Sunday, December 26, 2010

माझं Tweet.....जन.गण.मन - राष्ट्रगीताचे शताब्दीवर्ष!

२६ डिसेंबर २०१०:   माझी शाळा Sampson English High School एक इस्राईली बाईने म्हणजे Late S. S. Sampsonने सुरु केली.  तिला आम्ही "Madam" म्हणतं असु.   शाळेत रोज सकाळी "जन.गण.मन" हे राष्ट्रगीत म्हटंल्यानंतरच वर्ग सुरु होत.    माझी मॅडम राष्ट्रगीताच्या प्रत्येक शब्दाच्या उच्चराबद्दल खुपच आग्रही असायची.  मला  आठवतं एकदा त्यातील काही  शब्द  आमच्या  कडुन नीट न उच्चारल्यांमुळे जवळ जवळ सात ते आठ वेळा आमच्या कडुन संपुर्ण जन.गण.मन तिने म्हणुन घेतलं होते.   बाई खुपच कडक शिस्तीची.  शाळेत लेट झालो की पायावर केनचे फटके. तुमचा विश्वास बसणार नाही पण रोज सकाळी शाळेतील प्रत्येक  विध्यार्थी तिच्या समोरुन वर्गात जाणार, मग ती आमचे कपडे, बुट, बॅग, डोक्यावरचे केस, सगळं तपासुन ती आम्हाला वर्गात सोडतं.   आज अशी शिस्त ऎकायला सुद्दा मिळतं नाही.   शाळेपेक्षा मला माझ्या मॅडमची खुप आठवण येते.   अजुनही मी स्वपनात किती वेळा तिच्या हातुन पायवार केनचे  फटके खातो.   आजही केस कापताना कानावरचे केस कमी कर हे मी नाव्याला सांगायला विसरत नाही.   मॅडमच्या प्रत्येक फटक्याने मी घडत गेलो.   तिच्या आठवणीने मन परत शाळेत जातं...... ...... असो.
आज अचानक जन.गण.मन आठवण्याचे कारणं म्हणजे दैनिक लोकसत्ताच्या आजच्या अंकातली ही बातमी........ ...राष्ट्रगीता बद्दलची माहिती आपल्याला असलीच पाहिजे म्हणुन हे आजचं माझं Tweet.

"राष्ट्रगीताचे शताब्दीवर्ष उद्यापासून.....

कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात २७ डिसेंबर १९११ रोजी रवींद्रनाथ टागोरांनी ‘जन गण मन’ या प्रार्थनागीताचं गायन केलं.   त्या घटनेच्या शताब्दीला सोमवारी सुरुवात होत आहे. मातृभूमीबद्दल नितांत प्रेम ऐकणाऱ्याच्या मनात सहज निर्माण करून भारताचा नकाशा क्षणार्धात डोळ्यासमोर उभे करणाऱ्या या गीताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० साली राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला.हे गीत बंगाली भाषेत आहे. पण ही बंगाली संस्कृतप्रचुर असल्यामुळे भाषिक अडसर दूर करून ते सहजतेने सर्व भारतीयांच्या ओठावर खेळते. किंबहुना हे गीत बंगालीत आहे हे लक्षातही येत नाही.


‘वंदे मातरम्’ प्रमाणे या गीताची पण एकूण पाच कडवी असून उरलेली चार म्हटली जात नाहीत. रवीद्रनाथांच्या गीतातील ‘भारत भाग्यविधाता’ आणि ‘अधिनायक’ या दोन शब्दांवरून तेव्हा वादळ उठले होते. हे शब्द पंचम जॉर्जला उद्देशून आहेत असे टीकाकारांचे म्हणणे होते. कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हे गीत म्हटले गेले. भारतभेटीवर असलेल्या पंचम जॉर्जचे स्वागत करणारा ठराव त्या दिवशीच्या कार्यक्रमपत्रिकेवर होता. या ठरावामुळे हे गीत ब्रिटनच्या राजासाठीच लिहिले गेले असा समज झाला.

इंग्रजी वृत्तपत्रांनी या गैरसमजात भर घातली. ‘राजाचे स्वागत करण्यासाठी म्हणून लिहिलेले विशेष गीत बाबू रवींद्रनाथ टागोर यांनी गायले’ असा स्टेटस्मन या वृत्तपत्राचा मथळा होता. इंग्लिशमन या वृत्तपत्रानेही अशाच आशयाचा मथळा दिला.

असा गैरसमज निर्माण होण्याचे एक कारण होते. ‘जन गण मन’च्या बरोबरच रामभुज चौधरी यांनी लिहिलेले ‘बादशाह हमारा’ हे हिंदी गीत त्यावेळी व्यासपीठावरून म्हटले गेले. ते पंचम जॉर्ज यांचे कौतुक करणारे होते. भाषिक व राष्ट्रीय वृत्तपत्रांनी या दोन गीतांमधील फरक नेमका टिपला होता.

‘ईशस्तवन करणाऱ्या बंगाली प्रार्थनेने काँग्रेसच्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर पंचम जॉर्ज यांच्यावर निष्ठा व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर बादशाहाचे स्वागत करणारे गीत म्हटले गेले’ असे अमृत बझार पत्रिकेच्या २८ डिसेंबर १९११ च्या बातमीत स्पष्ट म्हटले आहे.

काँग्रेस अधिवेशनाच्या इतिवृत्तातही हा फरक स्पष्ट करण्यात आलेला आहे. ‘काँग्रेस अधिवेशनात पहिल्या दिवशी वंदे मातरम म्हणण्यात आले. बाबू रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या देशभक्तीपर गीताच्या गायनाने दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

अधिवेशनाला शुभेच्छा देणारे संदेश वाचण्यात आले. त्यानंतर बादशाहावर निष्ठा दर्शविणारा ठराव मंजूर झाला व पंचम जॉर्ज व राणी मेरी यांचे स्वागत करणारे गीत गाण्यात आले’, असे या इतिवृत्तात म्हटले आहे.

हा वाद बराच काळ चालू होता. १० नोव्हेंबर १९३७ रोजी रवींद्रनाथांनी आपले मित्र पुलीन बिहारी सेन यांना लिहिलेल्या पत्रात या गाण्याचा अर्थ उलगडला आहे. ‘पंचम जॉर्जसाठी मी गाणे लिहिणे शक्यच नव्हते. तशी विनंती मला झाली होती हे खरे, पण त्यानेच मी क्षुब्ध झालो व युगानुयुगे भारताचे सारथ्य करणाऱ्या त्या ‘भाग्य विधात्या’चे विजयगीत मला स्फुरले. असंख्य अडीअडचणीतून भारताला मार्ग दाखविणाऱ्या ईश्वराचा मी उल्लेख केला होता, कोणा पंचम जॉर्जचा नव्हे. गाणे लिहिण्याची विनंती करणाऱ्या माझ्या मित्रालाही हे कळले होते’ असे रवींद्रनाथांनी म्हटले आहे.

सरकारी नोकरीत असलेल्या आशुतोष चौधरी यांनी रवींद्रनाथांना ही विनंती केली होती. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लगेचच ‘सर’ ही पदवी परत करण्याची हिम्मत दाखविणारे रवींद्रनाथ पंचम जॉर्जची आरती ओवाळणे शक्यच नव्हते. तरीही वाद सुरू राहिला.

मूळ गीत पाच कडव्यांचे आहे. त्या प्रत्येक कडव्यातील एक ओळ घेऊन ती पंचम जॉर्ज संबंधी कशी आहे हे दाखविण्याचे उद्योग करण्यात आले. त्याचा सडेतोड प्रतिवाद अनेकांकडून करण्यात आला. अर्थात हा सर्व वाद अत्यंत सुसंस्कृत पद्धतीने, जाळपोळ वा बहिष्काराची भाषा न वापरता झाला. गाण्यात फक्त पंजाब, सिंध, गुजरात, मराठा असे शब्द आहेत.

ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली हे प्रदेश होते. अन्य प्रदेशांचा टागोरांनी का उल्लेख केला नाही असाही सवाल करण्यात आला. त्यावर ‘द्राविड’ या एकाच शब्दात संपूर्ण दक्षिण भारत टागोरांनी वर्णिला आहे व ‘जलोधी’ या शब्दातून समुद्रवलयांकित हिंदुस्तान ध्वनित होतो हे दाखवून देण्यात आले. ‘सिंध’ आता पाकिस्तानात असल्याने त्याच्या जागी काश्मिर हा शब्द घालावा अशी मागणी २००५ मध्ये करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली.

वाद होण्यापूर्वी ‘जन गण मन’ हे ब्राह्मो समाजाचे प्रार्थनागीत म्हणून काही मोजक्या लोकांमध्येच म्हटले जात होते. टागोर संपादित ‘तत्व बोध प्रकाशिका’ या ब्राह्मो समाजाच्या जर्नलमध्ये ते प्रसिद्ध झाले होते.

डॉ सुरेश चांदवणकर यांनी याबाबत महत्वाची माहिती ‘लोकसत्ता’ला पुरविली. रवींद्रनाथांच्या आवाजात हे गीत ग्रामोफोन कंपनीनं मुद्रित केलं होतं. त्याचं पहिलं कडवं इंटरनेटवर यू टय़ूबवर ऐकायला मिळतं. ती चाल कविता वाचनासारखी आहे. विश्वभारती म्युझिक बोर्डच्या गायक वृंदानं एच.एम.व्ही. लेबलवर तर हरिपाद चॅटर्जीच्या समूहानं हिंदुस्तान रेकॉर्डवर हे गाणं टागोरांच्याच संगीतात मुद्रित केलं आहे.

आझाद हिंद सेनेच्या स्फूर्तीगीतांतही या गीताचा समावेश होता. दक्षिणेकडे के. अश्वत्थम्मांच्या आवाजात अमीरकल्याणी रागात ओडियन लेबलवर ऐकायला मिळतं. राजन सरकार यांच्या ‘सूरश्री’ वाद्यवृंदात कोलंबिया लेबलवर ते मुद्रित झालेलं आहे. १९४१ साली रवींद्रनाथ हे जग सोडून गेले.

स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीत निवडीच्या वेळी हे प्रार्थनागीत पुन्हा एकदा चर्चेला आलं व त्याच्या पहिल्या कडव्याची निवड २६ जानेवारी १९५० रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ग्रामोफोन कंपनीनं एक मिनिटाची कंठ व वाद्य संगीताची ध्वनिमुद्रिका आकाशवाणीसाठी बनवली. मात्र अपवादात्मक व विशेष प्रसंगीच ती रेडिओवर वाजवली जाते.

‘वंदे मातरम’ गीताच्या १२५ हून अधिक प्रकारच्या गायन वादनाच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. ‘जन गण मन’च्या मात्र आठ-दहाच आहेत. २००७ साली मात्र भारतबाला समूहानं राष्ट्रगीत गायनाचे व वादनाचे सर्व संकेत धुडकावून आघाडीच्या सर्व गायक, गायिका व वादकांकडून हे गीत गाऊन व वाजवून घेतलं आहे, असेही डॉ चांदवणकर यांनी म्हटले आहे..

इंग्रजी ‘जन गण मन’

या गीताबाबत आणखी एक मनोरंजक आठवण आहे. प्रसिद्ध आयरीश कवी जेम्स कुझिन यांच्या निमंत्रणावरून १९१८-१९ या काळात रवींद्रनाथ टागोर आंध्र प्रदेशातील मदनपल्ली या गावातील बेझंट थिऑसॉफिकल कॉलेजमध्ये राहिले होते.

प्रसिद्ध तत्वदर्शी जे कृष्णमूर्ती यांचे मदनपल्ली हे जन्मगाव. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी जन गण मन बसविले व जाहीर गायन केले. मदनपल्लीचा परिसर ऋषी व्हॅली म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील निसर्गसौंदर्य व प्राचीन वातावरण यांनी कविराजांना मुग्ध केले व तेथेच त्यांनी जन गण मनचे इंग्रजीत भाषांतर केले.

जेम्स कुझिनची पत्नी मार्गारेट ही पाश्चात्य संगीताची जाणकार होती. तिच्या मदतीने टागोरांनी इंग्रजी गाण्याचे नोटेशनही केले. टागोरांनी स्वत केलेले हे इंग्रजी भाषांतर त्या महाविद्यालयात आजही उपलब्ध आहे.
 
(सौजन्य दैनिक लोकसत्ता दिनांक २७ डिसेंबर, २०१०).

6 comments:

Fort Arnala said...

AMAR RAHE JAN GAN MANA AUR JAN GANATANTRA HAMAARAA.

Meena Lama said...

bharat maata ki jai....

Anonymous said...

उत्तम विषय निवडल्याबद्दल अभिनंदन !

shivnath said...

bharat mate chi jay ho,,,,,
lekin jan gana mana che raj karan karun rajkarni lokani tyacha khel karu nahe........

shivnath said...

bharat mate chi jay ho,,,,,
lekin jan gana mana che raj karan karun rajkarni lokani tyacha khel karu nahe........

shivnath said...

bharat mate chi jay ho,,,,,
lekin jan gana mana che raj karan karun rajkarni lokani tyacha khel karu nahe........