो दिंड्या  गजाननाच्या गजर करीत शेगावात दाखल झाले असतील आणि सर्वत्र भक्तीचा महासागर ओसंडून वाहत असेल.   गजानज महाराजांच देशात अस एकमेव स्थान आहे जिथं कुठलाही भेद भाव होत नाही - कुठलाही ’व्हीआयपी’ पास नाही.  प्रत्येकाला एकाच रांगेत उभं रहावं लागतं.

Monday, September 6, 2010

माझं tweet.....देशाच्या दारिद्र्याला जबाबदार कोण?

६ सप्टेंबर २०१०:   देशाच्या निरक्षरता, कुपोषण, स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, अन्नधान्न्यांच्या व विजेच्या पुरवठ्याबाबतची दारूण स्थिती या गंभीर समस्यांच्या मागे दरिदी लोकप्रशासन ('पूअर गव्हर्नन्स') हेच कारण असल्याचे मत सॉफ्टवेअर उद्योगातील एक दिग्ग्ज व इन्फोसिस टेक्नॉलॉजिसचे 'चीफ मेण्टॉर' एन. आर. नारायणमूर्ती यांनी रविवारी बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग बेंगळुर मध्ये आयोजित बी. ई. व बी. आर्क.च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले......... एक बातमी महाराष्ट्र टाइम्स

Tuesday, August 24, 2010

माझं tweet.....मल्टिप्लेक्स आणि मराठी सिनेमा!

२४ ऑगस्त २०१०:  नारळी पोर्णिमेच्या शुभेच्छा!  गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्रातील  मल्टिप्लेक्स हा चर्चेचा विषय बनला आहे.   मुंबईत मराठी हॉटेल्स, मराठी शाळा, नाट्यसृष्टी,  गिरणगावातल्या मराठी माणसांच्या चाळी, अशा सगळ्याच प्रंट वर आपण खुप मागे पडलो!   गेल्या ४० वर्षात मुंबईच मराठीपण जपण्यासाठी आपण ठोस काहीही करु शकलो नाही.   ज्या मराठी भाषेसाठी आपण जीवाच रान करतो, पोट तिडकीने बोलतो, त्या माय मराठी भाषेचं वर्षातुन एकदा होणारं साध साहित्य संमेलन आपण भांडण-तंट्या शिवाय नीट भरवु शकत नाही ही आपली शोकांतिका आहे!  याला जबाबदार कोण?   काही वर्षांनी तर मुंबईत मराठी माणुस  दुर्बिणीने शोधावा लागेल!   उद्या मुंबईत सगळीकडे मराठीच्या पाट्या लागल्या, मल्टिप्लेक्स मधे मराठी सिनेमा लागला तरी त्या आपल्या बांधवांना कल्याण डोंबिवली वसई आणि विरार मधुन मुंबंईत परत आणु शकणार नाही!   हे कटु सत्य आहे.  

Friday, August 13, 2010

माझं tweet...देश विकणारे तुपाशी, आणि झेंडा विकणारे उपाशी.


१५ ऑगस्ट २०१०:   आधी आयपीयल नावाच्या क्रिकेट वर करोडोंची बोली लागली आणि मग ते पैसे वसुल करण्यासाठी तेवढ्याच पैशाचा सट्टा झाला.  त्यातील गुन्हेगार शोधण्याआधी दिल्लीश्वरांनी कॉमन वेल्थ गेम्सच्या नावखाली काही हजार कोटींचा पुण्याच्या पिस्तुलने सहज गेम केला.   देश विकणारे तुपाशी आणि देशाची खरी "वेल्थ" असणारी चाचा नेहरूंची मुलं मात्र  झेंडा विकून सुद्दा उपाशी!

एकीकडे हा असा बेसुमार भ्रष्टाचार!  तर दुसरीकडे गेल्या वर्षी शिर्डीच्या साईबाबांना आपण काही करोड रुपयांच्या सोन्याच्या आसनावर बसविले, आता पंढरपुरात विठोबाच घर सोन्याचं होणार आहे!  त्या आधी आमच्या प्रभादेवीच्या सिद्दिविनायकाच्या देवळावर सोन्याचा कळस लोकांनी चढविला!  देवालाही जर करोडोंचा भोग लागणार असेल तर सामान्यांनी काय करावं?  कुणाकडे जावं?  आपण कुठे निघालो आहोत हेच कळतं नाही.  डोक बधिर होतं. 

Monday, August 9, 2010

माझं tweet.....ए प्रॉमिस इज प्रॉमिस! सर. रतन टाटा.

९ ऑगस्ट २०१०: सध्या कॉर्पोरेट जगतामधे सगळ्यात मोठ्या उत्सुकतेचा विषय कुठला असेल तर तो आहे श्री. रतन टाटा नंतर टाटा ग्रुपचा वारसदार कोण?   या संदर्भात लोकसत्तचे श्री. प्रसाद केरकरांनी आजच्या एक्सप्रेस Money मधे उत्तम लेख लिहीलेला आहे तो खाली देत आहे.   तर श्री. टाटांचा वारसदार कोण याचं उत्तर मिळायला  आपल्याला अजून किमान आठ महिने वाट पहावी लागणार आहे.

साधारणपणे एप्रिल महिन्यात Economic Times ने भारतातील टॉपमोस्ट १०० CEOsची यादी जाहीर केली. त्यात पहिल्या क्रमांकावर टाटा ग्रुपचे चेअरमन सर. रतन टाटा,  दुसरे होते श्री. मुकेश अंबानी आणि तिसऱ्या क्रमांकावर होते श्री. नारायण मुर्ती.   याच वृतप्रतात ह्या सिईओजच्या पुर्वी केलेल्या त्यांच्या भाषणातील काही निवडकं वाक्य सुद्दा प्रसिद्ध केले होते.    नंबर १ वर असलेल्या श्री. टाटांच शब्द होते "A promise is promise!" - मला वाटतं इतका अर्थपुर्ण आणि पावरफुल मेसेज मी आज पर्यंत कुठेही वाचलेला नाही!   एखाद्या ग्रुप चेअरमेन जेंव्हा अस बोलतो तेंव्हा त्याला एक वेगळा अर्थ लाभतो.   श्री. टाटा हे फार संयमी आहेत, कमी बोलतात, मनापासुन बोलतात!  हे सगळ्यांना माहीत  आहे.   या चार शब्दा मुळे त्यांनी त्यांच्या ग्रुपची इमेज संपुर्ण जगात तर फार उंच नेलीच! पण त्याच बरोबर  त्यांच्या ग्रुप मधे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठ्या जबाबदारीने  काम करण्याचा संदेश सुद्दा दिला.  माझ्या दृष्टीने हे फार महत्वाच आहे.  कॉर्पोरेट लॉयर म्हणुन काम कुठल्याही कोलॅबोरेशन/ भागीदारी चे ऍग्रीमेंट वर चर्चा करताना मी नेहमी म्हणतो की ज्याला शब्द पाळायचा असेल त्याला कागदावर सही करण्याची गरज नसते! 

Thursday, July 29, 2010

माझं tweet.....मुंबई कुणाची?

२९ जुलै २०१०:  मुंबई कुणाची?  हा प्रश्न विचारला तर राजकीय भुकंप होईल!  मुंबईतल्या चाळी गेल्या तसा आता मध्यम वर्ग हा प्रकारच नाहीसा होत चालेला आहे. मध्यमवर्गाने काय करावं? कुठे जावं? आजचा दिवस ढकला, उद्याच काय?  पुढच्या पिढीची गोष्टच सोडा.  मध्यमवर्गाला कायमच गप्प केल जातयं! इथल्या मुळ माणसांना मुंबईच्या बाहेर नेणारा हा रस्ता एकतर्फी आहे!   आणि यासाठी दिल्ली ते गल्ली पर्यंतची सगळी गिधाडे एकत्र आलेली आहे.  कुठल्याही रंगाचा झेंडा याला अपवाद नाही.  मुंबईतल्या रस्त्यावर खोऱ्याने पैसा ओढायचा असेल आणि तो सुद्दा एका रात्रीत तर एकच धंदा आहे,  आणि तो म्हणजे "बिल्डर" होण्याचा.   बिल्डर होण्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन - साम-दाम-दंड-भेद!   इथं प्रत्येकाला हवाय ह्या मुंबईतील सामान्य माणसांचा आणि त्यांच्या जमीनीचा  लचका!  त्यातच "redevelopment" नावाची एक नविन जीवघेणी साथ आलेली आहे!   कुणाची होती ही मुंबई, आज कुणाची आहे,  उद्या ही कुणाची असणार आहे?  फुटपाथ बळकविणारे उपरे तसे इथ पाच पिढ्या रहाणारे सुधा उपरे झालेत? याला जबाबदार कोण?  सगळेच असुरक्षित!

Friday, July 23, 2010

माझं tweet.....'तेंडुलकर ओपस' - लक्षम्ण रेषा?

२3 जुलै २०१०:   'तेंडुलकर ओपस' या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चरित्राची 'ब्लड एडिशन' बाजारात येतेय.   या चरित्राचे एक पान तयार करताना कागदाच्या लगद्यासोबत सचिनच्या रक्ताचे काही थेंबही वापरण्यात आले आहेत!    ८५२ पानांच्या ३७ किलो वजनाच्या आणि अर्धा चौ. मीटर क्षेत्रफळाच्या या चरित्राची किंमत आहे ७५ हजार अमेरिकन डॉलर्स!  केवळ १० प्रतींच्या या मर्यादित आवृत्तीमध्ये सचिनचे अप्रकाशित फॅमिली फोटों व त्याचे करिअर विषयी त्याचे विचार असतील.  सचिनचे डीएनए प्रोफाइलही पुस्तकात छापण्यात येणार असून त्यासाठी सचिनच्या लाळेचे नमुनेही मागवण्यात आले आहेत असे प्रकाशक क्रेकन मीडियाचे कार्ल फोव्लरने सांगितलं.  या अशा रक्तरंजीत पुस्तकाच्या दहाही प्रतींची नोंदणी झालेली आहे.  या दहा प्रतींच्या विक्रीतून येणारी रक्कम मुंबईत शाळा बांधण्यासाठी सचिनच्या संस्थेला देण्यात येणार आहे.   या चरित्राची प्रत्येकी दोन ते तीन हजार डॉलर्स किमतीची एक हजार प्रतींची आणि  त्याशिवाय २०० ते ३०० डॉलर्स किमतीची स्वस्त आवृत्तीही छावण्यात येणार आहे.   अशी बातमी मटात वाचली.  आणि परवा IBN7 Lokamat वर या विषयीच्या चर्चेत नाराजीचा सुर देखिल बघितला.  काल Economic Times मधे सुद्दा या अशा मार्केटिंगबद्दल काही मान्यवरांच्या नकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.  थोडक्यात सचिनने चरित्रछापताना रक्त वापरण्याची गरज नव्हती.  ही Cheap publicity  आहे.

Sunday, July 18, 2010

माझं tweet.....Compulsory आराम!

१८ जुलै २०१०: मित्रांनो गेली १० दिवस मी आजारी आहे!  घबरु नका आता पुर्ण बरा आहे.  सुरुवातीला वायरल फिवर आहे असं वाटलं होतं, पण निघाला "डेंग्यु" - पुण्याजवळ सोमाटणे फाटा आहे तिथं मोठ मोठ्या नर्सरीज आहेत तिथे मी माझ्या खंडाळ्यच्या घरासाठी काही झाडं घ्यायला गेलो असताना कदाचित मच्छर चावला असण्याची शक्यता आहे!   बॉटम लाईन मला ’डेंग्यु’ झाला होता.  डॉकटरांना सुरुवातीला निदान करता न आल्यामुळे मला Typhoidचे औषद दिले.  असो.  आता पुर्ण पणे बरा झालो असलो तरी weakness खुप जाणवतो, आणि अजुन दोन आठवडे तरी पुर्णकाम करता येईल असं वाटतं नाही.   Compulsory आराम म्हणजे माझ्या सारख्या माणसाला एक प्रकारचं मोठं काम!   घरचे मला शांतपणे बघु शकतं नाही.  खरं तर "झोप" मला फारच प्रिय!  मी सलग दोन दिवस आरामात झोपु शकतो!  मी काहीही न करता दहा दिवस काढले हे ऎकुन मित्रांना खुपच विचित्र वाटतं असेल.  घरी काही बॉण्डचे सिनेमे बघितले!  पण मन मात्र रोज पावसात छान फिरुन येतं.

काय करायच सुचत नव्हतं.  नाही म्हणायला लोकसत्ता अर्थवृतान्त मधील माझे लेख कंपाईल करायला सुरुवात केली आहे, साधारणं पणे ऑटोबर मधे पुस्तकं प्रसिद्द करायचा विचार आहे बघुया किती जमतं ते.   ऒफिस मधे कामाचे डोंगर तयार आहेत, माझ्या सहकाऱ्यांची काय अवस्था असेल मी समजू शकतो.  सोमवारपासुन जाईन म्हणतो.   मनाचा जोर तर झाला आहे.