Monday, October 18, 2010

माझं tweet.....उल्हास दिलसे!

१८ ऑक्टोबर, २०१०:    बाराखडी दिलसे टीम आणि बॉर्न-टु-विन... ....
प्रिय उल्हास,

दसरा असूनही तुझ्या प्रेमळ आग्रहाखातर "स्वप्न बघा स्वप्न जगा" कार्यक्रमासाठी दामोदर हॉल परळ येथे उपस्थित राहिलो आणि वाटले इथेच मला विचारांचे सोने लुटायला मिळाले!   मला खरचं पुण्याला जायच होतं पण मी ते शेवटच्याक्षणी टाळलं आणि तुझ्यासाठी आलो

उल्हास तुला "नाही" म्हणता येत नाही रे राजा!   याच पहिलं कारण म्हणजे तुझा प्रेमळ आणि मृदु स्वभाव; आणि दुसरं तुझी "बाराखडी दिलसे"ची संपुर्ण टीम एका धेयाने प्रेरित होऊन काम करीत आहे अस मला वाटतं.   तूम्ही तरूण आहात,  तुम्हाला सुद्दा करिअर करायच आहे,  इतरांसारखे पैसे कमवायचे आहेत,  पण हे करीत असताना तुम्ही मराठी तरूणांना एक दिशा देण्याच काम करीत आहेत;  समाज घडवतं आहात,  म्हणुन तुमच्या कामाला मना पासुन सलाम! 
बाराखडी दिलसे... च्या वरील कार्यक्रमात काय होतं हे इतरांना कळलं पाहिजे म्हणुन त्यांच्यासाठी काल आलेल्या तीन वकत्यांनी जे विचारांच सोनं दिलं ते खाली देत आहे: 

 "मी जगातील सर्वात आनंदी माणूस आहे" - हे तळवलकर जिमचे संस्थापक ७८ वर्षाचे तरूण मधुकर तळवलकरांच वाक्य आपल्याला खुप विचार करायला लावणारं आहे!   ते म्हणाले God has been very kind and impartial to all of us कारण देवाने सर्वांना दोन डोळे, कान, हात, पाय अस समान शरीर दिले आहे मग आपल्यात अशी तफावत का असते?  आपले कुठे चुकते आहे?  हा त्यांचा प्रश्न बिनतोड  आहे.  त्यांनी सांगितल्या प्रमाणे  आपण जर सकारात्मक वृत्ती ठेवली आणि स्वत:बद्दल विश्वास बाळगला तर यश फार दुर आहे असं मला वाटतं नाही.

नंतर डॉ.उदय निरगुडकरांनी सांगितलं की स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी नियोजन हवे.   आयुष्यात काय करायचे "नाही" ते माहित हवं हे सांगितलं!   आणि शेवटी स्वत:मधील ठिणगी विझू देऊ नका हा त्यांचा फारच मोलाचा संदेश त्यांनी दिला.  

गोपी कुकडे हे जाहिरात क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व.  ते म्हणाले आजच्या युगात इंग्लीशवर प्रभूत्व असणे अत्यंत आवश्यक आहे.   तसेच प्रयोगशील असणेही गरजेचे.  तणावाचे रुपांतर मौजेत करून त्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे.   शेवटी स्वत:तील बालपण हरवू नका असे ते म्हणाले.

तसचं त्रिमितीतर्फे काल उल्लेखनीय सामाजिक कार्य करणार्‍या स्पर्श या संस्थेच्या  संचालीका श्रीमती सारीका देसाई आणि समतोल फाऊंडेशनया संस्थेचे श्री. विजय जाधव यांचा सत्कार केला गेला.  स्पर्श ही संस्था रस्त्यावरील मुलांच्या शिक्षणासाठी काम करते, तर समतोल ही संस्था घरातून पळून आलेल्या मुलांना पुन्हा घरी पाठवण्याच काम करते.  चिपळूणचे उदय पोटे यांनी ग्रामीण भागातील लोकांसाठी "स्वदेश"च्या धरतीवर वीजेचा शोध लावला आहे म्हणुन त्यांचा ही गौरव करण्यात आला.


मला वाटतं वरील तिन्ही दिग्गजांनी जगायच कसं ते शिकवलं तर सारीका आणी विजय यांनी जगायच कशासाठी हे सांगितलं.   दसऱ्याच्या दिवशी त्यांनी सगळ्यात साधा आणि सोपा विचार दिला.    मला वाटतं आजच्या रोज बदलणाऱ्या युगात सगळ्यात दुर्मिळ काय असेल तर ते म्हणजे चांगले विचार!  त्याची लुटच जणू या तिन्ही वक्त्यांनी केली.   आजचे तरूण फार लवकर जिद्द सोडतात, अपयशाला घाबरतात, हताश होतात, they give up very easily!  त्यांनी मी एवढच सांगेन की  श्रीकृष्णाने सांगितल्या प्रमाणे आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं एवढच आहे;  म्हणुन प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केले तर यश हे हमखास मिळणारच!  आणि जर ते नाही मिळालं तर देवाने तुमच्यासाठी आणखी मोठं यश ठेवल आहे अस समजुन आणखी जास्त प्रयत्न केले पाहिजे.   तरी यश नाही मिळालं तर ज्या यशासाठी आपण प्रयत्न केले, ते खरं तर "यश"च नव्हतं अस समजुन पुन्हा नव्याने प्रयत्न केले पाहिजे!  पण कुठेही नाउमेद होता कामा नये.  आपली पॉसिटिव्हिटी सोडता कामा नये!  आपल्यातली ठिणगी विझता कामा नये!!
  
उल्हास,  तुझ्या ह्या कमात तुला उदंड उत्साह मिळो!  समाजात अस काम करताना शरीर थकलं तरी विचारांची झेप आणि मनाची श्रीमंती कायम असावी!  तु ज्या विचारांनी पुढे जातो आहे त्या विचारांचा पिळ घट्ट ठेव!   तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना देव तुला भरभरून यश देवो ही इश्वर चरणी प्रार्थना करतो.  मी तुमच्या मागे नाही तर तुमच्या बरोबर आहे, कारण तुम्हा सगळ्यांना खुप मोठं झालेल मला बघायच आहे! 

तुमचा


नितीन पोतदार.......

1 comment:

ULHAAS KOTKAR - Professional Event Organizer said...

Nitin Sir I am on top of the world, Thank you very much