Tuesday, June 21, 2011

माझं tweet.....पाटीपासून आयपॅडपर्यंत…

२१, जुन २०११:   आपल्यापैकी प्रत्येकाच्या लिखाणाचा प्रवास हा दगडी पेन्सिलने पाटीवर लिहण्यापासून कालच्या ईमेल वरून SMSsवर आणि आजच्या आयपॅडवर पोहोचलेला आहे.  ह्या प्रवासाच सुंदर वर्णन "पाटीपासून आयपॅडपर्यंत" या लेखात शनिवारच्या लोकसत्तेच्या लोकरंग पुर्वणीमधुन अपर्णा मोडक या लेखिकेने केल आहे, त्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन  (त्यांच्या लेख खाली दिला आहे).   हा लेख वाचताना नकळतपणे मला माझ बालपण डोळ्यासमोरुन गेलं.   वकिल असल्यामुळे खर सांगेन खोट सांगणार नाही - लिहीण्याबरोबर मला दगडी पेन्सिल खायला आवडत होती!  मला माह्ति आहे तुमच्या पैकी कित्येकाला तशी सवय असणार.   पुढे "नटराज" ब्रॅण्डची काळी आणि लाल पट्यांची पेन्सिल आणि कॅम्लिनचा कंपॉस बॉक्स, आणि नंतर "Reynold"चे बॉलपेन वगैरे वगैरे.  

आपण सारे एकाच प्रकारच्या दगडी पेन्सिलने अक्षरं गिरवायला शिकतो तरी प्रत्येकची लिहायची पद्दत स्वभावाप्रमाणे वेगवेगळी होत जाते.   पुढे काढलेल्या अक्षरांच्या शाईपेक्षा त्यांच्या मागे दडलेले अर्थ गडद होत जातात, तर कित्येक वेळा उडणाऱ्या शाईबरोबर शब्दांचे संदर्भ बदलत जातात.  काय गंमत आहे बघा, लहापणी आपलं अक्षर वेडवाकड असलं तरी त्याचा अर्थ सरळ आणि सोपा असतो.   त्याच बरोबर लहानपणी सरळ रेषेत लिहीणारे मोठे झाल्यावर सरळ वागतीलच अशी खात्री नसते.   लहानपणी आपण ठरवून देखिल जोड-अक्षर नीट काढु शकत नाही आणि काळांतराने जोड-अक्षर जरी सुंदर काढायला शिकलो तरी काढलेल्या अक्षरातुन माणस जोडायला आपण नेहमी कमी पडतो.   कित्येकांचे अक्षर स्वच्छ असले तरी त्याच्या मागचा विचार   शुध्द नसतो!  कदाचित "अक्षर" सुंदर काढाण्यावर आपण जितका भर देतो तितका भर आपण अक्षरापासुन तयार होणाऱ्या शब्दांच्या सुंदरतेवर देत नसु.  आज तंत्रज्ञानाच्या जोरावर कंप्युटर स्वच्छ आणि सुंदर लिहायला मदत करतो,  त्यातुन प्रकट होणारे विचार लाखो लोकांपर्यंत एका क्लिकवर पोहोचवता येतात.   प्रश्न सुंदर आणि स्वच्छ विचारांचा आहे?
पाटीपासून आयपॅडपर्यंत…

                                                                   ..अपर्णा मोडक, शनिवार, १८ जून २०११
                                                                      सौजन्य लोकसत्ता

भिंतीवर रेघोटय़ा मारण्यासाठी मी पहिल्यांदा पेन्सिल हाती घेतली असेल. पण माझ्या हाती अधिकृतपणे देण्यात आलेलं लेखन साहित्य म्हणजे दगडी पाटी, पाटीची पेन्सिल, लाकडी फूटपट्टी आणि प्लॅस्टिकच्या डबीतला स्पंज. आम्ही पाटी-पेन्सिलने लिहीत असताना, आमच्या वर्गशिक्षिका फळ्यावर ज्या रंगीबेरंगी खडूंनी लिहायच्या त्या खडूंचे तसेच तो फळा पुसायच्या डस्टरचेही तेव्हा खूप आकर्षण वाटायचे. बाईंनी कधी टीचररूममधून खडू आणायला किंवा वर्गाबाहेर जाऊन डस्टर झाडून आणायला सांगितलं की अगदी ऐट वाटायची. टीचररूममधील कपाटात ठेवलेले वेगवेगळ्या रंगांच्या खडूंचे खोके बघून एखादा खजिना बघितल्यासारखे डोळे विस्फारायचे. शाळेच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या फळ्यावर ओल्या खडूने लिहिताना बघायचंही अप्रुप वाटायचं. आधी न दिसणारी अक्षरे नंतर ठळक कशी दिसायला लागतात, ही जादूच वाटायची.


यानंतर हाती आल्या दुरेघी ओळींच्या चौकटीच्या वह्य़ा, शिसपेन्सिली आणि खोडरबर. लाल-काळय़ा रेघांच्या नटराज पेन्सिली. खोडरबरसुद्धा साधाच, राखाडी रंगाचा. वडीलधाऱ्यांकडून त्यांच्या लहानपणीचा पुस्त्या गिरविण्याचा उल्लेख ऐकला होता. त्या ऐवजी मी ‘बग्रे सुरेखा’ पाटीवर मुळाक्षरे गिरवत असे. त्यानंतर १-२ वर्षांनी एकेरी ओळीच्या वह्य़ा वापरायला सुरुवात झाली. साधारण त्याच सुमारास गुलाबी फुलांच्या डिझाइनच्या फ्लोरा पेन्सिली आल्या. रंगीत सुवासिक खोडरबरसुद्धा आले. पाटीची जागा वहीने घेतल्यावर पट्टीची लांबी अर्धी झाली. १२ इंचावरून ६ इंचावर आली.

माध्यमिक शाळेत फाऊंटन पेनने लिहायला सुरुवात झाली. जाडी, बोजड, मोठय़ा नीबची पेनं. बऱ्याच वेळा पेन खाली पडून नीब तुटायची. वर्गात सगळेच निळीच शाई वापरत असत, बहुतकरून कॅम्लीनची. ड्रापर वापरून पेनात शाई भरण्याचं काम कितीही काळजीपूर्वक केलं तरी एखादा थेंब सांडायचाच. मत्रिणीच्या पेनातली शाई संपली म्हणून माझ्या पेनातली शाई तिच्या पेनात ओतताना हात हमखास रंगायचे. पेनाचं लिखाण खोडणारे खोडरबरही वेगळे. निळसर किंवा वीटकरी रंगाचे. खोडताना हमखास कागद फाटायचा! फाऊंटन पेनच्या सोबतच हातात आलेली नवीन गोष्ट म्हणजे कंपास बॉक्स. यातील सगळे साहित्य जरी नेहमी वापरायला लागत नसले तरी कंपास बॉक्स कायम दप्तरात असायचा.

साधं फाऊंटन पेन वापरायला लागल्यावर आकर्षण होतं ते हिरव्या किंवा काळपट लाल रंगाच्या, सोनेरी टोपणाच्या, पेनाच्या आत लपलेली छोटी नीब असलेल्या, शाई भरायला अंगचाच ड्रापर असलेल्या, ‘हीरो’ पेनचं. वरच्या वर्गात जाताना ते पेन मिळालं. शाईचा रंगही बदलला, ब्ल्यू-ब्लॅक किंवा ब्लॅक. ड्रॉइंगच्या परीक्षेच्या निमित्ताने बी, २बी च्या शिसपेन्सिली वापरात आल्या. सध्याच्या ०.५ पेन्सिलीचा पूर्वज म्हणता येईल असा ‘पेन-पेन्सिल’ नावाचा एक प्रकारसुद्धा वापरात होता.

बॉलपेनने अक्षर खराब होतं, अशी भीती घातल्याने शाळेत असताना जरी वापरलं नाही तरी ज्युनियर कॉलेजमध्ये असताना शार्पचे बॉलपॉइंट पेन वापरायला लागले. रीफिल नवीन असेल तेव्हा लिहायला कठीण जायचं आणि रीफिल संपत आली की शाईचे ठिपके पडायचे. म्हणून रीफिलचे अख्खे पाकीट घेऊन, प्रत्येक रीफिल थोडी-थोडी वापरून, परीक्षेच्या वेळेस नीट लिहिता येईल, असे तयार करून ठेवायचे. शाळेत वरवरच्या वर्गात जाताना पानांची संख्या जरी ४०-८०-१००-२०० अशी वाढत गेली तरी वह्य़ांचा आकार तोच होता. कॉलेजमध्ये गेल्यावर वहीचा आकारही वाढला.

इंजिनीयरिंगच्या वर्षांत वह्य़ा न वापरता, सुटे कागद वापरून, ते विषयानुरूप वेगवेगळे फाईल करून ठेवायचं खूळ होतं. या सुमारास पायलट पेन वापरात होतं. त्याच्या शाईची छोटीशी बाटलीसुद्धा आणली होती. पण बहुतेक पेनं शाई भरायचं लक्षात यायच्या आधीच सुकून जायची. याच सुमारास शाळा संपल्यापासून वापरातून मागे पडलेली फाऊंटन पेन पुन्हा एकदा वापरात आली ती पेनच्या नीबा तिरक्या कापून कॅलिग्राफी करण्यासाठी. जर्नलवर नावं लिहायला किंवा असाइनमेंटची शीर्षकं लिहायला ही पेनं वापरायचे.

पहिल्या जॉबच्या दरम्यान वेगवेगळ्या आकाराची रायटिंग पॅड्स वापरली. ऑफिसमध्ये असताना वापरायचं मोठ्ठय़ा आकाराचं आणि क्लायंटच्या ऑफिसला जाताना पर्समध्ये राहील असं छोटय़ा आकाराचं.. या दोन्ही पॅड्ससोबत पेन असायचं रेनॉल्ड्सचं पांढरं, निळ्या टोपणाचं. यथावकाश कामाचं स्वरूप बदलत गेलं. मॅनेजरने सांगितलेले मुद्दे माझ्या रायटिंग पॅडवर लिहून घेता घेता, मी माझ्या ज्युनियर्सना काम सांगायलाही सुरुवात झाली. या सुमारास जेल पेन्स आणि फ्लुरोसंट रंगांचे पारदर्शक मार्कर्स नवीन होते. त्यामुळे वेगवेगळ्या रंगांची पेनं वापरू लागले. म्हणजे ज्युनियरने ज्या रंगाने लिहून घेतलं असेल, त्यात सुधारणा करताना किंवा कामाचा अग्रक्रम ठरवून देताना, मूळ लिखाणापेक्षा वेगळा रंग वापरता यायचा.

बाहेरगावी राहणाऱ्या नातेवाईकांना पत्र लिहायची मला लहानपणापासूनच सवय होती. त्यात उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त परगावी किंवा परदेशी गेलेल्या मित्रमत्रिणींची भर पडली. मित्रमत्रिणींना पत्र लिहिताना ०.५ पेन्सिलीने लिहायला मला आवडायचं. बहुतेक मित्रमत्रिणी आय.टी. क्षेत्राशी संबंधित असल्याने लवकरच आम्हा सर्वाना आपापल्या ऑफिसतर्फे इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली. त्यानंतर या पत्रव्यवहाराची जागा ई-मेलने घेतली.

यानंतर लिखाणाचे एक नवीनच माध्यम वापरात आले. कागद-वही यांची जागा घेतली मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ‘एमएस वर्ड’ या सॉफ्टवेअरने आणि पेन्सिल-पेन यांची जागा घेतली की-बोर्ड आणि माऊसने. समास आखायला नको, तो तिरका व्हायला नको, ओळींमधील अंतर कमी-जास्त व्हायला नको, मजकुराच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या अक्षरात फरक दिसायला नको, खाडाखोड नको, कच्चं लिखाण पक्कं करण्यासाठी पुन्हा उतरवून काढायला नको. या सर्व गोष्टी की-बोर्ड किंवा माऊसची बटणं दाबून एका चुटकीसरशी व्हायला लागल्या. ‘एमएस वर्ड’ वापरून केलेल्या नेटक्या लिखाणाची इतकी सवय झाली की, जरा सविस्तर काही लिहायचं असेल की कागद-पेन हाती घेण्याऐवजी कॉम्फ्युटर ऑन केला जाऊ लागला. सुरुवातीला लिखाणासाठी केला जाणारा कॉम्फ्युटरचा वापर हा इंग्रजी लिखाणापुरता मर्यादित होता.

कॉम्फ्युटरचा आकार कमी झाला, किंमत कमी झाली. इंटरनेटचा विस्तार वाढला, वेग वाढला. सुरुवातीस फक्त ऑफिसमध्ये वापरला जाणारा कॉम्प्युटर घरीसुद्धा आला. डेस्कटॉप / लॅपटॉप, पीसी यांचा वापर नित्यनेमाचा झाला. काही वर्षांनी मराठी लिखाणसुद्धा कॉम्प्युटरवर करता येऊ लागले. मी लिहिलेले लेख घरबसल्या ई-मेलद्वारे पाठवू लागले. यानंतर युनिकोडमुळे कॉम्प्युटरवरील मराठीचा वापर आणखी सुलभ झाला. आता प्रतीक्षा आहे ‘टॅबलेट पीसी’ची. भारतीय बाजारपेठेत जरी याचे आगमन झाले असले तरी अजून तो माझ्यापर्यंत पोचलेला नाही. दगडी पाटीपासून सुरू केलेला लिखाणाचा सिलसिला पाटीसदृश आयपॅडपर्यंत कधी पोहोचतोय ते बघू या.

आजतागायत लेखनसामुग्रीत माझ्या लेखी (!) जे बदल झाले त्याचा हा आढावा. आमच्या नात्यातील एका आजोबांनी नियमित पत्रव्यवहारातून मला लेखनाचे प्राथमिक धडे दिले. त्यांनी माझ्या लहानपणी, मी मोठ्ठी झाल्यावर काही तरी छानसं लिखाण करीन, असं स्वप्नं माझ्यासाठी पाहिलं असेल. पण तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर माझ्या हातात ‘शेफर’चं फाऊंटन पेन किंवा ‘रेिमग्टन’चा टाइपरायटर असेल. आयपॅडसारख्या उपकरणाची त्या काळी कोणी कल्पना केली असेल काय?!

6 comments:

Sonal said...

@ अपर्णा,

अतिशय सुंदर, सगळ्या आठवणी पुन्हा दाटून आल्या.

आणि हो, कोणीतरी कल्पना केल्याशिवाय काहीही सत्यात उतरतचं नाही..

म्हणून आजोबांनी नाही पण कुणीतरी तशी कल्पना नक्कीच केली असेल.

@ नितीन,

Thanks for sharing this to all of us.

-सोनल

Anonymous said...

खरच शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या, पण एक मात्र नक्की बदल किती झपाट्याने होतोय हे यातून प्रतीत होते. त्याप्रमाणे आपल्याला सज्ज व्हायचंय.


सुषमा कदम.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

Today change is the only constant factor! and most importantly it is happening fast! in every sphere of life.

GORDON'S HORSE said...

I only hope,
this speed will become fastest thing to regain the lost glory of Maharashtra,on all fronts,
Tiday a friend from Pathri in Marathwada,has sent the info,that a school in it's ad says,specially trained Kerala teachers will teach in the English medium school,school is run by Maharashtrian,I thing it's abuse on Maharashtra's teachers,and dishonour to Karmaveer Bhaurao Patil,Bharatratna Maharshi Dhondo Keshav Karve,Pandita Ramabai,looks like after bihari problem,we are in for new problem with white shirt jobs going to Nn Maharashtrians,it's time to act,what do you think

Nitin Potdar said...

Thanks for your comment. Lets not worry about 'tools', lets first get the 'Job' done. Success 'where' and 'who' gives is not important becoming successful is important.

GORDON'S HORSE said...

Rodger.