Thursday, April 29, 2010

मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय.....मुकेश अंबानी

मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.

महाराष्ट्राची राजधानी असणा-या मुंबईत माझा जन्म झालाय, तोही महाराष्ट्र राज्यानिर्मितीच्या एका वर्षानंतर....माझे वडिल ज्येष्ठ उद्योगपती धिरूबाई अंबानी १९५८ मध्ये मुंबईत आले तेव्हापासून आमचे कुटुंब इथेच राहते आहे. ही स्वप्नभूमी आमची कर्मभूमीही आहे.  त्यामुळे मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.

याच मुंबईत माझ्या वडलांनी एक लहानसा व्यापार सुरू केला. १९७७ मध्ये लावलेल्या या लहानशा रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. त्यांच्या डोळ्यासमोरच रिलायन्स ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी झाली. त्या माझ्या महान वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची परंपरा राखण्याचा प्रयत्न मी करतोय आणि यापुढेही करत राहीन.

Thursday, April 22, 2010

माझं tweet.....लालबाग परळ - प्रत्येक मराठी काळजाने बघावं असा चित्रपट.

२२ एप्रिल २०१०:   "लालबाग परळ" चित्रपट PVR परळच्या मल्टिप्लेक्समध्ये बघताना चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत संपूर्ण चित्रपटगृहात खूप काही बोलणारी एक भयाण शांतता पसरलेली होती! प्रत्येकाला खूप काहीतरी बोलायचं असणार, पण प्रत्येकजण जणू मनातून कुठेतरी भेदरलेला असावा.

हा चित्रपट लेखक जयंत पवार यांचा जास्त वाटतो. महेश मांजरेकरांनी हिंदीत वास्तव केलेला असल्यामुळे त्यांनाही हा विषय तसा जवळचा आहे. त्यांनाही श्रेय द्यावचं लागेल. कास्टिंग आणि प्रत्येकाच काम अप्रतिम! काहींच्या मते चित्रपट खुप भडक, व्हॉयोलंट आहे, अंगावर येतो, संपाच्या तो खोलात जात नाही, संदर्भ चुकीचे आहेत, कारण १९८२ साली कुठे होतं मॅच फिक्सिंग, ग्लोबलायझेशन, मॉल आणि उंच टॉवर्स? मला वाटतं अशा टीका होण्याच कारणं म्हणजे एकूणच गिरणी कामगाराच्या भोवती पुष्कळ विषय जोडले गेलेले आहेत. उदा. मालक वर्गाची ताकत, डॉ. सामंतांच नेतृत्व, शिवसेनेची भुमिका, कॉग्रेस सरकारचे निर्णय आणि एकुणच कामगारांची परिस्थिती. कदाचित पसारा खुप मोठा झाला असता म्हणून लेखकाने हे कुठलेच विषय जास्त खोलात जाऊन मांडलेले नाहीत की त्यावर स्वत:च भाष्य देखील केलेलं नाही. हे एक प्रकारे चांगलच झालं.   काही गोष्टी इतिहासजमा झालेल्याच बऱ्या.  प्रेक्षक अडीच तासात हे सगळे पैलू शोधायचा प्रयत्न करतो आणि तिथं तो थोडासा नाराज होतो अस मला वाटतं.    प्रेक्षकांना गिरणी कामगारांची नेमकी कशामुळे फरफट झाली हेच कळतं नाही.  दोष कुणाला द्यायचा हेच समजत नाही, म्हणुन थोडस फ्रस्ट्रेशन दिसतं.   पण जयंत पवारांनी शेवटपर्यंत गिरणी कामगारांच्या कौटुंबिक जीवनाला मात्र पुर्ण न्याय दिलेला आहे म्हणून त्यांच कौतुक करायलाच हवं.  म्हणुन मला चित्रपट खुपच आवडला आणि मला वाटतं प्रत्येक मराठी काळजाने तो एकदातरी मोकळ्या मनानं पाहावा.

Monday, April 19, 2010

........तेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’

एक जुना दिवाळी अंक चाळत असताना एका नानखटाई बनविणाऱ्या मराठी बेकरी मालकाची छोटेखानी मुलाखत वाचायला मिळाली.   वयाच्या १० वर्षांपासून भट्टीपुढे उभं राहून काम करीत पुढे स्वत:ची बेकरी त्याने कशी थाटली आणि यश कसं संपादन केलं हे त्यांनी त्यात सविस्तर सांगितलं होतं. मुलाखतीत पुढे त्यांनी अभिमानाने सांगितलं की, प्रत्येक दिवाळीच्या सणासुदीला ते अजूनही १२ ते १५ तास सलग भट्टीसमोर उभे राहतात. संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर मेहनत करतं आणि भरपूर पैसे कमावतात. त्यांची दोन्ही मुलं आज त्यांच्याबरोबर मेहनत करतात, त्याचं त्यांना फार कौतुक वाटतं. पण त्यांची एक मोठी खंत आहे आणि ती म्हणजे त्यांना एक ग्लुकोज बिस्किटे बनविण्याची छोटीशी फॅक्टरी टाकायची होती. तसेच त्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ज्वारीचा ब्रेड बनवायचा होता! शाळेच्या मुलांसाठी त्यांना मधल्या सुट्टीसाठी एक पौष्टिक डबा बनवायचा होता! पण.. हे सगळं त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं. कारण त्यांना बेकरीच्या रोजच्या व्यापातून बाहेर पडताच आलं नाही. हे असं का व्हावं? कारण त्यांनी बेकरीचा उद्योग सुरू केला. पण ते स्वत: त्यांच्याच बेकरीत आयुष्यभर भट्टीपुढे नोकरीच करीत राहिले! शून्यातून सुरुवात करून या बेकरीच्या मालकाने उद्योग वाढवला पण एका मर्यादेपर्यंतच. चांगल्या नवीन कल्पना त्यांच्याकडे होत्या, इच्छा होती, पण ते झेप घेऊ शकले नाहीत. का? कारण ‘डेलिगेशन’ हा शब्दच त्यांना माहीत नव्हता. जे त्यांच्या बाबतीत घडलं तेच काही प्रमाणात उच्चशिक्षित उद्योजकांच्या बाबतीतही निदर्शनास येते. डेलीगेशनअभावी आपल्या उद्योगातील सर्व कामं ते स्वत:च करत असतात आणि उद्योगविस्तार हे महत्त्वाचं कामं मात्र बाजूला राहतं. हा खरोखरच गंभीर विषय आहे. असं का होतं, त्यातून बाहेर कसं पडायचं हे नीटपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

Wednesday, April 14, 2010

माझं tweet .....आयपीय्ल! इंडियन पैसा लुटो!!

१४ एप्रिल २०१०:  माझ्या पिढीने सुनिल गावस्करचा स्ट्रेट ड्राइव्ह, गुंडप्पा विश्वनाथचा स्क्वेअर कट, फिरकी चे बादशाह चंद्रा, बेदी, प्रसन्ना आणि वेंकटराघवन यांची गोलंदाजीचा आणि हो एकनाथ सोलकरने बॅकवर्ड व फॉरवर्ड शॉर्टलेगला केलेली फिल्डिंगचा आभ्यास करत करत दहावी आणि बारावीच्या परिक्षा दिल्या.  पुढे कॉलेज मधे गेल्यावर कपिलदेव माझा देव होता!  तर संदिप पाटील अमिताभ बच्चन!  नंतर ह्या सगळ्यांची जागा एका सचिनने भरुन काढली आणि अजुनही धावतोच आहे.   सेहवाग धोणी आणि इतर पण चांगल खेळत आहेत पण काही वर्षांपुर्वी मॅच फिक्सिंगच्या प्रकरणामुळे मला "क्रिकेट" ह्या शब्दाविषयी मनातं एक प्रकारची घृणा निर्माण झाली ती निघता निघत नाहीयं.   १९८३ च्या वर्ल्डकपची लढाई मी दिवसभर ब्लॅक & व्हाईट टीव्हीसमोर बसुन पाहिलेली आहे.   जर सचिनने २०११चा वर्ल्डकप जिंकला तर परत मुड लागेल असं वाटतं.   मुख्य म्हणजे एक्स्पर्ट कॉमेन्ट्री एकावी तर फक्त विजय मर्चंन्ट्च्या धारदार आवाजातुनच!  लहानपणी वडिलांच्या तोंडातुन विनु मांकड, विजय हजारे, बापु नाडकर्णी, नवाब पतौडी अशा दिग्गजांची नाव ऎकलेली होती.

हे सगळं आज आठवायच कारण म्हणजे आज आयपीएल कोची टीमच्या मालकी हक्कावरून 'IPL' अध्यक्ष ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यात जी साठमारी सुरु आहे,  आणि एकूणच ज्या पद्दतीने संपुर्ण IPL वर पैशाचा किळसवाणा पगडा बघुन माझ्यासारखे क्रिकेटवर प्रेम  करणारे रोज आत्मह्त्या करीत असतील!  आता कुठल्याही ब्रॅण्डची टीशर्टस आणि टोप्या न घालता शुद्ध क्रिकेट फक्त शिवाजी पार्कात ८ ते १४ वयोगटातील मुलं खेळतानाच दिसणारं असं दिसतयं?  तुर्त एवढंच.

Tuesday, April 13, 2010

माझं tweet ....."स्टॉप वॉच" - स्वत: स्पेशल स्टॉप घेऊन वाचावसं पुस्तक

१३ एप्रिल २०१०:  गेल्या
आठवड्यात      Born2Winच्या कार्यक्रमात राष्ट्रपती शौर्य पदक विजेते मूंबईचे पोलिस उपनिरीक्षक श्री.  संजय गोविलकरांशी भेट झाली.   माझ्या भाषणानंतर त्यांनी स्टेजवर येऊन माझं तोडं भरुन कौतुक केलं म्हणुन त्यांचे माझ्या ब्लॉगवरुन आज जाहीर आभार मानतो.   भेटीनंतर त्यांनी मला त्यांच "स्टॉप वॉच" हे पुस्तक आणि त्यांच्या "जीवनरंग" (http://jeevanrang.org/) ह्या उपक्रमात झालेल्या कार्यक्रमाची सीडी प्रेमाने पाठविली. 

"स्पीड" आणि "चेंन्ज" च्या युगात आपणच स्वत:ला कुठल्याही गोष्टीत सतत फरफटत नेतोय का?  एखाद्या विचारांनी पेटुन ऊठणं किंवा झपाटून जाणं आणि एखादी गोष्ट "झटपट" करणं  ह्यातला फरक आपण विसरतोय का?  "शांतपणा" हा शब्द आपणच आपल्या डिक्शनरीतुन पुसुन टाकलेला आहे का?  आपण जे मिळवलंय त्याचा आस्वाद आपण कधी घेणारच नाही का?   आयुष्य इतक छोटं करून आपल्याला काय नक्की मिळवायच आहे?  असे प्रश्न तुम्हाला पडले असणारचं.  म्हणुन तुम्ही "स्टॉप वॉच" हे श्री. संजय गोविलकर (jeevanrang@gmail.com)  आणि सौ. स्नेहल गोविलकर लिखित ’अनियमित दिनचर्या आणि आरोग्य’ या विषयावरील हे पुस्तक वाचलेच पाहिजे.   

PS:  लहानपणी आपण स्टॉप स्टॉप खेळायचो;  आज तुमचे ते मित्र तुम्हाला स्टॉप म्हणायला कदाचित नसतील तर स्वत:लाच स्टॉप म्हणुन हे पुस्तक वाचायला घ्या आणि आयुष्यात योग्य स्पीड आणा.  

Friday, April 9, 2010

मराठी उद्योजकांनी पुस्तकी नियमांच्या बाहेर पडावे!

बॉर्न२विन चा ‘लक्ष्यसिद्धी सोहळा’ -  रिपोर्ट

अपुरे भांडवल, तंत्रज्ञानात होणारे बदल, ब्रॅण्ड पोझिशनसाठी मार्केटिंगची जीवघेणी स्पर्धा, मनुष्यबळाचा अभाव अशा अनेक समस्यांना भारतातच नव्हे तर जगातील सगळ्याच उद्योजकांना तोंड द्यावे लागते. तरीही अशा उणीवांनी न डगमगता ते व्यवसाय करीत असतात. मराठी उद्योजकांनीही इतरत्र उद्योजक त्यांच्यापुढील समस्यांवर कशी मात करतात याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे. गरज पडल्यास पुस्तकी नियमांच्या बाहेर पडून समस्यांचा सामना करण्याची त्यांनी तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन नामवंत कॉर्पोरेट लॉ नितीन पोतदार यांनी केले.

कर्नाटक संघ सभागृह, माटुंगा येथे आयोजित ‘लक्ष्यसिद्धी सोहळ्या’त प्रमुख पाहुणे या नात्याने पोतदार बोलत होते. ‘बॉर्न टू विन’ या अतुल राजोळी आणि अमेय आमरे या दोन मराठी तरुणांनी स्थापलेल्या संस्थेच्या वतीने व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी ध्येयनिश्चिती ते ध्येयसिद्धी अशा सहा पायऱ्या असणारा ११ आठवडय़ांचा प्रशिक्षण कार्यक्रम ‘लक्ष्यवेध’ या नावाने राबविला जातो. या प्रशिक्षण कार्यक्रमातील सर्व सहभागींसाठी आयोजित ‘लक्ष्यसिद्धी’ सोहळयात पोतदार यांच्या हस्ते ठरवून दिलेले लक्ष्य साधण्यात यशस्वी झालेल्या निवडक प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला.
(संपुर्ण लेख वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा)

Friday, April 2, 2010

मराठी माणसाने व्यवसायात उतरावे - जयराज साळगावकर

‘उद्योगपंथ’ पुस्तक प्रकाशन सोहळा रिपोर्ट

चांगला जनसंपर्क ठेवून बाजारातील पत सांभाळण्याबरोबरच थोडासा धोका पत्करण्याची तयारी करून मराठी माणसाने नुसते राजकारण आणि दंगा, मस्तीत गुंतून पडण्याऐवजी मोठय़ा प्रमाणावर उद्योग व्यवसायात उतरावे, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध उद्योजक व कालनिर्णयकार जयराज साळगावकर यांनी ठाण्यातील परममित्र पब्लिकेशनतर्फे ‘उद्योगपंथ’ हे पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दिला.   प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून साळगावकर बोलत होते.

प्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर होते. परममित्रचे संपादक माधव जोशी, अरुण करमरकर आणि रवींद्र कऱ्हाडकर यांच्या प्रयत्नांतून विविध उद्योगांत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन यशस्वी झालेल्या १९ उद्योजकांची यशोगाथा ‘उद्योगपंथ’मधून साकारली आहे.

(संपुर्ण लेख वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा)