Friday, April 2, 2010

मराठी माणसाने व्यवसायात उतरावे - जयराज साळगावकर

‘उद्योगपंथ’ पुस्तक प्रकाशन सोहळा रिपोर्ट

चांगला जनसंपर्क ठेवून बाजारातील पत सांभाळण्याबरोबरच थोडासा धोका पत्करण्याची तयारी करून मराठी माणसाने नुसते राजकारण आणि दंगा, मस्तीत गुंतून पडण्याऐवजी मोठय़ा प्रमाणावर उद्योग व्यवसायात उतरावे, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध उद्योजक व कालनिर्णयकार जयराज साळगावकर यांनी ठाण्यातील परममित्र पब्लिकेशनतर्फे ‘उद्योगपंथ’ हे पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दिला.   प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून साळगावकर बोलत होते.

प्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर होते. परममित्रचे संपादक माधव जोशी, अरुण करमरकर आणि रवींद्र कऱ्हाडकर यांच्या प्रयत्नांतून विविध उद्योगांत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन यशस्वी झालेल्या १९ उद्योजकांची यशोगाथा ‘उद्योगपंथ’मधून साकारली आहे.

(संपुर्ण लेख वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा)
कोणताही उद्योग सुरू करणे व तो यशस्वी करणे या प्रवासातील येणाऱ्या अडचणींतून कसा मार्ग काढावा, यादृष्टीने या कार्यक्रमात साळगावकर आणि पोतदार यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करून काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या. विशेषत: मराठी माणसाने उद्योग, व्यवसायात मागे राहू नये असा सल्ला त्यांनी दिला.  मुळात उद्योग करण्याची मानसिकता असेल तरच उद्योजक होता येते, असे स्पष्ट करीत साळगावकर म्हणाले की, जो धंदा करण्याची मनात इच्छा आहे अशा धंद्याशी संबंधित उद्योगात प्रथम काही वर्षे नोकरी करावी. त्यातून दुसऱ्याच्या पैशाने धंद्यातील बारकावे समजून घेता येतात. मराठी माणूस धंद्यांसाठी कर्ज घेण्यास घाबरतो ही घोडचूक असून उलट स्वत:ची बाजारातील पत वाढविण्यासाठी मराठी माणसाने आवश्यकता नसेल तरीही कर्ज घ्यावे व त्याची ठरलेल्या मुदतीत व वेळेवर परतफेड करण्याची सवय करावी. दर्जेदार उत्पादन, चोख सेवा आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केल्यास धंद्यात नक्की यश येते, असेही ते म्हणाले. उद्योजक व व्यावसायिकांमुळे अनेकांना रोजगार व नोकऱ्या मिळतात. त्यामुळे त्यांचे हे काम एका परीने राष्ट्रउभारणीचे असल्याने उद्योजकाचा समाजाने सन्मान करायला हवा. अन्य समाजात तो केला जातो, पण दुर्दैवाने मराठी समाजात तो होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मराठी माणूस उद्योगधंद्यात अजिबात मागे नाही, असे स्पष्ट करून अ‍ॅड. पोतदार यांनी प्रथम अशी चर्चा थांबवायला हवी, असे मराठी माणसाला आवाहन केले. मराठी माणूस धंद्यात मागे ही चर्चा केवळ मुंबईतील चाकरमान्यांना डोळ्यांपुढे ठेवून आम्ही करतो, पण केवळ मुंबई म्हणजेच महाराष्ट्र व मराठी माणूस हे समीकरण चुकीचे आहे. सोनार, कोळी, सुतार, लोहार, वाणी हा समाज आजही केवळ व्यवसाय व उद्योगधंदे करीत आहे. त्याची संख्या मुंबईतील मराठी माणसांपेक्षा कितीतरी अधिक आहे. मग असे असताना मराठी माणूस धंद्यात मागे, अशी चर्चा होणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.उद्योग, व्यवसायात स्वत:भोवती मर्यादा घालून न घेता परिघाबाहेर पडून मोठी झेप घ्या, असे सांगून पोतदार यांनी धंद्यांसाठी कर्ज घेजणे, भागीदारी करणे या गोष्टी वाईट असल्याची समजूत प्रथम दूर करायला हवी, बदलते तंत्रज्ञान व आधुनिकीकरण यांची कास धरावी आणि स्वत:बद्दल व स्वत:च्या उत्पादनाबाबत सविस्तर माहिती देणारी ‘वेबसाइट’ तयार करावी, अशा काही महत्त्वाच्या टिप्स त्यांनी दिल्या.

महाराष्ट्र आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असले, तरी महाराष्ट्र निर्मितीच्या मूळ उद्दिष्टांपासून ते दूर जात असल्याचे दुर्दैवी चित्र सर्वच क्षेत्रात दिसत असल्याची खंत जोगळेकर यांनी यावेळी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. उद्योग, कृषी, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या माणसाच्या दैनंदिन जीवनाशी व प्रगतीशी निगडित असणाऱ्या क्षेत्राची आज दुर्दशा झाली. राज्यात शिक्षणासाठी मंत्रालय आहे, पण त्यासाठी स्वतंत्र मंत्री नाही, ८०० नवीन विद्यापीठे स्थापन होणार असल्याची चर्चा होते, तर येथे मुंबई विद्यापीठाला अद्याप कुलगुरू मिळत नाही. राज्यातील ४०० कृषीशाळांमुळे कोणताच लाभ झाला नसल्याने त्या बंद कराव्यात, असा अहवाल राज्य सरकारकडे आला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेकडो उद्योग धडाधडा बंद होऊन गुजरात सरकारने मंत्रालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र सरकारला उद्योग वाचावेत असे वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे उद्योगखाते गुजरात सरकारकडे चालविण्यास द्यावे, असा उपरोधिक सल्लाही जोगळेकर यांनी भाषणात दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी भाषेतील चरित्र इंग्रजीत अनुवादित करण्यात येत असून, या पहिल्या इंग्रजी पुस्तकाचे लवकरच परममित्रतर्फे प्रकाशन केले जाईल, अशी घोषणा यावेळी माधव जोशी यांनी केली.
 
सौजन्य लोकसत्ता दि. ३० मार्च २०१०.