Sunday, October 2, 2011

माझं Tweet.....मिफ्ता लंडन...यशाचं दुसरे वर्ष!

२ ऑक्टोबर २०११:  महेश मांजरेकर आणि मराठी नाट्य आणि चित्रपटातील कलाकारांनी हिंदी चित्रपट सृष्टीत परदेशात होणाऱ्या "आयफा" च्या धर्तीवर गेल्या वर्षीपासून 'मिफ्ता' नावाने सुरु केलेला पुरस्कार सोहळा यंदा लंडन मधे दिमाखात पार पडला.  गेल्या वर्षी दुबईत तीनशे कलावंत 'मिफ्ता पुरस्कार सोहळा' करून आले आणि यंदा 'लंडनला’ आणखी जास्त संख्येने मराठी कलाकार त्यात सहभागी झाले.   महेश मांजरेकरांच आणि मिफ्ताच्या संपूर्ण टिमच, त्यात सहभागी झालेल्या सगळ्या कलाकारांच आणि खास करुन दुबई आणि लंडन मधील समस्त मराठी रसिकांच कौतुक कराव तेवढ थोडं.   त्यांच त्रिवार अभिनंदन! आणि पुढच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा.

या पुढे मराठी चित्रपट आणि नाट्य व्यवसाय हा साता समुद्रापलीकडे नेण्यात मिफ्ताचं योगदान मोठं असणार आहे यात शंकाच नाही.   "श्वास" चित्रपटाच ऑस्कर साठी नॉमिनेशन झाल्यापासून मराठी चित्रपट आणि नाट्य व्यवसाय खऱ्या अर्थाने श्वास घ्यायला लागला अस मी मानतो.   त्याच्या नंतर बरेच चांगले दर्जेदार चित्रपट आले आणि अजून येत आहेत.   आज मराठी चित्रपटांचे बजेट काही कोटींमधे गेलेले आहे.   कलाकारांना चांगल मानधन मिळतं.   निव्वळ मार्केटिंगसाठीच काही कोटी रुपये खर्च होत आहेत.   म्हणजे आज मराठी नाट्य आणि चित्रपटांना चांगले दिवस नक्कीच आलेले आहेत किंवा येऊ घातलेले आहे अस म्हटंल तर चुकीच होणार नाही. चांगल्या पैशाबरोबरच चांगली दर्जेदार कलाकृती, व्यावसायिकता आणि कलाकारांना मानमरातब आणि एकूणच मराठी नाट्य-चित्रपटाचा पसारा दिवसागणिक वाढतो आहे.   मिळालेल यश ही क्षणिक लाट न ठरता एक भक्क्म उद्दोगक्षेत्र होवो ही सदिच्छा! 
 आज प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे.  काम करणाऱ्या प्रत्येकाला एका आत्मियतेने आणि आपलेपणाने काम कराव लागणार आहे.  आपली शर्यत ही आपल्याच कामाबरोबर असली पाहिजे, आणि इतर कुणी पुढे गेले मोठे झाले तरी नकळतपणे आपणच मोठे होणार आहोत ही भावना ठेवुन काम करावं लागणार आहे.  अशा प्रयत्नांना मराठी प्रेक्षकांनी अजूनही म्हणावा तसा पाठिंबा दिलेला नाही. त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. मिफ्ता मुळे मराठी चित्रपटांना परदेशी बाजारपेठ, पैसे आणि एकूणच जगभरातील मराठी रसिकांच पाठबळ मिळण्यास मदत होवो, नव्हे तशी मदत व्हायलाच पाहिजे.  आणि म्हणून मिफ्ताने पुरस्कार सोहळ्याच्या पुढे जाऊन कलाकारांचा जगभरातील मराठी लोकांशी थेट संवाद घडवुन आणला तर फारच व्यवसायाच्या दृष्टीने एक वेगळ मह्त्व प्राप्त होईल. नाट्य चित्रपट हा एक सिरिअस उद्दोग आहे आणि तो मनोरंजनाच्या पुढे जाऊन बघायला पाहिजे.   नाट्य-चित्रपटसृष्टी एक सगळ्यात मोठं प्रभावी माध्यमच नव्हे तर ती एक प्रभावशाली शक्ति आहे अस मी मानतो, आणि म्हणुनच  कलाकारांच्या येणाऱ्या नविन पिढीला अपेक्षा असणार यात शंका नाही.

आज पर्यंत अनेक सोहळे पुरस्कार आणि समारंभ झाले, त्या पुढे जाऊन कलाकारांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येणं गरजेच आहे.  एक होणं गरजेच आहे.  सोहळा, परदेशवारी, उत्सव असे म्हटले तरी खरे तर अशा उत्सवी सोहळ्यांमधून सकारात्मक परिणाम घडवण्यार्‍या काही गोष्टी नकळत नक्कीच साध्य होत असतात. सृजनाच्या पातळीवर विचार केला तर अनेक लेखक, पत्रकार, कलाकार परदेशातील कला-संस्कृती बघतात, तेव्हा त्यांना एक फार मोठा कॅनव्हास बघायला मिळतो.  विशाल जगाशी त्यांचा परिचय होतो.  व्यवसायाचा विचार केला तरी या वाढलेल्या आर्थिक उलाढालीचा नाट्य-चित्रपटसृष्टीला फायदा होतो. कोणी सांगावे एनआरआय हिंदी चित्रपट हा एका प्रकार मागील १५-२० वर्षात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेपासून उदयास आला. तसेच एनआरआय मराठी चित्रपट ह्या प्रकारातील काही कलाकृती निर्माण होतील.   ह्या नकळत होणार्‍या परिणामाशिवाय जर काही नियोजन करून,  विविध क्षेत्रातील व्यावसाईक-प्रोफेशनल्सना बरोबर घेऊन, जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर दादासाहेब फाळक्यांनी लावलेल्या पारिजातकाच्या फुलांचा सडा मराठी चित्रपटसृष्टीच्या अंगणात सुद्दा दिसेल!

टीप:  मिफ्ताचे कौतुक जेष्ठ लेखक जयंत पवारांनी खुपच चांगल्या पध्दतीने आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये केलं आणि त्याच बरोबर लोकसत्तामध्ये बॅकस्टेज आर्टिस्टचे काम करणाऱ्या मराठी कलाकारांची व्यथेची एक बातमी वाचली.  ती पण खाली देत आहे.    केलेल्या प्रगतीचे कौतुक करत असताना मुळ प्रश्नाकडे सुद्दा  गांभिर्याने बघितलं गेल पाहिजे.  
********************************************************************

व-हाड जाऊन आलंय लंडनला - जयंत पवार

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स - दि. २.१०.२०११

आज लक्ष्मण देशपांडे हयात असते आणि ते मिफ्ता पुरस्कार सोहळ्यासाठी पावणे चारशे कलावंतांच्या कबिल्यासह लंडनवारी करून आले असते तर त्यांनी 'वऱ्हाड निघालंय लंडनला'चा दुसरा भाग नक्की लिहिला असता. एखाद्या शाही लग्नाच्या वऱ्हाडासारखेच सारे कलावंत-तंत्रज्ञ आपला जामानिमा घेऊन विमानात बसले. विमानाने टेक ऑफ घेताच प्रथेप्रमाणे 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करते झाले आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ते लॅण्ड होताना पुन्हा एकदा या गजराबरोबरच 'मेरी झांसी नही दूंंगी', 'तुम मुझे खून दो मैं तुझे आजादी दूंगा'चे नारेसुद्धा देते झाले. एस्टीतल्या प्रवासाप्रमाणे उडत्या विमानात स्वैर भटकणारे, गाण्यांच्या भेंड्या खेळणारे, मोठ्याने ओरडून चिडवाचिडवी करणारे हे पोट्टे आणि पोट्ट्या बघून ब्रिटिश एअरवेजच्या हवाई सुंदऱ्यांची चिडचीड झाली तरी हे मराठीमस्तीत होते.

खरंतर इतक्या मोठ्या संख्येने एकेकाळच्या वसाहतवाद्यांच्या देशात शिरून चार-पाच दिवस वसती करून राहणं हे एक आश्चर्यच होतं. पण 'मिफ्ता' नावाने सुरू झालेल्या मिशनने ते सलग दोन वर्षं प्रत्यक्षात आणून दाखवलं. गेल्या वषीर् दुबईत तीनशे कलावंत 'मिफ्ता पुरस्कार सोहळा' करून आले आणि 'लंडनचं काही खरं नाही' म्हणता म्हणता ह्या संख्येत घट न होता भरच पडून याही सोहळ्याची तुतारी फुंकून आले. गतवषीर्च्या बराच गाजावाजा करुन नंतर खूपसा गोंधळ घातलेल्या न्यू जसीर् नाट्यसंमेलनाच्या आणि परदेशवारीची लॉटरी लागलेल्या निवडक साहित्यिकांना घेऊन जेमतेम आटपून येणाऱ्या विश्व साहित्य संमेलनांच्या पार्श्वभूमीवर या नव्या कलावंत संमेलनाने मारलेली उंच उडी तशी अप्रूपाचीच म्हणायला हवी. मराठी कलावंतांत हेवेदावे फार, असं म्हणणाऱ्यांची पाचही बोटं आश्चर्याने तोंडात जावीत अशा सौहार्दाने सारे नट, नट्या, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, निर्माते, गायक, संगीतकार या दौऱ्यात आपापले कॅम्प विसरून एकमेकांत मिसळून खुल्या दिलाने राहिले, फिरले, वावरले.

ह्या सगळ्याची सुरुवात दोन वर्षांपूवीर् महेश मांजरेकरच्या पुढाकाराने झाली. दि ग्रेट मराठा एंन्टरटेन्मेंट नावाची कंपनी त्याने वाजत गाजत लॉंच केली आणि तिच्यातफेर् परदेशात मराठी नाट्य-चित्रपटांचे पुरस्कार सोहळे करण्याची घोषणा केली. राजा राणी ट्रॅव्हल्सच्या अभिजीत पाटील यांनी महेशच्या डोक्यात ही कल्पना घुसवल्यावर ती इतक्या त्वरेने प्रत्यक्षात येईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. हिंदी चित्रपटांचे पुरस्कार सोहळे परदेशात होतात तर मराठीची का होऊ नयेत, हा यामागचा साधा हिशेब. पण हिंदी चित्रपटसृष्टीला जे ग्लॅमर आहे ते मराठीला कधीच नव्हतं. पण हे काम काळाने नेमक्यावेळी केलं. मराठी अस्मितेचा मुद्दा गेल्या काही वर्षांत केवळ राजकीय न राहता सांस्कृतिकही बनला. सगळीकडेच प्रादेशिकतेची भावना बळावत असताना मराठी माणसालाही आपल्या मागे राहण्याचं न्यून वाटू लागलं आणि त्याच्यातलं टॅलण्ट झेप घेण्यासाठी आसुसू लागलं. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'ला मिळालेलं यश ही त्याचीच एक खूण होती. महेशने स्वत:च केलेला हा सिनेमा त्याच्यासाठी लिटमस टेस्ट ठरला नि अचूक रिझल्ट मिळताच त्याने 'मिफ्ता'च्या नावाने पुढची झेप घेण्याचा निर्णय घेतला असावा.

एकाअर्थाने लंडनमध्ये २३ ते २६ सप्टेंबर या काळात मराठी कलावंतांचं संमेलनच भरलं होतं. फार पूवीर् मराठी नाट्य परिषदेतफेर् कलावंत मेळावा होत असे. त्यात सगळे नाट्य कलावंत सहभागी होत. त्यादिवशी एकमेकांना भेटत. आपल्या अडचणी, तक्रारी जाहीरपणे मांडत. ती मोडलेली प्रथा आता नव्याने सुरू होतेयसं वाटलं. अर्थात या 'मिफ्ता' मेळ्यात अडचणी, तक्रारी यांना थारा नव्हता. होतं ते सेलिब्रेशन. आणि तोच तर नव्या जगण्याचा मंत्र आहे. लंडनमधल्या पहिल्या रात्री हेच सेलिब्रेशन थेम्स नदीत उभ्या असलेल्या क्रूझवर झालं. लंडन महाराष्ट्र मंडळाचे सभासद सहकुटुंब मोठ्या संख्येने कलावंतांबरोबर सहवासाचा, भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी डेकवर जमले होते. आपलं पौगंड-तारुण्य मुंबई-पुण्यातल्या कलाजगतात आणि कलावंत मित्रांच्या संगतीत घालवलेले पण गेली अनेक वर्षं परदेशात स्थायिक झालेले कित्येकजण आपल्या कुटुंब कबिल्यासह पुन्हा एकदा तो माहोल अनुभवण्यासाठी आले होते. अनेकांना आता टीव्हीमालिका, इंटरनेट, फेसबुकमुळे नवे कलावंत परिचयाचे झाले होते. त्यांच्याद्वारे लंडनकर मराठीजन आपल्या आठवणींची कवाडं उघडत भूतकाळात शिरत होते. त्याचवेळी लंडनब्रीज खुला होत त्याच्याखालून बोट पलीकडच्या प्रवाहात शिरत होती.

' मिफ्ता सोहळ्या'तल्या कार्यक्रमाची थीम देखील 'नॉस्टॅल्जिया' अशीच होती. पण त्याआधी दुसऱ्या दिवशी झालेल्या क्रिकेट मॅचने मराठी कलावंत आणि लंडनवासीय मराठी माणसांना अधिक जवळ आणलं होतं. काही दिवसांपूवीर् इंग्लंडमध्ये भारतीय संघाने सपाटून मार खाल्ला होता. पण मराठी कलावंतांच्या टीमने त्याची पुनरावृत्ती होऊ न देता लंडनकरांना हरवलं. अभिनेता जितेंद जोशीची अथक चाललेली कॉमेंटरी हा खरा ह्या सामन्यांतला हायलाइट होता.

कलावंतांनी क्रूझवरच्या पाटीर्त आपल्या कलागुणांची बेरकी झलक दाखवली होतीच, पण २५ तारखेच्या रात्री ग्रीनविचच्या ओटू नाट्यगृहात झालेल्या मुख्य इव्हेण्टमध्ये ते आणखीन खुलले. 'एकच प्याला', 'नटसम्राट', 'बॅरिस्टर', 'हमिदाबाईची कोठी' ह्या अशा कार्यक्रमांत सहसा सादर न होणाऱ्या गंभीर नाटकांबरोबर 'श्ाी तशी सौ', 'ऑल दि बेस्ट' ह्या विनोदी नाटकांतले प्रवेशही टेचात सादर केले गेले. त्यांच्या जोडीला जुनी चित्रपट गीतं, त्यावरची नृत्यं, श्ाीनिवास खळ्यांची भावगीतं, स्किटस् असा साडेतीन तासांचा भरगच्च कार्यक्रम होता. काही ठिकाणी तो लांबल्यासारखाही झाला, पण लंडनवासीयांना हा मराठमोळा आविष्कार पाहू तितका कमीच वाटत होता. कार्यक्रमाचे निवेदक म्हणून आधी पु.ल. (अतुल परचुरे) मग दादा कोंडके आणि निळू फुले (पुष्कर श्ाोत्री-नीलेश साबळे) आणि शेवटी लता मंगेशकर-नाना पाटेकर (वैभव मांगले-जितेंद जोशी) अशा जोड्या आणायची कल्पना चांगली होती. नीलेश साबळेने घेतलेलं निळूभाऊंचं बेअरिंग आणि बोलण्याची ढब दाद द्यावी अशी होती. जितेंद आणि वैभवने तर दोन्ही व्यक्तिमत्वं अशा खुबीने आणि बेरकीपणाने खुलवली की त्यात दोन्ही मान्यवरांनी परस्परांची फिरकी घेतल्याचा धमाल फील आला. भावनांचे कढ काढून सारखे डोळे पुसणारा नाना आणि 'तेव्हा मी १३ वर्षांची होते'चं पालुपद लावत नेमक्या प्रश्ानंची उत्तरं टाळणाऱ्या लताबाई यांच्या नकला प्रेक्षकांना लोटपोट करून गेल्या. अर्थात याचं श्ाेय या स्किटचं लेखन करणाऱ्या राजेश देशपांडेलाही द्यायला हवं. चंदकांत कुलकणीर्ंनी नाट्यप्रवेश आणि स्किटस्चं दिग्दशंन केलं होतं तर नृत्याची बाजू सोनिया परचुरेंनी उत्तमपणे सांभाळली होती. स्वत: सोनियाने कार्यक्रमाच्या अखेरीला सादर केलेलं अभंगांवरचं नृत्य आणि एकूण कोरिओग्राफी खूप वेगळी होती. या संपूर्ण कार्यक्रमात नाट्यप्रवेशांत विक्रम गोखले, प्रशांत दामले, सचिन खेडेकर, सुनिल बवेर्, वंदना गुप्ते, नीना कुळकणीर् यांच्यापासून ते प्रसाद ओक, भरत जाधव, संजय नावेर्कर, अंकुश चौधरी, अनिकेत विश्वासराव, विजय कदम, नेहा पेंडसे पर्यंत आणि नृत्यात सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, सोनाली कुलकणीर्, मनवा नाईक, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, आदित्य कोठारे, अभिजीत केळकर, मानसी नाईक, शेफाली सय्यद, भार्गवी चिरमुले, मृण्मयी देशपांडे अशा नव्या दमाच्या कलाकारांनी आपली अदाकारी पेश केली. सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी, अजित परब, स्वप्निल बांदोडकर, अवधुत गुप्ते हे मान्यवर गायक गाऊन गेले. लंडनस्थित आणि या सोहळ्याचे आधारस्तंभ असलेले महेश पटवर्धन यांनी 'या चिमण्यांनो परत फिरा रे' हे गाणं गाऊन तिथल्या मराठी माणसांच्या अंतरात्म्यालाच साद घातली. अवधुत गुप्तेच्या 'गर्जा महाराष्ट्र माझा'ने कहर केला. अवधुतची गाणं सादर करण्याची शैली, त्यातला ताल आणि त्यातून महाराष्ट्राविषयी-मराठीपणाविषयी उचंबळून येणाऱ्या यामुळे रसिकांनी त्याला वन्समोअर दिला.

सिंधुताई सपकाळ यांनी अखेरच्या क्षणी रंगमंचावर आगमन करून माइक हातात घेत महेश मांजरेकरला आशीर्वाद देण्याची संधी साधून घेतलीच, पण ही वाट काटेरी असल्याचंही सांगितलं. पण त्याचवेळी या मिफ्ता सोहळ्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेले उद्योजक दत्तात्रय म्हैसकर यांनी, हे काटे बोचणार नाहीत याची काळजी मी घेईन, असं तिथेच ठोस आश्वासन देऊन पुढच्या सोहळ्यासाठी आयोजकांना उभारी दिली. त्यामुळे परतताना सर्व कलावंतांवर आणि एकूणच मराठी एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीवर उत्साहाची आणि ग्लॅमरची दोन पुटं जरा जास्तच चढली होती.

***************************************************************************

मराठी नाट्यव्यवसायात ‘भैय्या हातपाय पसरी’!

बॅकस्टेज आर्टिस्टचे काम करणाऱ्या मराठी कलाकारांचा तुटवडा

रोहन टिल्लू, मुंबई, १ ऑक्टोबर

सौजन्य लोकसत्ता दि. २०.१०.२०११

नाटक उभे करण्यासाठी लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या तोडीचे काम करणाऱ्या बॅकस्टेज आर्टिस्टची संख्या कमी होत असून आता या धंद्यातही ‘भैय्या’ हातपाय पसरी’ असे चित्र आहे. गेल्या १०-१५ वर्षांत मराठी रंगभूमीवरील बॅकस्टेज आर्टिस्टची संख्या तब्बल ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे नाटक धंद्याला झळ पोहोचण्याची शक्यता निर्माते व्यक्त करतात.

बॅकस्टेज आर्टिस्टमध्ये सेट लावणारे, प्रॉपर्टीवाले, ड्रेपरी सांभाळणारे आदींचा समावेश आहे. नाटकाच्या एका प्रयोगामागे बॅकस्टेज आर्टिस्टला २५० ते ३०० रुपये मानधन मिळते. गेल्या काही वर्षांत धंद्याची बदलती गणिते आणि कलाकारांच्या दुर्मिळ झालेल्या तारखा यामुळे प्रथितयश नाटय़संस्थांच्या चालणाऱ्या नाटकांचेही महिन्याला जेमतेम १५-२० प्रयोग होतात. त्यामुळे या आर्टिस्टच्या हाती दरमहा साडेचार ते सहा हजार एवढीच रक्कम येते. एवढय़ा पैशात कुटुंबाचा खर्च भागवणे शक्य नसल्याने अनेक मराठी बॅकस्टेज आर्टिस्ट चांगल्या पगाराच्या नोकरीकडे वळले आहेत. सेट लावणाऱ्या कलाकारांना नाटकाच्या प्रयोगाआधी गोदामामधून सेट आणण्यापासून प्रयोगानंतर तो परत पोहोचवण्यापर्यंत काम असते. याचे गाडीभाडे त्यांना दिले जात नाही. तसेच दिवसाला मिळणाऱ्या ३०० रुपयांमधील ७०-८० रुपये जेवण आणि प्रवासावरच खर्च होतात. त्यामुळे बॅकस्टेज आर्टिस्ट या धंद्यात टिकत नसल्याचे, ‘सुयोग’ या नाटय़संस्थेचे सर्वेसर्वा सुधीर भट यांनी सांगितले. पुण्यातील सिद्धिविनायक निर्मितीच्या शेखर लोहकरे यांनीही बॅकस्टेज आर्टिस्टचे मानधन कमी आहे, या गोष्टीला दुजोरा दिला. मात्र नवीन कलावंतांनाही याच पटीत मानधन मिळते, असे ते म्हणाले.

मराठी बॅकस्टेज आर्टिस्ट या धंद्यातून काढता पाय घेत असल्याने आता परप्रांतीय मंडळींचे चांगलेच फावले आहे. सेट लावणाऱ्या मेस्त्रींपासून ते ड्रेपरी सांभाळणाऱ्यांपर्यंत अनेक क्षेत्रात या मंडळींनी शिरकाव केला आहे. या लोकांवर कुटुंबाची जबाबदारी नसल्याने त्यांना एवढय़ा कमी पैशात काम करणेही परवडते. मात्र त्यामुळे काही महिन्यांतच मराठी रंगभूमीच्या बॅकस्टेजचा ताबा या मंडळींकडे जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

मानधनात करणार वाढ

बॅकस्टेज आर्टिस्टची ही परिस्थिती पाहता मराठी रंगभूमीवरील अनेक स्तुत्य उपक्रमांमध्ये अग्रणी असलेल्या ‘सुयोग’ने या आर्टिस्टच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सेट लावणाऱ्या आर्टिस्टच्या मानधनात दीडशे रुपयांनी वाढ करून ते ४५० रुपयांपर्यंत करण्यात येईल. तसेच प्रॉपर्टी आणि ड्रेपरी यासाठी हे मानधन ३५०-४०० रुपये इतके केले जाईल, असे भट यांनी जाहीर केले आहे. इतर नाटय़संस्थाही आपला कित्ता गिरवून या कलाकारांच्या मानधनात वाढ करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

No comments: