Friday, May 7, 2010

माझं tweet.....पुढच्या शतकासाठीच्या उद्योगसाठी नेतृत्व तयार करू - नितीन नोहरीया

७ मे, २०१०:  नितीन नोहरीया ह्या भारतीय व्यक्तीची नुकतीच (Harward Business School) ‘हार्वड बिझनेस स्कूल’ ह्या अत्यंत प्रतिष्ठीत संस्थेच्या डीन पदावर नेमणूक झाली.  सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब!  म्हणुन त्यांचे प्रथम अभिनंदन करुया!!  आज अनेक भारतीय (इंग्लीश) वृत्तपत्रातून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या. त्यांत मांडलेले त्यांचे काही विचार इथं देत आहे.   

ते म्हणतात, भारतीय कंपन्यांकडून शिकण्यासारखे खूपच आहे.  भारतीय कंपन्यांवर हार्वड विद्यापीठाने ५० केस स्टडी लिहल्या असून वर्गात शिकवताना त्याचा उपयोग होतो. ह्या कंपन्यांनी वितरण व्यवस्थेचे जाळे खूप मोठ्या प्रमाणात कसे ऊभे केले, नोकरीसाठी माणसे निवडताना, जास्तीत जास्त लोकांमधून त्यांची निवड कशी करायची व संस्थात्मक स्तरावर निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढायची, हे शिकण्यासाठी भारतीय कंपन्यांचा अभ्यास उपयोगी पडतो. ते पुढे म्हणाता की शिक्षणक्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून आम्ही काम करू व पुढच्या शतकासाठीच्या उद्योगसाठी नेतृत्व तयार करू.
त्यांनी ‘लिडरशिप अन्ड कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबीलीटी’ ह्या विषयावरचा कोर्स त्यांच्या मुलांना अनिवार्य केला आहे.   ह्या विषयाबाबत त्यांच्या खूप उत्कट भावना आहेत.  वैद्यकीय विद्यार्थ्यांना; डॉक्टरना जशी हिप्पोक्रॅटीक ओथ – शपथ घ्यावी लागते, तशी उद्योगक्षेत्र, व्यवस्थापनक्षेत्र, व त्यातील लोक, ह्यांच्यासाठीसुद्धा शपथ असावी अशी कल्पना त्यांनी मांडलेली आहे. ते म्हणतात, उद्योगक्षेत्राला समाजामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावायची आहे व उद्योग हा सन्मानाने केला पाहिजे.  मागील काही वर्षात समाजाचा उद्योगक्षेत्रावरचा विश्वासा नाहीसा झाला आहे, कारण दीर्घ कालावधीत काय जास्त हिताचे असेल याचा विचार न करता उद्योगक्षेत्राने तात्कालीक फायद्याचा विचार केला. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.  त्यांची करिअर म्हणजे स्प्रिंट शर्यत नव्हे तर मॅरेथॉन शर्यत आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.  केवळ स्वत:च्या भरभराटीचा, स्वत:पुरता विचार नसावा तर पूर्ण समाजासाठी, जगासाठी ते भरीव कामगिरी ते करू शकतात व त्यांना ती करायची आहे.   ज्या क्षेत्राबद्दल तुम्हाला खूप ध्यास आहे, त्यात तुम्ही करिअर केलीत तर यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते असे नितीन म्हणतात. भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत उद्योग, कला, शिक्षण ह्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत, हॉलिवूडमध्ये आहेत, त्याचे हे एक कारण आहे असे ते मानतात.

नितीन यांचे वडील के.के. रोहरीया हे क्रॉम्पटन ग्रीव्हजमध्ये विद्युत उपकरणे ह्या विभागाचे प्रमुख होते. त्यांचा नितीन यांच्यावर खुप प्रभाव आहे. वडिलांनी नेतृत्वाबाबत त्यांना सल्ला दिला, स्वत: मार्ग शोधा, विनम्र राहा. बहुधा भारतीय मुलांनी काय करिअर करावी, त्यांचे पालकच ठरवतात. मात्र नितीन यांच्या वडिलांनी स्वत:ची मते त्यांच्यावर लादली नाहीत. नितीन यांचा शिक्षक होण्याकडे कल आहे बघून त्यासाठी प्रोत्साहन दिले.   डीन म्हणून नितीन व्यस्त असणार हे उघडचं आहे, पण त्यातूनही शिकवण्यासाठी वेळ काढता येईल अशी त्यांना आशा आहे. शिकवण्याचे काम त्यांना मनापासून आवडते व विद्यार्थ्यांबरोबर संपर्क ठेवणारच असे ते म्हणतात.

माझ्या वडिलांनी मला ज्याची मनापासून आवड होती, त्याक्षेत्रात जायला शिकवले व माझ्या विद्यार्थ्यांना मी तोच सल्ला देतो, असे ते म्हणतात. हा खरे तर नेहमीचा सल्ला आहे. पण प्रत्येक कोर्सच्या विद्यार्थ्यांना, शेवटच्या तासाला ते एक वेगळा सल्ला देतात. ते (Generosity) ओदार्याबद्दल बोलतात:  ‘जे तुम्ही समाजाला द्याल, आयुष्य, त्याची तुम्हाला अनेकविध मार्गानी परतफेड करते. तुम्ही कल्पना करणार नाही अशा रितीने तुम्हाला भरभरून परत देते!’

PS:   मला नितीन नोहरीयांचे विचार आणि हसणं दोन्ही आवडलं म्हणुन त्यांचे दोन फोटो देण्याचा मोह आवरला नाही.  Congrats once again!!

No comments: