Monday, November 22, 2010

माझं Tweet.....वाह ताज! वाह टाटा!!

२२ नोव्हेंबर २०१०: गेल्या आठवड्यात सर. रतन टाटांनी गौप्यस्फोट केला की दहा वर्षांपुर्वी त्यांनी घरी बसणं पसंत केले पण १५ कोटीची लाच देऊन स्वत:ची एअरलाईन्स सुरु केली नाही.  त्या नंतर लगेचच पंतप्रधान मन मोहन सिंग यांना सुद्दा टेलिफोन घोटाळा प्रकरणी टीका सहन करावी लागली म्हणुन मी थोडा बेचैन होतो.   असो.  लोकसत्ताचे श्री. सुधीर जोगळेकरांनी "ब्रॅण्ड ताज" या शीर्षकाखाली रतन टाटांनी त्यांच्या "द ताज पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट" फंडाने घरोघरी जाऊन दोन कोटींच्या वर रक्कम २६ नोव्हेंबर २००८च्या दहशतवादी हल्यामधे होरपळलेल्या मुंबईच्या दुर्दैवी कुटूंबीयांना दिली, त्याची संपुर्ण माहिती कालच्या रविवार लोकसत्ता पुरवणीत दिली आहे.   त्यातील काही भाग इथं देत आहे.    एक व्यक्ती!  अनेक आदर्श!  सर. रतन टाटांच्या या कामगिरीला संपुर्ण देशाचा मनापासुन सलाम! 

मनोज ठाकूर. वय र्वष २९. कुलाबा कॉजवेजवळच्या ताज समूहाशेजारी असलेल्या एका छोटय़ा दुकानात काम करणारा तरुण.  लिओपोल्ड कॅफेत झालेल्या गोळीबारात जखमी झालेला. त्यानं आजवर ताजबद्दल फक्त ऐकलं होतं की तिथं  चहाचा कप ९०० रुपयांचा असतो.  आपण असा एखादा चहाचा कप पिणं सोडून द्या, नुसता पाहू तरी शकू का, असा प्रश्न त्याला पडत असे.. ....२६/११ला जखमी झालेल्या मनोजला उपचारादाखल द ताज पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट फंडानं पहिले सहा महिने दरमहा ५००० रुपये दिले.   मनोज बरा झाला. ताजनं त्याला तीन महिन्यांचं प्रशिक्षण दिलं.   नंतर ताजच्याच फूड अ‍ॅण्ड बीव्हरेजेस विभागात स्टायपेंडवर मनोजला नोकरी लागली.  ट्रस्टनं त्याच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तर उचललीच आहेच, पण त्याच्या शिक्षिका पत्नीला पुढचं शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्तही केलं आहे....

Monday, November 15, 2010

माझं Tweet.....१४ नोव्हेंबर - बालक दिन!

१४ नोव्हेंबर २०१०:  बालक दिन!  पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२१व्या जयंती.   दर वर्षी  आजच्या दिवशी सरकार मोठ मोठ्या जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करते.   तरी देशातील लाखो निष्पाप मुलांची परिस्थिती "जैसे थे"!   मनसोक्त खेळायच्या वयात ती मुल देश उभारणीचा भार उचलतात!त्यांना आपण अजुनही प्राथमिक शिक्षणं देवू शकलो नाही? तरी ही या मुलांच्या तोंडावर नेहमी हास्य असतं.
त्यांना डोक्यावर एक साधं छ्प्पर मिळू नये का?  देवा तुझ्या शरणात तरी त्यांना सुखरूप ठेव! हीच प्रार्थना! 

Tuesday, November 9, 2010

माझं tweet.....अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामां!

९ नव्हेंबर २०१०:  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी मिशेल तीन दिवसांचा दौरा आटपून आशिया खंडाच्या पुढच्या प्रवासाला आज जातील.   त्यांच्या वर पहिल्या दिवशीच पाकिस्तानवर तोफ डागली पाहिजे होती इंथ पासुन ते अमेरिकेचे सेल्समेन आहेत आणि भारताला त्यांच्या कडुन काहीही फायदा होणार नाही, आज मंदीच्या काळात अमेरिकेला आपली गरज जास्त आहे आपल्याला नव्हे!  इथं पर्यंत सगळ्यांनी टीका केली,  आणि त्यांच्या भेटीचे कवित्व अजुन काही दिवस आपला मिडीय़ा जिवंत  ठेवतील यात काही शंका नाही.   ओबामांनी आपल्याला रस्ते, वीज, पाणी, अन्न, वस्त्र आणि निवारा या सगळ्यांसाठी कुठल्याही अटी शिवाय सढळ हस्ते मदत करावी, भरपुर पैसे द्यावेत आणि त्यावर आपल्यासाठी पाकिस्तानला सुद्दा सज्जड दम भरावा अशी काहींची अपेक्षा होती.   अमेरिका असो  किंवा इतर कुठलाही देश असो त्यांचे राष्ट्राध्यक्ष काही ब्लॅन्क (Blank) चेक बुक घेऊन कुठेच जात नाही!   अशी टीका करणाऱ्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या राज्यकर्त्यांनी गेली ६३ वर्ष आपल्या देशासाठी काय केल?    आपल्या राज्यकर्त्यांनी कुठला "आदर्श" जनतेपुढे ठेवला हे आपल्याला चांगल माहित आहे?

Wednesday, November 3, 2010

माझं tweet.....शुभ दिपावली! २०१०

३ नोव्हेंबर २०१०:  दिपावली म्हटंल की आनंदाचा, उत्साहाचा आणि भरपुर कार्यक्रम activityचा सण! दिपावलीच्या शुभेच्छा कार्डस तयार करणे (कालपर्यंत विकत घेत होतो - आता आपण ई-ग्रीटिंगस पाठवितो), कंदिल  बनविणे (हल्ली फोल्डिंगचे विकतं घेतो), फराळ बनविणे (हल्ली तोही विकत मिळतो - त्यातच डायट आणि शुगर फ्री फराळ देखिल मिळतो!), फटाके घ्यायला जाणे (ते थोडं कमी झालंय), मित्रांच्या घरी जाणे (हल्ली एखाद्या मॉलला भेट देतो), नविन कपडे आपल्या नेहमीच्या शिंप्याला शिवायला देणे (हल्ली रेडी मेड ब्रॅण्डेड कपडे घेतो), मित्रांना फोन करणे (हल्ली फेसबुक, ट्विटर   आणि SMS वरून मेसेज पाठवितो), दिवाळीची नवीन खरेदी (त्यात मोबाईलचा हॅन्डसेट बदलणं हे हमखास असतं). मी दिपाली साजरी करण्याच्या पद्दतीवर मुळीच टीका करीत नाही, तशी इच्छा देखिल नाही, फक्त दिवाळी साजरी करताना होत गेलेला फरक मांडण्याचा प्रयत्न केला!  मला माहित आहे की ’बदल’ हीच अशी गोष्ट आहे की ती  ’कायम’ असते!  

Monday, November 1, 2010

उद्योगाचा शुभारंभ!

‘मंगेश (म्हणजे पूर्वीचा मोरू) अरे यंदाच्या दिवाळीला पदवीधर होऊन तुला सहा महिने झाले, अजूनही तू तुझा बायोडेटा तयार केलेला नाहीस. त्याशिवाय तू नोकरीसाठी अर्ज कसा करणार?’ मंगेशचे पप्पा (म्हणजे पूर्वीचा मोरूचा बाप) मंगेशला उद्देशून म्हणाले, ‘नाही! काय वाटेल ते झालं तरी मी नोकरीसाठी अर्ज तयार करणार नाही आणि कुणाला नोकरीसाठी भेटणारसुद्धा नाही, मग ती मॅनेजरची का असेना.’ इति मंगेश. मंगेशचे पप्पा चकीत झाले, डोक्यातला संताप लपवत, दिवाळीच्या तोंडावर वाद नको म्हणून विनोदाने घेत म्हणाले, ‘का बरं लॉटरी वगैरे लागली आहे का? की कोणी घरजावई करून घेणार आहे?’ ‘मला स्वत:चाच एक उद्योग उभारायचा आहे, पप्पा! मी दर महिन्याला इतर कोणाकडून ठरावीक दिवशी ठरावीक पगार घेणार नाही तर एक माणसाला का होईना पण मी पगार देणार! हे लक्षात ठेवा.’ मंगेश आवेशात पप्पांना म्हणाला. ‘अरे मंगेशा, मग इतका शिकलास कशाला? आणि हो अरे पैसे कुठून आणणार आहेस?’ मंगेशचे पप्पा मंगेशला काळजीच्या स्वरात म्हणाले, ‘अहो पप्पा, तुमची पिढी काय फक्त शंकाच काढत बसणार का? मनोज तिरोडकरांना कोणी पैसे दिले होते? पण ते तर त्यांच्या जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून अनिल अंबानीची कंपनी विकत घ्यायला निघाले होते.’ मंगेश चढय़ा स्वरात म्हणाला. ‘असं म्हणतोस? खरे तर मलाही नोकरीऐवजी उद्योग करायची सुप्त इच्छा होती. पण त्या वेळी फार विरोध झाला असता, शिवाय माहिती मिळणं सोपं नव्हतं, इतरांची मोनापोलीच असल्यासारखं होतं. आता बराच बदल झाला आहे, असं वाटतंय. चल तू प्रयत्न कर. मी तुझ्या पाठीशी आहे.’ मंगेशचे पप्पा म्हणाले.

मंगेश व त्याच्या पप्पांमधील हा संवाद काल्पनिक असला तरी आज मोठय़ा प्रमाणात मराठी घरात तो नक्कीच होतो आहे. मराठी तरुणांच्या व त्यांच्या कुटुंबाच्याही मानसिकतेत हा सुखद बदल होताना दिसतोय. आज जवळपास प्रत्येक मराठी वृत्तपत्रात दर आठवडय़ाला एक करिअरसंबंधी स्पेशल पुरवणी असते. त्यात मुख्यत: स्वयंरोजगार उद्योगाविषयी सविस्तर माहिती असते. शिवाय इतर किती तरी मराठी मासिके आज उद्योग, व्यापार, व्यवसाय, स्वयंरोजगार याविषयी निघतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज मराठी नाटकांच्या आणि सिनेमांच्या जाहिरातीबरोबर मराठीत मॅनेजमेंटचे धडे, यशाचा महामंत्र, सक्सेसचा- ब्ल्यू प्रिंट, यशस्वी मराठी उद्योजकांच्या मुलाखती, तसेच व्यवसाय आणि उद्योगासंबंधी मार्गदर्शनाचे तीन-तीन तासांचे आणि काही तर दिवसभराचे कार्यक्रम आज शिवाजी मंदिर, कर्नाटक संघ हॉल, रवींद्र नाटय़ मंदिरात होत असतात आणि ५०० रुपयांची तिकिटं घेऊन ते बघायला आणि ऐकायला मोठय़ा प्रमाणात मराठी तरुण येत आहेत, पण बघायला आणि ऐकायला येत आहेत म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणे होईल! कारण पुढे जाऊन हे धडे अंमलात आणण्याच्या निश्चयाने ते अशा कार्यक्रमांना जातात. त्यांचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन खरंच वाखाणण्याजोगा आहे. मला वाटतं अशा मुलांच्या पाठीशी त्यांच्या पालकांनी आणि खरं तर संपूर्ण मराठी समाजानेच खंबीरपणे उभं राहायला हवं.