Saturday, September 3, 2011

माझं Tweet.....अण्णां....एक आशावादाचा विजय!

१ स्पटेंबर २०११:  गेले १५ दिवस अण्णां हजारे नावाच्या एका साध्या सरळ आणि सच्चा माणसाने देशाला स्वत:कडे खेचुन आणलेल आहे.   असं काय असेल या माणसात की त्यांच्या एका वाक्यावर काशमीर ते कन्याकुमारी पर्यंत देशभर लाखो लोक रसत्यावर शांतपणे अण्णांच्या आंदोलनात उतरलेले होते आणि दिल्लीच्या रामलीला मैदानावर १२ दिवस ठिय्या मांडुन बसले होते.   अण्णां म्हणतील ती पुर्व दिशा अस मानत आहेत?  हे अस अचानक का व्हावं?  ते कस बोलतात?  काय आहेत त्यांचे विचार?  त्यांनी असा कोणता अदभुत मंत्र दिला की लोकांना ते आवडु लागले. 
"अण्णां एक आंधी है! देश का दुसरा गांधी है!"   खर तर महात्मा गांधींने केलेल्या कामांची आणि आजच्या अण्णांच्या कामांची तुलना करण बरोबर नाही अस मला वाटतं.   असो.  अज्ञात गांधी या महात्मा गांधीच्या पुस्तकात "गांधी नावाचं गारूड" आणि "तीस कोटींचे नायक" या लेखात १९१५ सालात बॅरिस्टर गांधी आफ्रिकेतून आपल्या मायभूमीत परतले आणि १९११ पर्यंत, म्हणजे अवघ्या पाच वर्षात "देशाचे नेते" व "महात्मा गांधी" कसे बनले याच वर्णन दिलं आहे.   लोहचुंबक जसा लोखंडाला स्वत:कडे खेचतो, तसं गांधींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या व्यक्तींना  आपल्याकडे  खेचून आणलं, त्यात तरूणांचा भरणा अधिक होता हे विशेष.  त्यात विविध प्रदेशांतल्या विविध जाती-धर्म-पंथांचे ज्ञानी, पंडित, शिक्षित, अशिक्षित, सगळ्या स्थरातले लोक होते,  या माणसाने लाखो लोकांना आपल्याकडे कसं आकर्षित केल असेल?  इतक्या साऱ्या लोकांचे गांधी "हृदयचुंबक" कसे बनू शकले?  आचार्य कृपलानी हे तेंव्हाचे इतिहासाचे प्रध्यापक होते.  कॉंग्रेसच्या जन्मापासुन ते त्या पक्षाचे सेक्रेटरी होते.  कृपलानी आणि गांधीमधला एक संवाद पुस्तकात दिला आहे तो माझ्या वाचकांसाठी देत आहे.  कृपलानी एकदा गांधींना म्हणाले, "मी इतिहासाचा प्राध्यापक आहे.  अहिंसेतून कुणाला स्वातंत्र्य मिळाल्याचा इतिहास नाही."  त्यावर गांधी उत्स्फूर्तपणे उदगारले होते - "तुम्ही इतिहासाचे प्राध्यापक असलात, तरी मी "रचनात्मक इतिहास रचणारा" आहे".  हिंसेतुन कशाचीही निर्मिती होऊ शकत नाही हे जणु त्यांना सुचवायच होतं.

सामान्य माणसं महात्मा गांधींच्या आणि आता अण्णांनी उभारलेल्या आंदोलनात का सहभागी होतात?  ह्याच उत्तर एका शब्दात मिळतं ते आहे "अहिंसा"!   स्वातंत्र्यापुर्वीच्या काळात काय किंवा आता काय, कुठल्याही सामान्य माणसाला हिंसेच आकर्षण कधीच वाटल नव्हतं आणि पुढेही तस वाटण्याची शक्यता कमीच आहे.  हातात दगड घेउन हिंसेच प्रदर्शन करत लोकांच नुकसान करणं कुणालाही आनंददेणारी कृती असुच शकत नाही, आणि त्याच समर्थन कधीच होऊच शकणार नाही.  दृष्ट किंवा गुंड प्रवृती असलेला माणुस सुध्दा स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रथम सामोपचाराचीच भाषा बोलणं पसंत करतो.   सामान्य माणसांचा चुकुनसुध्दा  पोलिसांशी संबध येत नसतो, मग कारण नसताना पोलिसांचा मार खायला आणि जेल मधे जायला कुणाला आवडणार आहे?  गांधींच आणि आता अण्णांच्या आंदोलनाच्या यशाचे हे गुपीत आहे अस मला वाटतं.  ही वस्तुस्थिती असताना देखिल राजकीय नेते जेंव्हा जहाल भाषा बोलतात, लोकांच्या  भावना  भडकवतात आणि आपल्या जहाल भाषेमुळेच लोक आपल्या मागे आहे अस सांगतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावशी वाटते.   अशा नेत्यांना "जनअंदोलन" म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसावं.   गांधीजीची संपुर्ण चळवळ ही अहिंसेवर आधारलेली होती.   आणि आता अण्णां जेंव्हा लोकांना अहिंसेचा संदेश देतात, कुणालाही त्रास होइल, कुणाच नुकसान होईल असं कुणीही वागू नका अस जेंव्हा सांगतात तेंव्हा प्रत्येकाला खात्री पटते की ह्या आंदोलनात आपणं स्वत: अगदी आपल्या संपुर्ण कुटूंबाबरोबर सहभागी झालो तरी आपल्यावर पोलिसांची एक काठी देखिल उगारली जाणार नाही.  तेंव्हा नकळतपणे प्रत्येकाचा अत्मविश्वास वाढत जातो,  एक बरोबर अनेक लोक आत्मविश्वासाने सामिल होत जातात आणि हाच आत्मविश्वास एका मोठ्या शक्तिला जन्म देतो!  तिथं क्रांती होते.

अहिंसे बरोबर अशा जनआंदोलनाचा पाया असतो एक मोठा "आशावाद"!   ब्रिटिशांच्या राज्यात लोकांना स्वातंत्र्य पाहिजे होतं.  आज लोकांना भ्रष्टाचार मुक्त देश हवाय.   याच कारण देशाच्या प्रगतीत सामान्य माणुस कुठेच दिसत नाही.  दुर्दैवाने प्रगती फक्त एक टक्का लोकांपुरती मर्यादित राहिली.  त्याच बरोबर साधं रेशन कार्ड, मुलांना शाळा-कॊलेज मधे ऍडमिशन, जन्म-मृत्युचा दाखला, ७/१२चा उतारा कुठलही सरकारी काम म्हटंल की द्या पैसे!  खालपसुन वर पर्यंत पैसे पैसे आणि पैसे!   शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरूणांमधे मोठ्या प्रमाणात लोकांमधे उदासीनता पसरलेली आहे.   त्यांना हवं होतं एक निमित्त! एक ठिणगी!! ती त्यांना अण्णांच्या रुपाने मिळाली.  मनाच्या विझलेल्या मशाली पुन्हा पेटल्या, एक नवी आशा जागृत झाली.  प्रत्येकाला स्वाभिमानाने जगायच असतं.  आजची मेहनत ही उद्याच्या सुखाची नांदी असावी अशी इच्छा प्रत्येकाचीच असते.  आपल्यातल्या प्रत्येकाला हव असतं एक मोठ यश!  यशाच्या अशा एका आशेवर आपण सगळे जगत असतो.  ज्या समाजात आपण जगत आहोत कष्ट करीत आहोत त्या समाजात काहीतरी नविन घडु शकतं, बदल होऊ शकतो आणि त्याने आपलंही आयुष्य बदलु शकतं या विचरात एक मोठा आशावाद आहे अस मला वाटतं.  कित्येक वेळा यशापेक्षा यशाची आशाच आपल्याला जास्त सुखावुन जाते.  अण्णांच आंदोलन हा त्या आशावादाचा विजय आहे!   सामान्यांचा स्वपनांचा विजय आहे!

अण्णांच्या १२ दिवसांच्या आंदोलनात पहिल्याच दिवशी अण्णां कुणालाही न सांगता गांधीजींच्या राजघाटावर दोन तास शांतपणे ध्यान लावुन बसले होते तोच माझ्या मते टर्निंग पॉंईन्ट होता.  अण्णा तिथंच लढाई जिंकले होते.   त्या क्षणाच फोटो वर देत आहे.   काय ताकत असते बघा शांत बसण्यात!

No comments: