Tuesday, October 25, 2011

माझं tweet.....शुभ दिपावली! २०११

२५ ऒक्टोबर, २०११:  मित्रांनो सर्वप्रथम दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा!  दिवाळी म्हटंल की घराघारात उत्साह आनंद आणि जोश!   आकाश कंदिल, रांगोळ्या, दिवे, फटाके, दिवाळीचा फराळ (लाडु चकल्या चिवडा करंज्या अनारसे.....), नविन कपडे, शुभेच्छा पत्र (ग्रीटिंग्स),  फोन, एसएमेस्स, ईमेल्स, हल्ला गुल्ला!  मग  एकमेकांच्या घरी जाणं, मित्रांसोबत  दिवाळीची खास पार्टी आणि हो अहो दिवाळी अंक विसरलात?  पुर्वी नाही का म्हणायचे -  चार गुजराती माणसं एकत्र आलीत की एखादा पैसे कमावण्याचा धंदा करतात, आणि चार मराठी माणसं एकत्र आलीत की दिवाळी अंक काढतात!  हल्ली चार मराठी तरूण एकत्र आलीत की ब्लॉग किंवा एखादी वेबसाईट बनवितात!   काय चुकलं त्यांच.  खरं तर प्रत्येक मराठी कुटूंबात किमान १००० रुपयांचे दिवाळी अंक विकत घेतले पाहिजेत आणि घरातल्या प्रत्येकाने आवडीनुसार ते वाचले सुद्धा पाहिजेत.  तसेच वेबदुनियेत आपण पाहिलेल्या चांगल्या मराठी वेबसाईट्स इतरांना बघण्यास सुचविल्या पाहिजेत किंवा त्यावर येणारा मजकुर वाचल्यानंतर अभिप्राय दिला पाहिजे.  विचारांनी आपला समाज किती पुढे आहे हेच त्याच एक लक्षण आहे अस मी समजतो.  एकुणच काय तर दिवाळी म्हटंल की नव-चैतन्य आणि जल्लोश! 
खरं तर यंदाची दिवाळी कधी आली हे कळलच नाही.  हो.  मित्रांनो हे वर्ष कस भराभर चाललय हेच कळत नाही.   बरं रोज वर्तमान पत्रात किंवा टिव्ही वर काय वाचाव आणि पहाव तर जगभरातील मंदी, भुकंप, बॉम्ब स्फोट आणि आपल्या देशात  रोज घडणारे स्कॅम्स!  प्रत्येक स्कॅम लाखो करोडोच्या घरातले!  अर्ध केंद्रिय मंत्रिमंडळ आणि बड्या कंपन्याचे अधिकारी तिहार मधे.  त्यातुन सुटका होत नाही तर हिस्सार (हरयाणा) मधुन लोकसभेची निवडणूक हरल्यापासुन कॉंग्रेसची अण्णां हजारेंच्या टिम मेंबर्स वर रोज होणारी प्रखर टिका.  त्यातच बातमी येते की गौतम राज्यध्यक्ष, स्टिव्ह जॉब्स आणि काल परवा गझलगायक जगजित सिंग गेले!  मित्रांनो गौतम राज्यध्यक्ष आणि जगजित सिंग गेले!  या बातमीवर विश्वासच बसत नाही.   माझ्या "प्रगतीचा एक्सप्रेस वे" या पुस्तकाच्या कव्हर पेज साठी गौतम ने माझा फोटो काढला आणि आमची मैत्री झाली.   प्रत्येक चेहऱ्याची सुंदर फ्रेम त्यांना दिसत होती कारण त्यांच्या मनाची लेन्स स्वच्छ आणि सुंदर होती!   प्रेमळ आणि मनापासुन बोलणारे गौतम.  फार वाईट वाटलं.  जगजित सिंग - १९८१/ ८२ मधे मी रुईया कॉलेज मधे बीए करत असताना रुईयाच्या क्ट्ट्य़ावर "होठोंसे छुलो तुम मेरा गीत अमर कर दो......", चे स्वर अजुनही माझ्या कानात नव्हे ह्यदयात तसेच्या तसेच आहेत.   "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो......", "आदमी आदमी को क्या देगा?......"  "ये कागज की कस्ती ये बारिश का पानी......." कस विसरु मी त्यांना.  त्यांची प्रत्येक गझल आपल्याला व्याकुळ करते.   गौतम राज्यध्यक्षां बरोबर केलेल्या गप्पा आणि रुईच्या कट्टयावर बसुन ऎकलेल्या जगजितच्या गझल्स मी कदापी विसरु शकणार नाही.  

मग त्यातुन एखादी खरच खुप गोड बातमी येते की जगभारातील संगीतप्रेमींच्या मना-कानांवर सहा दशकांहून अधिराज्य गाजविणा-या मलिका-ए-‘सूर’ ताज, आशा भोसले यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान!  1943 पासून कारकीर्दीची सुरुवात करणा-या आशाताईंनी 20 पेक्षा अधिक भाषेत तब्बल 11 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली.  संगीत संशोधक विश्वास नेरुरकर यांनी आशाताईंची सर्व गाणी शोधून काढली आणि त्याची माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे कळवली. त्यामुळेच आशाताईंच्या कामगिरीची नोंद होऊ शकली.  आशाताईंच अभिनंदन आणि नेरुरकरांचे मनापासुन कौतुक आणि आभार!

अशा संमिश्र वातावरणात दिवाळी आली आहे तरी आपण दिवाळीच आनंदाने स्वागतच केलं पाहिजे.  ये दिन भी जायेंगे..... म्हणत पुढे गेल पाहिजे.....

माझ्या वाचकांचे आणि खास करुन  New York, California, UK, Germany, Taipei, Dubai, Singapore, Australia, Japan तसेच देशातील आणि महाराष्ट्राच्या शहरातील आणि ग्रामीण भागातील वाचकांचे आभार.  तुम्हा सगळ्यांना दिवाळी सुखाची आणि आनंदाची जावो ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजचा ब्लॉग संपवतो.  

No comments: