Thursday, July 29, 2010

माझं tweet.....मुंबई कुणाची?

२९ जुलै २०१०:  मुंबई कुणाची?  हा प्रश्न विचारला तर राजकीय भुकंप होईल!  मुंबईतल्या चाळी गेल्या तसा आता मध्यम वर्ग हा प्रकारच नाहीसा होत चालेला आहे. मध्यमवर्गाने काय करावं? कुठे जावं? आजचा दिवस ढकला, उद्याच काय?  पुढच्या पिढीची गोष्टच सोडा.  मध्यमवर्गाला कायमच गप्प केल जातयं! इथल्या मुळ माणसांना मुंबईच्या बाहेर नेणारा हा रस्ता एकतर्फी आहे!   आणि यासाठी दिल्ली ते गल्ली पर्यंतची सगळी गिधाडे एकत्र आलेली आहे.  कुठल्याही रंगाचा झेंडा याला अपवाद नाही.  मुंबईतल्या रस्त्यावर खोऱ्याने पैसा ओढायचा असेल आणि तो सुद्दा एका रात्रीत तर एकच धंदा आहे,  आणि तो म्हणजे "बिल्डर" होण्याचा.   बिल्डर होण्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन - साम-दाम-दंड-भेद!   इथं प्रत्येकाला हवाय ह्या मुंबईतील सामान्य माणसांचा आणि त्यांच्या जमीनीचा  लचका!  त्यातच "redevelopment" नावाची एक नविन जीवघेणी साथ आलेली आहे!   कुणाची होती ही मुंबई, आज कुणाची आहे,  उद्या ही कुणाची असणार आहे?  फुटपाथ बळकविणारे उपरे तसे इथ पाच पिढ्या रहाणारे सुधा उपरे झालेत? याला जबाबदार कोण?  सगळेच असुरक्षित!
या भीषण परिस्थितीवर नाटककार जयंत पवारांच ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ हे नाटक आज पासुन मुंबईत येत आहे.  ते प्रत्येक मुंबईकरांनी पाहिलच पाहिजे.  हा डेंजर वारा उद्या प्रत्येकाच्या  घरात  शिरुन प्रत्येकाला बेघर करणार आहे!  आशय-विषय-फॉर्म-सादरीकरण सर्व बाबतीत हे नाटक अनोखे आहे.  सर्वसामान्य माणसांच एकुणच खालावलेल जीवनमान, त्याची कुचंबणा, मानहानी, लाचारी, प्रत्येक वेळी होणारी फरफट ह्या विषयी हे नाटक आपल्याला खोल विचार करायला लावते.  त्याच वेळेस कंगालपणामुळे गाव सोडून जगण्यासाठी शहरात येणार्‍या विस्थापितांविषयीही बोलते.  जगण्यासाठी होणारी धडपड बघुन नाटक भावनिकदृष्ट्या अक्षरश: अंगावर येईल, त्याचसह विचार करायला लावेल.  आज मला वाटतं जयंत पवार सारखा समर्थ लेखकच ह्या विषयाच शिवधनुष्य पेलू शकतो.

नाटकाची निर्मिती महाराष्ट्र रंगभूमी या संस्थेने केली आहे तर प्रायोगिक रंगभूमीवरील नव्या दमाचे तरूण दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड याचे दिग्दर्शन करत आहेत.  अनिल गवस व आभा वेलणकर प्रमुख भूमिकेत असून त्यांनी नाटकात जीव ओतुन काम केलयं.  अनेक नव्या कलाकारांच्या करिअरचा शुभारंभ या नाटकाने होत आहे.  त्यातील अनेक एनएसडी प्रशिक्षित आहेत, काहींनी विद्यापीठात प्रशिक्षण घेतलेले आहे.  नितीन भजन, अमृता मापूसकर, सिद्धेश शेलार, हे त्यातील काही कलाकार. अक्षय शिंपी व पुर्णानंद वांढेकर हे महत्वाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक रंगभूमीवरील जाणते व गुणी कलाकार दीपक कदम व संजय देशपांडे ह्या नाटकात आहेत.  नाटकाविषयी मराठी नाटक वर्तुळात औत्स्यूक्याचे वातावरण आहे.

नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आज २९जुलैला गडकरी रंगायतन ठाणे इथे दुपारी होत असून, नंतर ३० जुलैला दिनानाथ पार्ले व ३१ जुलैला शिवाजी मंदीर इथे दुपारी प्रयोग आहेत.

ता.क:  तुम्हाला वाटेल मी नाटकाची जाहिरात करतो का?  मित्रांनो विषयच तसा आहे.  हा तुमचा विषय आहे, माझा विषय आहे, हा आपल्या सगाळ्यांचा विषय आहे!  आणि आज नसेल तर उद्या होईल म्हणुन जयंत पवारांशी बोललो, माहिती काढली आणि ती तुमच्या पर्यंत पोहोचवली.  

2 comments:

club first said...

पहायला नक्की आवडेल !!!!!!!!!

pramod kakde said...

खरच ,हा वारा नसुन एक वादळ होणार आहे .