Monday, November 22, 2010

माझं Tweet.....वाह ताज! वाह टाटा!!

२२ नोव्हेंबर २०१०: गेल्या आठवड्यात सर. रतन टाटांनी गौप्यस्फोट केला की दहा वर्षांपुर्वी त्यांनी घरी बसणं पसंत केले पण १५ कोटीची लाच देऊन स्वत:ची एअरलाईन्स सुरु केली नाही.  त्या नंतर लगेचच पंतप्रधान मन मोहन सिंग यांना सुद्दा टेलिफोन घोटाळा प्रकरणी टीका सहन करावी लागली म्हणुन मी थोडा बेचैन होतो.   असो.  लोकसत्ताचे श्री. सुधीर जोगळेकरांनी "ब्रॅण्ड ताज" या शीर्षकाखाली रतन टाटांनी त्यांच्या "द ताज पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट" फंडाने घरोघरी जाऊन दोन कोटींच्या वर रक्कम २६ नोव्हेंबर २००८च्या दहशतवादी हल्यामधे होरपळलेल्या मुंबईच्या दुर्दैवी कुटूंबीयांना दिली, त्याची संपुर्ण माहिती कालच्या रविवार लोकसत्ता पुरवणीत दिली आहे.   त्यातील काही भाग इथं देत आहे.    एक व्यक्ती!  अनेक आदर्श!  सर. रतन टाटांच्या या कामगिरीला संपुर्ण देशाचा मनापासुन सलाम! 

मनोज ठाकूर. वय र्वष २९. कुलाबा कॉजवेजवळच्या ताज समूहाशेजारी असलेल्या एका छोटय़ा दुकानात काम करणारा तरुण.  लिओपोल्ड कॅफेत झालेल्या गोळीबारात जखमी झालेला. त्यानं आजवर ताजबद्दल फक्त ऐकलं होतं की तिथं  चहाचा कप ९०० रुपयांचा असतो.  आपण असा एखादा चहाचा कप पिणं सोडून द्या, नुसता पाहू तरी शकू का, असा प्रश्न त्याला पडत असे.. ....२६/११ला जखमी झालेल्या मनोजला उपचारादाखल द ताज पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट फंडानं पहिले सहा महिने दरमहा ५००० रुपये दिले.   मनोज बरा झाला. ताजनं त्याला तीन महिन्यांचं प्रशिक्षण दिलं.   नंतर ताजच्याच फूड अ‍ॅण्ड बीव्हरेजेस विभागात स्टायपेंडवर मनोजला नोकरी लागली.  ट्रस्टनं त्याच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तर उचललीच आहेच, पण त्याच्या शिक्षिका पत्नीला पुढचं शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्तही केलं आहे....

*********
महमद अयुब अन्सारी हा मनोजसारखाच एक उमदा तरुण.  रस्त्याकडेला फुटकळ विक्री करणारा.  २६/११ला तोही फायरिंगमध्ये जखमी झाला.  त्याला सामान्य उपचारांनंतर प्लास्टिक सर्जरीचा खर्च ट्रस्टनं केलाच, पण मनोजप्रमाणेच त्यालाही तीन महिन्यांचं प्रशिक्षण दिलं. तोही आता ताज प्रेसिडेंटमध्ये वेटरचं काम करतो.....
*********
वीस वर्षांचा शाहबाज झुबेर महमद टॅक्सीच्या स्फोटात जखमी झाला.  त्याचे वडील डॉकयार्डमध्ये नोकरी करणारे; त्यामुळे शाहबाजवर काही घर अवलंबून नव्हतं.  पण त्याच्या उपचारासाठी ट्रस्टकडून दरमहा जे पाच हजार रुपये मिळाले, त्याचा उपयोग किमानपक्षी वैद्यकीय मदत करता येण्यासाठी तरी झाला. हुस्नबानू ही शाहबाजची आई. तिचं हृदयाचं ऑपरेशन अलीकडेच झालं होतं. ते करण्यासाठी झुबेरजींनी जे दोन लाखांचं कर्ज काढलं होतं, त्याचेच हप्ते इतके जाचकहोते, की प्रत्यक्षात निम्माच पगार झुबेरजींच्या हातात पडत होता. ‘पण स्फोटानंतर कधीतरी काही माणसं आली.  त्यांनी शाहबाजविषयी चौकशी केली.  त्याच्या उपचारांविषयी जाणून घेतलं.  आम्ही सगळेच अशा धक्क्यात होतो, की आलेली माणसं कोण आहेत, ती कशाकरता चौकशी करताहेत, हेही विचारण्याचं आम्हाला सुचलं नाही,’ हुस्नबानू सांगत होत्या.. ‘काही दिवसांनी दरमहा पैसे यायला लागले तेव्हा कळलं की, चौकशी करून गेलेली माणसं ताज ट्रस्टची होती.....प्राथमिक उपचारांनंतर शाहबाजला वांद्रय़ातील ताज लॅण्डस एण्डमध्ये नोकरी देण्यात आली. पण तो जेमतेम दोनच महिने कामावर जाऊ शकला. तो एवढा अशक्त झाला होता, की नोकरीवर जाणंच काय, साधं घराबाहेर पडणंही त्याच्यासाठी अवघड होतं. आता तो बरा आहे. ताजनं त्याला आता ताज प्रेसिडेंटमध्ये नोकरी देऊ केली आहे..
*********
रामचंद्र नायर. वय र्वष तीस. केरळमधल्या पलक्कडचा रहिवासी.   लिओपोल्ड कॅफेजवळच्या भावाच्या दुकानात तो काम करत असे. कसाबनं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बेधुंद गोळीबारात उजव्या पायाला लागलेल्या एका गोळीनं रामचंद्र जखमी झाला. दहा दिवस रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. पण त्यानंतरही तीन महिने उपचार सुरू होते. भरपाईदाखल मिळालेले पैसे आणि ट्रस्टकडून मिळालेले दरमहा खर्चाचे पैसे यातले काही पैसे वाचवून रामचंद्रनं आपला धंदा वाढवायचा, असा निर्णय घेतला. फोर्टमध्येच त्यानं १८ हजार रुपये भाडय़ानं एक गाळा घेतला. अंडय़ांचा होलसेल धंदा सुरू केला. ट्रस्टनं त्याला ९१,००० रुपयांची मदत दिली. आज रामचंद्र स्वत:च्या पायांवर उभा आहे. ताजचं किचन त्याच्या अंडय़ांसाठी मोठं गिऱ्हाईक बनलं आहे.....
*********
मोमिमा खातून ही गोवंडीच्या झोपडपट्टीत राहणारी एक मध्यमवयीन निरक्षर महिला. महमद उमर हा तिचा पती.. घरातला एकमेव कर्ताधर्ता. रोज कमवायचं आणि पोट भरायचं. गाठीशी बचत अशी नाहीच. महमदव्यतिरिक्त घरात ती आणि तिची तीन लहान कच्चीबच्ची. गरिबीचे चटके इतके भीषण; परंतु तिला त्याचं फारसं सोयरसुतक नसावं. ती आपल्या सांसारिक आनंदात मश्गुल. २६ नोव्हेंबरचा हल्ला झाला, सारं वातावरण भयकंपित झालं, पण मोमिमाला त्याचा पत्ताच नव्हता. रोजच्यासारखा संध्याकाळी सात वाजता टॅक्सी चालवायला घराबाहेर पडलेला महमद दुसऱ्या दिवशी घरी परतलाच नाही.   वाट पाहून पाहून शिणलेल्या मोमिमाला खबर मिळाली ती नवऱ्याच्या मृतदेहाची. जी टॅक्सी तो चालवत होता, तिच्यातच स्फोट झाला होता आणि त्या बिचाऱ्याला प्राण गमवावे लागले होते. घराचं भाडं सोळाशे रुपये आणि दोन वेळच्या जेवणाखाणासाठी लागणारी रक्कम कुठून उभी करायची, हा प्रश्न तिच्यापुढे आ वासून उभा राहिलेला. पोटात आणखी एक मूल होतं. त्याचीही जबाबदारी तिला अस्वस्थ करून टाकत होती. पण ट्रस्टनं मदतीचा हात पुढे केला. दरमहा दहा हजार रुपये असे सत्तर हजार रुपये तिला ट्रस्टनं दिले. ‘हे पैसे मिळाले नसते तर आत्महत्या करण्यावाचून कोणताच दुसरा पर्याय माझ्यापुढे नव्हता,’ असं म्हणणारी मोमिना आता ट्रस्टनंच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली असल्यानं आशादायी आहे..
*********
राजकुमारीची कहाणी४१ मोमिनासारखीच. तिचा नवरा मृत्युमुखी पडला तो सीएसटी स्थानकावरच्या अंदाधुंद गोळीबारात. त्या परिसरात तो भेळपुरी विकायचा. त्यालाही चार मुली. मोठी १८ वर्षांची. ‘ट्रस्टनं माझ्या आईला प्रशिक्षण द्यायची इच्छा बोलून दाखवली, पण नशीब आडवं आलं..’ ती सांगते. कधीच घराबाहेर न पडलेल्या राजकुमारीला मानखुर्दहून तासभराचा रेल्वेप्रवास करून प्रशिक्षणासाठी जावं लागे. पण ते तिला झेपलं नाही.    राजकुमारीचा नवरा शिवशंकर गुप्ता दिवसाला १५० ते २०० रुपये कमावत असे. त्यात त्यांचा संसार चाले. पण आता तेही उत्पन्न नसताना खोलीचं १२०० रुपये भाडंही कसं द्यायचं, हा राजकुमारीला पडलेला अवघड प्रश्न. नीलम तिच्या मोठय़ा मुलीचं नाव. ट्रस्टनं दिलेल्या मदतीनं ती एकदम भारावून गेली होती. ताजशी काडीचाही संबंध नसताना ट्रस्टनं त्यांच्या कुटुंबाची ज्या प्रकारे जबाबदारी उचलली आहे, त्यानं ती विलक्षण गहिवरून गेली आहे..
*********
सुनू वर्गीज आणि अ‍ॅग्नेस प्रेसिल्ला मार्टिस या ताज ट्रस्टच्या आणखी दोघी लाभार्थी. परवा-परवापर्यंत दोघी एकमेकींना ओळखतही नव्हत्या. पण २६ नोव्हेंबरची दुर्घटना घडली आणि दोघींनाही समान दिव्यातून जावं लागलं. सुनूचा नवरा व्हर्गीज थॉमस ताजमधल्या वसाबी या जपानी रेस्टॉरंटचा सीनियर कॅप्टन होता, तर अ‍ॅग्नेसचा नवरा फॉस्टिन मार्टिस सी लाऊंजमध्ये सीनियर कॅप्टन होता. व्हर्गीजनं गोळीबारात सापडलेल्या अनेकांचे प्राण वाचवले, पण त्या प्रयत्नांत तोच अतिरेक्यांच्या गोळीचं लक्ष्य बनला. फॉस्टिनची मुलगी प्रियादेखील ताजमध्येच कॉम्प्युटर सेक्शनला नोकरी करणारी. दहशतवाद्यांनी ताजचा ताबा घेतला, गोळीबार सुरू केला, हे फॉस्टिनला कळलं तेव्हा आत अडकलेल्या प्रियाला सोडवण्यासाठी तो मागच्या दारानं आत घुसला. पण अतिरेकी नेमके कुठे लपले आहेत, याचा अंदाज न आल्यानं तोच त्यांच्या टप्प्यात आला आणि ठार झाला. ३३ तासांनी प्रिया सुखरूप बाहेर आली, पण दुर्दैवानं तिला पाहावं लागलं ते फॉस्टिनचं छिन्नविच्छिन्न झालेलं शव.

ताज ट्रस्टनं सुनू आणि अ‍ॅग्नेसला भरपाईदाखल मोठी रक्कम दिलीच, पण दोघींच्याही नवऱ्यांना शेवटच्या महिन्यात मिळालेल्या पगाराइतकी रक्कम आयुष्यभर मिळत राहील अशीही व्यवस्था करून दिली. याशिवाय दोघींच्याही मुलांचा विमा उतरवणं, त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची कायमची तरतूद करणं अशाही काही गोष्टी ट्रस्टनं परस्पर केल्या आहेत. ताजनं केलेल्या या मदतीनं दोघी भारावून गेल्या आहेत. पण त्याहीपेक्षा त्या सद्गदित झालेल्या दिसल्या त्या साक्षात् रतन टाटांनी दोघींचे हात हातात घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना धीर दिला तेव्हा. सुनू आणि अ‍ॅग्नेस आता ट्रस्टसाठी काम करणार आहेत. नि:शुल्क..
*********
या दहशतवादी हल्ल्याचं मुख्य लक्ष्य होतं- छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन, हॉटेल लिओपोल्ड, ताज इंटरनॅशनल, हॉटेल ट्रायडंट आणि छाबड हाऊस.. यातलं छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन तर अवघ्या चार तासांतच प्रवाशांसाठी खुलं झालं होतं. लिओपोल्डनंदेखील गोळीबाराच्या खुणा अंगावर वागवत पुढील काही दिवसांत कामकाज सुरू केलं होतं. पण ट्रायडंट, ताज इंटरनॅशनल सुरू व्हायला मात्र र्वष- सव्वा वर्षांचा अवधी जावा लागला होता. आणि छाबड हाऊस तर अजून पूर्णाशानं सुरूही झालेलं नाही. गेल्याच महिन्यात ताजनं आणि त्याच्याही काही दिवस आधी ट्रायडंटनं साऱ्या दुरूस्त्या पूर्ण करून आपले नित्याचे व्यवहार नव्यानं सुरू केले आहेत..
*********
२६ नोव्हेंबरच्या त्या हल्ल्यात मृत वा जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करण्याचं काम टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसची मुलं पहिल्या दिवसापासून करत होती, हेच मुळी फार थोडय़ा लोकांना माहीत आहे. सुमारे चारेकशे कुटुंबांशी त्यांचा संपर्क होताच, पण कुठल्या ना कुठल्या यंत्रणेद्वारे त्यांना मदत मिळते आहे की नाही, याकडेही त्यांचं लक्ष होतं. सरकारी यंत्रणा कशा कमकुवत, कुचकामी ठरताहेत, हे दाखविण्याचा उद्देश त्यामागे नव्हता, तर अशा यंत्रणांकडून मिळणारी मदत ही तात्पुरती असते, हे ध्यानात घेऊन या आपदग्रस्तांसाठी कायमस्वरूपी असं काय करता येईल, याची चाचपणीही त्यातून केली जात होती.

या कुटुंबांना केवळ आर्थिक मदतच हवी होती असं नाही. घरातली कर्ती व्यक्ती गेल्यामुळे पोटापाण्याची भ्रांत तर होतीच, पण भरमसाट खर्चाच्या वैद्यकीय उपचारांसाठी, कायमच्या आलेल्या अपंगत्वातून मार्ग काढत भविष्याची बांधणी करण्यासाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठीही साहाय्याची गरज होती. चार पैसे मिळवण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही, हातपायदेखील हलवू शकत नाही, याचं शल्य मनात असल्यानं या आपदग्रस्तांना आलेलं मानसिक दौर्बल्य विलक्षण होतं. ते दूर करून त्यांना विश्वास देण्याची, त्यांच्या मनात सकारात्मकता जागवण्याची खरी गरज होती. प्रशिक्षित कौन्सेलर्स घरोघरी पाठवून टाटा उद्योगसमूहानं दुसरीकडे तेही काम सुरू केलं होतं. अर्थात हे सारं सुरू झालं होतं अशा काळात, की जेव्हा बहुतांश यंत्रणा हा हल्ला झाला कसा, त्याला जबाबदार कोण, हल्लेखोरांमागे कोण होतं, सुरक्षाव्यवस्था कुठे आणि कशा कमी पडल्या, याचीच चर्चा करण्यात गुंतून पडल्या होत्या तेव्हाच. हल्ला झाल्यानंतर खरं तर काही मिनिटांतच रतन टाटांनी सूत्रं हाती घेतली होती. टाटा उद्योगसमूहातल्या निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे दूरध्वनी गेले होते आणि सारी ज्येष्ठ मंडळी ताजमध्ये गोळा झाली होती. जीव धोक्यात असताना स्वत: रतन टाटा घटनास्थळी हजर आहेत, हे पाहून सर्वात खालच्या स्तरातील कर्मचाऱ्यालाही स्फुरण आलं होतं. आतील जिवंत सहकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याबरोबरच मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणं- ही सारी कामं ताजच्या सुरक्षा यंत्रणेनं सुरूही केली होती. रतन टाटा इथेच थांबले नव्हते, त्यांनी पुढली जुळवाजुळवही सुरू केली होती. नैसर्गिक आपदा आल्या की मदतीचा हात पुढे करणारे, पुनर्वसन कार्यात प्रत्यक्ष वाटा उचलणारे अनेक उद्योग, अनेक आर्थिक आस्थापना आजवर भारतानं पाहिल्या होत्या. पण त्यांचं काम मर्यादित राहिलं होतं ते तेवढय़ापुरतंच.

या पाश्र्वभूमीवर ताज पब्लिक सव्‍‌र्हिस वेल्फेअर ट्रस्ट स्थापन झाला होता. भारताच्या स्वातंत्र्योत्तरच काय, स्वातंत्र्यपूर्व औद्योगिक इतिहासातही अशा प्रकारचं अनोखं पाऊल आजवर कुणी उचललेलं नव्हतं. तीन दिवस आणि तीन रात्र दहशतवादी हल्ल्याचं सावट ताजवर टिकून होतं. त्या तीन दिवसांतच ट्रस्टची पूर्ण आखणी पार पडली होती. काय करायचं, याचा आराखडा तयार झाला होता. उद्ध्वस्त झालेला ताजचा अंतर्गत भाग पूर्ववत करण्यासाठीच वर्ष लागणार होतं. या काळात हॉटेल चालवणंच मुष्किल होतं. दुसरं कुणी असतं तर मोजकी संख्या वगळता सर्व १७०० कर्मचाऱ्यांना ले ऑफ देऊन घरी बसवणंच व्यवस्थापनानं पसंत केलं असतं. पण टाटांनी संपूर्ण ताजमधल्याच नव्हे, ताज हेरिटेजमधल्याही एक हजार कर्मचाऱ्यांपैकी कुणालाच घरी बसवणं उचित मानलं नाही.

सर्वाचं सहकार्य घेण्यात आलं. पोलीस आणि कलेक्टर कचेरीतून मृत आणि जखमींची संपूर्ण यादी मिळवण्यात आली. टाटा समूहातल्या १२ जणांना प्राण गमवावे लागले होते, तर नऊजण गंभीर जखमी झाले होते. टाटाचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याच नव्हे, इतरांच्याही घरी गेले. काही ठिकाणी स्वत: रतन टाटाही गेले. त्यांनी टाटा समूहातल्या आपदग्रस्तांची भेट घेतलीच, पण समूहाशी संबंधही नसलेल्या अनेकांच्या घरी ते गेले. एक कॉर्पस तयार करण्यात आला. त्यात टाटा उद्योगसमूहानं पैसे घातलेच, पण समूहातल्या कर्मचाऱ्यांनीही आपला वाटा उचलला. एचडीएफसीनं त्यात सहभाग घेतला. अन्यही काही कंपन्यांनी आणि ट्रस्टनी त्यासाठी भरघोस देणग्या दिल्या.

गेल्या पावणेदोन वर्षांत या ट्रस्टमधून १३८ कुटुंबांना मदत केली जात आहे. टाटा उद्योगसमूहाशी थेट वा अप्रत्यक्ष संबंध नसणाऱ्या कुटुंबांना त्यातून आजवर सव्वादोन कोटीची मदत केली गेली आहे. टाटांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना केली गेलेली मदत वेगळीच. गेल्या वर्षभरात ट्रस्टकडे नऊ कोटीहून अधिक रकमेच्या देणग्या जमा झाल्या आहेत. २६ नोव्हेंबरचा हल्ला आणि त्या हल्ल्यानं उद्ध्वस्त केलेल्या जनजीवनाचं पुनस्र्थापन हे ट्रस्ट- स्थापनेमागचं उद्दिष्ट होतंच; परंतु आता केवळ तेवढय़ापुरतं ट्रस्टनं आपल्याला सीमित ठेवलेलं नाही. मानवनिर्मित वा निसर्गनिर्मित आपदा नेहमीच येत असतात. त्यात होरपळलेल्या सामान्यांना सावरण्याचे प्रयत्न सरकार वा खाजगी यंत्रणांकडून होत असतात. पण त्या प्रयत्नांत जी भरपाई दिली जाते ती इतकी तुटपुंजी असते, किंवा इतक्या विलंबानं मिळते, की ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असं म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर येते. अनेकदा ही भरपाईची रक्कम जखमेवर मीठ चोळणारीच असते. त्यामुळेच मदतीचा हात पुढे करण्यापूर्वी टाटांनी चार वेळा विचार केला. एकदा काही दिलं आणि हात मोकळे करून घेतले, असं होऊ न देता ही मदत दीर्घकाळासाठी होत राहावी, कर्ता माणूस गेलेल्या घराला पूर्ण सावरण्यासाठी त्या मदतीचा उपयोग व्हावा आणि मदत करताना ‘हा आपला, तो परका’ असा विचार होऊ देऊ नये, हा कटाक्षही राखला. पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट टाटांनी मनात पक्की ठेवली. हिंसेचं थैमान, नैसर्गिक संकटं किंवा सार्वजनिक मालमत्तेला हानी पोचवणारी एखादी गंभीर घटना घडताच ट्रस्टनं मदतीचा हात पुढे करावा, असं सूत्रही ठरवून दिलं. त्यामुळेच असेल कदाचित, बिहारमध्ये अलीकडेच झालेल्या वादळात आणि आगीत जी ३०७ कुटुंबं होरपळून निघाली, त्यांना ट्रस्टनं तातडीने मदत देऊ केली.

ट्रस्ट स्थापन करण्याची कल्पना रतन टाटांची असली तरी ही कल्पना एका रात्रीत, एका गंभीर घटनेनंतर मनात आलेली नाही. ती मनात येण्याची व ती सहकाऱ्यांच्याही मनात रुजवली जाण्याची प्रक्रिया टाटा उद्योगसमूहात गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून अबोलपणे घडते आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे उद्योगसंस्कृतीने त्याला दिलेलं अलीकडचं नाव. पण ते कुणाच्याही स्वप्नातदेखील नव्हतं तेव्हापासून टाटा उद्योगघराण्यात ते जपलं जात आहे.

* * *

ताज पब्लिक सव्‍‌र्हिस वेल्फेअर ट्रस्टनं ज्या अनेक अनोख्या मदत-सुविधांसह वाटचाल सुरू केली त्यातला एक पैलू होता- ज्यांची बॅंक खातीही नाहीत, अशांना बॅंकांत खाती उघडून देऊन ती कशी हाताळावीत याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्याचा. दीर्घ मुदतीची उपाययोजना म्हणून ट्रस्टनं लोणावळ्यातील आयटीआयमध्ये कौशल्याधारित प्रशिक्षणाचा एक अभ्यासक्रम सुरू करायचं ठरवलं आहे. हाऊसकीपिंग, रेस्टॉरंट सव्‍‌र्हिस, फूड प्रॉडक्शन, हायजिन असे अनेक पूरक अभ्यासक्रम तिथे शिकवले जातील आणि यशस्वी विद्यार्थ्यांपैकी २५ टक्क्यांहून अधिकांना ताजच्याच हॉटेल्समध्ये सामावून घेतले जाईल.. ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या आणि रतन टाटांच्या मनात एक गोष्ट स्पष्ट आहे. त्यांनी म्हटलं आहे- आपण ही मदत केवळ कर्मचाऱ्यांच्या वा भागधारकांच्या सहानुभूतीसाठी करीत नसून, गेल्या शंभर वर्षांत भारतात उद्योग उभे करीत असताना या देशानं, या मातीनं, या समाजानं आपल्याला जे दिलं त्याची काही अंशी परतफेड करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे, इतकंच.

(संदर्भ अंश - द वीक, ३ ऑक्टोबर २०१०)

4 comments:

Fort Arnala said...

Tata is Tata ,any moment,
there are lot of things that we must learn from Tata's,
What they have done is little taller than their image, asusual,
NEVER SAY TATA IS,
CERTAINLY TATA.
Now I don't understand why readers fail to post comments on such topics,
if it's only cause of Non Marathi surname,then it's time to understand,he is more marathi,than one who carries his Marathi surname with pride and do nothing for them,
readers have heart to accept the best,and learn to understand the best.
Thats what Nitin is trying,
keep you heads out of HELMET.

Fort Arnala said...

AND HEARTS OPEN,
MINDS FREE FOR ACCEPTING ALL THAT IS THE BEST,
NOT ONLY BUT EVERYTHING LIKE TATA,
NEVER SAY TATA TO TATA'S.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

Thanks for your straight and objective comment. I am sure the current generation is quite open and also frank to accept the reality of life.

MeeKuchin said...

Kudos to TATA's. TATA really forms the best Indian Corporate house. They have always tried to do the right thing without making any fuss.