Monday, January 4, 2010

2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)!

ससा आणि कासवाची जुनी गोष्ट आपल्याला माहीतच आहे. कालांतराने सशाने त्याच्या पराभवाचं मूळ शोधून काढलं (Root Cause Analysis).‘स्पर्धकाला कमी लेखणे’ आणि ‘फाजिल आत्मविश्वास’ हे दोन स्वत:चे दोष त्याला उमगले. मनाची तयारी करून त्याने पुन्हा कासवाला शर्यतीसाठी निमंत्रण दिले आणि या खेपेस कुठलीही चूक न करता धावत जाऊन शर्यत जिंकला- तात्पर्य आपल्या स्पर्धकांना कमी न लेखता सदैव जागरूक असायला हवं. गोष्ट इथं संपत नाही- कासवाने आता त्याच्या पराभवाची कारणमीमांसा केली. त्याने या खेपेस शर्यतीसाठी मार्गात एक नदी येईल असा मार्ग निवडला. सशाने विचार न करता पुन्हा शर्यतीसाठी होकार दिला. या खेपेस नदीपर्यंत ससा धावत गेला पण पोहता येत नसल्यामुळे त्याला थांबावं लागलं, कासव हळूहळू आला पण त्याने नदी सहजपणे पार केली आणि शर्यत जिंकली. तात्पर्य: कासवाने पाण्यात पोहता येणं ही त्याची Core Competency- खरी क्षमता ओळखून मार्ग निवडला म्हणून जिंकला आणि शर्यतीचा अभ्यास न करता शर्यतीत सहभागी झाल्यामुळे ससा हरला. दोन शर्यतीनंतर कासव आणि ससा हे एकमेकांचे चांगले मित्र झालेले होते आणि त्यांनी त्याच मार्गावर पुन्हा कमीत कमी वेळेत शर्यत जिंकण्याचा निर्णय घेतला पण एकटय़ाने नव्हे तर दोघांची ‘टीम’ करून एकमेकांच्या सहकार्याने! नदीपर्यंत सशाने कासवाला आपल्या पाठीवर घेतलं ज्यामुळे वेळेची बचत झाली आणि पुढे नदीत कासवाने सशाला पाठीवर घेऊन दोघांनीही शर्यत जिंकली! तात्पर्य : प्रत्येकाने स्वत: हुशार असणं केव्हाही चांगलं, पण आपण जिथं कमी पडतो तिथं दुसऱ्याच्या ताकदीचा उपयोग करण्यात जास्त हुशारी असते. मुख्य म्हणजे दोघांनीही अपयशाने खचून न जाता प्रत्येक वेळी नवीन मार्ग शोधला. एकमेकांशी स्पर्धा न करता दोघांनीही सहकार्याने परिस्थितीवर मात केली. केवळ बोधकथा म्हणून या गोष्टींकडे न पाहता प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग होऊ शकतो. उदा. एकाच उद्योगक्षेत्रात कार्यरत असलेले दोन उद्योजक हे एकमेकांचे स्पर्धक असू शकतात, पण त्यांनी एकमेकांना एकमेकांचे ‘शत्रू’ समजण्याची चूक करू नये.


आज कुणाकडे मॅन्युफॅक्चरिंगचा बेस आहे तर कुणाकडे मार्केटिंगची ताकद आहे. कुणाकडे चांगलं ब्रॅण्ड आहे तर कुणाकडे भांडवल उपलब्ध आहे. मदत पाहिजे पण सहकार्यासाठी पार्टनर नको ही मानसिकताच चुकीची आहे. मराठी उद्योजकांनी यशासाठी निदान आपल्या मनाची दारे कुठलाही पूर्वग्रह न बाळगता इतरांशी सहकार्य करायच्या दृष्टीने मोकळी ठेवायलाच पाहिजेत. सहकार्य याचा अर्थ फक्त व्यवसायात पार्टनरशिप असा नाही. व्यवसायाच्या ज्या विभागात आपण कमी पडतो, तिथं इतरांना सहभागी करून घेता आले पाहिजे. ज्याच्याकडे जे उत्तम आहे त्याला बरोबर घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. तोच प्रगतीचा मार्ग आहे! बहुराष्ट्रीय कंपन्या तर प्रत्येक देशात विविध प्रकारे सहकार्याचे करार करीत असतात. कित्येक वेळा असे करार मोडावेदेखील लागतात पण तो एक व्यवसायाचा भाग म्हणून स्वीकारायला शिकलं पाहिजे. निदान सहकार्याविषयी चर्चा करण्याची मानसिकता तयार होणं गरजेचं आहे. १+१=२ ही बेरीज आपण शिकलो, पण व्यवहार्य दृष्टीने त्याचं उत्तर ११ करता आलं पाहिजे, तरच जगात आपण आपली नवीन ओळख तयार करू शकू. एकमेकांचा हात धरून मोठं होण्याच्या मानसिकतेची सुरुवात मराठी समाजात झालेली आहे, पण ती सगळ्या स्तरात वाढायला हवी. आज जैन, कच्छी आणि मारवाडी समाज एकमेकांना धरून चिकटून काम करताना दिसतात. माहिती, ज्ञान आणि अनुभवाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात जसा ते करतात तसा आपल्या मराठी समाजात अजून होत नाही.

मागच्याच आठवडय़ात मुंबईत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितो या संघटनेतर्फे जैन समाजातील व्यावसायिक- उद्योजकांची जागतिक परिषद पार पडली. त्यात फायनान्शियल सुपर मार्केट या वित्तीय सेवा बाजारपेठेतील भारतातील संधीचा उहापोह करण्यात आला. त्या परिषदेत विशेष म्हणजे प्रारंभिक भागविक्री करून भांडवल उभारणी कशी करावी, लहान व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध आर्थिक पर्याय, व्यवसाय विस्तारासाठी सुयोग्य वृद्धी धोरण आदी विषयांवर जाणकार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं गेलं. त्यांच्या चर्चेचा विषयसुद्धा आर्थिक यश म्हणजे पैशाच्याच भोवती फिरत असतो. जितो या त्यांच्या नावातसुद्धा जिंकणे अभिप्रेत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे!

मराठी उद्योजकांना विविध प्रकारे इतरांशी सहकार्य करण्यासाठी सर्वप्रथम विविध उद्योग, प्रॉडक्टस्, मार्केट, तंत्रज्ञान आदी विषयांची भरपूर माहिती मिळणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यापक सहकार्य करण्यासंबंधीचं योग्य मार्गदर्शन व एकूणच एकमेकांच्या सहकार्यासाठी लागणारी मूलभूत व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. हे काम संघटित स्वरूपातच होऊ शकतं. आज महाराष्ट्रात उद्योजकांच्या किमान दोन ते तीन डझन विविध संस्था कार्यरत आहेत व प्रत्येक संस्था वेगवेगळी चूल थाटून आपलं कार्य करायचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येकाचा अजेंडा एक असला तरीही ते एकत्र काम करायला फारसे उत्सुक असत नाहीत. प्रत्येक संस्थेने स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून इतर संस्थांशी निदान माहिती आणि प्रशिक्षणासाठी सहकार्य केलं तरी त्यांच्याच सभासदांना मोठी मदत होऊ शकते. मुख्य म्हणजे संघटित स्वरूपात व्यावसायिकांचे प्रश्न सरकारपुढे चांगल्या प्रकारे मांडता येतील. आज मुंबईत आणि महाराष्ट्रभर कित्येक भारतीय आणि परदेशी उद्योजकांचे व्यवसाय प्रदर्शनं, प्रशिक्षणं, चर्चासत्रं आयोजित होत असतात, त्यांची नीट माहितीसुद्धा कित्येकांना मिळत नाही.

महाराष्ट्र सरकारने १९८८ साली उद्योजकता विकास या उद्देशाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (Maharashtra Centre for Enterpreneurship Development (MCED) या स्वयंनिर्भर संस्थेची स्थापना केली (www.mced.net). गेली २१ वर्षे उद्योजकीय प्रशिक्षण देणे आणि उद्योजकतेचा विकास करणे हे कार्य टउएऊ जोमाने करत आहे. त्यांच्यातर्फे उद्योजक हे माहितीपूर्ण मासिक प्रसिद्ध केले जाते (www.udyojakmagazine.com). त्याचं मुख्य कार्यालय औरंगाबाद इथं आहे. संपादक किरण कुलकर्णी MCED च्या कार्याविषयी बोलताना म्हणतात की, २१ वर्षांच्या वाटचालीनंतर भावी काळात गुणात्मक यशाची आणि संशोधनात्मक पायावर आधारलेल्या प्रशिक्षणाची नवी क्षितिजे पादाक्रांत करायला टउएऊ सज्ज आहे. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणारी संस्था ही MCED ची प्रतिमा त्यांना टिकवायची आहे व त्यासाठी जनसंपर्क आणि कामकाजात पारदर्शकता त्यांना अभिप्रेत आहे. त्यांच्यापुढे आव्हान आहे ते प्रशिक्षणात आशयनिवडीचं आणि प्रशिक्षण पद्धतीचं! प्रशिक्षण कार्यक्रमाचा मेळावा होऊ नये असं त्यांना वाटतं. कालबाह्य़ तंत्रज्ञानातून बाहेर न पडलेला आणि संगणकशत्रू असलेला अधिकारी-कर्मचारी MCED ला नको आहे. अशी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ भूमिका असलेली व परखड आत्मपरीक्षण करण्याची धमक असलेली संस्थाच यशाची शिखरं गाठू शकते! हा एकूणच संपूर्ण उपक्रम खूप स्तुत्य आहे. उद्याच्या उज्ज्वल महाराष्ट्रासाठी MCED ची माहिती अजून मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत गेली पाहिजे. MCED बद्दल इथं जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण इतर संस्थांच्या तुलनेत त्यांच्याजवळ विविध विषयांचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे व त्याचा उपयोग इतर संस्थांनी करावा हा उद्देश. शिवाय या संस्थेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहे, त्यामुळे सर्वच शहरांतील उद्योजकांना त्याचा लाभ मिळू शकतो.

'Education a great leveller' या विषयावर इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी त्यांचे विचार यंदाच्या 'TiE Entrepreneurial Summit' च्या वार्षिक सभेत काढले. ही संघटना २००४ पासून संपूर्ण आशियातून उद्योजक, व्हेन्चर कॅपिटलिस्ट, देश आणि राज्याचे धोरणात्मक निर्णय घेणारे, विविध विषयांतील मान्यवर अशा लोकांना एकत्र आणण्याचे काम करीत आहे. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की जी सगळ्यांना एकाच लेव्हलवर (पातळीवर) आणू शकते हा महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला.

मेकॅन्झीने २००५ साली एक अभ्यास केला होता, त्यानुसार भारतातील बिगर-तांत्रिक पदवीधरांपैकी ८५ ते ९०% व इंजिनीअर- पदवीधरांपैकी ७५% मुले नोकरीवर घ्यावी या क्षमतेचीच नसतात. अशाच एका अहवालाचा संदर्भ देत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी विद्यापीठ व महाविद्यालयीन पातळीवर अभ्यासक्रम हे सरळ रोजगारांशी जोडणं आवश्यक आहे व त्यासाठी त्यांनी उद्योग आणि उद्योजक व तांत्रिक शिक्षणसंस्था यांचे सहकार्य घेणे आवश्यक आहे अशी सूचना केली. एकीकडे महाराष्ट्र विकास केंद्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे आणि दुसरीकडे विद्यापीठांकडे मुलं आहेत पण त्यांना MCED सारख्या विकास केंद्राशी स्वत:ला जोडून घ्यावसं वाटत नाही? येणाऱ्या दशकात विद्यापीठ, शाळा, कॉलेज आणि MCED सारख्या संस्था एकमेकांबरोबर सहकार्य करतील व त्यातून नवीन उद्योजक तयार होतील अशी अपेक्षा करू या.

आता महाराष्ट्राचं दुसरं चित्र बघू या- हा लेख लिहीत असताना संदीप पुरुषोत्तम कडू (शेतकरी), वय वर्ष २२, शिक्षण- बारावी पास, राहाणार मु. खानापूर, ता. कारंजा (लाड), जिल्हा वाशिम यांचे पत्र मिळाले. घरच्या किरकोळ किराणामाल विक्रीच्या दुकानातून स्वत:च्या बुद्धीने विविध मसाले ‘संदीप मसाला’ या नावाने तयार करून त्याने उद्योग सुरू केला. दोन वर्षांत बँकेकडून कर्ज घेऊन दळणयंत्र, मिक्सर, सिलिंग मशीन आणून उद्योगात मोठी मजल मारली. सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे- संदीपने अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ येथील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत जवळपास ३००० बेरोजगार महिलांना प्रशिक्षण दिले! मिटकॉनतर्फे वाशिम जिल्ह्य़ातील उद्योग सुरू करण्यास इच्छुक असणाऱ्यांना मसाले तयार करण्यापासून ते मार्केटिंग, जाहिरात, पॅकेजिंगसाठी लागणारं प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षणादरम्यान संदीपला विविध जिल्ह्य़ातील त्याच्या प्रॉडक्टस्साठी चांगली बाजारपेठ शोधता आली.   लोकसंपर्कबरोबरच आत्मविश्वासदेखील वाढला!

२००० च्या दशकामध्ये इन्टरनेटच्या माध्यमातून आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून जगातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर आपण संपर्क साधू शकतो आणि घराच्या बाहेर एकही पाऊल न टाकता जगभर व्यवसाय करू शकतो! हे शक्य झालं इंटरनेटमुळे! आज देश, राज्य आणि प्रांत अशा भिंती उद्ध्वस्त करून जगातल्या प्रत्येक कॉम्प्युटर एकमेकांशी सहकार्य करतो आहे. त्याचबरोबर सोशल नेटवर्किंगद्वारे भाषा, जातपात, गरीब, श्रीमंत अशी सगळी बंधनं झुगारून प्रत्येक माणूस एकमेकांशी जोडला जात आहे व याद्वारे विविध प्रॉडक्टस् आणि सेवा पुरविणारी मार्केटिंगची नवीन संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. नेटशिवाय कॉम्प्युटर असा विचारदेखील आज आपण करू शकत नाही. आज प्रत्येक मराठी उद्योजकानी मी आणि माझे हा मानसिकतेचा विषारी व्हायरस काढून, व्यवसायात यश मिळविण्यासाठी सहकार्य (collaboration) हा एकच पासवर्ड वापरला पाहिजे!

गेल्या दशकाच्या सुरुवातीला भारतात फक्त एक टेलिफोन कंपनी होती, आज डझनभर मोबाईल कंपन्या, शेकडो हॅन्डसेटस्च्या कंपन्या व लाखो-करोडो ग्राहक; पूर्वी एक प्रीमियर कंपनी व त्यांची फियाट हे एकमेव मॉडेल, आता त्या जागी जगभरातल्या १० टॉप कंपन्या व त्यांचे प्रत्येकी १० कार मॉडेल्स आपल्याकडे आहेत; एका दूरदर्शनच्या तुलनेत आज ३५० चॅनेल्स! पोस्टाची जागा कुरियरने, कुरियरची जागा ईमेलने आणि आता ईमेलची जागा रटर ने घेतली! येणारं २०१० चं दशक टीव्हीचे चॅनेल्स बदलावं तशी रोज नवं-नवीन प्रॉडक्टस्, मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी घेऊन येणार, स्पर्धा अधिक व्यापक होणारं. एकटय़ाने व्यवसाय सुरू केला तरी, कदाचित मोठं होण्यासाठीच नव्हे तर व्यवसायातच टिकून राहण्यासाठी इतरांशी सहकार्याशिवाय पर्याय असणार नाही. २०१० च्या दशकात १०१ टक्के यशासाठी १+१=११ हाच सिनर्जी फॉम्र्युला वापरावा लागेल. यश आपल्याकडे येणार नाही तर आपल्याला कधी ससा तर कधी कासव बनून त्याच्याजवळ जावं लागेल!

नितीन पोतदार
nitinpotdar@yahoo.com
99309 54747

(सौजन्य लोकसत्ता Express Money (अर्थ वृतान्त) दि. ४ जानेवारी २०१०)

1 comment:

Anonymous said...

Shri.Nitin Potdar,

Lekh farach prerak aahe ani tyat kelela vishleshan pan......mala awadla.

Yogesh