Sunday, October 10, 2010

माझं tweet.....आपण देणाऱ्याचे हात केंव्हा घेणार!

१० ऑकटोबर २०१०:  गेल्या आठवड्यात श्रीलंकेत असताना तेथील दैनिक वृतपत्रात एक बातमी वाचली की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळविलेल्या बिल गेटस् वा दुसऱ्या क्रमांकावरील वॉरन बफे यांनी चायनामधील श्रीमंत उद्दोगपतींची भेट घेतली आणि त्यांनी कमविलेल्या मालमत्तेपैकी काही पैसे सामाजिक कार्यासाठी देण्याचे आवाहन केले.   आता ते दोघेही आपल्या भारतातील श्रीमंत उद्दोगपतींची लवकरच भेट घेणार आहेत.  या संदर्भात काल दैनिक लोकसत्ताच्या आर्थिक पुर्वणीत श्री. प्रसाद केरकरांनी "भारतासही एक बिल गेटस हवेत" ह्या शीर्षकाचा एक लेख आहे तो खाली देत आहे.   आपल्या देशात Corporate Social Responsibility वर आपण फक्त कृतीहीन चर्चा करायला सदैव तयार असतो, हे ह्या देशाच दुर्दैव आहे! 
मला आठवतं एकदा एका भारतीय उद्दोजकाला एका पत्रकाराने विचारलं की,  वॉरेन बफे सारखं आपण समाजासाठी केंव्हा दान देणार,  तर तो साठीतला उद्दोगपती म्हणाला की समाजासाठी काम करायला माझ वय तितकसं परिपक्व झालेल नाही.  अजुन मी तरूण आहे!  ते म्हणाले ते अगदी खर आहे,  बरीच माणसं फक्त वयाने मोठ होतात मनाने नाही!  देशातील फक्त ५० श्रीमंत कुटुंबांनी ठरवलं तर देशातील प्रत्येक माणसाला माणुस म्हणुन जगाता येईल इतकी साधन संपती आपल्या देशात आहे.  प्रश्न असा आहे की आपण देणाऱ्याचे हात केंव्हा घेणार? 
भारतासही ‘बिल गेटस्’ हवेत ..
(सौजन्य लोकसत्ता - लेखक प्रसाद केरकर)

आपल्याकडचे उद्योपती हे अमेरिकेला प्रमाण मानून त्यानुसार आपली सर्व ध्येयधोरणे आखीत असतात. अनेकदा त्यांचे अनुकरण करण्याकडेही त्यांचा कल असतो. मात्र अमेरिकन उद्योजकांचे सर्व गुण ते घ्यायला तयार होत नाहीत. फक्त आपल्या सोयीचे जेवढेच आहे तेच अमेरिकेकडून घेण्याची त्यांची तयारी असते. उदाहरण द्यायचे झाल्यास अमेरिकन उद्योगपतींचा अनेक सेवाभावी प्रकल्पांना सढळ हाताने मदत करण्याची प्रवृत्ती. अमेरिकेतील उद्योजक आपल्या संपत्तीपैकी अतिशय अल्प वाटा आपल्या वारसांना देतात. किंबहूना देतही नाहीत. कारण आपण कमविलेल्या पैशावर आपला हक्क आहे आणि त्याचे काय करायचे हे आपण ठरविणार, हा आपला हक्क असल्याचे तेथील नागरिकाला वाटते. तेथील मुलांनाही आपल्या पित्याकडून वारसा हक्काने मालमत्ता मिळेल याची अपेक्षाही नसते. तेथील प्रत्येक नागरिक हा स्वबळावर उभा असतो. आपल्या कुवतीप्रमाणे तो कमवितो आणि खर्चही करतो. आपल्याकडे याच्या नेमके उलटे आहे. आपल्याकडील सर्व मालमत्ता ही वारसाहक्काने मुलांना मिळालीच पाहिजे अशी एक समजुत असते. अनेकदा यातूनच आपल्या वारसा हक्काच्या मालमत्तेवर ताबा मिळविण्यासाठी कोर्टबाजीही होते. अमेरिकेतील कुणीही असो, कोणत्याही आर्थिक थरातला असो तो आपल्या पैशाचे काय करायचे ते तो स्वत: ठरवितो. म्हणूनच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळविलेल्या बिल गेटस् वा दुसऱ्या क्रमांकावरील वॉरन बफे यांनी आपल्या कमविलेल्या मालमत्तेपैकी बहुतांश वाटा सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे ठरविले आहे. अर्थात ही रक्कम थोडीथोडकी नाही तर अब्जावधी डॉलरची असते. अमेरिकेतील सुमारे ४० अब्जोपतींनी आपल्या मालमत्तेपैकी अर्धी रक्कम तरी सामाजिक कार्यासाठी म्हणजेच जगातील दारिद्र संपुष्टात येण्यासाठी वापरण्याचे ठरविले आहे. अमेरिकेतील उद्योगपती अशा प्रकारे प्रकारे जगाच्या कल्याणाचा विचार करीत असताना आपल्याकडचे उद्योगपती मात्र असा विचार करताना दिसत नाहीत ही खेदाची बाब ठरावी. मात्र यालाही अपवाद आहेत. अलीकडेच एच.सी.एल. या आय.टी. उद्योगातील कंपनीचे प्रवर्तक शिव नाडर यांनी आपल्या एकूण मालमत्तेपैकी १० टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करणार असल्याचे जाहीर केले आहे. इन्फोसिसचे प्रवर्तक नारायणमूर्ती, विप्रोचे अझीम प्रेमजी व भारती एअरटेलचे सुनिल मित्तल यांनी देखील यापूर्वी आपल्या मालमत्तेतील काही वाटा सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यास सुरुवात केली होती. नारायममूर्ती व प्रेमजी यांच्या निधीतून अनेक भागात कामे सुरु आहेत. अनेक शाळांमध्ये गरीब मुले शिक्षण घेत आहेत. सुनिल भारती यांनी तर राजस्थानातील सुमारे २५० शाळा दत्तक घेऊन चांगले प्राथमिक शिक्षण कशा प्रकारे मिळेल हे पाहिले आहे. आता नाडर यांनी देखील प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचे जाहीर केले आहे. सध्या आपल्या वेळेच्या ४० टक्के वेळ सामाजिक कार्यासाठी देत आहेत. अशा प्रकारे आता वयाची पासष्ठी ओलांडल्यावर नाडर यांनी आपल्या वेळेपैकी मोठा वेळ सामाजिक कार्यासाठी देणे ही घटना स्वागतार्ह आहे. नाडर यांच्यातर्फे आठवी ते बारावी या वर्गातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी त्यांनी एक लाख रुपयांहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांचा शोध घेऊन त्यांना या शाळेत शिक्षणाची व राहण्याची सोय करण्याचे ठरविले आहे. कारण आठवी नंतरच अनेक मुलांचे शिक्षण पैशाअभावी थांबते. नाडर यांनी हातात घेतलेला हा प्रकल्प उल्लेखनीयच म्हटला पाहिजे. नाडर यांनी अमेरिकेत बिल गेटस् यांची ज्यावेळी भेट घेतली त्यावेळी त्यांनी हाती घेतलेल्या सामाजिक कार्याने भारावून जाऊन आपणही काही तरी करावे म्हणून त्यांनी शैक्षणिक कार्यातील प्रकल्प हाती घेतले आहेत. मोठय़ा उद्योगसमूहात आपल्याकडे टाटांनी अशा प्रकारचे अनेक सेवाभावी प्रकल्प आपल्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेतले आहेत. नारायणमूर्ती, प्रेमजी, नाडर किंवा भारती काय हे नवीन पिढीतील उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांचे काही उद्योसमूह नव्हते. पहिल्या पिढीतील ते उद्योजक आहेत. असे जर देशताील प्रत्येक उद्योसमूहाने व अब्जाधीशांनी आपल्याकडील मालमत्तेतील काही वाटा विधायक सामाजिक कार्यासाठी खर्च केल्यास देशाचे चित्र पालटू शकते. यासाठी आपल्याकडील प्रत्येकाने बिल गेटस्चा आदर्श ठेवावयास काही हरकत नाही.

No comments: