Monday, March 15, 2010

........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे!

नुकत्याच झालेल्या दुबईतील विश्व मराठी साहित्य संमेलनात व्यवसाय ही कोणा एका समाजाची मक्तेदारी नाही, मराठी माणसाने संकोच सोडावा व व्यवसायात उडी मारावी असे आवाहन करण्यात आले. साहित्य संमलेनासारख्या सांस्कृतिक व्यासपीठावरून मराठी माणसाला उद्योजकतेचे आवाहन करण्यात आले. हे स्वागतार्हच आहे, पण माझ्या मते हा एक मूलगामी बदल आहे. त्याचे मनापासून स्वागत. मराठी संस्कृती टिकविण्यासाठी आतापर्यंत केवळ भाषेच्या अंगाने विचार झाला. आता संस्कृती व आर्थिक समृद्धी यांचा परस्पर संबंध आहे हे आपल्या लक्षात येत आहे त्याचेच हे द्योतक. एकीकडे मुंबईचे मराठीपण हरवत आहे, नव्हे नष्ट होत आहे, तर दुसरीकडे मराठी माणूस आर्थिकदृष्टय़ा मागे पडत चाललेला आहे. या दोन्ही विषयांची चर्चा एकत्रितपणे होताना दिसते, त्यासंबंधी नीट विचार करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र सरकारचं गॅझेट मराठीत, पत्रव्यवहार इंग्रजीत आणि रोजचा व्यवहार हिंदीत. मुंबईतल्या दुकानांवर मराठी सोडून सगळ्या भाषेत रंगवलेल्या पाटय़ा, झपाटय़ाने बंद होत चाललेल्या मराठी शाळा, मराठी नाटकांना घटत चाललेली गर्दी, गिरगाव आणि दादरसारख्या मराठमोळ्या भागात नाहीशी झालेली मराठी माणसांची हॉटेल्स, बंद पडलेल्या गिरण्या आणि संपलेला मराठी गिरणी कामगार, गिरण्यांच्या जागी उभे राहिलेले उंच मॉल्स आणि मल्टिप्लेक्स व श्रीमंतांचे गगनचुंबी टॉवर्स आणि तिथं राहायला येणारा बिगर मराठी समाज. म्हणजे एकूणच मुंबईत आणि महाराष्ट्राच्या प्रमुख शहरी भागांत आज १९६० साली असलेलं ‘मराठीपण’ जाणवत नाही. याचा अर्थ मराठी माणसांची पीछेहाट झाली का? दुसरीकडे मराठी तरुणांना नोकऱ्यांसाठीसुद्धा करावा लागणारा झगडा आणि भांडवलाअभावी इतरांच्या तुलनेत मागे पडत चाललेले मराठी उद्योग आणि कुटुंब मोठी म्हणून प्रशस्त घरं घ्यायला पैशाअभावी मुंबईबाहेर कल्याण, डोंबिवली आणि वसई-विरारपलीकडे फेकली गेलेली मुंबईतली मूळ मराठी माणसं. म्हणजे मराठी भाषा आणि संस्कृती मागे पडत चालली आहे का? आपण कुठेतरी विषयांची गल्लत करत आहोत. मुंबईचं मराठीपण आणि मराठी माणसांची आर्थिक स्थिती हे दोन वेगवेगळे विषय आहेत, दोन्हींची परिस्थिती नक्कीच चिंता करण्यासारखी असली तरी ते सोडवण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत.

मराठी माणसाच्या मनातील या असुरक्षिततेच्या भावनेवर उतारा म्हणून मराठीवादी पक्षांनी बऱ्याच वेळा ‘अरे’ ला ‘कारे’नेच उत्तर दिलं असेल, पण दुर्दैवाने अशा उत्तराचीच चर्चा इतरांकडून मुद्दाम केली जाते. त्यात हल्ली इंग्रजी आणि हिंदी प्रसार माध्यमांनी, त्यातही न्यूज चॅनेल्सनी संपूर्ण मराठी समाजाला एकाच रंगाच्या ब्रशने रंगवायचा सपाटा लावला आहे. कुणाचंही आंदोलन असो- मराठी समाज अतिशय संकुचित मनोवृत्तीचा आहे, इथं परप्रांतीयांचे जीवन धोक्यात आहे असे विपर्यस्त चित्र अशा चॅनेल्सवरून चोवीस तास रंगवल जातंय. एकंदरीतच संपूर्ण मराठी समाज हा ‘राडेबाज’ समाजच आहे अशी प्रतिमा निर्माण करण्यात येत आहे. हे आपल्या पुढच्या पिढीसाठी फार घातक आहे म्हणून याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक समाजातच जहाल व भडक भाषा वापरणारे नेते आहेत. मग मराठी समाजाच्याच वाटेला मात्र देशभर अशी बदनामी का येतेय? यात एखादा छुपा अजेंडा असेलही, पण आपण इतर समाजाच्या तुलनेत कम्युनिकेशनमध्ये नक्कीच कुठेतरी कमी पडत चाललो आहोत! मराठी समाजाची चांगली बाजू जगापुढे मांडली जात नाही; आपल्या प्रत्येक ‘ध’चा ‘मा’ करून गहजब माजविण्यात येतो. आपल्याला मुद्दाम डिवचलं जातंय आणि आपण आपलं तोंड उघडून त्यांच्या जाळ्यात चालत जातो! दुर्दैवाने मराठी समाजाचा जो चेहरा आज जगापुढे येत आहे, तो संपूर्ण मराठी समाजाचा चेहरा नाहीच, पण हे सांगणार कोण? सचिन तेंडुलकर ज्याला आज संपूर्ण देश भारतरत्न देण्याची तयारी करीत आहे तो अस्सल मराठी कुटुंबातून आलेला आहे. अब्जावधी रुपयांच्या बॉलीवूड चित्रपट व्यवसायाचा पाया रचला तो आपल्या दादासाहेब फाळक्यांनी! त्याच मराठी समाजाने विविध क्षेत्रांत देशाला असंख्य अशी रत्ने यापूर्वी दिलेली आहेत. पण आज मराठी तरुणांनी हातात दगड का घेतला, त्यांची व्यथा समजून न घेता त्यांनी केलेल्या राडय़ावरच अधिक चर्चा होणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काळ सोकावतोय! त्याचबरोबर स्थानिक, मूळ रहिवाशांपेक्षा, तिथे इतर लोकांची संख्या जास्त होणे ही जगातल्या प्रत्येक मोठय़ा शहराची समस्या झालेली आहे. मुंबईबरोबर, चेन्नई, कलकत्ता, सिंगापूर, लंडन, सिडनी प्रत्येक मोठय़ा शहरांची आणि तिथल्या मूळ रहिवाशांची हीच अवस्था आहे, म्हणून कुणी रोज रस्त्यावर येत नाही. राडेबाजी ही कुठल्याही प्रश्नावर उत्तर होऊ शकत नाही! हेच जर आपल्याला कळलं नाही तर यापुढे अशा आंदोलनात लाठय़ा काठय़ा मारणारे पोलीस आणि कुत्र्यासारखे मार खाणारी आपलीच कोवळी पोरं ही आतडय़ांना पीळ देणारी दृष्यं आपल्याला सतत बघावी लागणार.

दुसरीकडे नवीन ज्ञानाधारित उद्योगविश्वात व सेवाक्षेत्रात स्वत:चं स्थान मिळवलेले व मिळवू पाहत असलेले आपल्या समाजातले आजचे तरुण आणि शिक्षणाअभावी मागे पडलेला आपल्याच समाजातील एक वर्ग यांच्याच एक मोठी दरी निर्माण होत आहे. म्हणजेच आपल्या समाजात पूर्वीपासून असलेल्या जाती-पोटजातीच्या िभतीबरोबर आज आपल्यामध्ये आणखी एक नवीन भिंत उभी राहत आहे. मराठी समाज नव्याने दुभंगतोय! आपण आपसातसुद्धा एकमेकांपासून दूर आहोत याचं दु:ख जास्त आहे! देशपातळीवर आपली चुकीची प्रतिमा निर्माण होणे व आपल्याच समाजातील दोन वर्गातील प्रचंड अंतर हे दोन्ही प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे ‘कम्युनिकेशन गॅप!’ मुंबई-पुणे शहरातल्या मराठी माणसांच्या तुलनेत ग्रामीण भागातल्या मराठी माणसांचे प्रश्न आणि व्यथा जास्तच गंभीर स्वरूपाच्या आहेत. इतकेच नाही तर आपण का व किती मागे आहोत याची त्यांना साधी जाणीवदेखील नाही. त्यांच्या प्रश्नांसाठी ना संस्थात्मक पातळीवर काम होत आहे, ना राजकीय पक्ष ते करीत आहे. म्हणून गरज आहे ती विविध स्तरांत सक्षम आणि फक्त प्रगतीचीच भाषा बोलणाऱ्या, व्हिजन असणाऱ्या अशा नेतृत्वाची!

खरं पहायला गेलं तर मराठी समाज हा इतर कुठल्याही समाजाच्या तुलनेने परिपूर्ण असा समाज आहे! देशाला सगळ्यात जास्त विचारवंत, समाजसुधारक आणि बुद्धिवंत महाराष्ट्राने दिले आहेत! आपल्याकडे साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत अत्यंत मोठी उत्तुंग माणसं होऊन गेली आणि आजसुद्धा आहेत त्यांची यादी देण्याची गरजच नाही. म्हणून आज गरज आहे मराठी समाजाला जगापुढे नीट ‘कम्युनिकेट’ करण्याची, आपले विचार आणि कर्तृत्व जगापुढे मांडण्याची आणि त्याचबरोबर आपल्या मेहनतीने ज्या मराठी माणसांनी स्वत:ची प्रगती केली आहे त्यांनी प्रगतीचे मार्ग मागे राहिलेल्यांना दाखविण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची! हा संवाद साधण्याची जबाबदारी मला वाटतं आपल्या प्रत्येकाचीच आहे, पण विविध प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या मराठी माणसांची जास्त आहे. त्यात प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टी, टीव्ही वाहिन्या आणि इंग्रजी व इतर भाषेतील वृत्तपत्रात काम करणाऱ्या मराठी लोकांनी पुढे यायला पाहिजे. एक छोटासा प्रयत्नसुद्धा मोठी किमया घडवू शकतो, त्यासाठी एखादी संघटना किंवा राजकीय पक्षच स्थापन केला पाहिजे असं मुळीच नाही. विचारांची एक ठिणगीसुद्धा क्रांती घडवू शकते! याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगीतकार कौशल इनामदारांनी मराठी भाषा दिनाच्या दिवशी यशस्वीपणे सादर केलेलं महाराष्ट्र अभिमानगीत! अशा प्रयत्नांतून सामूहिक नेतृत्व पुढे आलं पाहिजे. खरे तर मराठी समाजाची बाजू जगापुढे मांडणारी इंग्लिश व हिंदी न्यूज चॅनेल आणि वर्तमानपत्रे हवीत. ते सध्यातरी शक्य दिसत नाही, तर आपल्या समाजातील धुरिणांनी, विचारवंतांनी आपल्या समाजाची सकारात्मक बाजू जोरदारपणे इंग्लिश व हिंदी न्यूज चॅनेलवर व वर्तमानपत्रातून मांडली पाहिजे. एक कॉन्शियस ऑनस्लॉटच (conscious onslaught) व्हायला हवा! इंग्लिश व हिंदू प्रसार माध्यमे आपल्या मालकीची नसतील, पण त्यावर इंटरनेट हा सर्वोत्तम पर्याय आपल्याला खुला आहे! आपल्या समाजातील थोर व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या अनेक वेबसाईट मराठीत आहेत. पण इंग्लीश व हिंदीमध्ये अशा वेगवेगळ्या वेबसाईटस् सुरू करून आपल्या समाजातील प्रत्येक माणसाचे कर्तृत्व जगासमोर आणणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर, निंदकाचे घर असावे शेजारी असं आपण नेहमी म्हणतो, पण घरातच निंदक असतील तर काय करणार? आपल्यातलेच काही लोक मराठी समाज मागे कसा आहे, तो डाऊनमार्केट आहे, त्याला न्यूनगंड आहे, आपल्यात जिद्द नाही, असे एक ना अनेक ठसे सतत मारून आणि स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत, त्यात आता काही सेलिब्रिटीजदेखील पुढे आलेले आहेत. त्यांना नेमकं ‘कुणाला’ आणि ‘काय’ कम्युनिकेट करायचं असतं हेच समजत नाही. काय करायला पाहिजे याविषयी सकारात्मक चर्चा अजूनही हवी तितक्या प्रमाणात होत नाही ती व्हायला पाहिजे. आपल्या चुकांची जरूर चर्चा व्हावी, पण चांगल्या गोष्टींचं कौतुक झाल्यानंतर आणि चार भिंतीच्या आत, एवढा साधा नियम जरी आपण पाळला तर समाजाची मोठी सेवा आपल्याकडून घडेल!

मराठी चित्रपटसृष्टीने पुन्हा नव्याने मोठी झेप घेतलेली आहे आणि हे माध्यम अजून तरी संपूर्ण मराठी माणसांच्याच हाती आहे, म्हणून त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत! मराठी समाजाला जागतिक पटलावर स्वत:ची मोठी ओळख (Identity) देण्याचं सामथ्र्य मराठी चित्रपटसृष्टीत नक्कीच आहे. त्यांनी जागतिक पातळीवर स्वत:ची कीर्ती उंचावलीच पाहिजे, पण त्याचबरोबर मराठी समाजाला दिशा देण्यासाठीसुद्धा पुढे यायला पाहिजे. नुकतंच ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या एका चित्रपटाने आपल्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम किती परिणामकारक केलं हे आपण बघितलं. मराठी चित्रपटाने मृत्यूच्या दाढेतून नुसता ‘श्वास’ घेतला नाही तर स्वत:ची आता ‘फॅक्टरीच’ टाकलेली आहे. ही फॅक्टरी आता २४x७ अविश्रांत सुरू राहिली पाहिजे! त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीचे जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी शासनाबरोबर संपूर्ण मराठी समाजानेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. एक इंडस्ट्री म्हणून त्यांना एकत्र येऊन organized व्हावंच लागेल! तर आणि तरच त्यांना आर्थिक गणिताबाबत कोटय़वधींची उड्डाणे करता येतील. वेगवेगळ्या चित्रपटांचं एकत्र अॅड कॅम्पेन, चित्रपटात क्रॉस सेलिंग आणि रिलीजच्या तारखा जर योग्य पद्धतीने हाताळल्या तर त्यांचे बरेच प्रश्न सुटू शकतील.

कम्युनिकेशनसाठी सगळ्यात प्रभावी आहे ते आजचं इलेक्ट्रॉनिक माध्यम- खासगी टीव्ही चॅनेल्स! जिथं १९८० साली सरकारी एक मराठी चॅनेलसुद्धा धड चालत नव्हतं तिथं आज एक डझन मराठी टीव्ही चॅनेल्स आहेत आणि सगळी नफ्यात आहेत हे विशेष. म्हणून लाखो लोकांच्या घरात पोहोचलेल्या या माध्यमांकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्याच्या दृष्टीने त्यांनी जाणीवपूर्वक काम करायला पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील तळागाळातल्या लोकांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला तर त्यांच्या प्रतिभेचं सोनं होईल!

मुंबईतील मराठीपण टिकविण्यासाठी इथला मूळ मराठी माणूस सर्वप्रथम मुंबईत राहिला तर पाहिजे. उद्या मुंबईत मराठी घरच उरलं नाही तर आपण दिवाळीचे कंदील आणि गुढीपाडव्याची गुढी कुणाच्या घरावर उभारणार आहोत? मुंबईच्या वैभवात भर टाकणाऱ्या वांद्रे-वरळी सी-लिंकने आपण मुंबईची दोन टोकं चार मिनिटांत जोडली खरी. पण गेल्या ४० वर्षांत चार पिढय़ा मुंबईला खऱ्या अर्थाने घडविणाऱ्या इथल्या मूळ मुंबईकरांना मात्र आपण अजूनपर्यंत मुंबईशी कायमच जोडू शकलो नाही. अजून करण्यासारखं पुष्कळ आहे. निदान मुंबईला ३६५ दिवस २४x७ सव्र्हिस देणारे/ त्यात निवृत्त झालेलेसुद्धा असे पोलीस, अग्निशमन दलातील जवान, पालिकेतील कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पोस्टमन, माथाडी कामगार आणि इतर यांना मुंबईत त्यांना परवडतील अशा भावात घरं मिळालीच पाहिजेत. मग त्यासाठी चटई निर्देशांक (FSI) २.५ करा नाही तर ५.२ करा. ही सगळी मराठी माणसं आहेत. बीडीडी चाळ, वांद्रे आणि इतर ठिकाणी असलेल्या सरकारी वसाहतीची पुनर्बाधणी सरकार/ MMRDA द्वारे का होऊ शकत नाही. त्याला खासगी विकासकाची गरज काय? आपल्याला कोणाचा विकास करायचा आहे?

मराठी भाषा टिकविण्यासाठी आपण २७ फेब्रुवारीला दर वर्षांप्रमाणे मोठय़ा उत्साहात मराठी दिन साजरा केला, गर्वगीते गायली, रांगोळ्या काढल्या, कवितेच्या चार ओळी लिहिल्या, असे उत्सव पुढच्या वर्षीदेखील साजरे करू. प्रश्न असा आहे की, समजा उद्या मुंबईतील बिगर मराठी लोक कामापुरतं मराठी बोलू लागली आणि दोन-चार दुकानांच्या पाटय़ा इतर समाजाच्या मालकवर्गाने मराठीत रंगवल्या तरी डोंबिवली, कल्याण, वसई आणि विरारकडे फेकला गेलेला मुंबईतील मूळ मराठी माणूस मुंबईत परत येऊ शकणार आहे का? इथं स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारू शकणार आहे का? मुंबईचं मराठीपण हे महत्त्वाचं आहे, पण सर्वप्रथम आपल्या समाजाची आर्थिक प्रगती मला जास्त महत्त्वाची वाटते. म्हणून विविध उद्योगांतील, क्षेत्रांतील, व्यवसायांतील आणि उच्चपदावरील नोकरीत असलेल्या मराठी माणसांनी सर्व मतभेद विसरून आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. आपल्या स्पर्धेतसुद्धा आपला मराठी माणूसच असला पाहिजे. मग आपण हरलो तरी जिंकणारा मराठी माणूसच असेल ही भावना आपल्यात येणं गरजेचं आहे!

आज मराठी पाऊल अडतं कुठे ही चर्चा करीत बसण्यापेक्षा छोटी तर छोटी, पण पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाचं तोंडभरून कौतुक करूया. प्रत्येक कर्तृत्वाचे उत्सव साजरे करूया! उद्या १६ मार्च २०१० रोजी गुढी पाडव्याला मराठीची पताका घेऊन जगाला आपली नव्याने ओळख व्हावी या दृष्टीने आपण सगळ्यांनी एक निर्णायक पाऊल टाकणं गरजेचं आहे.

Communication is Key! ज्या दिवशी आपला संपूर्ण मराठी समाज अशा विचाराने एक पाऊल पुढे टाकेल, त्या दिवशी मराठी भाषा आणि प्रत्येक मराठी माणसाची पावलं पडतील पुढे! जय महाराष्ट्र!

नितीन पोतदार , कॉर्पोरेट लॉयर, - सोमवार, १५ मार्च २०१०
संपर्क : ९९३०९५४७४७
सौजन्य लोकसत्ता आर्थिक पुरवणी.

1 comment:

GORDON HORSE said...

YOU ARE RIGHT SIR,
BUT FIRST COME FIRST,
WE NEED TO THROW DOWN OUR COMPLEX AND KAALEE VAHMEE MANSIKTA,
IT IS MORE IMPORTANT THAN ANIS.