Friday, April 29, 2011

’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे

लोकप्रभा दिनांक ६ मे २०११:  मराठी उद्योगपतींविषयी समज असा आहे की त्यांना व्यवसाय करता येत नाही, कारण धंद्यासाठी त्यांना लबाडी करता येत नाही! ही माणसं व्यवसायात पारदर्शक असतात आणि कुणालाही सहसा फसवित नाही. म्हणजे ‘विश्वासाहर्ता’ हा आपल्या समाजाचा ब्रॅण्ड आहे! आणि त्याच चांगल्या प्रकारे मार्केटिंग झालं तर मोठं यश मिळवता येऊ शकेल.
तसेच मराठी माणसं उद्योगधंद्यात मागे आहेत अशी एक सर्वसाधारणपणे सर्वाची समजूत झाली आहे. परंतु ही समजूत पूर्णत: खरी नाही. मराठी माणसे मोठय़ा संख्येने उद्योगात आहेत आणि यशस्वी उद्योजक म्हणून ते आज समाजात वावरत आहेत. गुजराती माणूस म्हटला म्हणजे तो उद्योगधंद्यातच असला पाहिजे अशी एक आपली समजूत. परंतु नोकरी करणारे गुजराती लोकही मोठय़ा संख्येने आहेत. तसेच मराठी उद्योजकांचे आहे. आता जशा नोकरीच्या संधी कमी होत चालल्या आहेत तसे मराठी तरुण स्वयंरोजगार, उद्योगधंद्याकडे वळत आहेत. पहिल्या पिढीतील उद्योजकांपुढे अनेक प्रश्न उपस्थित होतात. यात प्रामुख्याने भांडवल उभारणीपासून ते मार्केटिंग असे सर्व प्रकारचे प्रश्न त्यांना भेडसावत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्योजकाला सहजरीत्या, सोप्या भाषेत कॉर्पोरेट लॉयर नितिन पोतदार यांनी प्रगतीचा एक्सप्रेस वे या पुस्तकात उलगडून दाखविली आहेत. ‘महाराष्ट्र दिना’निमित्त या पुस्तकाच्या निमित्ताने नितीन पोतदार यांची घेतलेली खास मुलाखत.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पुढे दिसतो, पण त्या प्रगतीत मराठी समाज पुढे येताना दिसत नाही?

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश व्यापारी मुंबईला आले. त्यांच्या पाठोपाठ इतर शहरातले व्यापारी आले. परदेशी कंपन्या देखील आल्या. म्हणून इथल्या मराठी व्यापाऱ्यांना आणि उद्योगात असलेल्या मराठी माणसांना नकळतपणे एक मोठया स्पध्रेला तोंड द्याव लागलं. तसं इतर राज्यात किंवा शहरात झालं नाही. अशा स्पध्रेत मराठी व्यापारी आणि उद्योगपती मागे पडले. या बाहेरून आलेल्या उद्योगपतींकडे भक्कम भांडवलाचं पाठबळ होतं, हे विसरून चालणार नाही. त्याचबरोबर आपण ८० टक्के स्थानिकांनी नोकऱ्या मगितल्या, पण उद्योगात असलेल्या मराठी उद्योगपतींनी कुठल्याही प्रकारचं आरक्षण किंवा सवलती मागितल्या नाही.   नोकऱ्यांची मागणी आपण इतक्या आग्रहाने केली की आपल्यालाच असं वाटू लागलं की आपला समाज हा चाकरमानी आहे! पण आता परिस्थिती झपाटय़ाने बदलत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानामुळे स्वंयरोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपल्बध झाल्या आहेत आणि त्यात मराठी तरुण चांगलं काम करताना दिसतात.

Saturday, April 23, 2011

माझं Tweet.....नाशिकच्या "ग्रीन स्ट्रीट" नंतर पुण्याचं "ग्रीन बिल्ड"

२३ एप्रिल २०११:   गेल्याच आठवड्यात नाशिकचे प्राध्यापक सचिन पाचोरकरांची व त्यांचा शिष्य अविनाश इघे यांची मुंबईत भेट झाली.  त्यांनी तयार केलेल्या "ग्रीन स्ट्रीट" म्हणजे कॉर्पोरेट स्टाईलने नारळपाणी थंड करुन २५० एमएलच्या ग्लास मधुन थेट देण्याच्या संकल्पनेच तोंडभरुन कौतुक आपण करायला पाहिजे हे मी माझ्या ब्लॉग वरुन दिनांक २१ मार्च रोजी लिहिलेल होतं.   सचिन पाचोरकरांना हे करताना आलेले अनुभव म्हणजे मॅनेजमेंन्टचे किमान १०० नविन धडे होऊ शकतील.   तरी रसत्यावर उभं राहून नारळ विकायला मराठी तरूण मिळत नाही;  आपली मुल आठ तासांची शिपायाची नोकरी करतील, पण मालक बनुन पाच तास सुद्दा काम करणार नाही ही त्यांची मोठी खंत त्यांनी बोलुन दाखवली.   तरीही त्यांनी प्रयत्न सोडलेले नाही.   मी म्हटंल धीर सोडू नका!  त्यांचा व्यवसाय संदर्भात थोडी चर्चा झाली.  त्यांना शुभेच्छा देऊन मी त्यांचा निरोप घेतला, आणि ते नाशिकला परत गेले.    

ती बातमी ताजी असताना आज महाराष्ट्र टाइम्सने पुण्याच्या व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आणि कन्सल्टन्सीचा दोन दशकांचा अनुभव असणाऱ्या प्रदीप जोशी आणि शिल्पा जोशी यांनी "ग्रीन बिल्ड"  नावाने पाण्याचा शंभर टक्के बचत करणारी आणि वापरण्यास सोपी असणारी तसेच पर्यावरणपूरक उत्पादने विकसित करण्यात आलेल्या या उत्पादनांना पेटंट देखील मिळाले आहे.   त्यांचा रिपोर्ट खाली देत आहे.

मराठी तरूण हे उद्दोगात "ट्रेडिंग" पेक्षा "मॅन्युफ्कचरिंग" मधे जास्त काम करताना दिसतात, कारण त्यांच्या कडे टेक्निकल ज्ञान आणि कल्पनाशक्ती भरपुर असते;  कुठलाही प्रोजेक्ट प्रोफेशन्ली बाजारात  आणुन कमर्शियली यशस्वी करणं हे महत्वाच असतं.  त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे उद्दोगाच्या प्रत्येक क्षेत्रात म्हणजे भांडवल, मॅन्युफ्कचरिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग मधे प्रोफेशनल अप्रोच ठेवणं गरजेच आहे.

Tuesday, April 12, 2011

माझं tweet.....देशाला मंत्रमुग्ध करणारा जंतर मंतर!

१२ एप्रिल २०११:  "मंहगाई डायन खाई जात है!" या दोन ओळीत आमिर खानने देशभर लोकांच्या मनात भ्रष्टाचारा विरुध्द एक सुप्त आंदोलन पेटवलं होतं!  आज "अण्णा हजारें" दोन अक्षरी मंत्राने संपुर्ण देशाला त्या आंदोलनात उतरवलं!  या दोन अक्षरी मंत्राने देशातील सगळ्या राजकीय पक्षातील  सर्व मुरब्बी राजकारण्यांना "कामाला" लावलेल आहे!  त्यांची कायमची झोप उडालेली आहे!  त्यांचा थरकाप झालेला आहे.   एकीकडे अण्णांच्या तोंडात चुकुन देखिल आपलं नाव येऊ नये म्हणुन सर्व राजकीय़ धुरंधर तोंड लपवत फिरत आहेत!   तर दुसरीकडे देशातला प्रत्येक सामान्य नागरिक, कच्ची-बच्ची, तरूण-तरूणी,  लहानातला लहान आणि समाजातील सर्व थरातील माणसं "मी अण्णा हजारे" म्हणुन छातीठोकपणे मैदानात उतरत आहे!  मला वाटतं हेच या आंदोलनाच यश आहे!  म्हणुन अण्णांच आपण त्रिवार अभिनंदन करायला पाहिजे.  त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाच अभिनंदन करायला पाहिजे.

स्वातंत्र्यानंतर कितीतरी आंदोलन, मोर्चे, रथयात्रा, बंद, उपोषणं झाली असतील, पण आण्णांनी काल दिल्लीतल्या जंतर मंतर वरून जो मंत्र देशाला दिला व त्या नंतर जे या देशात घडलं ते फक्त अभुतपुर्व, अद्वितीय आणि उत्तुंग असचं म्हणाव लागेल!  देशात एक नव चैतन्य निर्माण झालं म्हणुन त्यांच कौतुक केलच पाहिजे.   आयुष्यभर राजकारण करणाऱ्या लोकांची या देशात कमी नाही.   गेल्या  ३० ते ४० वर्षात प्रत्येक निवडुणाक जिंकणारे आणि कायम कुठल्यातरी मंत्रीपदावर राहणारे महाभाग या देशात आणि खास करुन महाराष्ट्रात भरपुर आहेत.   त्यांना निवडुन येणं आणि मंत्रीपद मिळवणं म्हणजे "लोकमान्यता"  नव्हे हे अण्णांनी निर्विवादपणे सिद्द करून दाखवलं हे माझ्या मते फार महत्वाच आहे.   आपण काहीही करू शकतो, आपलं कोणीही काही वाकडं करू शकतं नाही;   सामान्य जनता म्हणजे मेंढर कशीही हाकावीत अशी गुरमी असणाऱ्यांना अण्णांनी देशासमोर शरमेने खाली मान घालायला लावली म्हणुन त्यांच कौतुक करावं तेवढ थोडं.

Sunday, April 3, 2011

माझं tweet.....धन्य तो धोणी!

३ एप्रिल २०११:    सगळ्यात प्रथम भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि त्याच्या संपुर्ण टीम चे आणि त्याच बरोबर संपुर्ण देशातील क्रिकेट प्रेमीचे त्रिवार अभिनंदन!  Nothing succeeds  like success!  अशी एक म्हण आहे.   आता सगळ विसरुन प्रत्येक खेळाडूंचे देशभर कौतुक होईल त्यात आपण सहभागी होऊया आणि आनंदाने उद्दा या मोठ्या यशाची गुढी उभारूया!      

मी १९८३ची वर्ल्ड कप मॅच संपुर्ण पाहिली होती; आणि कालची सुद्दा पाहिली.  खरं सांगतो मला कालचा विजय हा जास्त आवडला कारण तो एका निश्चयाने मिळवलेला होता!  म्हणुन १९८३चा विजय कूठेही कमी होत नाही.  पण एक क्रिकेटप्रेमी म्हणुन आणि एकुणच कालच्या प्रत्येक खेळाडुचा खेळ आणि मॅचच्या आगोदर पासुन त्यांच्या वर्ल्डकप जिंकायचाच आहे!  आणि तो सचिनसाठी जिंकायचा आहे हा निर्धार मला खुपच मोलाचा वाटतो.  काल सचिन कडुन मोठी खेळी झाली नाही त्याच मला जितकं वाईट वाटलं त्या पेक्षा इतर खेळाडू म्हणजे गौतम गंभीर, विराट कोहली आणि कॅप्टन धोणी हे ज्या एकाग्रतेने, इर्षेने आणि जिद्दीने खेळले त्याच मला जास्त कौतुक वाटत.  काल जिंकल्यानंतर युवराज देखिल म्हणाला की हे यश सचिनसाठी आहे.   इतकं प्रेम जिव्हाळा आणि आदर मला आज पर्यंत कुठल्याही क्रिकेटपटू विषयी त्याच्या सहकार्यांकडुन दिसला नाही.   हे यश सचिनच आहे!  त्याच्या Focussed बॅटिंगच्या बरोबरच त्याच्या मृदु स्वभावाच आहे!  सचिन कुणाचा अपमान करु शकतो हे मी imagineच करु शकत नाही.   यश इथंच असतं!   काल वर्ल्डकप जिंकल्याच्या आनंदापेक्षा सचिनला दिलेला  शब्द आम्ही पाळू शकलो ही भावना प्रत्येक खेळाडुच्या मनात होती, आणि म्हणून त्यांनी वर्ल्डकप डोक्यावर घेण्यापेक्षा सचिनला खांद्यावर घेणं पसंत केलं.   ते ही मुंबईच्या वानखेडेवर म्हणजे सचिनच्याच घरी!   आणि विजयी कॅपटन या मिरवणुकीच्या मागुन चालत होता.   किती मोठा मान!  आणि मनाचा मोठेपणा!!  हे सचिन कधीही विसरू शकणार नाही.   दर चार वर्षांनी येणारा वर्ल्डकप हा फक्त एका खेळाडूसाठी!  हा विचारच मला खुप मोठा वाटतो.   आपण आपल्या खेळाडूंच्या लाईफस्टाईल विषयी टीकेच्या स्वरात बोलतो, पण मला वाटतं भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने परिपक्व झालेला आहे.  आणि हे इतर खेळांमधे देखिल बघायला मिळालं पाहिजे.

Saturday, April 2, 2011

माझी tweet.....क्रिकेट हा खेळण्याचा नसुन बोलण्याचा गेम!

१ एप्रिल २०११:  क्रिकेट हा खेळ बॅट व चेंडूने खेळण्याचा नव्हे तर तोंडाने बोलण्याचा विषय आहे अस ज्याला वाटतं तो मुंबईकर!  हे वाक्य आहे पु. ल. देशपांडे ह्यांच्या मी मुंबईकर, नागपुरकर की पुणेकर या कथेतलं;  ह्या   वाक्याचा अर्थ मला गेल्या आठ दिवसात खऱ्या अर्थाने समजला.   "चर्चा" करणे म्हणजे नेमकं काय असतं हे सुद्दा मला याच काळात पुर्णपणे समजलेल आहे.    प्रत्येक कॉलेजच्या नाक्या नाक्यावर, कॅन्टीन मधे,  चाळीं-चाळीं मधे असलेल्या कॉमन गॅलरीत, लोकलच्या गर्दीत, बस मधे,  ऑफिस मधे, बॉसच्या केबिनमधे जिकडे तिकडे एकच विषय क्रिकेट !   त्याच बरोबर एकाच विषयावर विविध चर्चा, परीसंवाद, भाषण, मुलाखाती, आरोप, प्रत्यारोप, भांडण, मारामाऱ्या, दगडफेक कशी होऊ शकते हे सुद्दा आता आपल्याला लवकरच कळेल!  अगदी उद्या टॉस कोण जिंकणार, भारताने टॉस जिंकला तर काय करावं, सचिनने कसे खेळावे, धोणीने कुणाला बॉलिंग द्यावी इथ पासुन ते भारत-पाक मैत्री असावी की युद्द!   बेटिंग वर तर हल्ली इतकं बोललं जात की जणू प्रत्येक पडलेला बॉल हा कुणी बुकीच्या इशाऱ्यावरच पडत असतो अस वाटावं जाऊद्या.  आणि शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने क्रिकेट हा खेळ त्यांच्या देशात सुरु केला तर त्यांच्या इकॉनोमीला चालना मिळेल का? इथ पर्यंत सगळे विषय आले.