Monday, November 1, 2010

उद्योगाचा शुभारंभ!

‘मंगेश (म्हणजे पूर्वीचा मोरू) अरे यंदाच्या दिवाळीला पदवीधर होऊन तुला सहा महिने झाले, अजूनही तू तुझा बायोडेटा तयार केलेला नाहीस. त्याशिवाय तू नोकरीसाठी अर्ज कसा करणार?’ मंगेशचे पप्पा (म्हणजे पूर्वीचा मोरूचा बाप) मंगेशला उद्देशून म्हणाले, ‘नाही! काय वाटेल ते झालं तरी मी नोकरीसाठी अर्ज तयार करणार नाही आणि कुणाला नोकरीसाठी भेटणारसुद्धा नाही, मग ती मॅनेजरची का असेना.’ इति मंगेश. मंगेशचे पप्पा चकीत झाले, डोक्यातला संताप लपवत, दिवाळीच्या तोंडावर वाद नको म्हणून विनोदाने घेत म्हणाले, ‘का बरं लॉटरी वगैरे लागली आहे का? की कोणी घरजावई करून घेणार आहे?’ ‘मला स्वत:चाच एक उद्योग उभारायचा आहे, पप्पा! मी दर महिन्याला इतर कोणाकडून ठरावीक दिवशी ठरावीक पगार घेणार नाही तर एक माणसाला का होईना पण मी पगार देणार! हे लक्षात ठेवा.’ मंगेश आवेशात पप्पांना म्हणाला. ‘अरे मंगेशा, मग इतका शिकलास कशाला? आणि हो अरे पैसे कुठून आणणार आहेस?’ मंगेशचे पप्पा मंगेशला काळजीच्या स्वरात म्हणाले, ‘अहो पप्पा, तुमची पिढी काय फक्त शंकाच काढत बसणार का? मनोज तिरोडकरांना कोणी पैसे दिले होते? पण ते तर त्यांच्या जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून अनिल अंबानीची कंपनी विकत घ्यायला निघाले होते.’ मंगेश चढय़ा स्वरात म्हणाला. ‘असं म्हणतोस? खरे तर मलाही नोकरीऐवजी उद्योग करायची सुप्त इच्छा होती. पण त्या वेळी फार विरोध झाला असता, शिवाय माहिती मिळणं सोपं नव्हतं, इतरांची मोनापोलीच असल्यासारखं होतं. आता बराच बदल झाला आहे, असं वाटतंय. चल तू प्रयत्न कर. मी तुझ्या पाठीशी आहे.’ मंगेशचे पप्पा म्हणाले.

मंगेश व त्याच्या पप्पांमधील हा संवाद काल्पनिक असला तरी आज मोठय़ा प्रमाणात मराठी घरात तो नक्कीच होतो आहे. मराठी तरुणांच्या व त्यांच्या कुटुंबाच्याही मानसिकतेत हा सुखद बदल होताना दिसतोय. आज जवळपास प्रत्येक मराठी वृत्तपत्रात दर आठवडय़ाला एक करिअरसंबंधी स्पेशल पुरवणी असते. त्यात मुख्यत: स्वयंरोजगार उद्योगाविषयी सविस्तर माहिती असते. शिवाय इतर किती तरी मराठी मासिके आज उद्योग, व्यापार, व्यवसाय, स्वयंरोजगार याविषयी निघतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज मराठी नाटकांच्या आणि सिनेमांच्या जाहिरातीबरोबर मराठीत मॅनेजमेंटचे धडे, यशाचा महामंत्र, सक्सेसचा- ब्ल्यू प्रिंट, यशस्वी मराठी उद्योजकांच्या मुलाखती, तसेच व्यवसाय आणि उद्योगासंबंधी मार्गदर्शनाचे तीन-तीन तासांचे आणि काही तर दिवसभराचे कार्यक्रम आज शिवाजी मंदिर, कर्नाटक संघ हॉल, रवींद्र नाटय़ मंदिरात होत असतात आणि ५०० रुपयांची तिकिटं घेऊन ते बघायला आणि ऐकायला मोठय़ा प्रमाणात मराठी तरुण येत आहेत, पण बघायला आणि ऐकायला येत आहेत म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणे होईल! कारण पुढे जाऊन हे धडे अंमलात आणण्याच्या निश्चयाने ते अशा कार्यक्रमांना जातात. त्यांचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन खरंच वाखाणण्याजोगा आहे. मला वाटतं अशा मुलांच्या पाठीशी त्यांच्या पालकांनी आणि खरं तर संपूर्ण मराठी समाजानेच खंबीरपणे उभं राहायला हवं.
आजच्या तरुणांना इंटरनेटमुळे प्रत्येक क्षेत्राची जगभरातील माहिती उपलब्ध आहे. नव्हे माहितीचा पूर आलेला आहे आणि म्हणून त्यांच्या विचारांना एक दिशा दिसते. स्वत: काही तरी करण्याची मनीषा दिसते. त्यातच सव्‍‌र्हिस सेक्टरमुळे तर स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी आज उपलब्ध केल्या आहेत. म्हणूनच आजच्या तरुणांचा ‘नोकरी’ करण्यापेक्षा काही तरी स्वत: निर्माण करण्याकडे कल असतो आणि तो योग्यच आहे, असं मला वाटतं. ज्यांना आज स्वत: काय करायचं आहे हे चांगलं ठाऊक असेल, तयारी झालेली असेल त्यांनी तर निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीने जगाशी बोलावं! इतर तरुण ज्यांना काही तरी उद्योग करून स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे ते दोन प्रकारांत मोडतात, १) असे तरुण ज्यांनी कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे मनाशी ठरवलेलं आहे, पण त्यांना नेमकी सुरुवात कुठून करायची हे ठाऊक नसतं आणि २) ज्यांना कुठला उद्योग किंवा व्यवसाय करायचा आहे हेच माहीत नाही, तरी त्यांनासुद्धा नोकरी न करता स्वत:च काही तरी करायची अशी एक जबरदस्त इच्छा असते. अशा तरुणांनी सुरुवात कशी करावी याचा थोडा विचार करूया.

मला वाटतं ज्यांनी स्वत:चा कल ओळखून कुठला उद्योग व्यवसाय करायचा आहे किंवा कोणत्या
सव्‍‌र्हिस सेक्टरमध्ये काम करायचं आहे हे ठरवलं असेल आणि सुरुवातीला लागणारं ज्ञान आणि अनुभव त्यांच्याकडे असेल त्यांनी खुशाल स्वत: उद्योग सुरू करावा. आज बहुतेक तरुणांचा कल हा ज्ञानाधारित उद्योगाकडे किंवा सव्‍‌र्हिस सेक्टरकडे जास्त असतो.  त्यात इंटिरिअर्स, फाइन आर्ट, प्रिंटिंग, फॅशनस इव्हेंट मॅनेजमेंट, कॅटरिंग, कोचिंग क्लासेस, मॅनेजमेंट कोर्सेस, अ‍ॅनिमशन, मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, कॉम्प्युटर क्लासेस, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, वेब डिझायनिंग, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम, रेस्टॉरंट्स, ब्रॅण्ड मेकिंग, मार्केटिंग असे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. अगदी छोटा तर छोटा, पण उद्योगाची सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवातीला एक चांगला अभ्यासपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट, नियोजन म्हणजे प्राथमिक तयारी करणं गरजेचं आहे.

‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ म्हणजे उद्योगाचा ब्लूप्रिंट! प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सुरुवातीचं भांडवल, उत्पादनाचा खर्च, कच्चा माल कुठे आणि कसा मिळणार, प्रोडक्ट ब्रॅण्ड, मार्केटिंग प्लान, प्रॉफिट-मार्जिन, तुमचे स्पर्धक, त्यांचे उत्पादन अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे. आज इन्टरनेटवर कुठल्याही उद्योगात भारतात आणि भारताबाहेर कोण आहे, त्यांचे उत्पादन, त्यांचे ब्रॅण्डस् व त्यांची जवळपास संपूर्ण माहिती उपलब्ध असते. असा प्रोजेक्ट रिपोर्ट एखाद्या चार्टर्ड अकाऊंटंटला दाखवा म्हणजे तो तुम्ही केलेले कष्ट आणि लावलेल्या पैशावर योग्य रिटर्न काय असू शकतं हे सांगू शकतो. उद्योग सुरू केल्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्टमधील तुमचा अंदाज चुकला तरी फारसं बिघडत नाही. त्यातूनही आपल्याला खूप काही शिकता येतं. त्याचबरोबर संपूर्ण उद्योगाच्या सुरुवातीचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. चांगलं तपशीलवार नियोजन म्हणजे अर्ध यश हे लक्षात घ्या.

आता तुम्ही कुठला उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे ठरवलं नसेल आणि तरी तुम्हाला नोकरी न करता एखादा स्वतंत्र व्यवसायच करायचा असेल तर तुम्हाला जरा जास्त मेहनत करायला पाहिजे, हे नक्की. प्रथम तुमची आवड आणि क्षमता याची तुम्हालाच नीट ओळख होणं गरजेचं आहे. त्यात येणारी प्रत्येक संधी ओळखता येणं महत्त्वाचं आहे. जास्त गोंधळ असेल तर एखाद्या करिअर काऊन्सेलरशी बोलणं केव्हाही चांगलं. कारण जोपर्यंत तुमचे गुण, दोष, मानसिक ताकद तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत नेमका कुठला उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे तुम्ही ठरवू शकणार नाही. मित्रांशी आणि घरच्यांशी चर्चा जरूर करा पण त्याचबरोबर विविध उद्योगातील अनुभवी लोकांचा आपण सल्ला घेतला पाहिजे, त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करा. मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत कुठल्याही निर्णयापर्यंत येऊ नका. झटपट उत्तरांच्या मागे न पडता प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार झाला पाहिजे. उद्योगाचे चांगले आणि वाईट सगळे मुद्दे लिहून काढलेले केव्हाही चांगलं. थोडं थांबून, अनुभव घेऊन मग पुढचा विचार करा. अनुभव मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जो उद्योग करायचं मनाशी ठरवलं असेल, त्या उद्योगात नोकरी करून प्रत्यक्ष माहिती मिळवणं केव्हाही चांगलं. कारण स्वत:चा अनुभव हाच आपला सगळ्यात मोठा शिक्षक असतो! पण सावधान, नोकरीतील त्या सुरक्षित व नियमित पगाराच्या जाळ्यात अडकण्याचा मोह होऊ देऊ नका. एकदा विचार पक्का झाला की, हर हर महादेव म्हणत पुढेच व्हा! मग मागे हटणे नाही! जीव तोडून कामाला लागा, यश हमखास तुमचं असेल. एखाद्या विशिष्ट उद्योगाची माहिती मिळवण्याचा एक मार्ग आपण बघितला. उद्योग कसा करावा याच व्यवस्थापन शास्त्राचं शिक्षण घेता आलं तर फारच उत्तम. मुख्य म्हणजे सकारात्मक विचार आणि स्वत:वरचा सकारात्मक विश्वास केव्हाही डगमगता कामा नये. यश हे अपघाताने मिळत नसतं, की आकाशातून पडून, ते मिळतं आपल्या कर्तत्वाने!

एकदा उद्योग सुरू करण्याआधी आपण प्रथम त्यात वाईट काय होऊ शकतं याचा विचार करतो आणि म्हणून कधी कधी आपण चांगल्या निर्णयापर्यंत येतच नसतो. मला असं वाटतं की, कुठल्याही गोष्टीचा चांगला आणि वाईट विचार करताना सुरुवात ही सकारात्मक विचारानेच करावी, पण निर्णयापर्यंत येण्याआधी त्यामधील वाईट गोष्टींचादेखील वस्तुनिष्ठपणे विचार झाला पाहिजे. म्हणजे hope for the best but prepare for the worst! आपल्या स्वप्नांना नेमकं कुठे आणि कशामुळे ब्रेक लागत आहे याचा भावनेला लांब ठेवून नीट विचार झाला पाहिजे. मुख्य म्हणजे स्वत:वर विश्वास असणं गरजेचं आहे! यशासाठी ‘डोळसपणे’ धोका पत्करणं अपरिहार्य असतं. त्याला फक्त धोका नाही तर हिशेबी धोका म्हणतात- कॅलक्युलेटेड रिस्क. हे तत्त्वही व्यवस्थापन शास्त्राचा एक भाग आहे. उद्योग सुरू केल्यावर काही पेचात टाकणारे निर्णय घेत राहावे लागतात. असे निर्णय चुकले तरी न घाबरता पुढे जा. यशस्वी माणसंदेखील पुष्कळ वेळा चुकीचे निर्णय घेतात!

शेवटी एकच सांगेन नुसती चर्चा किंवा विचार करून कुणी उद्योजक होणार नाही. संधी येताना फार छोटी वाटते पण गेल्यावर ती फारच मोठी दिसते! जग काय म्हणेल याचा विचार करण्याची आजच्या जगात तरी कोणी चूक करू नये. जे प्रोत्साहित करतील त्यांना धन्यवाद देऊन व जे नाउमेद करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. शंका काढणारे १०० लोक भेटतील, तर नाउमेद करणारे २००! टीकेपेक्षा टीका कोण करतो हे मह्त्त्वाचं असतं हे लक्षात घ्या. त्याचबरोबर कुणाविषयी कडवटपणा किंवा तिरस्कार धरून न ठेवता शांतपणे पुढे जाण्यातच आपलं यश आहे.

अडचणी आणि अडथळे हे येणारच म्हणून आपण प्रयत्नच करणार नाही का? माझ्या मते यशस्वी प्रयत्न म्हणजेच १००% यश! चांगल्या कामासाठी मुहूर्ताची गरज नसते, पण अनायासे दिवाळीचा मुहूर्त आहे तर पहिलं पाऊल तर उचला, म्हणतात ना, Journey of a thousand miles begins with a single step. शुभ दीपावली!
 
सौजन्य लोकसत्ता दिनांक १ नव्हेंबर २०१० Express Money Supplement

No comments: