Sunday, July 10, 2011

माझं Tweet.....यशाचा IRB मार्ग.

१० जुलै २०११:  मला काल लातुरच्या सचिन पाटील (बदललेल नाव) नावाच्या एका तरूणाचा ईमेल आला तो जसाच्या तसाच खाली देत आहे.   तो आधी कृपा करून लक्षपुर्वक वाचा....

Email from Sachin Patil to Shri. Nitin Potdar

Name         : Sachin Patil (name changed)
Education   : Now Studying in Final Year Engg. in college of Engg. Pune (COEP) Branch
Branch       : Electronics & Telecommunication
Location     : XXX, now at Pune

Sir, My dream is my life is to become very big & good businessman from my child-hood.  And I want to start the business in electronics.  But Sir, I am very confused about starting my business.  The questions arises in my minds are HOW, WHERE should start my business.

Sachin Patil.
XXX,

इंजिनीयरिंगच्या फायनयल वर्षात असलेल्या या मुलाला कस आणि काय उत्तर देऊ ह्या विचारात असताना, आज लोकसत्तेच्या मुंबई वृतान्तात  ‘आय. आर. बी.’ या कंपनीच्या दत्तात्रय म्हैसकरांच्या यशाच्या प्रवासाच वर्णन वाचलं ते खाली देत आहे.  महत्वाचे मुद्दे Underline केले आहे.   सचिन आणि त्याच्या सारख्या असंख्य मुलांचे असेच मुलभुत प्रश्न असणार, त्यांच्या देखिल मनात रोज चलबिचल होत असणार.  आयुष्याला एक दिशा देण्याची धडपड आणि जिद्द .....

श्री. म्हैसकरांनी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअर  ही पदवी घेउन जवळजवळ १७ वर्षे नोकरी केली, परंतु नोकरीतच अडकून न पडता अवघ्या तीन लाख रुपयांच्या भांडवलदार त्यांनी १९७७ मध्ये ‘आय. आर. बी.’ची स्थापना केली आणि नंतर रस्तेबांधणीत मोठ नाव कमावलं.

ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याचा मूलभूत अभ्यास, व्यवसायाशी प्रामाणिक वृत्ती, पारदर्शक व्यवहार, येणाऱ्या संधीचा अचूक फायदा घेणे, वेळेचे अचूक नियोजन या आणि अशा मूलभूत तत्त्वांच्या पायावर ‘आय. आर. बी.’च्या वटवृक्षाचा आज महाविस्तार झाला आहे......

सचिन सारख्या असंख्य मित्रांना एवढच सांगेन यशाकडे जाणारा रस्ता हा नेहमीच Under Construction असतो..... त्यात येणाऱ्या अपयशाच्या प्रत्येक खड्ड्यांना न घाबरता न डगमगता, मेहनतीच्या दगडांनी बुजवुन पुढे जाव लागणार.......  All the best!

******************************************************************************
यशाचा आय. आर. बी. मार्ग

सौजन्य - अभय जोशी - लोकसत्ता मुंबई, रविवार, १० जुलै २०११

               
‘बिल्ड, ऑपरेट, ट्रान्स्फर’ ही कार्यपद्धती गेली अनेक वर्षे सर्वाच्या चांगलीच परिचित आहे. उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर शासकीय हस्तक्षेपाचे प्रमाण कमी होण्याबरोबरच अनेक क्षेत्रांतील कामांना खासगीकरणातून वेग आला. या बदलत्या परिस्थितीचा अत्यंत चाणाक्षपणे अंदाज घेत त्यानुसार प्रगतिशील पावले उचलण्याचे धाडस ज्या मोजक्या उद्योजकांनी- त्यातही मराठी उद्योजकांनी केले, त्यामध्ये ‘आयडियल रोड बिल्डर्स’चे ‘आय. आर. बी.’चे प्रणेते दत्तात्रय पांडुरंग म्हैसकर यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल.
 
‘दत्तात्रय म्हैसकर’ आणि ‘आय. आर. बी.’ हे अतूट समीकरण आज मराठी माणसाला तरी अनोळखी राहिलेले नाही.  तुम्ही मुंबईहून पुण्याला द्रुतगती महामार्गावरून जाताना किंवा मुंब्रामार्गे पनवेलला जाताना नजरेस पडणारे ‘आय. आर. बी.’चे टोलनाके सगळ्यांच्याच माहितीचे आहेत, परंतु एवढीच काही आज ‘आय. आर. बी.’ची ओळख राहिलेली नाही.

डोंबिवलीत जन्म झालेले दत्तात्रय म्हैसकर मध्यमवर्गातूनच आजच्या स्थानी येऊन पोहोचले आहेत. अर्थात त्यामागे आहे आजही वयाच्या ७३ व्या वर्षी कोणतेही कष्ट झेलण्याची तयारी, नाविन्याचा शोध घेण्याची जिज्ञासू वृत्ती आणि नव्या युगाशी सातत्याने संपर्क ठेवण्याची इच्छा.. ‘आय. आर. बी.’च्या स्थापनेचा पाया याच तीन गुणांनी घातला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मराठी माणसे धंद्यात अपयशी ठरतात, त्यांना नोकरीचेच आकर्षण असते, असा आक्षेप अजूनही घेतला जातो.   सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतल्यानंतर म्हैसकरांनीही १९६० पासून पुढची जवळजवळ १७ वर्षे नोकरी केली, परंतु नोकरीतच अडकून न पडता अवघ्या तीन लाख रुपयांच्या भांडवलदार त्यांनी १९७७ मध्ये ‘आय. आर. बी.’ची स्थापना केली आणि नंतर रस्तेबांधणीतील त्यांच्या कारकीर्दीस प्रारंभ झाला. साधारण १९८८-८९ च्या सुमारास ‘आय. आर. बी.’ला पुणे-अहमदनगर (१२० किलोमीटर) व अकोला-हिंगोली (९० किलोमीटर) अशी कामे एकाच वेळी मिळाली. ही कामे वेळेआधीच पूर्ण करून त्यांनी एक वेगळा विक्रम केला.

खासगीकरणाद्वारे पथकर वसुलीचे काम ‘आय. आर. बी.’ला १९९० मध्ये राज्य सरकारकडून मिळाले. ‘बिल्ड-ऑपरेट- ट्रान्स्फर’ या संकल्पनेची ती सुरुवातच होती. १९९४ मध्ये ‘आय. आर. बी.’ला अमरावती महापालिकेच्या जकात वसुलीचे काम मिळाले. खासगीकरणाद्वारे या कामातून ३० ते ३५ टक्के अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी सरकारला दाखवून दिले. याच काळात ‘आय. आर. बी.’ला पथकर वसुलीच्या कामात अनेक अडचणी, संकटे, टीका यांचा सामना करावा लागला, परंतु म्हैसकर यांनी या अडचणींचा बाऊ न करता त्याकडे एक आव्हान म्हणून बघितले व त्या दृष्टीने पुढील वाटचाल केली.   त्याच सुमारास म्हैसकर यांचे दोन पुत्र वीरेंद्र व जयंत चांगल्या प्रकारे शिकून हाताशी आले. या काळात म्हणजे १९९४ च्या सुमारास त्यांनी खराब रस्त्यांची दुरुस्ती करून तो चांगल्या स्थितीत आणणे आणि या कामाचा खर्च टोलच्या उत्पन्नातून करून उर्वरित रक्कम सरकारला देणे अशी संकल्पना मांडून तिचा पाठपुरावा केला. म्हैसकर पितापुत्रांच्या या कल्पनेला चांगला प्रतिसाद लाभला.   कारण ‘सेल्फ फायनान्स’ करून टोल उत्पन्नाद्वारे त्याची वसुली करून घेणे ही संकल्पना आगळीवेगळी ठरली.  ‘आय. आर. बी.’च्या माध्यमातून म्हैसकरांनी ही कल्पना केंद्र व राज्य सरकारपुढे सादर केली. त्यांनाही ही कल्पना आवडली, कारण त्यांच्यावर कोणताच आर्थिक बोजा न पडता रस्तेउभारणीसारखी प्रचंड कामे याद्वारे पार पडणे शक्य होणार होते. याद्वारे ‘आय. आर. बी.’ला अशी ११ कामे मिळाली. त्यांनी ही सर्व कामे दिलेल्या मुदतीपूर्वी आणि यशस्वीरीत्या पार पाडली. ‘बिल्ड-ऑपरेट- ट्रान्स्फर’ तत्त्वावर स्वीकारलेली ही रस्त्यांची सर्व कामे पार पाडताना त्यांच्या देखभालीचीही जबाबदारी संबंधित ठेकेदारास उचलावी लागते. त्यामुळे कामाचा उत्कृष्ट दर्जा बाळगण्याचे बंधन त्यांच्यावर असते. यात आणखी एक बाब म्हणजे संबंधित रस्त्याचे काम वेळेपूर्वी पूर्ण झाले तर तेथील टोलवसुलीही तातडीने करता येते. हा फायदा ‘आय. आर. बी.’ला चांगल्या प्रकारे मिळाला.

ही अशीच घोडदौड सुरू असताना नंतर २००४ मध्ये ‘आय. आर. बी.’ला मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाची देखभाल व टोलवसुलीचे काम १५ वर्षांसाठी मिळाले. त्याचबरोबर शीळफाटा ते देहू रोड असे १११ किलोमीटर लांबीचे जुन्या मुंबई- पुणे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम त्यांना मिळाले. या कामांसाठी दत्तात्रय म्हैसकर यांनी ‘आय. आर. बी.’च्या वतीने राज्य सरकारला ९ ऑगस्ट २००४ रोजी ९१८ कोटी रुपयांचा चेक देऊन आणखी एक रेकॉर्ड प्रस्थापित केला. ‘आय. आर. बी.’ची ही यशस्वी वाटचाल अशीच सुरू आहे. मधल्या काळात म्हणजे २००६मध्ये ‘आय. आर. बी.’ लिमिटेड कंपनी झाली व २००७ मध्ये तिचे पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर झाले. सध्या ‘आय. आर. बी.’ ही अत्यंत अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. अलीकडे कंपनीला ‘तळेगाव- अमरावती’, ‘जयपूर- देवळी’, ‘पठाणकोट-अमृतसर’, ‘पणजी- कर्नाटक सीमा’, ‘तुमकूर-चित्रदुर्ग’ व सिंधुदुर्ग विमानतळ अशी सहा प्रमुख कामे मिळाली असून त्यामुळे ‘आय. आर. बी.’च्या नावावर यशाची लखलखती मोहोर उमटली आहे.

या सर्व प्रदीर्घ वाटचालीत दत्तात्रय म्हैसकर यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना कायम आत्मीयतेची वागणूक देत त्यांच्याप्रती आस्था दाखविली. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन, त्यांचा सत्कार असे उपक्रम राबविले. कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना म्हैसकरांनी कधी कमीपणा मानला नाही.

ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याचा मूलभूत अभ्यास, व्यवसायाशी प्रामाणिक वृत्ती, पारदर्शक व्यवहार, कर्जे न चुकविणे, येणाऱ्या संधीचा अचूक फायदा घेणे, वेळेचे अचूक नियोजन या आणि अशा मूलभूत तत्त्वांच्या पायावर ‘आय. आर. बी.’च्या वटवृक्षाचा आज महाविस्तार झाला आहे.

हे सर्व सुरू असताना दत्तात्रय म्हैसकर यांनी निव्वळ व्यवसाय हेच ध्येय न मानता ज्या समाजाने आपल्याला आज एवढे दिले आहे, त्या समाजासाठी भरीव कार्य करून समाजऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न कसलीही वाच्यता न करता केला आहे. डोंबिवली ही जन्मभूमी असलेल्या कर्मभूमीही मानलेल्या म्हैसकर यांनी डोंबिवली शहरातील असंख्य संस्था, शाळा, गरजू विद्यार्थी, रुग्णालये, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सामाजिक बांधीलकीचे तत्त्व मानून मोठी आर्थिक मदत केली आहे. म्हैसकर यांना पर्यावरणाचेही प्रेम असून त्या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू असते. या कामात त्यांच्या सुविद्य पत्नी सुधाताई म्हैसकर यांचेही तसेच सहकार्य असून त्यांच्या मदतीशिवाय आपली ही वाटचाल पूर्ण होऊच शकली नसती, असे दत्तात्रय म्हैसकर कृतज्ञपणे सांगतात.

3 comments:

Anonymous said...

सुरवात ही मदतनीस वा नोकरी अशीच करावी लागते. पण त्यातही मी करीत असलेले काम अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल यावर भर हवा.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायच आहे, तेथे नोकरी केली तर त्या क्षेत्राची माहिती नक्कीच मिळते; पण म्हणुन कायम नोकरी करू नये. योग्य वेळी ती सोडायची देखिल तयारी असली पाहिजे.

Vinayak Pandit said...

एफ एम गोल्डवर या आठवड्यात आणि त्याआधीच्या आठवड्यात झालेली आपली मुलाखत ऐकली.आवडली.टू द पॉईंट बोलण्यामुळे फारच आवडली.आपले लोकसत्तामधून येणारे लेखही नियमितपणे वाचतो.आवडतात.कॉर्पोरेट लॉयर या संकल्पनेबद्दल माहित नव्हते ते आपल्या मुलाखतीमुळे समजले! आभार!