Tuesday, September 6, 2011

माझं Tweet.....मध्यमवर्ग आणि आशावादी वर्गाचे बळ वाढतेय!

6 सप्टेंबर २०११:  मागच्या ब्लॉग मधे मी म्हटलं की "अण्णां....एक आशावादाचा विजय" आणि आज महराष्ट्र टाईम्स मधे श्री. राजेश शुकला यांचा एक सुंदर लेख आलेला आहे तो खाली देत आहे तो वाचकांनी जरुर वाचावा ही विनंती.   मित्रांनो गेली चार ब्लॉगस मी अण्णां आणि त्यांच्या आंदोलनावर लिहीले.  अण्णांच्या आंदोलनाने निर्माण केलेले वादळ आणि नविन प्रश्न इतके आहेत की त्यावर अजुन बरच लिहीता येण्यासारखं आहे.   काल माझ्या फेसबुक वरुन जे लिहिल ते खाली देत आहे. 

"Anna....Enemy of Congress.....Fence for BJP.....Confusion for Print Media.....Darling of Electronic Media.....Hero of Young India.....Hope of Common man!

मध्यमवर्ग आणि आशावादी वर्गाचे बळ वाढतेय!

अण्णा हजारे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर छेडलेल्या आंदोलनात हजारो जणांनी कसा उत्स्फूर्त भाग घेतला आणि भ्रष्टाचार व कमकुवत प्रशासनाविरोधी कसा संताप व्यक्त केला, याचा अनुभव अवघ्या जगाने घेतला. स्वातंत्र्याच्या काळातील संस्कार घेत वाढलेले अण्णा हजारे वयाच्या ७४ व्या वर्षीही ठाम उभे होते. ते या आंदोलनातले केंद्रबिंदू होतेच, शिवाय त्यांनी जागतिकीकरण
झालेल्या शहरी मध्यम वर्गालाही या आंदोलनात सहभागी करून घेऊन कृती करण्याची प्रेरणा दिली, याचे नवल वाटत होते. या आंदोलनातून मध्यमवर्गीयांनी उच्चभ्रूंच्या हाती सत्ता एकटवण्याला आव्हान दिले आहे, तसेच धोरण आखण्यात यापुढे मध्यमवर्गीयांनाही सहभागी करून घेण्याचे लक्षात आणून दिले आहे.


मध्यवर्गीयांची चळवळ असे संबोधल्या गेलेल्या या चळवळीत सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी नेतृत्व करणे अपेक्षित होते, पण ज्या प्रकारे हे आंदोलन झाले त्यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, समाजातील एक विशिष्ट वर्ग एक तर विस्मरणात गेला किंवा तो सोयीस्करपणे मध्यमवर्गात मिसळून टाकण्यात आला. हा वर्ग मध्यमवर्ग आणि वंचितवर्ग यांच्या मधला आहे, ज्याला' आशावादी' वर्ग म्हणता येईल. या वर्गाला मध्यमवर्गात जाण्याची इच्छा आहे . आशावादी वर्गातल्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख ते ३ लाख ४० हजार रु. ( २००९ - १० मधील किमतींनुसार ) आहे. या वर्गातील बहुतांश कुटुंबांतील मुख्य कमावते पुरेसे शिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना कमी उत्पन्नाचे, मजुरीचे, क्लार्कचे काम करावे लागते. पण त्यांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करायचे असल्याने त्यांचा प्रवेश मध्यमवर्गात होऊ शकेल.

सर्वत्र चर्चिल्या जात असलेल्या झपाट्याने होत असलेल्या भारताच्या वाढीत आपणही सहभागी व्हावे आणि आपणही मध्यमवर्गात जावे, ही या वर्गाची मनीषा आहे आणि याच आकांक्षेने हा वर्ग दिल्लीतल्या या आंदोलनात सहभागी झाला. भ्रष्टाचाराविरोधी लढा हा त्यांच्या लढ्यातील एक भाग आहे. त्यांचा संघर्ष एकूणच देशातील यंत्रणेविरोधी आहे ज्या यंत्रणेने त्यांना असमानतेची वागणूक देत त्यांची वाढ खुंटवली आहे. परवडणारे व दर्जेदार शिक्षणस आरोग्य व रोजगाराच्या संधी यापासून वंचित ठेवले आहे.

सन २०१५ - १६ मध्ये या वर्गाची संख्या एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के, म्हणजे अंदाजे ४४.४ कोटी असेल, तर मध्यमवर्गाचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या २० टक्के, म्हणजे २६.७ कोटी असेल.  त्यामुळे हा वर्ग संख्येच्या बाबतीत मध्यमवर्गापेक्षा सरस असल्याने या दशकाच्या मध्यात या दोन्ही वर्गांचे एकूण लोकसंख्येत एकत्रित प्रमाण अंदाजे ५४ टक्के असेल. याचाच अर्थ असा की, मतांचे गठ्ठे मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांना यापुढे फक्त गरीब मतदारांना खूष करून चालणार नाही. निवडणुकीचे यश आता आर्थिक घटकांवर अधिकाधिक अवलंबून होत चालले आहे.  त्यामुळे निडणुकीच्या जय- पराजयात सामाजिक विषमतेपेक्षा आर्थिक धोरणे, आर्थिक निर्णय यांचे महत्त्व वाढत जाणार आहे. याचाच परिणाम म्हणजे, यापुढे राजकीय आणि विकासाचे धोरण आखताना मध्यमवर्ग आणि आशावादी वर्ग अतिशय प्रभावशाली असणार आहे.

पण हा झाला एक भाग. सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यांचा आपली अर्थव्यवस्था, लोकशाही आणि त्याबरोबरच राजकीय क्षेत्र यांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या घटकांसोबतच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा विषय म्हणजे डेमोग्राफी आणि त्यांच्यातील वाढती राजकीय जागृती.   १३ ते ३५ या तरुण गटातील लोकसंख्या सन २००९ मध्ये ४५.९ कोटी होती . येत्या निवडणुकीत या गटातील असंख्य तरुणांना मतदानाचा अधिकार मिळेल. उदारीकरणाच्या काळात वाढलेल्या आणि शिकलेल्या या तरुण वर्गाचा बौद्धिक क्षमतेवर अधिक भर आहे. भ्रष्टाचाराची खोलवर गेलेली पाळेमुळे आणि मूठभर लोकांच्या हातात एकवटलेले स्रोत पाहिल्यावर वाढीची कल्पना किती खुजी आहे आणि त्यांना कशी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे, याची त्यांना कल्पना आहे.

समाजातील विविध स्तरांतील लोकांमध्ये सध्याच्या अनागोंदीविषयी खदखदत असलेला असंतोष हेरून अण्णा हजारे यांनी अशा विविध स्तरांतील लोकांना कौशल्याने एकत्र आणले.  त्यामुळेच भ्रष्ट व्यवस्था धुवून काढण्याबरोबरच समानतावादी समाज निर्माण करण्याची भावनाही या संघर्षामागे होती. टीव्ही आणि मोबाइलच्या माध्यमातून हे आंदोलन ज्या प्रकारे पसरले त्यातून जग किती जोडलेले आहे, हे अधोरेखित झालेच, पण या आंदोलनाच्या संवेदना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्याचीही जाणीव झाली.

व्यापकपणे हे आंदोलन भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे दिसत असले तरी मला हा एका मोठ्या संघर्षाचा एक भाग असल्यासारखे वाटते. हा मोठा संघर्ष देशातील एकंदरित समीकरणे बदलणारा असेल, ज्यामध्ये जास्त भर विकास आणि लोकांप्रतीची जबाबदारी यावर असेल.   समान संधी व गुणवत्तेवर आधारित समाज निर्माण करण्याकडे त्याचा कटाक्ष असेल.

( लेखक एनसीएईआर - सीएमसीआरचे संचालक आहेत

No comments: