Wednesday, January 27, 2010

माझं tweet.....आपणच ‘वातावरणकर्ते’!

२७ जानेवारी, २०१०: माजी राष्ट्रपती व ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा ई-मेलद्वारे ‘भवताल’च्या निसर्गायनवरचा प्रतिसाद, २६ जानेवारीच्या दैनिक लोकसत्ता मधे प्रसिद्द झाला तो शब्दशहं खाली देतं आहे. आपण सगळ्यांनी संपुर्ण वाचावं ही आग्रहाची विनंती करण्यासाठी माझं हे आजचं दुसरं ट्विट.....................

"तुम्ही कुठे असलात, काहीही केलं तरी पर्यावरणावर परिणाम करूशकता- मग अगदी घरी, शाळेत, कॉलेजात किंवा कामाच्या ठिकाणी असलात तरी!


एक पूर्ण वाढलेले झाड वर्षांला तब्बल २० किलोग्रॅम इतका कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेते. त्याचे रूपांतर लाकडात करते आणि त्याच वेळी १४ किलोग्रॅम इतका ऑक्सिजनसुद्धा देते. भारतातील एकूण जंगलं आपण एकूण वातावरणात सोडत असलेल्या कार्बन वायूंपैकी तब्बल ११.२५ टक्के इतके कार्बन वायू शोषून घेतात. हे प्रमाण भारतातील एकूण वाहने ऊत्सर्जित करत असलेला कार्बन वायू आणि घरगुती वापरात उत्सर्जित होत असलेला कार्बन वायू यांच्याइतके जास्त आहे. मी गेल्या सात वर्षांत तब्बल ५० लाख मुलांना भेटलो, त्यांना झाडे लावण्यास सांगितली. त्यातून लाखो झाडे लावली गेली, त्यासाठी मी युवकांचे अभिनंदन करतो. आता आपले लक्ष्य वाढवून ‘अब्ज लोकांसाठी अब्ज वृक्ष’ असे ध्येय घेऊ या. त्यासाठी काहींनी १०० झाडे लावावीत, काहींनी १०, तर काहींनी किमान १ झाड तरी लावावे. त्याद्वारेच देशातील युवक उत्तम वातावरण देऊ शकतील! केनियासारख्या गरीब देशातील वांगारी माथाई या कार्यकर्तीने तर प्रतिकूल परिस्थितीत हे कार्य केले. लोकांना, मुख्यत: महिला गटांना सोबत घेऊन त्यांनी ही चळवळ बनवली. त्याद्वारे तब्बल तीन कोटी १० लाख झाडे लावून त्या अखेर २००४ सालच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.


मित्रांनो, पर्यावरणाचा आणखी ऱ्हास टाळणे ही आपली जबाबदारी आहेच, शिवाय सर्वाच्या राहण्यासाठी व पुढील पिढय़ांसाठी उत्तम वातावरण टिकविणे हीसुद्धा! त्यासाठी युवक मोठय़ा प्रमाणात जनजागृती करू शकतात, आपले घर, परिसर स्वच्छ राखू शकतात, पाणी-ऊर्जा यांची बचत करू शकतात, लोकांपर्यंत आरोग्याचा संदेशही पोहोचवू शकतात. अहमदाबाद येथील आय.आय.एम.मध्ये मी काही युवकांचे प्रयोग पाहिले- काहींनी छत्री वापरून पाणी शुद्ध करण्याचा प्रयोग केला होता, काहींनी सांडपाणी शुद्ध करण्यासाठी अनोखी पद्धत विकसित केली होती.. माझ्या दृष्टीने हे युवकच पर्यावरणाचे दूत आहेत.

ऊर्जा आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने..

सध्याची जिवाष्म इंधनाची टंचाई आणि हे इंधन जाळून दरवर्षी ३० अब्ज टन कार्बन वायूंचे उत्सर्जन यावर एकच उत्तर म्हणजे ऊर्जेची आत्मनिर्भरता. भारतात जगातील १७ टक्के लोक राहतात, तर जीवाष्म ऊर्जा केवळ १ टक्का आहे. आताच्या विकासाच्या गतीचा विचार करता, विजेची गरज आजच्या दीड लाख मेगाव्ॉटवरून २०३० साली चार लाख मेगाव्ॉटपर्यंत जाईल. त्यासाठी सौर, पवन अशा पुनर्निर्मित ऊर्जा, अणुऊर्जा व जैविकऊर्जेकडे वळावे लागेल. सौर ऊर्जेसाठीच्या फोटोव्होल्टिक सेलची कार्यक्षमता २० टक्क्य़ांवरून ५५ टक्क्य़ांपर्यंत वाढवावी लागेल. खनिज तेलाची आयात रोखण्यासाठी इंधनात १० टक्के इथेनॉल वापरण्याची तयारी हवी.


सर्वजणच पर्यावरणरक्षणाची शपथ घ्या-

१. मी १० झाडे लावेन आणि पालव, मित्र-मैत्रिणी, शेजारी यांनाही तसे करायला लावून वृक्ष मोहिमेचा दूत बनेन!
२. घर-परिसर स्वच्छ ठेवेन आणि जास्तीत जास्त जैविक उत्पादनेच वापरेन.
३. सायकल वापरून, पाण्याची बचत करून व पुनर्निर्मित वस्तूंचा वापर करून पर्यावरणसुसंगत जीवन जगेन.
४. करीयर व व्यवसाय करताना पर्यावरणरक्षण व त्याच्या संवर्धनाकडे लक्ष ठेवेन.
५. पुनर्वापर करण्याजोगी सौर, पवन अशी ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणात वापरेन.
6. मी माझ्या घरात, परिसरात व मित्रांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता वाढवेन.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
साधारणत: वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. १९८९ च्या सुमारास ‘अग्नी १’ या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणासाठी ओरिसातील चंडीपूर येथे तळ विकसित केला जात होता. समुद्रकिनाऱ्याची पाश्र्वभूमी असल्याने परिसर सुंदर होताच, पण एक गोष्ट अनुपस्थित होती- तिथे झाडे नसल्याने तो परिसर भकास वाटत होता. त्यामुळे तिथे मी शेकडो झाडे लावली, तरीही त्याचे मोठे क्षेत्र पाहता, परिसर रुक्षच वाटत होता. ‘अग्नी १’ च्या चाचणीच्या आदल्या दिवशी तत्कालीन संरक्षणमंत्री के.सी. पंत व इतर दिग्गज नेते आले. पंत आणि आम्ही आदल्या रात्री किनाऱ्यावरून फेरफटका मारत असताना ते म्हणाले, ‘डॉ. कलाम उद्या या क्षेपणास्त्राचे उड्डाण यशस्वी होईलच. त्यानंतर तुम्हाला माझ्याकडून काय हवे?’ क्षणभर त्यांना काय मागावे हे सुचेना, पण अंतर्मनात असलेली खंत जागी झाली आणि मी तत्काळ बोलून गेलो, ‘या परिसरात एक लाख झाडे लावण्याची परवानगी द्या’.. त्यावर काही क्षण शांतता पसरली. मग ते उत्तरले, ‘हवी तेवढी झाडे लावा..’ तिथे झाडे लावण्यासाठी पैसे मिळाले. त्यातून झाडे तर लावलीच, शिवाय एक छानसा तलाव करून घेतला. मग ती झाडे व पाणवठय़ावर असंख्य पक्षी येऊ लागले. तो परिसर निसर्गाने बहरून गेला. ही जागा संरक्षित असल्याने त्या किनाऱ्यावर सागरी कासवं येऊन अंडी घालू लागली. मग दरवर्षी त्यांची असंख्य पिलं समुद्राच्या पाण्याच्या दिशेने दौडतात.. लक्षात ठेवा माणूसच वातावरण निर्माण करू शकतो- चांगले वातावरण!

No comments: