Wednesday, January 13, 2010

मराठी सुवर्णकारांचा विश्वासार्हता हाच ‘ब्रॅण्ड’ - नितीन पोतदार

मराठी समाज ही तुमची हक्काची ग्राहकपेठ आहे; पण त्याचबरोबर इतर समाजाला तुमच्या विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहक बनविता आलं तर खऱ्या अर्थाने तुमच्या व्यवसायाचं सोनं होईल! पारसी समाज जशी त्यांची जुनी गाडी विकताना त्यांच्या समाजाच्या इमेजचा वापर करतो, मग शुद्ध सोनं आणि सुवर्णालंकार विकायला मराठी सुवर्णकारांनी त्यांच्या ‘विश्वसार्हते’चं ब्रॅण्ड वापरलं तर बिघडलं कुठे, असा सवाल प्रख्यात कॉर्पोरेट विधिज्ज्ञ नितीन पोतदार यांनी केला.
दादर सराफ मित्र मंडळाच्या वतीने आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी आणि फायनान्शिअल टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने मराठी सुवर्णकारांसाठी ‘एमसीएक्स : सोने आणि चांदीचे कमॉडिटी ट्रेडिंग’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पोतदार यांनी वरील सूचक उद्गार काढले. ते पुढे म्हणाले की, मराठी सुवर्णकार प्रामाणिक असतात, अशी आपली इमेज आहे. यापुढे मार्केटमध्ये रोज नवं-नवीन प्रोडक्टस् येणार, मॉल, इंटरनेट, अशा अनेकविध नवनव्या मार्गानी मार्केटिंग करण्याच्या पद्धतीत वाढ होत जाणार. कदाचित मराठी उच्चभ्रू ग्राहकसुद्धा या मॉलमध्ये जाईल किंवा एव्हाना जायला लागला आहे.  मग आपणही मराठी भाषिकांबरोबर इतर समाजातील जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे कसे आणता येईल याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे.  आज गिरगाव, दादर आणि पाल्र्यात न राहता नवी मुंबई, ठाणे, वसईत जिथं मोठय़ा टाऊनशिप विकसित होत आहेत तिथंसुद्धा मराठी सुवर्णकारांनी आपली बाजारपेठ निर्माण करावयास हवी.

सर्वसाधारणपणे ‘एमसीएक्स’वरून होत असलेल्या सोने आणि चांदीच्या व्यापारामुळे सुवर्णकारांना फार मोठं नुकसान सहन करावं लागत आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी पोतदार यांच्या पुढाकाराने ‘एमसीएक्स’वरील सोने आणि चांदी ट्रेडिंग म्हणजे काय, कमॉडिटीज मार्केट म्हणजे काय आणि लहान सुवर्णकारांना त्यात काय स्थान आहे या विषयावर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात फायनान्शिअल टेक्नॉलॉजीजचे प्रेसिडेंट डॉ. बंदीराम प्रसाद आणि उपाध्यक्ष समीर पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. बंदीराम म्हणाले की, ग्लोबल घटनांना यापुढे आपल्या व्यवसायात महत्त्व येणार आहे. म्हणून जगात काय चाललंय हे आपण समजून घ्यायलाच पाहिजे. यांनी तांत्रिक शिक्षण घेण्यावर देखील खूप भर दिला. पोतदार यांच्या सूचनेला मान देत डॉ. बंदिराम यांनी ‘एमसीएक्स’ (MCX) गोल्ड आणि सिल्व्हर ट्रेडिंगबद्दल संपूर्ण विश्लेषण आणि माहिती पुस्तके मराठीत प्रसिद्ध करण्याचं मान्य केलं. बदलत्या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी मराठी सुवर्णकारांनी आपल्या पुढच्या पिढीला व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेत लवकरात लवकर विश्वासाने सहभागी करायला पाहिजे, असे मत पोतदार यांनी मांडले. चर्चासत्रात जवळपास ५० सुवर्णकार सहभागी झाले होते. चर्चासत्रात आयोजन करण्यात दादर सराफ मित्र मंडळातर्फे संतोष भडेकर, अजित पेंडुरकर आणि महेश वैद्य आणि ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे नितीन कदम यांनी पुढाकार घेतला.
 
सौजन्य: लोकसत्ता [मुंबई वृतांन्त व्यापार - उद्दोग] दिनांक. १३ जानेवारी २०१०
लिंक: http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=39377:2010-01-12-15-17-40&catid=39:2009-07-09-06-54-27&Itemid=6