Thursday, June 16, 2011

माझं tweet.....गांधीजी आम्हाला क्षमा करा!

१६ जुन २०११:   एखादी बातमी वरवर छोटी वाटली तरी ती कुठेतरी मनावर खुप खोल घाव करुन जाते!  अस्वस्थ करते!!  महात्मा गांधींचा त्यांच्या सेवाग्राम आश्रमातून चष्मा चोरीला गेला ही बातमी वाचली आणि खुपच वाईट वाटलं.   स्वातंत्र्यानंतर देशाला विकून काही लाख कोटी काळा पैसा स्विस बॅंकेत सत्तेत असलेल्या लोकांनी पाठवला,  ही मंडळी देशाला रोज विकुन खात आहेत!   त्या पेक्षाही गांधीजींचा चषमा चोरीला जाणं ही फार मोठी भयंकर घटना आहे अस मी मानतो.   प्रत्येक भारतीयांची मान शरमेने खाली घालायला लावणार हे कृत्य.   महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस................. अशा शेकडो लोकांच्या अपार त्यागातुन आणि बलिदानातुन आज आपली १५० कोटी जनता मोकळा श्वास घेत आहे.   खरं तर या थोर पुरुषांच्या  शिल्लक असलेल्या प्रत्येक गोष्टी आपण देव्हाऱ्यात ठेवाव्या इतक्या त्या पवित्र आहेत.    मला अजुनही एक भोळी आशा आहे - वाटतं की लवकरच दुसरी बातमी येईल की गांधीजींचा चष्मा हा चोरीला गेला नसुन तो कुणीतरी साफ करण्यासाठी नेला होता त्याने तो परत आणला आहे, पण झालेल्या कृत्याबद्दल त्याने गांधीजींची माफी मागितली!   
आज १६ जुन रोजी सेवाग्राममधील गांधी कुटीच्या अमृतमहोत्सवाला सुरुवात होत आहे.   खरं तर त्या सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी काही पत्रकारांनी त्यांच्या कुटीला भेट दिली तेव्हा तेथील गांधीजींचा चष्मा गायब झाल्याचं त्यांना आढळलं.   उपस्थित पत्रकारांनी ही बाब विश्वस्तांच्या समोर आणली,  तेव्हा आश्रमाचे पदाधिकारी जागे झाले आणि हा चष्मा चार महिन्यांपूर्वी चोरीला गेल्याची माहिती पत्रकारांना दिली.   विशेष म्हणजे, चष्मा गायब होऊन ४ महिने उलटल्यानंतरही चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नाही.    बापू कुटीमध्ये चरखा, गादी, डेस्क, टेलिफोन, लोड अशा गांधीजींच्या एकूण १७ वस्तू होत्या.

हा ब्लॉग लिहीत असताना मनाला यातना देणारा प्रश्न सारखा मला पडत होता की गांधीजीं बद्दल स्वतंत्र्यानंतर जन्माला आलेल्या माझ्या पिढीला खरोखर किती आत्मियता आहे?  आणि उद्याच्या पिढीच काय?  त्यांनी जर विचारल की गांधीजी कोण तर दोष कुणाचा?  असे अनेक प्रश्न माझ्या मनाच्या चिंध्या करीत असताना काय योग बघा!  माझे मित्र श्री. अनिल कोठावळेंनी मला "अज्ञात गांधी" हे गांधीजींच्या कथांच मराठीत रुपांतर केलेल एक अप्रतिम पुस्तक दिलं.   श्री. नारायणभाई देसाई (महात्मागांधीचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे चिरंजीव), ज्यांनी तब्बल वीस वर्षं बापूंच्या सहवासात काढले, त्या नारायणभाईंनी गांघीजींचं "जीवनसत्य" सांगणारे हे पुस्तक  गुजराती  भाषेत लिहिल व त्याचं मराठी भाषांतर श्री. सुरेशचंद्र वारघडे यांनी सुंदररित्या केलेल आहे.   गांधीजींना ज्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशा भाग्यवंतापैकी नारायणभाई देसाई हे एक.  गांधीजींच्या आंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऎतिहासिक क्षणांचे साक्षीदार.   गांधींच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टी उकलून दाखवणारं त्यांच हे पुस्तक पुण्याच्या समकालीन प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केलं आहे ते सर्वांनी जरुर वाचावं ही आग्रहाची विनंती.  

देशाला आज जेंव्हा गांधीजींच्या दृष्टीची नितांत गरज आहे,  तिथं आपण त्यांच्या चषमाच चोरतो!   इतके अंध आणि करंटे आपण का आणि कशासाठी झालो आहोत?  चषमा चोरणाऱ्याची अशी काय मजबुरी असेल हेच मला समजत नाही.   आपल्याला हा देश कुठे न्यायचा आहे?   गांधीजींनी ज्या चषम्यातून संपुर्ण देशातल्या प्रत्येक गोरगरीबाला करूणेच्या, मायेच्या आणि प्रेमाच्या नजरेने बघितलं तो चषमा आज गांधीजींपासुन आपण दुर केला.   आज आपल्याला त्या मायेन कोण बघणार?  आपली इतकी अधोगती का व्हावी........?


कदाचित गांधीजींना आपल्या देशाची होत असलेली अधोगती आता खरचं बघवत नसेल म्हणुन तर त्यांनी त्यांचा चषमा नेला नसेल ना?  गांधीजी आम्हाला क्षमा करा........


2 comments:

Anonymous said...

Impt subject.......I feel Gandhiji's glasses are important no doubt ......wht about his thoughts , philosophy ? which is more important me!
It's good u refered 'Agyat Gandhi', we all Indian must learn this Gandhi by heart........ not just for his symbols but as living way and many more things!

Anonymous said...

Strange,
it's time to collect all symbols of Gandhijee at one place,for proper safety and security,and may be people like Mr.Vijay Mallya must stay on alert,if it comes up in any auction,Mr. Mallya should bring it back,
no doubt his cash comes from wine,but then country of Bapujee runs on wine taxes,so Nno harm to get back baapu's CHASHMAA,by him,as he is bringing back the treasure of Krrnataka,it's time he works for India.