Tuesday, July 6, 2010

माझं tweet.....टॉवरफुल माणुस - मनोज तिरोडकर.

५ जुलै २०१०:  श्री. मनोज तिरोडकर  नावाच्या मराठी तरूण आणि तडफदार माणसाने कॉर्पोरेट विश्वात मोठा धामाका केला!    त्यांनी चक्क अनिल अंबानीच्या रिलायन्स  इन्फ्राटेल या कंपनीचे  सुमारे ५० मोबाईल टॉवर खरेदी करण्यासाठी तब्बल ५० हजार कोटी रुपये मोजले!  या व्यवहारामुळे जी.टी.एल. इन्फ्रा कंपनीने जगातील सगळ्यात मोठी टॉवर कंपनी म्हणुन नाव मिळवलं - हे प्रत्येक मराठी माणसाला अभिमानास्पद आणि गौरव देणारी घटना आहे.  त्यांच मी मनापासुन अभिनंदन करतो!  आणि त्यांना पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा देतो.   तिरोडकरांची सविस्तर मुलाखत दैनिक लोकसत्ताचे श्री. प्रसाद केरकर यांनी घेतली आणि कालच्या अर्थ वृतान्त मधे छापली ती वाचकांसाठी देत आहे.
लोकसत्ता अर्थवृतान्त दिनांक. ५ जुलै २०१०
जी.टी.एल.इन्फ्रा या कंपनीने ज्यावेळी रिलायन्स इन्फ्राटेल या कंपनीचे सुमारे ५० मोबाईल टॉवर खरेदी करण्यासाठी तब्बल ५० हजार कोटी रुपये मोजले त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.  नेहमी अन्य कंपन्या खरेदी करण्यात माहिर असलेल्या अनिल अंबानी समूहातील कंपनीलाच आपल्या पंखाखाली आणणारी जी.टी.एल. ही कोणती बरे कंपनी? त्याहीपुढे जाऊन जी.टी.एल.चे प्रवर्तक हे चक्क मराठी आहेत हे समजल्यावर उद्योगात मराठी समाज मागे असल्याबद्दल धाय मोकलून रडणाऱ्या अनेकांना सणसणणीत चपराकच बसली. जी.टी.एल.ने हे ‘डील’ नेमके कसे केले? जी.टी.एल. उद्योगसमूह काय आहे? त्यांच्या भविष्यातल्या योजना काय आहेत? अशा अनेक प्रश्नांविषयी जी.टी.एल.चे अध्यक्ष मनोज तिरोडकर यांनी दिलेली मनमोकळेपणाने उत्तरे—

रिलायन्स इन्फ्राचे टॉवर ताब्यात घेऊन जी.टी.एल.चा विस्तार करण्याचा प्रस्ताव आपल्याकडे कधी आला?

जी.टी.एल.इन्फा ही कंपनी पूर्णपणे ‘फोकसड्’ आहे. जी.टी.एल. लि. या मूळ कंपनीतून वेगळा विभाग काढून जी.टी.एल. इन्फ्रा या कंपनीची स्थापना खास त्यासाठीच करण्यात आली. टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांना पायाभूत सुविधा पुरविणारी एखादी कंपनी असावी, हे क्षेत्र भविष्यात झपाटय़ाने वाढत जाणार आहे, हे ओळखून आम्ही या कंपनीची स्थापना केली. अनिल अंबांनी यांना आपली टॉवर उद्योगातली कंपनी विकून त्यांची मूळ कंपनी आर. कॉमसाठी भांडवल उभारणी करायची आहे, हे आम्हाला समजले होते. त्याचबरोबर आम्हाला झपाटय़ाने विस्तार करायचा असेल तर आम्हाला अशी एखादी मोठी कंपनी ताब्यात घेण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्यामुळे आम्हा दोघांच्या गरजा यातून पूर्ण होणार होत्या. यातूनच हे ‘डिल’ साकारले.

अनिल अंबानी यांची भेट आपली कधी झाली? त्यासंबंधी आपण काही सांगाल का?

आम्ही ज्यावेळी एअरसेलचे टॉवर्स ताब्यात घेतले त्यानंतर लगेचच रिलायन्स टॉवर्स संबंधी चर्चा सुरु झाली होती. मात्र याविषयी कोणतेही ठोस पाऊल पडेपर्यंत काही जाहीर करणे योग्य नव्हते. सुरुवातीच्या पातळीवर उभय कंपन्यांत व्यवस्थापकांमध्ये प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर अंतिम स्वरुप देण्यासाठी माझी व अनिल अंबांनी यांची भेट झाली. अनिल अंबांनी यांना भेटताना सुरुवातीला काही क्षण माझ्यावर काहीसे दडपण होते. कारण अनिल अंबांनी हे उद्योजक म्हणून माझ्या तुलनेत खूपच मोठे आहेत. पण अनिल अंबांनी यांच्याशी काही क्षण बोलताच ते दडपण दूर झाले. अनिल अंबांनी हे अतिशय पारदर्शी, ठोस धोरण असणारे व झटकन निर्णय घेण्याची क्षमता असणारे व्यक्ति आहेत, हे मला सर्वात प्रथम जाणवले. त्यांच्या काही शंका होत्या. त्याप्रामुख्याने आमच्या टॉवरवरुन जर इतर स्पर्धक कंपन्यांना जर व्यासपीठ मिळाले तर त्याचा परिणाम आमच्या कंपनीवर होणार नाही ना यासंबंधी होत्या. परंतु आजवरचा आमचा अनुभव, आम्ही अनेक कंपन्यांशी केलेले व्यवहार हे पारदर्शी असल्याने तसेच आमचे अस्तित्व ‘स्वतंत्र’ असल्याने आम्ही कोणत्याच एका मोबाईल कंपनीला ‘प्रमोट’ करण्याचा प्रश्न उद्भवत नाही हे स्पष्ट केल्यावर अनिल अंबांनी हे समाधानी झाले आणि त्यांनी या व्यवहाराला हिरवा कंदिल दिला. अनिल यांची व माझी वेव्हलेंग्थ काही क्षणातच जुळली आणि हा व्यवहार होण्याचा मार्ग मोकळा झाला. एअरसेलचे टॉवर्स ताब्यात घेतले त्यावेळी जी.टी.एल.मध्ये आमचे भांडवल ७५ टक्के होते. आता ते ५६ टक्क्यांवर खाली आले आहे. भविष्यातही आणखी खाली गेल्यास मला पर्वा नाही हे मी अनिल यांना सांगितले. आम्हाला दोघांनाही टॉवर कंपनी ‘स्वतंत्र’ असावी असे वाटत होते. त्यामुळे

आत्ताचा भांडवली वाटा लक्षात घेता एका कुणाचे वर्चस्व राहाणार नाही. त्यामुळे कोणत्याही एका मोबाईल कंपनीला झुकते माप देणार नाही याची खात्री सगळ्यांनाच वाटते. अनिल अंबांनींना हा मुद्दा पटला.

आर.कॉम दिलेली आश्वासने पाळेल असे तुम्हाला वाटते का?

जरुर पाळतील. आमची एक टेलिकॉम उद्योगातील पायाभूत सुविधा पुरविणारी व्यावसायिक दृष्टीकोन असलेली कंपनी आहे. आजवर आम्ही अनेक टेलिकॉम ऑपरेटर्सशी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करुन उत्कृष्ट संबंध स्थापन केलेआहेत. रिलायन्सशीही आम्ही यापूर्वी काम केलेले आहे. भविष्यातही आम्ही याच दृष्टीने काम करु यात काहीच शंका नाही.

रिलायन्स ही तुमच्या तुलनेत फारच मोठी कंपनी आहे, तुमचे त्यांच्याशी जुळेळ का? विलीनीकरणाची ही प्रक्रिया कधी पूर्ण होईल?

यात काहीच शंका नाही. रिलायन्स हा मोठा उद्योगसमूह आहे. त्यांना आर. कॉमच्या खर्चात कपात करावयाची होती. या कामी आमची त्यांना मदत होणार आहे. त्यामुळे परस्परांना फायदेशीर हा व्यवहार आहे. दोघांसाठी ‘विन-विन’ स्थिती आहे. आत्ता कुठे विलीनीकरणाची घोषणा झाली आहे. त्यानंतर व्हॅल्यूअर नियुक्त करुन पहिले पाऊल उचलले जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान सहा महिने लागतील.

जी.टी.एल. कंपनीचा आकार पाहता हे खूप मोठे डिल आहे असे आपणास वाटत नाही का? यासाठीचे पैसे आपण कसे उभारणार आहात?

आमची ही काही पहिली वेळ नाही. अशा प्रकारची छोटी डिल्स आम्ही यापूर्वी केलेली आहेत. सहा महिन्यांपूर्वी आम्ही ८४०० कोटी रुपयांचे एअरसेलचे डिल केले त्यावेळी असेच बोलले गेले होते. परंतु ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली. आत्ता आम्हाला विश्वास आहे की हा व्यवहार देखील सहजरित्या होईल. जी.टी.एल.कडे भविष्यातील व्यवसायाची हमी असल्याने आम्हाला यासाठी पैसे द्यायला अनेक बँका, वित्तसंस्था तयार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारे भांडवल विकून आम्ही हे पैसे उभारत नाही आहोत. हा व्यवहार समभाग व रोखीच्या स्वरुपातील आहे. त्यापैकी रोख पैसे आम्ही कधीही देऊ शकतो.

भविष्यात जी.टी.एल.मध्ये आणखी कुणी सहकारी, गुंतवणूकदार येण्याची शक्यता आहे का?

एखादी कंपनी ‘स्वतंत्र’ ठेवणे याचाच अर्थ आणखी कुणालाही यात सहभागी करुन घेण्याची तयारी ठेवणे. आम्ही अशा प्रकारच्या प्रस्तावासाठी केव्हाही तयार आहोत. मात्र सध्यातरी असा कोणताही तातडीचा प्रस्ताव कंपनीकडे नाही. भविष्यातील सहकारी कंपनी ही वित्तीय किंवा धोरणात्मक सहकारी असू शकेल. आमची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. येत्या काही वर्षांतच आमची उलाढाल दीड ते दोन लाख कोटी रुपयांवर जाईल. रिलायन्सचे टॉवर आमच्या ताब्यात आल्यामुळे आमची झपाटय़ाने आर्थिक वाढ होणार आहे. याचा लाभ आमच्या कंपनीतील समभागधारकांनाही दीर्घकालीन विचार करता होईल.

सौजन्य लोकसत्ता अर्थवृतान्त दि. ५ जुलै २०१०

No comments: