Friday, July 15, 2011

माझं tweet.....गुरुपौर्णिमा - ऒम अनुभवाय नम:


१५ जुलै २०११:  आज गुरुपौर्णिमा - गेल्या वर्षी मी लिहिलेलं माझ tweet  पुन्हा ब्लॉग वर देत आहे:  आज हे tweet लिहीताना मुंबईवर परवा झालेले बॉम्ब स्फोटांच्या निमित्ताने होत असलेली चर्चा समोर आहे.  मला आठवत १९९३चे बॉम्ब स्फोट - मी माझ्या ऑफिच्या गच्चीवरून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधे झालेला बॉम्ब स्फोट पाहिला - रस्त्यावरून रक्तबंबाळ लोक सैरावैरा धावताना पाहिले.  सगळीकडे हाहाकार! अफरातफरी!! आणि एक जबरदस्त भीती सगळ्यांच्या मनात होती.  आज त्याची आठवण होण्याच कारण आपण जेंव्हा म्हणतो की अनुभव हाच सगळ्यात मोठा गुरु आहे, तर १९९३च्या बॉम्ब स्फोटांपासुन आपण काय शिकलो?  अमेरिकेच्या ९/११ हल्या नंतर संपुर्ण अमेरिका बदललेली दिसते.   त्यांच्या सरकारने तेथिल नागरिकांना विश्वासात घेऊन तेथे असणारी संपुर्ण सुरक्षा यंत्रणा बदलवून टाकली, कायदे बदलले आणि जगात एक आदर्श निर्माण केला.  १९९३ नंतर मुंबई हे बॉम्ब स्फोटांसाठी सॉफ्ट टारगेट ठरलेलं आहे आणि असे हल्ले होतच राहणार हे गृहीत धरुन आपण पुढे गेल पाहिजे.  कुणाला दोष देण्याचा मी प्रयत्न करणार नाही कारण नुसत एकमेकांवर दोषारोप किंवा राजकीय चिखलफेक करुन हा प्रश्न सुटणार नाही. 

मला अस वाटत आपण अनुभवातून शिकतच असतो, पण जो पर्यंत आपल्या राज्यकर्त्यांना आणि सरकार दरबारी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला देशा बद्दल, आपल्या नागरिकां बद्दल आपुलकी वाटत नसेल, आस्था वाटत नसेल तर त्यांच्या कडुन काही अपेक्षा करण पुर्णपणे चुकीच ठरेल.  थोडक्यात जो पर्यंत हा देश म्हणजे माझं स्वत:च "घर" आहे आणि मरणारा प्रत्येक नागरिक हा माझा कुणीतरी आहे हे त्यांना वाटणार नाही तो पर्यंत आपण अनुभवातून काहीच शिकणार नाही.   आज आपल्या राज्यकर्त्यांविषयी किंवा मुंबई पोलिसांबद्दल बोलताना आपल्याला एक कमालीची सर्वत्र उदासिनता, नाराजी आणि खरं म्हणजे "राग" दिसतो - ह्याची त्यांनी दखल घेतलीच पाहिजे.  एक  जबरदस्त   "पोलिटिकल विल" असल्याशिवाय अशा संकटांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकणार नाही.  जास्त काय लिहू.   आज महाराष्ट्रात "I will make the difference" असा म्हणणारा एकही नेता नाही?  तुर्त इतकचं.  
My नीतीच्या माझ्या सर्व वाचकांतर्फे मी कालच्या बॉम्ब ब्लास्ट मधे ठार झालेल्या मुंबईकरांना श्रध्दांजली वाहतो त्यांच्या कुटूंबियांना हा अनपेक्षित आधात सहन करण्याची शक्ति मिळो हीच इश्वरचरणी प्रार्थना करतो.........

******************************************************************************

२५ जुलै २०१०: आज गुरुपौर्णिमा - फार वर्षां पुर्वी गुरुपौर्णिमा म्हंटल की डोळ्या समोर येत ऋषी, मुनी, तपस्या करणारे!  त्यानंतरच्या काळात गुरुंची जागा आपल्या शाळामास्तर, गायन, वादन, चित्रकला किंवा कुठलीही कला शिकविणाऱ्या गुरुजनांनी घेतली;   आता गुरु म्हटंल की आपल्या समोर येतात कुठलेतरी बुआ, बाबा, दादा, आई, महात्मा, बापु, श्री**, **देव बाबा, अशी असंख्य माणसं!  जिवंतपणीच स्वत:ची पुजा आणि आरती करवुन घेणाऱ्या या माणसांनी "गुरु" या शब्दची व्याख्याच बदलवून टाकलेली आहे.   तरी त्यांच्या मागे आज लोकांची रीघ लागलेली असते.   जाऊदे अशा बांबा आणि बुआंवर मला आजचं माझं tweet लिहायची इच्छा नाही.

माझ्या मते आज खरा गुरु कोण असेल तर तो आहे प्रत्येक माणसाचा स्वत:चा "अनुभव"!  कुठल्याही अनुभव  आपल्याला  जे शिकवू शकतो ते कुठल्याही पुस्तकात किंवा कुठल्याही  शाळा-कॉलेजात आपण शिकु शकणार नाही.  "विस्तव" म्हणजे काय? हे हात भाजल्यावर जितकं जळजळीतपणे समजु शकतं,  तसं विस्तवावर कितीही पुस्तकं किंवा निबंध वाचुन करून कळणार नाही.   तसचं नाकातोंडात पाणी जाणे म्हणजे नेमकं काय?  हे खोल पाण्यात पडल्याशिवाय कळू शकतं नाही.  अनुभव कितीही छोटा असला तरी कित्येक वेळा काहीतरी मोठं शिकवुन जातो आणि आपल्याला आयुष्यभरसाठी धडा मिळतो.  आपण  रोज काहीतरी वाचत असतो, विविध लोकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो,  अनुभव घेतो.  आपण शांतपणे विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या भोवती रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना सुद्दा आपल्याला नकळतपणे खुप काहीतरी शिकवीत असतात.   रस्त्यावरची अंगठाबहादुर केळेवाली जेंव्हा नीट हिशोब करुन प्रामाणिकपणे आपले ५० पैसे परत करण्यासाठी जीवाचा आकांत करते तेंव्हा  आपल्याला आयुष्यात गणिता पेक्षा  "प्रामाणिकपणा"  किती महत्वाचा आहे हे कळतं.  आणि हे  नुसतचं कळतं नाही तर ती आपल्याला आयुष्यभर प्रामाणिकपणे वागायला भाग पाडते!  इतकी प्रचंड ताकत त्या ५० पैशात असते.   अशा छोट्या घटना जर आपल्याला काही शिकवु शकतं नसतील तर दोष त्या अशिक्षित केळेवालीचा नसुन खुप शिकलेल्या आपल्या पिढीचा आहे हे समजुन घ्या.  

अशा घटना नीटपणे उलगडता आल्या पाहिजे आणि त्यातून माणुसकीला धरून जगता आलं पाहिजे.   असे असंख्य गुरु आपल्याला रोज नवीन धडे देत असतात,  रोज नव्याने जगायला शिकवीत असतात.  हे अस असलं तरी आपल्याला रोज  कुठल्यातरी  बाबा किंवा दादांचा आशिर्वाद का लागतो? हेच कळतं नाही.  चला आपल्या आयुष्यावर  रोज परिणाम करणाऱ्या अशा असंख्य गुरुंना आज आपण मनापासुन नमस्कार करूया!  आणि सर्वप्रथम माणुस म्हणुन जगायला शिकुया!  म्हणा "ऒम अनुभवाय  नम:"

ता.क:  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रज्ञा रणशिंगे यांचा इमेल आला - त्या म्हणतात की अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे हे कबुल पण कित्येक माणसं अनुभव घेउन सुद्दा त्याच त्या चुका करतं असतात!  मला वाटतं प्रज्ञा म्हणते ते बऱ्याच अंशी खरं आहे.  जो स्वत:च्या चुकां पासुन शिकतो तो हुशार, पण जो इतरांच्या चुकांतुन शिकुन पुढे जातो तो खरा हुशार!  जो स्वत:च्या सोडा पण इतरांच्या चुकां पासुन देखील शिकू शकतं नाही त्याला आपण काय म्हणणार?   त्याच नशीब!!

1 comment:

अमित said...

सर १००% खरं आहे.