Friday, April 29, 2011

’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे

लोकप्रभा दिनांक ६ मे २०११:  मराठी उद्योगपतींविषयी समज असा आहे की त्यांना व्यवसाय करता येत नाही, कारण धंद्यासाठी त्यांना लबाडी करता येत नाही! ही माणसं व्यवसायात पारदर्शक असतात आणि कुणालाही सहसा फसवित नाही. म्हणजे ‘विश्वासाहर्ता’ हा आपल्या समाजाचा ब्रॅण्ड आहे! आणि त्याच चांगल्या प्रकारे मार्केटिंग झालं तर मोठं यश मिळवता येऊ शकेल.
तसेच मराठी माणसं उद्योगधंद्यात मागे आहेत अशी एक सर्वसाधारणपणे सर्वाची समजूत झाली आहे. परंतु ही समजूत पूर्णत: खरी नाही. मराठी माणसे मोठय़ा संख्येने उद्योगात आहेत आणि यशस्वी उद्योजक म्हणून ते आज समाजात वावरत आहेत. गुजराती माणूस म्हटला म्हणजे तो उद्योगधंद्यातच असला पाहिजे अशी एक आपली समजूत. परंतु नोकरी करणारे गुजराती लोकही मोठय़ा संख्येने आहेत. तसेच मराठी उद्योजकांचे आहे. आता जशा नोकरीच्या संधी कमी होत चालल्या आहेत तसे मराठी तरुण स्वयंरोजगार, उद्योगधंद्याकडे वळत आहेत. पहिल्या पिढीतील उद्योजकांपुढे अनेक प्रश्न उपस्थित होतात. यात प्रामुख्याने भांडवल उभारणीपासून ते मार्केटिंग असे सर्व प्रकारचे प्रश्न त्यांना भेडसावत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्योजकाला सहजरीत्या, सोप्या भाषेत कॉर्पोरेट लॉयर नितिन पोतदार यांनी प्रगतीचा एक्सप्रेस वे या पुस्तकात उलगडून दाखविली आहेत. ‘महाराष्ट्र दिना’निमित्त या पुस्तकाच्या निमित्ताने नितीन पोतदार यांची घेतलेली खास मुलाखत.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पुढे दिसतो, पण त्या प्रगतीत मराठी समाज पुढे येताना दिसत नाही?

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश व्यापारी मुंबईला आले. त्यांच्या पाठोपाठ इतर शहरातले व्यापारी आले. परदेशी कंपन्या देखील आल्या. म्हणून इथल्या मराठी व्यापाऱ्यांना आणि उद्योगात असलेल्या मराठी माणसांना नकळतपणे एक मोठया स्पध्रेला तोंड द्याव लागलं. तसं इतर राज्यात किंवा शहरात झालं नाही. अशा स्पध्रेत मराठी व्यापारी आणि उद्योगपती मागे पडले. या बाहेरून आलेल्या उद्योगपतींकडे भक्कम भांडवलाचं पाठबळ होतं, हे विसरून चालणार नाही. त्याचबरोबर आपण ८० टक्के स्थानिकांनी नोकऱ्या मगितल्या, पण उद्योगात असलेल्या मराठी उद्योगपतींनी कुठल्याही प्रकारचं आरक्षण किंवा सवलती मागितल्या नाही.   नोकऱ्यांची मागणी आपण इतक्या आग्रहाने केली की आपल्यालाच असं वाटू लागलं की आपला समाज हा चाकरमानी आहे! पण आता परिस्थिती झपाटय़ाने बदलत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानामुळे स्वंयरोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपल्बध झाल्या आहेत आणि त्यात मराठी तरुण चांगलं काम करताना दिसतात.

स्वतंत्र्यानंतरची पहिली ५० वर्ष गेली, आता पुढे काय?

येणारं शतक हे नॉलेजबेस्ड सíव्हस इंडस्ट्रीजचं असणार आहे. १९५० साली देशाच्या जीडीपीत सíव्हस सेक्टरचा वाटा फक्त १५ टक्के होता. तो गेल्या वर्षी म्हणजे २०१० साली ५६ टक्के इतका झपाटय़ाने वाढला आहे. त्यात रियल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी (हॉटेल्स, टुरिझम), आयटी, मीडिया व एण्टरटेन्मेंट (टीव्ही चॅनेल्स, चित्रपट ते इव्हेंट मॅनेजमेंट), कम्युनिकेशन व पब्लिक रिलेशन्स, वित्तीय सेवा (बॅकिंग, इन्शुअरन्स), आणि रिटेल (शॉप्स, मॉल) अशा सेवा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. सíव्हस सेक्टरच्या क्षेत्रात बुद्धिमत्ता आणि कौशल्य हेच मोठं भांडवल असतं! सुदैवाने आपल्या मराठी समाजात शिक्षणाला आपण जास्त महत्त्व देतो; त्यात टेक्निकल ज्ञान असणाऱ्यांनी जर एका महत्त्वाकांक्षेने पाऊले टाकली तर नक्कीच ते मोठं यश मिळवू शकतात. आता नुसतं डॉक्टर आणि इंजिनीयरच्या पदव्या घेऊन नोकरीसाठी परदेशी जण्यापेक्षा इथं राहून सíव्हस सेक्टर मधे स्वत:चं अस्तित्त्व निर्माण करायला पुढे आलं पाहिजे. नोकरी मागणारे हात तयार करण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्याकडे आपला कल असला पहिजे आणि ते आजच्या युगात शक्य आहे.

‘प्रगतीचा एक्सप्रेस वे’ या पुस्तकात बद्दल थोडं सांगा.

आज मराठी तरूणांत कुणाकडे चांगलं प्रॉडक्ट आहे, तर कुणाकडे नवीन प्रॉडक्टस् तयार करण्याची टेक्नॉलॉजी, कुणाकडे जुना नावाजलेला ब्रॅण्ड आहे, तर कुणाकडे नविन ब्रॅण्डची संकल्पना, कुणाकडे मार्केटिंगचं कौशल्य आहे, तर कुणाकडे म्यॅन्युफॅक्चिरगचा बेस; काही अनुभवाने श्रीमंत आहेत, तर काहींकडे वडिलोपार्जति व्यवसाय, कुणाकडे प्रोजेक्ट तयार आहे तर कुणाकडे त्याचं संपूर्ण पेपरवर्क तयार आहे! महिलांना काहीतरी करायचं आहे त्यांच्यातसुद्धा उद्योजकता आहे, पण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. प्रॉडक्ट आहे तर मार्केटिंग नाही, मार्केटिंग आहे तर भांडवलचा अभाव! थोडक्यात उर्जा आहे पण उभारी नाही! म्हणून या पुस्तकात उद्योगाचा शुभारंभ, भांडवल उभारणी, बिझनेस नेटवìकग, यशाचं गमक, ह्य़ूमन रिसोर्स, उद्योगाचा वारसदार अशा अनेक प्रश्नांकडे बघण्याचा मराठी माणसांचा दृष्टीकोन आणि मानसिकता कशी असते आणि त्यावर नेमकं काय करायला पाहिजे, याचं उत्तर शोधण्याचा आणि तो सोप्या भाषेत मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हे पुस्तकं जसं उद्योजकांसाठी आहे तसं प्रत्येक होतकरू तरूणासाठी सुद्धा आहे.   मोठय़ा यशासाठी ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार करता आला पाहिजे. भांडवल पाहिजे, मार्केटिंगला मदत पाहिजे, ब्रॅण्ड पाहिजे, पण पार्टनर नको ही मानसिकता बदलावी लागेल.


सर्वसाधारणंपणे असं बघितल गेलं आहे की भांडवल उभारणीत आपण कमी पडतो. हे खरं आहे का?

हो हे काही अंशी खरं आहे. सर्वप्रथम आपण ‘कर्ज’ या शब्दाला खूपच घाबरतो. कर्ज देणाऱ्याची झोप उडण्यापेक्षा इथं कर्ज घेणाऱ्याची झोप उडते. जगातला कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग हा कर्जाशिवाय उभा राहूच शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. बँकेतून किंवा एखाद्या सरकारी योजनेतून कर्ज काढाताना आपल्याला चार प्रश्न विचारतील, या भीतीने आपण त्या वाटेला जातच नाही; आणि गेल्यानंतर तिथं जर आपल्या विषयी प्रश्न विचारले तर तो अपमान समजतो. हे संपूर्णपणे चुकीचं आहे. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून बँकेत गेलं पाहिजे. बँकेचे पसे न भरल्यामुळे कुणाला फाशी झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही.

आज पॅकेजिंग व मार्केटिंग म्हणजे ‘ब्रॅण्ड’चा जमाना आहे! अशा जीवघेण्या स्पध्रेत मराठी उद्योजक कसे तग धरतील?

इंग्रजी वृतपत्रात येणारया सेकण्डहॅण्ड जुन्या गाडय़ांच्या जाहिराती बघा - त्यात असतं की कार ही पारसी मालकाची आहे; याचा अर्थ ती गाडी चांगलीच असणार; कारण पारसी माणसं कुठलीही वस्तू चांगली वापरतात, असा होतो. एका विशिष्ट समाजातील माणसांनी बनविलेली कुठलीही वस्तू आपण म्हणतो की ती ‘डुप्लिकेट’ असणार. तसं मराठी उद्योगपतींविषयी समज असा आहे की त्यांना व्यवसाय करता येत नाही, कारण कुठल्याही धंद्यासाठी लागणारी लबाडी त्यांना करता येत नाही! ही माणसं व्यवसायात पारदर्शक असतात आणि कुणालाही सहसा फसवित नाही. म्हणजे ‘विश्वासाहर्ता’ हा आपल्या समाजाचा ब्रॅण्ड आहे! आणि त्याच चांगल्या प्रकारे मार्केटिंग झालं तर मोठं यश मिळवता येऊ शकेल.

महाराष्ट्रातल्या लहान मोठय़ा मराठी उद्योजकांनी मोठं होण्यासाठी नेमकं काय करावं?

व्यवस्थापनात प्रोग्रेसिव्ह िथकिंग आणि बाजारात अग्रेसिव्ह मार्केटिंग केल्याशिवाय पर्याय नाही! मनाची दारं उघडल्याशिवाय यशाचं दार उघडणार नाही. आम्ही गेली ४० वर्ष जे केलं, पुढे ही तेच करू, असं म्हणायचे दिवस आता राहिलेले नाही. थांबला तो संपला! मोठय़ा यशासाठी ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार करता आला पाहिजे. भांडवल पाहिजे, मार्केटिंगला मदत पाहिजे, ब्रॅण्ड पाहिजे, पण पार्टनर नको ही मानसिकता बदलावी लागेल. येणाऱ्या काळात जिथं आपण कमी पडू तिथं इतरांकडून सहकार्य घेण्याची मनाची तयारी ठेवावीच लागेल. १+१=२ नव्हे तर १+१=११ हा फॉम्र्युला वापरावा लागेल. त्याचबरोबर इंटरनेटच्या मदतीने आपला प्रांत आणि देश सोडून जगाची बाजारपेठ शोधावी लागेल. .

तुमच्या पुस्तकाचं ब्रीद आहे, कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट, तेंव्हाच होईल.. जय महाराष्ट्र! ही संकल्पना काय आहे?

माझ्या मते आज प्रगतीची आणि यशाची भाषा आहे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव! ते आत्मसात करण्यासाठी मग तुम्ही मराठी किंवा जगात कुठल्याही माध्यमाचा वापर करा.    भाषा हे एक ज्ञान मिळवण्याच माध्यम आहे अस मला वाटतं   तसचं मिळेल ते काम करून पुढे जाण्याकडे आपला कल असला पाहिजे. काम आहे म्हटंल्यावर कुणीतरी ते करणारच, तर मग मीच ते काम का करू नये? आणि कष्टाला कधीच मोज माप असूच शकत नाही! यशासाठी कितीही कष्ट करण्याची मानसिक तयारी करावीच लागेल. म्हणून पडतील तेवढे कष्ट! नंतर बघतो, मग येतो, ते कसं होणार? यश मिळेल का? प्रश्न उपस्थित करून कुठलेही प्रश्न सुटत नसतात. पुस्तकात कुठे चुकतं यापेक्षा नेमकं काय करायला पाहिजे ह्य़ावर मी भर दिलेला आहे.

शेवटी मराठी तरूणांना काय सांगाल?

आपण १ मे रोजी ‘जय महाराष्ट्र’ असा गजर मोठ्याने करू! उद्या ‘जय म्हाराष्ट्र’ होईलसुद्धा, पण त्या ‘जय महाराष्ट्रा’त आपण असणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे? म्हणून ‘मोडेन पण वाकणार नाही’ ही मानसिकता बदलून यशासाठी हव तेवढं वाकेन, पण कधीच मोडणार नाही; अशी करण्याची गरज आहे! तसं केल्याशिवाय खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र होणार कसा?


सौजन्य लोकप्रभा दिनांक ६ मे २०११:  prasad.kerkar@expressindia.com

३० एप्रिल - अक्कलकोटनिवासी सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचा समाधीग्रहण  दिन आणि १ मे हा महाराष्ट्र दिन - या निमित्ताने लोकप्रभा साप्ताहिकात श्री. प्रसाद केरकरांनी माझी मुलाखत घेतली त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार!!  नितीन पोतदार

3 comments:

Anonymous said...

Nitin,

First come first,Greetings,on 51et MAHARASHTRA DIWAS,as GJ state I was expecting bit too much,now I have only one request to G.M.,that,Maharashtra becomes better during HIRAK MAHOTSAV,
You are really doing a good job,and sure to see positive results,% no matter.
MAHARASHTRIAN TRADER MUST SEE HOW MUCH PLACE IN CASH BOX IS EMPTY,RATHER THAN HOW MUCH LOADED IT IS ?
such approch will take him long way to rule the world.
Good interview in the punlication,that I shall not be reading from MAHARASHTRA DIWAS 2011.But you will be always read.

Anonymous said...

VISHWASARH HAA APLA BRAND ASLAA TAREE,GRAHAK VISAMBUN RAAHU SHAKTO EVDHI VISHWAASAARHTAA NIRMAAN KARNYAA SAATHEE MARATHI VYAWSAAIKAALA BARECH KASHT GHYAWE LAAGTEEL HE NISCHIT,
KARAN VEL AANEE SHABDACHE VAJAN,VACHANMOOLY HYAAT APWAAD SODLE TAR MARATHI MAANUS MAGE AAHE.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

मा. नितीन पोतदार,
स. नमस्कार,

’विश्वासाहर्ता’ हा आपल्या मराठी समाजाचा ब्रॅण्ड आहे! हे आपले विधान फार महत्वाचे आहे. मराठी माणुस व्यवसायात कमी नाही हे या वरुन समजते. प्रगतीचा एक्सप्रेस वे हे पुस्तक सर्व मराठी उध्योजकांनी वाचले पाहिजे तसेच ज्यांना उद्दोग करायचा आहे त्यांनि सुदा हे पुस्तक वचावे. मी Saturday Club Global Orga.शी संम्बधित आहे. सध्या नोकऱ्यांची परिस्थिती कठिण आहे. मराठी माणसांनी छोटा मोठा व्यवसाय सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले पुस्तक प्रेरणा देईल असे नक्की वाटते....

म. न. ढोकले सर, डोम्बिवली.
ता.क. माझ्या इमेल वर आलेले हे पत्र.