Sunday, May 9, 2010

माझं tweet.....अग्निहोत्र!! पत्रकार ते मालिका लेखन - अभय परांजपे

९ मे २०१०:  ‘अग्निहोत्र’ ही स्टार प्रवाहवरील मराठी मालिका ४५० भागानंतर ३० एप्रिल २०१०ला संपली.   पुर्वी काही रटाळ कंटावाण्या मालिकांनी माझा अंत बघितल्यामुळे मला आता मालिका हा प्रकारच आवडेनासा झाला आहे.  तरी पण अग्निहोत्र मालिकेचे सुरुवातीचे काही भाग माझ्या १८ वर्षाय मुलाच्या आग्रहाखातर मी पाहिले आणि मग अधुन मधुन माझी बायको मला कथानकाविषयी update करत होती.   ‘अग्निहोत्र’ खूपच लोकप्रिय झाली, अगदी ऑर्कुटवर अग्निहोत्रची ३५०० सदस्यांची कम्युनिटी निर्माण झाली.   इतर सुमार मराठी मालिकांच्या पिकात ती उठून दिसली हे मात्र नक्की.   याच श्रेय मालिकेचे निर्माते श्रीरंग गोडबोले यांना जास्त जातं.  मझे ते आवडते निर्माता दिगदर्शक आहेत.
माझे स्नेही उदय कुलकर्णी ह्यांनी मालिकेचे लेखक अभय परांजपेची बातचीत करून एक सविस्तर लेख लिहलेला आहे.  लेख खाली अपलोड करत आहे.   कुलकर्णींकडुन अभय परांजपेंची माहीती मिळाली ती वाचकांना देत आहे.   पूर्णवेळ पत्रकार via  जाहिरात क्षेत्राची चांगली नोकरी ते  टीव्ही क्षेत्रात मालिका लिहणे हा त्यांचा प्रवास खुपच प्रगतीचा आहे!   Man of action!   असा एक यशस्वी लेखक आपल्या यशाचे गुपीत इतकं उघडपणे इतरांशी मोकळेपणानी शेअर करतो हे माझ्या मते फार महत्वाच आहे.   मालिका कशी लिहावी याचं तंत्र,  दर्जा टिकवण्याचे रहस्य, त्यांनी दिलेल आहे.  मराठी समाजातल्या प्रतिभावान लोकांनी काळाची पाउल ओळखुन कस काम करावं,  त्यातुन यश कस मिळवावं, याचा classic formula!!  त्यांनी त्यांच्या मुलाखतीच्या शेवटी  दिलेला आहे तो मला फार महत्वाचा वाटला म्हणुन त्यांची संपुर्ण मुलाखतच खाली दिलेली आहे.   ज्यांनी ही मालिका संपुर्ण बघितली त्यांनी अभय परांजपेंची मुलाखत वाचायला जरुर आवडेल कारण प्रत्येक गोष्टीचा किती बारीक विचार केला जातो हे आपल्याला समजतं.  Thank you dear Paranjape!

अभय परांजपेशी बातचीत करुन उदय कुलकर्णींनी लिहलेला लेख:

अभय परांजपे ८६ ते ९९ पर्यंत पूर्णवेळ पत्रकार होते, त्यात ९१ पासून ते जाहिरात क्षेत्रात कॉपी-रायटर म्हणून काम करू लागले.  मुद्रा, चैत्रा, त्रिकाया ग्रे अशा अनेक नामवंत कंपन्यात ते होते.  त्यांच्या जाहिरातींना मानाचे पुरस्कार मिळाले.  जाहिरात क्षेत्रात भरपूर पैसा मिळत असतानाही नुकसान सहन करून ते क्षेत्र सोडून ९९साली ते टीव्ही क्षेत्रात - झी-अल्फा मराठीमध्ये रुजू झाले. आभाळमाया मालिका झी वर सुरू असताना ते तिचे कार्यकारी निर्माता होते. ही नोकरी सोडून मग त्यांनी मालिका लिहणे सुरू केले. ‘आधार’ ही दुरदर्शनवर दाखवलेली मालिका, त्यांची पहिली मालिका. २००३ला झीवर त्यांची ‘वादळवाट’ मालिका सुरू झाली व खूप लोकप्रिय झाली. ही चार वर्षे चालली व तिचे ९५० भाग झाले होते.  तुझ्याविना, रेशीमगाठी, थरार ह्याही काही त्यांच्या मालिका.  ९३साली त्यांनी सचिनसाठी ‘कुंकू’ सिनेमा लिहला.  त्याला राज्य पुरस्कार मिळाला. पैलतीर हा त्यांचा दुसरा चित्रपटही उत्तम कथाविषय असून केवळ अत्यंत टुकार दिग्दर्शनामुळे लोकांच्या समोरच आला नाही. ‘ए भाऊ डोकं नको खाऊ’ हे त्यांच नाटक लोकांना आवडल. या नाटकाचेही एका वर्षात ३५० प्रयोग झाले. ‘मायलेक’ ही त्यांची मालिका आता इ टीव्हीवर सुरू होईल.

मालिका लेखन प्रक्रियेचे तंत्र - व्यक्तीरेखांचा ग्राफ सर्वात महत्वाचा!

‘अग्निहोत्र’ मालिका स्टार प्रवाहवर सुरू झाली तेव्हा त्यातील तो जुना काळ, तुळशी वृंदावन वगैरे बघून ती बघायची नाही असेच ठरवले.  आजचे वास्तव इतके गुंतागुंतीचे आहे, त्यावर आधारित कथानकांऐवजी जुन्या काळाचे कथानक बघण्यात मला स्वारस्य नाही. पण नंतर दोन-तीन महिन्यांनी रिमोटवर स्वार होऊन टीव्हीरुपी समुद्रातील चॅनेलरुपी लाटांवर हेलकावे घेत असताना अचानक अग्निहोत्र मालिकेत मुक्ता बर्वेची एंट्री झाल्याचे दिसले. तेही ती एकदम वेगळ्या भूमिकेत. अशिक्षित, तमाशातील मुलगी व येताना गाठोड्याबरोबर रहस्यही घेऊन आलेली. त्यामुळे ही मालिका बघणे सुरू केले व त्यात गुंतत गेलो – ह्याला मालिकेचे लेखक-पटकथाकार अभय परांजपे यांचा शब्द वापरायचा म्हणजे हुक (hook ), गळाला लागणे! पण मी मालिका बघायला सुरवात केली तेव्हा जवळपास शंभराच्या वर भाग होऊन गेले होते, तरी मला कथानकाची संगती कशी लागत गेली? त्यातील व्यक्तीरेखांची एकमेकांबरोबर काय नाती आहेत, त्यांच्यातील प्रेमभाव व ताण-तणाव कसे कळत गेले? अभय परांजपे याचा उलगडा करतात: दैनंदिन मालिका जशी रंगत जाते, चांगली असते, लोक स्वत:हून तिच्याविषयी दुसर्‍याना सांगतात, त्यामुळे मालिकेला नवे प्रेक्षक मिळत राहातात. मालिकेत त्यामुळे परत परत फील द्यावा लागतो, मागचा भाग रिव्हीजिट करावा लागतो, म्हणजे थोडा भाग पुन्हा दाखवावा लागतो. अर्थात पूर्ण प्रसंग पुन्हा दाखवायची गरज नसते, तर संदर्भ देणे पुरेसे असते. त्यातून नव्या प्रेक्षकाला कथानकाची संगती लागत जाते. पण प्रेक्षकाच्या सोयीसाठी असे केले तरी ते कथानकाच्या ओघात झाले आहे असे वाटले पाहिजे, जुन्या प्रेक्षकांना त्याचा अडथळा वाटला नाही पाहिजे. हेच लेखकाचे कौशल्य आहे. परांजपे म्हणतात, म्हणूनच मालिका लिहणे ह्यात सृजनशीलता कमी व कारागिरी – हिशोबीपणा जास्त आहे. किंवा असे म्हणता येईल हिशोबीपणाने काही गोष्टी मालिकेत दाखवायच्या तरीही त्या अनिवार्य आहेत वाटले पाहिजे अशा रितीने आणायच्या.

मालिकेसंबधी बोलताना प्रथमपासून सुरवात करायची म्हणून मी त्यांना विचारले, कथा श्रीरंग गोडबोले व कथाविस्तार-पटकथा अभय परांजपे असे श्रेय दिले जाते. मग तुमची एंट्री कधीपासून झाली? परांजपे म्हणतात: गोडबोलेंना एक अनुभव आला, दोन व्यक्ती एकमेकांना मित्र म्हणून ओळखत होते. तिसर्‍या व्यक्तीच्या घरातील एका कौटुंबिक समारंभात ते दोघे अनपेक्षितपणे एकमेकांसमोर आले, तेव्हा त्यांना कळले, ते एकमेकांचे नातेवाईक आहेत! अलेक्स हेलीची ‘रुट्स’ कादंबरीही त्यांना आवडलेली होती. गोडबोलेंच्या मनात आठ भाऊ, तीन बहिणी, त्यातला मोठा भाऊ सगळ्यांना शोधणार असा प्लॉट होता. पण परांजपेंना हा प्लॉट प्रेडीक्टेबल होईल वाटले. त्यामुळे त्यांनी विविध दिशांना गेलेले आठ गणपती घेतले, रहस्य आणले, फ्लॅशबॅक आणले. हे आणताना कुटुंबातील व्यक्ती, त्यांची पार्श्वभूमी येत गेली.

मालिकेत तीसहून जास्त, महत्वपूर्ण रोल असलेल्या व्यक्तीरेखा आहेत. आप्पा- त्यांची पत्नी. त्यांची तीन मुले व दोन मुली-दोन सुना- दोन जावई- दोन नातू व चार नात-मुली. आप्पांच्या आश्रयाला आलेली प्रभामामी, तिचा पती, मुलगा दिनेश, त्याची बायको-पद्मा – त्यांच्या मुली सई व मंदिरा, बाप्पा, इंद्रा असे अनेक. मग हा पसारा कसा सांभाळला? सुसंगती राखणे, तसेच विकास करणे कसे केले, इतक्या सगळ्यांच्या आयुष्यातील घटना लक्षात ठेवायच्या, त्यांच्या स्वभावात सातत्य राखायचे कसे जमले? परांजपेंचे उत्तर म्हणजे मालिका लेखनाचे मर्मच. ते म्हणतात, संपूर्ण आवाका डोक्यात लक्षात ठेवलेला असतो. गोष्ट कुठे संपवायची ठरलेले असते. अगदी सुरवातीला, एक फॅमिली ट्री आधी बनवून घेतो. प्रत्येकाचे वय, अगदी जन्मतारीख व त्या तारखेप्रमाणे, त्याची रास काय असेल व त्या राशीप्रमाणे त्याचा स्वभाव काय असेल तेसुद्धा! पण कॅरेक्टर ग्राफ सर्वात जास्त महत्वाचा – व्यक्तीरेखांचा आलेख, हा ग्राफ केला की त्यातून गोष्ट तयार होते. प्रत्येक व्यक्तीरेखेची फिलॉसॉफी बनवावी लागते. तो कसा वागणार नाही हे ठरवावे लागते. व्यक्तीरेखा विकसित करणे परांजपेंना आवडते. सर्व व्यक्तीरेखा वेगळ्या व खर्‍या वाटल्या पाहिजेत. उदा: महादेव हा पापभीरू, अविवाहीत, एकटा राहाणारा, त्यामुळे आचरटपणा करतो, एककल्ली, स्वत:ची तत्वे सोडत नाही, तिरसट होतो, श्रद्धाळू असतो. उलट मणी हा नास्तिक. कोणताही माणूस जन्माने नास्तिक नसतो. तो विचार करायला लागतो तेव्हा नास्तिक होतो.


लेखकाच्या आवडत्या व्यक्तीरेखा कोणत्या?

मी त्यांना विचारले, इतक्या मोठ्या पसार्‍यात, तुमच्या सर्वात जास्त आवडत्या व्यक्तीरेखा कोणत्या? महादेव व मणी ह्या परांजपेंच्या सर्वात जास्त आवडत्या. मला मात्र सर्वात जास्त भावलेल्या दोन व्यक्तीरेखा म्हणजे मृणालवहिनी व उमामृणालवहिनी ही खूप समंजस, मॅच्युअर आहे. तिला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आहे. तिच्या पतीचा – मणीचा, प्रभामामींवरील संशय, फार घाण संशय, निखालस चुकीचा होता हे सिद्ध होते.  महादेव तेव्हा मणीला खूप जिव्हारी लागले असे बोलतो, तेव्हा मृणाल त्याला फटकारते, नवी नाती जोडताना, जुनी नाती तुटणार नाहीत ह्याची काळजी घ्या म्हणते. मणी नंतर स्वत:ला दोष देत बसतो, त्याला स्वत:चाच तिरस्कार वाटायला लागतो, तेव्हा मृणालच त्याला सांभाळून घेते, त्याला स्वत:ची किंव करत बसण्यापासून वाचवते.   अशी समंजस व्यक्तीरेखा परांजपेंना आवडते.   ही व्यक्तीरेखा गोष्टीचा कणा आहे असे ते म्हणतात. ते म्हणतात माझ्या कोणत्याच मालिकेत सासू-सुनेची भांडणे नाहीत.  माणसे मनाने चांगली असतात ह्यावर त्यांचा विश्वास आहे. ही भूमिका इला भाटे यांनी खूप छान केली आहे.

दुसरी माझी आवडती व्यक्तीरेखा उमा.  ही वकील आहे. ही व्यक्तीरेखा ही माझी वैयक्तीक आवड. त्याचे कारण आपल्याकडे करीअरीस्ट स्त्री दाखवण्याची एक ठराविक पद्धत आहे. ती बॉबकट करणार, कुटुंबापासून दुरावलेली, कठोर वगैरे (खुद्ध ह्याच मालिकेत पद्मा-दिनेशची बायको कलेक्टर आहे, ती अशी दाखवलेली आहे- मुली तिला दुरावलेल्या आहेत. करीअरीस्ट पुरुषाबाबतही हाच फंडा आपल्याकडे वापरतात, तोही कुटुंबापासून दुरावलेला!).  पण उमा यशस्वी असूनही तशी नाही. पण एकुणच यशस्वी, करीअरीस्ट, स्त्रीपण न गमावलेली, कुटुंबसुखाबाबतही आनंदी असणारी स्त्री- व्यक्तीरेखा मला भावते! दिवास्वप्न –विशफूल थिकींग? अशा स्त्रिया नसतात? मी बघितलेल्या आहेत. स्वत: परांजपेंना ही व्यक्तीरेखा वादळवाटच्या नायिकेची पुढची आवृती वाटते. ही भुमिका स्पृहा जोशी ह्या नव्या अभिनेत्रीने केली आहे. उत्तम अभिनय व लोभस व्यक्तीमत्व!


कथानक पुढे नेण्यासाठी..............
एक किरकोळ प्रसंग घडून गेला आहे. नंतर त्याचा कथानक पुढे नेण्यासाठी महत्वपूर्ण उपयोग होतो असे दिसते. उदा: महाजन नावाचे गृहस्थ मंजुळा ही तमाशातील मुलगी तुझ्याकडे का राहाते, तुला पूजा सांगायला बोलावणार नाही असे महादेवला म्हणतात. ह्याचाच उपयोग बर्‍याच नंतर महादेव महाजन ह्यांना मंजुळाची ओळख करून देताना श्रीपाद ते ऐकतो व त्याला आपल्याला मुलगी आहे कळते हे दाखवण्यासाठी केला आहे. माझा परांजपेंना प्रश्न होता, नंतर वापर करायचा असे ठरवून हा आधीचा प्रसंग लिहलेला असतो की, कथानकाला उपयोग होईल लक्षात येते म्हणून मग तो वापरला जातो? ते म्हणतात, दोन्ही खरे आहे. लिहताना कधी लक्षात येते, मागच्या प्रसंगाचा इथे उपयोग करून घेता येईल, मग तो केला जातो. किंवा कधी पुढे उपयोग करण्यासाठी तो लिहलेला असतो. त्याचप्रमाणे इतरही बाबी त्यांनी सांगितल्या: रोल चांगला आहे, परंतु कलाकार चांगले काम करत नसेल तर रोल कमी केला जातो. किंवा रोल फारसा महत्वपूर्ण नसतो, पण कलाकार चांगले काम करतो, त्यामुळे रोल वाढवला जातो.

छोट्या तपशीलामुळे लोक त्याच्याशी रीलेट होतात!

ऑर्कुटवर अग्निहोत्रची कम्युनिटी आहे व त्याचे साधारण ३५०० सदस्य आहेत. त्यांच्या शंकांना मालिकेतील प्रसंगातून कधी उत्तर दिले जाते. त्यांच्याकडून व इतर मार्गानेही प्रतिसाद, सूचना मिळतात. त्याप्रमाणे सतत फाईन ट्युनिंग केले जाते. प्रेक्षक फार बारकाईने मालिका बघतात. किरकोळ प्रसंगालाही दाद देतात. उदा: मणी व कुटुंबिय बाहेरगावाहून दोन दिवस लवकर परत येतात, तेव्हा मृणाल वैदेहीला सांगते, दुधाच्या पिशव्या घेऊन ये, कामवाल्या बाईला फोन करून यायला सांग. हा काही कथानकाचा कंटेट नाही. परांजपेंनी हे लिहले पात्रांचा बिझनेस म्हणून. पण हे लोकांना अपील झाले.  कारण हा बारकावा अगदी नेमका व खरा आहे.  अशा  छोट्या तपशीलामुळे लोक त्याच्याशी रीलेट होतात, ती व्यक्तीरेखा खरी वाटते. असे, साधे लिहणे अवघड आहे! मालिकेतील पात्राप्रमाणे भाषा वेगळी आहे. तरुणांची भाषा वापरली आहे. पण अट्टाहासाने बहीण भावाला ब्रदर किंवा ब्रो म्हणणार केलेले नाही. तरुणांना, इंग्लीश माध्यमात शिकलेल्यांनाही ही मालिका आवडते, त्यातले नाट्य त्यांची पकड घेते.

मालिकेत सुरवातीला मृणाल(इला भाटे) व रोहिणी(शुभांगी गोखले) यांचे फोनवरचे एकमेकांसाठीचे भोचक संवाद खूप खुसखूशीत असायचे. मी त्याला ‘जुगलबंदी’ म्हणायचो! त्याबाबात परांजपें सांगतात त्यांना स्वत:चे लिहलेले फोनवरचे संवाद वैशिष्ठपूर्ण वाटतात. दुसरा काय बोलतो आहे ते रिपीट न करता, प्रेक्षकांना कळले पाहिजे, सहज बोलल्यासारखे असे ते असतात. त्यांच्या ह्या कौशल्याला जाणकार दाद देतात.

माणसे चांगली दाखवण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. ते आशेचा किरण दाखवतात. ते म्हणतात, लोकप्रियतेचे घटक मालिकेत घालावे लागतात, पण ते बुद्धिचातूर्याचा उपयोग करून सुसंगत वाटणारे हवेत. उदा: नील हा आठ गणपतीचा शोध घेत आहे. पण तो पुजा करत बसलेला नाही. त्याला उत्सुकता आहे म्हणून तो शोध घेत आहे.


कथानकाविषयी

कथानकाच्या अनुषंगाने मी चर्चा केली. ‘मोरया’ हे पात्र का आवश्यक आहे? तो नसता तर काही विशेष फरक पडला नसता. उगीच गुढता निर्माण करण्यासाठी तो आहे का विचारले. ते म्हणतात, कथानकात एक लेयर असावा लागतो. जो सगळीकडे आहे, पण कशातच नाही. मोरया तसा आहे. गूढ आणणे, उत्सुकता निर्माण करणे हा हेतू होताच, पण फिलॉसॉफी आणणे, सुचन करणे हेही तो करतो. तो सुत्रधारासारखा आहे. तो असा का वागतो, त्याचा उलगडा नंतर होणार आहे. मणीने दिनेशच्या आईवर भलताच आरोप केल्याने दिनेशचे त्याच्याशी वैर आहे. मुलींच्या अट्टाहासापायी तो लग्नाला मान्यता देतो, समझोता करतो. पण त्याच्या मनात अढी कायम आहे. हे मला फार भावले. कितीही माफी मागा किंवा नाक घासा, पण आईवर असा आरोप करणार्‍या व्यक्तीबद्दलची अढी जाणे शक्य होणार नाही. लेखकाने हे विचारपूर्वक दाखवले आहे.

अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा एक प्रसंग मी त्यांना सांगितला. उषा अग्निहोत्रात पाणी घालून ते विझवायला निघते. महादेवच्या श्रद्धेवर प्रचंड आघात. तो शाप देतो अग्निदेव तुला शिक्षा देईल. नंतर उषाचा जीवनसाथी शरूला आदिवासी जाळून मारतात. ती डिनायल स्टेजमध्ये जाते. त्या काळातच ती थबकून राहिली आहे. अनेक वर्षांनी महादेवला आपल्या शापाची जाणीव झाल्यावर तो अग्निदेवाकडे भीक मागतो, शाप मागे घेतो. उषा नॉर्मल होते. परांजपें याबाबत म्हणतात, ती महादेवाची श्रद्धा आहे. पण त्याचवेळेला उषावर उपचार होत आहेत, समुपदेशन होत आहे हेही दाखवले आहे. इतर काही न करता केवळ शाप मागे घेतला म्हणून ती बरी झाली दाखवलेले नाही.  अशी श्रद्धाळू माणसे समाजात आहेत हेही तितकेच खरे. परंतु ही देवदेवतांच्या इतर धार्मिक मालिकांसारखी मालिका होऊ नये याचा तोल सांभाळणे ही तारेवरची कसरत होती. मालिकेत त्यांनी मणीच्या रूपात नास्तिक आणून सतत अंधश्रद्धेविरुद्ध ठाम भुमिका घेतलेली आहे.

उजव्या सोंडेचा गणपती हे खास कोकणस्थी प्रस्थ! लेखक, निर्माता कोकणस्थ म्हणून उजव्या सोंडेचे गणपती घेतले का माझा प्रश्न! एक गणपती पुरेसा असताना आठ गणपती का जमा झाले, त्याचे समर्पक कारण हवे, त्या गणपतींमध्ये काही वैशिष्ठ हवे, म्हणून केवळ ते उजव्या सोंडेचे घेतले व आठ घेतले, कारण अष्टविनायक असे लेखक म्हणतात. पण मालिका ब्राम्हणी वाटली नाही, त्यात जातीयता नाही आणि ह्या घटना कोणत्याही जातीतील कुटुंबात घडू शकतात, त्यामुळे सर्वच लोक आवडीने बघतात.

कृष्णा हा अग्निहोत्रींची जमिन कसत आहे. अग्निहोत्रींपैकी कोणी तिकडे अनेक वर्षे फिरकलेलेही नाही. अचानक जमिनीबद्दल चौकशी होत असल्याने जमिन आपल्या हातातून जाईल का अशी त्याला धास्ती वाटायला लागते. मी अनेक वर्षे रक्त सांडवून, घाम गाळून ही जमिन सुपीक बनवली आणि आता हे अग्निहोत्री कुठून आले असा त्याचा सवाल आहे. त्याची बाजू मांडणारे ते संवाद पार प्रभावी होते. पण ह्या सामाजिक अंगाचा उपयोग का केला नाही? त्याऐवजी त्याला गुन्हेगारीच्या मार्गाकडे का ढकलले असा माझा प्रश्न होता. लेखक म्हणतात, अग्निहोत्री फक्त चौकशी करत आहेत. जमिन परत मागत नाहीत. आणि मालिका संपताना कृष्णाला न्याय दिलेला आहे.


स्थित्यंतर: ब्राम्हण घरातील तीन पिढ्यातीलच का?

वाडा चिरेबंदी हे महेश एलकुंचवारांचे अभिजात नाटक, मुखवटा ही अरूण साधूंची अभिजात कादंबरी व आता अग्निहोत्र मालिका, तिन्ही कलाकृतीत ब्राम्हण घरातील तीन पिढ्यातील स्थित्यंतर आहे. हे तिन्ही लेखक ब्राम्हण असल्याने त्यांनी ब्राम्हणांच्या घरातील पिढ्या घेतल्या का, असे विचारल्यावर परांजपे म्हणाले, ब्राम्हण समाजात फार मुळापासून – आमूलाग्र बदल झाले व ते वेगाने झाले. हा समाज हे बदल स्वीकारत गेला. कायद्यांमुळे हे बदल त्याच्यावर लादले गेले, असेही म्हणता येईल. पण ही त्यांच्यासाठी अस्तिवाची लढाई होती. कोणत्या का कारणाने होईना तो जुन्यांना चिकटून राहिला नाही. हा समाज प्रगतीची ओढ असणारा समाज आहे, बुद्धीवादी आहे. इतर समाजात हे बदल त्या वेगाने झाले नाहीत. त्या समाजात काही खूप उंचावर गेलेल्या व्यक्ती आहेत, अनेकही असतील पण ते समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे नाहीत. त्यांच्या प्रतिपादनामुळे एक विरोधाभास माझ्या लक्षात आला ब्राम्हण समाजाने चटकन बदल स्वीकारले असे ते म्हणतात, पण संस्कृतीवर आक्रमण होत आहे, जुन्या गोष्टी लयास जात आहेत, मूल्यांचा र्‍हास होत आहे असा धोशा लावणारे तथाकथित विचारवंतही ह्याच समाजातले असतात. म्हणजे समाज पुढे व हे विचारवंत मागे! परांजपे म्हणतात हे विचारवंत मागे असतातच शिवाय ते समाजाला मागे खेचत असतात! ह्याच समाजात अतिशय कर्मठ लोकही आहेत ह्याकडे मी लक्ष वेधले. ते म्हणतात पण त्यावर सडकून टीका करणारेही ब्राम्हण समाजातीलच असतात.

माझा ‘जातीय’ (!) दृष्टीकोन बघून परांजपेंनी स्वत:हूनच खूलासा केला, मालिकेचा निर्माता, लेखक, संगीतकार, अनेक प्रमुख कलाकार कोकणस्थ ब्राम्हण, पण हे ठरवून झालेले नाही. व्यक्तीरेखांचा विचार करताना तसे होत गेले!


दर्जा टिकवण्याचे रहस्य!

शेवटी मी त्यांना दोन प्रश्न विचारले. तुमच्या मालिका लोकप्रिय होतात, त्याचबरोबर दर्जा उत्तम असतो. सुमार मालिकांच्या पिकात त्या उठून दिसतात. हे कशामुळे शक्य होते? चांगल्या टीमबरोबर काम करणे की कमी काम करणे की स्वत:च्या टर्मवर काम करणे? परांजपेंनी तात्काळ उत्तर दिले ह्या तिन्ही गोष्टींमुळे. अग्निहोत्रच्या निर्मात्याची, कलाकारांची ते मनापासून तारिफ करतात.

आता मालिका संपताना लेखक म्हणून किती समधान आहे व त्याचे सादरीकरण ह्याबाबत किती समाधान आहे ह्यावर ते म्हणतात, सादरीकरणाबाबत लेखक कधीच समाधानी नसतो! पण त्याबाबतीत थोडी अलिप्तता हवी. पण लेखक म्हणून पूर्ण समाधानी आहे.मी, त्यांना आणखी एक प्रश्न केला: टीव्ही क्षेत्रात चांगले लेखक का नाहीत?

टीव्ही क्षेत्रात चांगले लेखक का नाहीत ह्याविषयी परांजपे म्हणतात, अनेक जण लेखक म्हणून चांगले आहेत पण म्हणून मालिका लेखनाचे तंत्र त्यांना जमेल असे नाही. ते त्याना शिकावे लागेल, स्वत:ला बदलावे लागेल. स्वत:ला गिअर-अप करावे लागेल.   प्रत्येक सृजनशील व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी एक एक फॉर्म सोयीचा वाटतो. कोणाला फक्त नाटकेच लिहावीत वाटेल, कोणाला फक्त कविता. टीव्ही क्षेत्रात लेखकाला खूप तडजोड करावी लागते, ह्याबाबत ते म्हणतात, त्याकडे मी तडजोड म्हणून नाही तर आव्हान म्हणून बघतो.  न आवडणारे बदल होतात, पण फार कमी वेळा.  एका मालिकेतून चॅनेलला वर्षाला तीन कोटी उत्पन्न मिळते.  हा व्यवसाय आहे आणि व्यवहारी वृत्ती हवीचांगले लिहणारे लोक हवेत, एक करिअर म्हणून पालकांनी आपल्या मुलांसाठी आधीपासून विचार करून त्याना या क्षेत्रात आणावे असं त्याना वाटते कारण या क्षेत्रात गुणवत्तेला मान आहे. जात, वय या गोष्टींना इथे थारा नाही. तुम्ही जर उत्तम लेखक झालात तर कामाला तोटा नाही आणि जोपर्यंत नवनविन कल्पना सुचत आहेत, हात चालत आहे तोपर्यंत तुम्ही लिहीत राहू शकता. असं त्याना वाटतं.

मालिकेचा शेवट: अरुण साधूंच्या मुखवटा कादंबरीचा वर उल्लेख केला. त्यात कर्ता व्यक्ती शेवटी मुखवटा नदीत खोलवर विसर्जित करून टाकतात. एका परंपरेचा शेवट होतो. समाजात झालेल्या आमूलाग्र बदलाचे जणू प्रतीक. महादेव असेपर्यंत अग्निहोत्रमध्ये अग्निहोत्र मात्र अजिबात विझणार नाही! ३० एप्रिलला शेवट काय झाला ते तर आता आपल्याला कळले आहेच!

इमेल: अभय परांजपे asparanjape1@gmail.com

उदय कुलकर्णी - kuluday@rediffmail.com

No comments: