Monday, August 9, 2010

माझं tweet.....ए प्रॉमिस इज प्रॉमिस! सर. रतन टाटा.

९ ऑगस्ट २०१०: सध्या कॉर्पोरेट जगतामधे सगळ्यात मोठ्या उत्सुकतेचा विषय कुठला असेल तर तो आहे श्री. रतन टाटा नंतर टाटा ग्रुपचा वारसदार कोण?   या संदर्भात लोकसत्तचे श्री. प्रसाद केरकरांनी आजच्या एक्सप्रेस Money मधे उत्तम लेख लिहीलेला आहे तो खाली देत आहे.   तर श्री. टाटांचा वारसदार कोण याचं उत्तर मिळायला  आपल्याला अजून किमान आठ महिने वाट पहावी लागणार आहे.

साधारणपणे एप्रिल महिन्यात Economic Times ने भारतातील टॉपमोस्ट १०० CEOsची यादी जाहीर केली. त्यात पहिल्या क्रमांकावर टाटा ग्रुपचे चेअरमन सर. रतन टाटा,  दुसरे होते श्री. मुकेश अंबानी आणि तिसऱ्या क्रमांकावर होते श्री. नारायण मुर्ती.   याच वृतप्रतात ह्या सिईओजच्या पुर्वी केलेल्या त्यांच्या भाषणातील काही निवडकं वाक्य सुद्दा प्रसिद्ध केले होते.    नंबर १ वर असलेल्या श्री. टाटांच शब्द होते "A promise is promise!" - मला वाटतं इतका अर्थपुर्ण आणि पावरफुल मेसेज मी आज पर्यंत कुठेही वाचलेला नाही!   एखाद्या ग्रुप चेअरमेन जेंव्हा अस बोलतो तेंव्हा त्याला एक वेगळा अर्थ लाभतो.   श्री. टाटा हे फार संयमी आहेत, कमी बोलतात, मनापासुन बोलतात!  हे सगळ्यांना माहीत  आहे.   या चार शब्दा मुळे त्यांनी त्यांच्या ग्रुपची इमेज संपुर्ण जगात तर फार उंच नेलीच! पण त्याच बरोबर  त्यांच्या ग्रुप मधे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठ्या जबाबदारीने  काम करण्याचा संदेश सुद्दा दिला.  माझ्या दृष्टीने हे फार महत्वाच आहे.  कॉर्पोरेट लॉयर म्हणुन काम कुठल्याही कोलॅबोरेशन/ भागीदारी चे ऍग्रीमेंट वर चर्चा करताना मी नेहमी म्हणतो की ज्याला शब्द पाळायचा असेल त्याला कागदावर सही करण्याची गरज नसते! 
कुठल्याही कंपनीच सगळ्यत मोठं भांडवल असतं त्यांची विश्वासाहर्ता! आपले इनव्हेस्टर्स, शेअर होल्डर्स, कर्जदार, कामगार, सप्लायर्स, कस्टमर्स, कोलॅबोरेटर्स, डिस्ट्रिब्युटर्स, आणि शेवटी समाज हे सगळे आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात हे फार म्हत्वाचं आहे.  मला वाटतं प्रत्येक उद्दोजकाने आणि खास करून लहान होतकरू उद्दोजकाने श्री. टाटांचे वरील ४ शब्द म्हणजे आपल्या व्यवसायाच्या यशासाठी लागणारा पहिला गुरुमंत्र म्हणुनच घ्यायला पाहिजे. 

टाटा ग्रुपला मोठी परंपरा आहे; श्री. रतन टाटांनी त्या परंपरेला शोभुन काम तर केलच पण त्यांच्या संपुर्ण ग्रुपची विश्वासाहर्ता जगातील कुठल्याही कंपनीच्या तुलनेत मोठी केली.   भ्रष्टाचाराने पोखरत चालेल्या आपल्या देशाला त्यांच्या सारख्याच उद्दोगपतींची फार गरज आहे.  त्यांच्या ग्रुपला चांगल नेतृत्व लाभो ही सदिच्छा आणि इश्वर चरणी प्रार्थना!

लोकसत्ता मधील केरकरांचा लेख खाली देत आहे.  सौजन्य लोकसत्ता:
 
"बरोबर वीस वर्षांच्या कालावधीनंतर टाटांचे मुख्यालय ‘बॉम्बे हाऊस’मध्ये पुन्हा एकदा वारसदार शोधण्याची तयारी सुरु झाली आहे. मात्र त्यावेळचा आणि आताचा टाटा समूह यात बराच फरक आहे. १९९१ साली जे.आर.डी.चे वारस म्हणून रतन टाटा यांची निवड झाली त्यावेळी देशातील आर्थिक स्थिती वेगळी होती. देश एका मोठय़ा आर्थिक संकटातून जात होता. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरु केली होती. या नवीन धोरणाला पाठिंबा कमी जणांचा होता, विरोधच जास्त होता. अगदी सुरुवातीच्या काळात देशातील अनेक उद्योगपतींनीही या धोरणाला विरोध केला होता. प्रारंभी याला विरोध करणार उद्योगपतींचा ‘बॉम्बे क्लब’ स्थापन झाला होता त्यात रतन टाटाही होते. परंतु काळाच्या ओघात हा क्लब विरुन गेला. रतन टाटांची निवड जरी जे.आर.डी.नी केली असली तरी सुरुवातीच्या काळात समूहात असलेल्या बडय़ा धेंडांना बाजूला सारणे ही मोठी जबाबदारी रतन टाटा यांच्यावर होती. कारण टाटा समूहात त्यावेळी जवळपास सर्वच जण ७५च्या पुढे होते. साठीत होते त्यांचा उल्लेख ‘तरुण’ असा केली जाई. (आज नेमकी हीच स्थिती पुन्हा टाटा समूहात निर्माण झाली आहे) एकीकडे समूहात तरुण रक्ताला वाव देण्याबरोबरीने समूहाची संपूर्ण फेररचना करण्याची जबाबदारी रतन टाटांवर होती. टाटा समूह त्यावेळी अनेक क्षेत्रात विखुरलेला होता. त्यामुळे समूहाला निश्चित असा ‘फोकस’ नव्हता. यातूनच रतन टाटा यांनी टॉमको, लॅक्मे अशा डझनभर कंपन्या विकल्या. टाटा समूहातल्या फार जुन्या असलेल्या कंपन्या त्यांनी विकल्याने त्यांना समूहातून बराच विरोध झाला. परंतु त्यांचा हा निर्णय योग्यच होता हे काळाने सिध्द केले. रतन टाटा यांनी उदारीकरणाच्या नवीन धोरणाला अनुसरुन टाटा समूह कशा प्रकारे झेप घेईल याची आखणी केली. त्यांनी आखलेल्या या धोरणामुळे टाटा समूह खऱ्या अर्थाने झपाटय़ाने वाढला. विस्तार करण्यासाठी समूहातील कंपन्यांना विदेशातील व देशातील कंपन्या ताब्यात घेणे गरजेचे आहे हे त्यांनी ओळखून कोरस (जानेवारी ०७), जग्वार अँड लॅंड रोव्हर (मार्च ०८), सीटीग्रुप ग्लोबल (डिसेंबर ०८), टेटली ग्रुप (फेब्रुवारी २०००), विदेश संचार निगम (फेब्रुवारी ०२), नॅटस्टील (ऑगस्ट ०२), टेलिग्लोब (जुलै ०५), एट ओ क्लॉक कॉफी (जून ०६), ह्यूज टेलिकॉम (डिसेंबर ०२) अशा अनेक कंपन्या आपल्या समूहाच्या पंखाखाली आणल्या. २००८ साली त्यांनी जगातील सर्वात लहान मोटार नॅनो बाजारात आणण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरविला त्यावेळी जगाने टाटांची दखल घेतली. रतन टाटा यांच्या करिअरमधील सर्वोच्च बिंदू ठरावा. नॅनोमुळे टाटा समूहाला त्यांनी जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. रतन टाटा यांची कारर्किद अस्ताला जात असताना आता हा समूह सात क्षेत्रात कार्यरत आहे. समूहात असलेल्या ११४ कंपन्यांपैकी २८ कंपन्यांची शेअर बाजारात नोंद करण्यात आलेली आहे. टाटा समूह आता खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला आहे. सुमारे ८५ देशात त्यांचा कारभार पसरला असून ७१ अब्ज डॉलर एवढी त्यांची उलाढाल आहे. समूहातील बहुतांशी म्हणजे ६५.८ टक्के समभाग हे चॅरिटेबल ट्रस्टकडे असून एकूण ३५ लाख समभागधारक जगभर पसरले आहेत. अशा या अवाढव्य आणि लोकांच्या मनात मानाचे स्थान असलेल्या टाटा समूहाचा नवीन वारस शोधणे ही तशी सोपी बाब नाही. कारण नवीन येणारा प्रमुख हा जागतिक स्तरावरील कंपन्यां सांभाळण्याची क्षमता असलेला जसा हवा तसे त्यांनी आजवर टाटांची असलेली जनमानसातील पत टिकविणेही आवश्यक आहे. नवीन नेतृत्त्वाला ‘तरुण रक्त’ समूहात आणावे लागेल. आजच्या घडीला टाटा समूहात असलेल्या आघाडीच्या पाच कंपन्यांतील ५० संचालकांपैकी ७० टक्के संचालक हे साठी पार केलेले आहेत. त्यामुळे वीस वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा टाटा समूहात तरुण रक्ताला वाव देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचबरोबर टाटा हा आता ग्लोबल ब्रँड झाला आहे, त्याला पुढे नेणारे नेतृत्व असण्याची गरज आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टाटातील नवीन नेता टाटा घराण्यातीलच असेल का बाहेरचा? बहुदा तो टाटा आडनाव असलेलाच असण्याची शक्यता जास्त आहे. कारण ‘बाहेरील’ माणूस स्वीकारण्याची मानसिक तयारी अजून टाटा समूहात झालेली नाही असेच दिसते. अंतिम निर्णयासाठी अजून किमान आठ महिने वाट पहावी लागेल तोपर्यंत नावांबाबत ‘गॉसिप’ सुरुच राहील."


2 comments:

HAREKRISHNAJI said...

thx for sharing

विजय देशमुख said...

टाटा हे नाव घेतलं की आदराने मान लवते. "लाच देणार नाही, मग काम नाहि मिळाले तरी चालेल" हे त्यांच वाक्य १९९० च्या दरम्यान केव्हातरी ऐकले होते, अन माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर वाढला.

टाटांना चांगला वारस लाभो अन अजुन भरभराट होवो हिच सदिच्छा.