Sunday, January 16, 2011

माझं Tweet.....सचिन नंतर शतकं करणारे बेडेकर मसाले!

१६ जानेवारी, २०१०:   गेल्या ट्विट मधे आपण सचिनच्या शतकांच अर्धशतक साजरं केलं, उभ्या देशाने आणि समस्त मराठी माणसांनी त्याची पाठ थोपटली;  त्याच बरोबर  मागच्याच महिन्यात गिरगाव, मुंबई येथील "व्ही. पी. बेडेकर ऍण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेड" म्हणजे "बेडेकर मसाला" या उद्दोगसमूहाने साजरं केलेल शतक हे फार महत्वाचं आणि अभिमानास्पद आहे.   त्याची दखल घेणं आज जरूरी आहे.   मागच्याच वर्षी आपण दुबई स्थित मसाला किंग धनंजय दातार यांच कौतुक केलंच आहे. 

लोणची, मसाला आशी छोटी वाटणारी उत्पादनांचा देखील एक मोठा उद्दोगसमूह होऊ शकतो, आणि तो भरपुर पैसे देऊ शकतो हे त्या दोघांनीही जगाला दाखवून दिलं.   लिज्ज्त पापडचं उदाहरणं देखिल आपल्या समोर आहे.  या उद्दोगांची गंमत म्हणजे या उद्दोगांना कुठल्याही प्रकारच "रॉकेट सायन्स" लागत नाही की सोफेस्टिकेटेड टेकनॉलोजी;   मार्केटिंगच्या ब्रॅण्डिंगसाठी कुठल्याही सेलिब्रेटीवर करोडो रुपये खर्च करावे लागत नाही की, लाखोरुपयांची  प्लाण्ट आणि मशिनरी विकत घ्यावी लागत नाही.  अगदी छोट्या भांडवलावर, घरच्या घरी अगदी दोन माणसांच्या चार हातांनी हा उद्दोग सुरु करता येतो.   पण तुमची मेहनत संयमाच्या तेलात निमुटपणे मुरल्याशिवाय यशाच्या लोणच्याची चव तुम्हाला चाखता येणार नाही हे ही तितकचं खरं!   सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात स्वंय रोजगार निर्मिती करणाऱ्या अशा ह्या उद्दोगांची आपल्या देशाला जास्त गरज आहे!   
बेडेकर कंपनीचे डायरेक्टर वसंत बेडेकर यांची एक छानशी मुलाखत आजच्या सामना या दैनिकात आलेली आहे, ती माझ्या वाचकांसाठी देत आहे.   बेडेकरांची मुलाखत स्वप्ना पाटकरांनी "प्रवचनकार उद्दोगपती" या शिर्षकाखाली खुपच छान लिहीली म्हणुन ती तशीच्या तशीच देत आहे. 
"प्रवचनकार उद्दोगपती"
"मराठी माणसाला धंदा करता येत नाही असे आपण अनेकदा ऐकले असेल. हे ऐकून मला नेहमीच हसू यायचे, कारण धंदा करणे ही काही कुणा जातीची जहागिरी नाही. पण मराठी माणसाच्या रक्तात उद्योग करणे नाही असे म्हणणार्‍यांच्या तोंडाला टाळे लागेल असा शतकपूर्ती समारंभ, बेडेकर मसालेवाले या उद्योगसमूहाने साजरा केला. व्ही. पी. बेडेकर ऍण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर वसंत बेडेकरांना मी जेव्हा विचारले की ‘‘हा प्रवास कसा वाटला?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हा माझा एकट्याचा प्रवास नव्हता. माझ्या खापर पणजोबांपासून हा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही सगळे त्या माळेत गुंफत गेलो.’’ खरं तर सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी कोकणातील राजापूर तालुक्यातील गोवळी गावी बेडेकर घराणे उत्तम प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होते. धंद्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही पार्श्‍वभूमी नसतानाही कीर्तनकार बेडेकर उद्योजक झाले. धंदा करायचाच या निर्धाराने बेडेकरांनी मुंबईचा रस्ता धरला. गिरगावमधील मुगभाट गल्लीत, शांतारामाच्या चाळीत त्यांनी एक किराणा मालाचे दुकान थाटले. जागा भाड्याची होती, पण आपण नोकरी नाही करायची या विचारांचे असल्यामुळे ते ‘रिक्स’ घ्यायला तयार होते. वसंत बेडेकर सांगतात, लहानपणापासून ते या धंद्यात नसले तरी तो पाहण्यातच त्यांचे लहानपण गेले. शाळेत जाता-येता दुकानात जाणे व्हायचे. पुढे जाऊन हा धंदाच सांभाळायचा हेच त्यांना माहीत होते. बी.एस्सी झाली आणि लगेच धंद्यात पदार्पण हे सर्व ठरलेलेच होते. वडील 1960 मध्ये निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, पण आपल्या ज्येष्ठ बंधू त्र्यंबक बेडेकरांकडून त्यांना खूप काही शिकता आले व त्यांच्या जोडीने या उद्योगाला पुढे नेण्याची संधी मिळाली. लोणची बनवण्याची सुरुवात कशी झाली ही गंमतच आहे. वसंत बेडेकरांच्या वडिलांना खूप ताप आला होता. जिभेची चव गेली होती. शेजारच्या काकींनी लिंबाची फोड दिली. ते खाऊन जरा बरे वाटले. आपण असे लोणचे बनवून विकले तर? या प्रश्‍नाचे उत्तर आहे आजचे प्रसिद्ध ‘बेडेकर लोणचे’. 1 मार्च 1943 रोजी व्ही. पी. बेडेकर ऍण्ड सन्स खासगी कंपनी स्थापन झाली. ‘मसाले कुटून विकणे हे ब्राह्मणाचे काम नाही, त्यांनी फक्त वेदविद्या शिकवावी’ असा सल्ला देऊन त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांनी काम सोडले नाही. ते सांगतात, घर अगदी हाकेच्या अंतरावर असूनही घराकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. पण त्यांची पत्नी उषा यांनी घर सांभाळून त्यांच्या प्रगतीत फार मोठा सहभाग केला. सुरुवातीच्या काळात सकाळी आठ ते रात्री आठ दुकानावर ते बसलेले असायचे. आठवड्यात एक दिवस सुट्टी असायची, पण तीही अगदी नक्की नव्हती. या प्रवासात काही खूप कठीण अनुभव आले. त्यातला एक म्हणजे 13 मार्च 1993ला त्यांच्या ज्येष्ठ बंधूंचे झालेले निधन. ते फक्त भाऊ नसून वसंत बेडेकरांचे मित्र व गुरूही होते. ‘‘ब्रेन हॅमरेजने ते गेले आणि मला शेवटचे काही बोलताही आले नाही.’’ हे सांगताना त्यांचे डोळे आजही पाणावतात. त्यांच्या निधनानंतर व्यवसायात खूप उलथापालथही झाली. त्या काळात त्यांनी आपल्या मुलांनाही कामात थोडे लक्ष घालायला सांगितले. 1991 पर्यंत कंपनीत खूप भानगडी होत्या. त्याच काळात कामगारांची कमी झाल्यामुळे अचानक काम हळू झाले. मोठ्या प्रमाणात होणारे लोणचे, कामगार नसल्यामुळे फार छोट्या प्रमाणात बनू लागले. वसंत बेडेकर त्या काळात स्वत: लोणची बनवण्यात हातभार लावत.

वडाळ्याच्या फॅक्टरीत बनवून कुर्ल्यात ते ठेवले जायचे. 800 पिंप आंब्याचे लोणचे त्यांनी कुर्ल्यात ठेवले होते. 1991 मध्ये कुर्ल्यात पूर आल्यासारखे पाणी साठले. 13 जून हा दिवसदेखील त्यांना स्पष्ट आठवतो. त्यांचे 1,60,000 किलो लोणचे पाण्यात वाहून गेले. स्वत: कष्ट करून वाया गेलेले ते लोणचे त्यांना ‘धंदा’ या शब्दाचा अर्थ समजावते. यात फायदा-नुकसान सगळं आपलेच असते आणि ते हसत स्वीकारायचे असते. आज त्यांचे सुपुत्र अजित, अतुल व भाचा मानदार ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून बेडेकरांचे नाव मोठे करत आहेत. वाडा, वडाळा व कुर्ला येथे त्यांच्या फॅक्ट्ररी आहेत. आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, दुबई या आरोग्यविषयक दक्ष असणार्‍या देशातही बेडेकरांची उत्पादने गुणवत्तेच्या कसोटीवर उतरल्यामुळे लोकप्रिय आहेत. मसाले, पापड, लोणचीच नाही तर इतर अनेक प्रॉडक्टस्वर त्यांचे संशोधन सुरू असते. बेडेकर सांगतात, ‘आम्ही कोणताही शॉर्टकट घेत नाही. सचोटीचा एकच मार्ग आहे मोठे होण्याचा. वेळ आली तर माघार घेतो, पण खोटेपणा करत नाही’. एक प्रसंग त्यांनी सांगितला तो मला मनाला भिडला. त्यांनी ‘पापडाचे तयार पीठ’ हा पदार्थ विकण्याचे ठरवले. मसाला वगैरे सर्व तयार. बाजारात चौकशी केली तेव्हा कळले की याच पदार्थाला इतर कंपन्या अर्ध्या दरात विकत आहेत. त्यांना प्रश्‍न पडला की काटोकाट कॉस्टिंग केले तरी हे कमी किमतीला कसे विकतात? मग त्यांच्या लक्षात आले की हे तोच पदार्थ वेगळ्या नावाने विकतात. ‘आटा’ या नावाखाली विकून कर वाचवतात. म्हणून त्यांना परवडते. हे कळताच त्यांनी तो पदार्थ विकण्याचा विचार सोडला व माघार घेतली. खोटेपणाने पैसे कमावणार नाही हेच त्यांच्या आयुष्याचे गणित आहे.

वसंत बेडेकर यांना सामाजिक भानही तेवढेच आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवणे, शिक्षण संस्थांना मदत करणे ते आपले कर्तव्य समजतात. गिरगावात आपल्या स्वत:च्या वास्तूत, ऑफिसबाहेरील जागेत अलीकडेच सुरू केलेल्या ‘व्यासपीठ’ या संस्थेद्वारे ते दरमहा दोन कार्यक्रम आयोजित करतात. तसेच वर्षातून एकदा ‘मार्गशीर्ष’ महोत्सव हा एका आठवड्याचा सांस्कृतिक कार्यक्रमही ते आयोजित करतात. प्रा. राम शेवाळकर, वा. ना. उत्पात, किशोरजी व्यास यासारख्या अनेक विद्वानांची व्याख्याने यात झाली आहेत. वसंत बेडेकर सांगतात, ‘शंभरी’च्या कार्यक्रमात त्यांनी ‘शंभरी’ झालेल्या इतर कंपन्यांच्या मालकांचा सत्कार केला, म्हणजे आपणच बाबा मोठे अशी हवा कुणाच्याही डोक्यात शिरायला नको. आपण जे केले ते अनेकांचे आधी करून झाले आहे हे आपल्या सर्वांना कळावे हाच हेतू. मराठी माणूस, मराठी प्रॉडक्ट, मराठमोळी कंपनी आणि तीही गिरगावातली. वसंत बेडेकरांनी तर मराठी माणसाची निंदा करणार्‍यांचे शंभरी गाठून डायरेक्ट लोणचेच घातले. ते म्हणतात, मराठी माणसाने धंद्यात आलेच पाहिजे, तरुणाने मोठी स्वप्नं पाहून ती साकार करण्यासाठी तडजोड करायला हवी. गिरगावातले त्यांचे मुगभाट रस्त्यावरील ऑफिसला पोहोचण्याच्या गल्ल्या छोट्या आणि नागमोडी आहेत. पण बेडेकरांचे मन तेवढेच सरळ आणि मोठे. वसंत बेडेकरांना व त्यांच्या बेडेकर कुटुंबाला शतकपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रवचनकार उद्योगपती झाले, पण प्रवचन सोडले नाही याचे अभिनंदन!

साभार: दैनिक सामना दिनांक. १६ जानेवारी, २०१०.

4 comments:

Anonymous said...

मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देणाऱ्या अशा ह्या उद्दोगांच आपल्या देशाला जास्त गरज आहे. - This thought is the true substance so ..........full compliments

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

Thanks. I wonder whether I deserve any compliments, because unfortunately I dont see any serious efforts towards reducing unemployment?

Anonymous said...

Whose efforts r expected? By way of Adopting Sustainable Growth /Living models may change the scene ! .......:)

Fort Arnala said...

Well,it's not you to think of if you are fit for it or not,as even indirectly you are doing the supporting,moral boosting,and responding to readers ,this is the point where MARATHI OONTAAVARCHE MAANYVAR KOSALTAAT,
so you certainly have all ,overall rating "q",strength 5.
keep the spirits flying and soarind,aswell deep diving to claim unknown world.
ALL THE BEST,
Take Care.