Thursday, April 22, 2010

माझं tweet.....लालबाग परळ - प्रत्येक मराठी काळजाने बघावं असा चित्रपट.

२२ एप्रिल २०१०:   "लालबाग परळ" चित्रपट PVR परळच्या मल्टिप्लेक्समध्ये बघताना चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत संपूर्ण चित्रपटगृहात खूप काही बोलणारी एक भयाण शांतता पसरलेली होती! प्रत्येकाला खूप काहीतरी बोलायचं असणार, पण प्रत्येकजण जणू मनातून कुठेतरी भेदरलेला असावा.

हा चित्रपट लेखक जयंत पवार यांचा जास्त वाटतो. महेश मांजरेकरांनी हिंदीत वास्तव केलेला असल्यामुळे त्यांनाही हा विषय तसा जवळचा आहे. त्यांनाही श्रेय द्यावचं लागेल. कास्टिंग आणि प्रत्येकाच काम अप्रतिम! काहींच्या मते चित्रपट खुप भडक, व्हॉयोलंट आहे, अंगावर येतो, संपाच्या तो खोलात जात नाही, संदर्भ चुकीचे आहेत, कारण १९८२ साली कुठे होतं मॅच फिक्सिंग, ग्लोबलायझेशन, मॉल आणि उंच टॉवर्स? मला वाटतं अशा टीका होण्याच कारणं म्हणजे एकूणच गिरणी कामगाराच्या भोवती पुष्कळ विषय जोडले गेलेले आहेत. उदा. मालक वर्गाची ताकत, डॉ. सामंतांच नेतृत्व, शिवसेनेची भुमिका, कॉग्रेस सरकारचे निर्णय आणि एकुणच कामगारांची परिस्थिती. कदाचित पसारा खुप मोठा झाला असता म्हणून लेखकाने हे कुठलेच विषय जास्त खोलात जाऊन मांडलेले नाहीत की त्यावर स्वत:च भाष्य देखील केलेलं नाही. हे एक प्रकारे चांगलच झालं.   काही गोष्टी इतिहासजमा झालेल्याच बऱ्या.  प्रेक्षक अडीच तासात हे सगळे पैलू शोधायचा प्रयत्न करतो आणि तिथं तो थोडासा नाराज होतो अस मला वाटतं.    प्रेक्षकांना गिरणी कामगारांची नेमकी कशामुळे फरफट झाली हेच कळतं नाही.  दोष कुणाला द्यायचा हेच समजत नाही, म्हणुन थोडस फ्रस्ट्रेशन दिसतं.   पण जयंत पवारांनी शेवटपर्यंत गिरणी कामगारांच्या कौटुंबिक जीवनाला मात्र पुर्ण न्याय दिलेला आहे म्हणून त्यांच कौतुक करायलाच हवं.  म्हणुन मला चित्रपट खुपच आवडला आणि मला वाटतं प्रत्येक मराठी काळजाने तो एकदातरी मोकळ्या मनानं पाहावा.
जे काल गिरणी कामगारांच झालं ते उद्या इतर कुठल्यातरी कामगारांच होईल!  जे मुंबईत घडलं ते उद्या जगाच्या पाठीवर अन्य कुठेतरी घडेल, नव्हे कदाचित घडलं देखील असेल.  केलेल्या चुकांपासुन कुणीही शिकत नाही!  २०१० सालीसुद्दा survival of the fittest! ची थिअरी लागू होते कारण आपण अजुनही बऱ्याच अंशी जंगल राज्यातच आहोत!

No comments: