Saturday, November 5, 2011

माझं tweet.....लेखकांची दिवाळी!

५ नोव्हेंबर २०११:   दिवाळीच्या शुभेच्छा देताना मागच्या ब्लॉग मधे मी म्हटंल होत की चार मराठी माणसं एकत्र आलीत की दिवाळी अंक काढतात!  आणि हल्लीची चार मराठी तरूण एकत्र आलीत की ब्लॉग किंवा एखादी वेबसाईट बनवितात!   विचारांनी आपला मराठी समाज किती पुढे आहे हेच त्याच एक उत्तम उदाहरण आहे अस मी समजतो असही मी म्हटंल.  

विविध प्रकारची मासिकं, दिवाळी अंक, वृतपत्रांच्या आवृत्या, आता ब्लॉग्स....... इतक्या प्रचंड प्रमाणात मराठीत विविध प्रकारचं लिखाणं करणारी माणसं असताना आपण काय पहातो तर  आज प्रत्येक चांगल्या प्रकाशकाची, नाटय-चित्रपट आणि टिव्ही सिरीअल्स निर्मात्यांची एकच तक्रार आहे ती म्हणजे त्यांना चांगल्या उत्तम कथा कादंबऱ्या किंवा पटकथा मिळत नाहीत.  हल्ली चांगले लेखकच तयार होत नाहीत?  म्हणजे एकीकडे रकानेच्या रकाने भरुन लिखाणं होत आहे, आणि दुसरीकडे आपणच म्हणतो की लेखक कुठे आहेत. मला वाटतं कुठे तरी आपण चुकतोय का?   हा विचार करीत असताना महाराष्ट्र टाईम्स मधे एक बातमी वाचली "कादंबरीकार बनवायची फॅक्टरी" ती खाली देत आहे. 

थोडक्यात अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतातील बर्कलेत राहणारा मुक्त पत्रकार क्रिस बेटी याने ’नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंच" स्थापन केला- लेखनाची इच्छा बाळगणाऱ्यांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कम्प्युटरसमोर बसवून त्यांच्या मनात साठलेल्या विषयावर किमान ५० हजार शब्द लिहून घेण्याचा हा उपक्रम आहे.  या स्पर्धेत सामिल होऊन पुढे बेस्ट सेलर लेखक झाल्याची काही उदाहरणं आहेत. स्पर्धेसाठी तयार झालेला ५० हजार शब्दांचा कच्चा खर्डा दाखवून काहींनी प्रकाशक सुद्धा मिळवले आहेत. अनेकांनी या कच्च्या प्लॉटवर काम करून पुढे आपलं पुस्तक पूर्ण केलं आहे.   मला वाटंत आपण ती बातमी खरच वाचावी आणि त्यांच्या वेबसाईटला सुध्दा भेट द्यावी.
हो अगदी बरोबर तुमच्या मनात आला तसा विचार माझ्या सुद्धा आला.  कोणता सांगा.....

असा एखादा उपक्रम मराठीत का होऊ नये?  

टीप:  आणि नुसतं चांगल पुस्तक,  चित्रपट, नाटक आणि टिव्ही सिरिअल्सच का?  चांगल्या विचारांच्या जोरावर समाजाला उपयोगी पडणारा उपक्रम किंवा एखादी चळवळ सुरु करता येउ शकते...... रोजगार निर्मिती होऊ शकते.....म्हणुन विचार करणं गरजेच आहे.

**************    *************    *************    ************    ************

कादंबरीकार बनवायची फॅक्टरी


               - सौजन्य महाराष्ट्र टाईम्स - हारिस शेख

नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंथ. हे एका उपक्रमाचं नाव आहे. नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखेपासून ३० तारखेपर्यंत होतकरू लेखकांनी कम्प्युटरसमोर बसून ५० हजार शब्द लिहायचे, हे उपक्रमाचं उद्दीष्ट. यातून लेखक बनण्याची सुप्त इच्छा असलेले पुढे खरोखरीच उत्तम लेखक बनले आहेत. आज हे जगातली सर्वात मोठी लेखन स्पर्धा मानली जाते...

तरुण लेखकांनी लिहिलेल्या नवनवीन विषयांवरच्या पुस्तकांचा ओघ वाढू लागल्यानंतर आता कुठे आपल्याकडे लेखकांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडाबहुत बदलताना दिसतोय. अन्यथा लेखक म्हटला की काहीसा दाढी वाढविलेला, काखेत झोळी अडकवलेला, ही बंदिस्त प्रतिमा वर्षानुवर्षे कायम होती. त्याला कारणेही होती. लेखक होण्याची इच्छा बाळगणारे अनेक जण समाजात असतात. वेगळे विषय, अनुभव अनेकांजवळ असतात. पुस्तक लिहिण्याची तीव्र इच्छा असूनही मनातले विचार पानावर उतरवण्याची हिंमत फार कमी लोक दाखवत असतात. सलग लिखाण करण्याबाबतची सुप्त भीती म्हणा किंवा आळस यामुळे एक नव्हे दोन नव्हे तर वर्षानुवर्ष मनातले विचार कुजवत ठेवणारे अनेक महाभाग अवतीभोवती दिसत असतात. विशेषत: यात तरुणांची संख्या अधिक दिसून येते.

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतातील बर्कलेत राहणारा मुक्त पत्रकार क्रिस बेटी हा तरुण याला अपवाद नव्हता. त्याला पुस्तक तर लिहायचं होतं. परंतु या कल्पनेनंच तो घाबरायचा. या अवस्थेतून अनेक जण जात असल्याचं पाहून १९९९ साली क्रिसच्या डोक्यात एक कल्पना आली. लेखनाची इच्छा बाळगणाऱ्यांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कम्प्युटरसमोर बसवून त्यांच्या मनात साठलेल्या विषयावर किमान ५० हजार शब्द लिहून घेण्याचा उपक्रम सरू करायचं त्याने ठरवलं. आणि इथेच 'नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंथ' या जगभरातील तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या उपक्रमाचा जन्म झाला. ३० दिवसांमध्ये ५० हजार शब्द लिहिण्याचं ध्येय घेऊन १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान, दररोज या संस्थेच्या इंटरनेट साइटवर जाऊ न लिहित राहायचं. ५० हजार शब्द लिहिणं हे बंधनकारक नसलं तरी तो सर्वसाधारण नियम बनवला गेला. एखाद्या लेखन स्पर्धेसारखा वाटणारा क्रिसचा हा इंटरनेट आधारित वार्षिक लेखन उपक्रम सध्या जगभरात लेखक होऊ पाहणाऱ्यांमध्ये चांगलाच क्लीक झालाय. १९९९ साली केवळ २१ जणांच्या सहभागाने सुरू झालेल्या या उपक्रमात नोव्हेंबर २०१० मध्ये जगभरातल्या ४० देशांतले २ लाख ५३० लोक सामिल झाले होते. पैकी महिनाअखेर ३७ हजार ४७९ जणांनी ५० हजार शब्दांचा टप्पा पूर्ण करून ऑॅनलाइन प्रशस्तीपत्रक मिळवलं होतं. गेल्या बारा वर्षांच्या काळात जगभरात विस्तारलेल्या या उपक्रमाचं संचलन सध्या ऑॅकलंड येथील 'ऑफिस ऑफ लेटर्स अँड लाइट' ही स्वयंसेवी संस्था करत असते.

नॅशनल नॉव्हेल रायटिंगच्या उपक्रमात सामिल होण्यासाठी भाषा, विषय किंवा लेखन प्रकाराचं कोणतंही बंधन ठेवण्यात आलेलं नाही. उपक्रमात सामिल होणाऱ्यांमध्ये लेखनाची ऊर्मी असणं हीच एकमेव अट आहे. या संस्थेच्या वेबसाईटवर ( http://www.nanowrimo.org/ ) जाऊन नोंदणी करून कुणीही लेखन सुरू करू शकतो. १३ वर्षांखालील मुलांना मात्र त्यांच्या पालकांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

गेल्या १२ वर्षांत या लेखन उपक्रमाने अनेक होतकरू लेखकांना लिहितं केलं आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या लेखन स्पर्धेत सामिल होण्यासाठी अमेरिका आणि युरोपमध्ये अनेकजण जोरदार पूर्वतयारी करत असतात.  या स्पर्धेत सामिल होऊन पुढे बेस्ट सेलर लेखक झाल्याची काही उदाहरणं आहेत. स्पर्धेसाठी तयार झालेला ५० हजार शब्दांचा कच्चा खर्डा दाखवून काहींनी प्रकाशक सुद्धा मिळवले आहेत. अनेकांनी या कच्च्या प्लॉटवर काम करून पुढे आपलं पुस्तक पूर्ण केलं आहे. 'ब्रेकअप बेब्ज' (रिबेका एज्जिविच), 'मोट इन अँड्रियाज आय' (डेव्ह विल्सन), 'सेल्फ स्टोरेजक' (गेल ब्रँडेज) ही काही नावाजलेली पुस्तकं याच स्पधेर्तून प्रकाशित झाली असून 'फ्लाइंग चेंजेस' (सारा ग्रुन्स) हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर्सच्या यादीत झळकलं आहे. 'नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंथ'चा संस्थापक क्रिस बेटी याचं 'नो प्लॉट? नो प्रॉब्लम!' हे नवोदित लेखकांसाठीचं मार्गदर्शनपर पुस्तकही प्रकाशित झालं आहे. या स्पर्धेत सामिल होऊ न महिनाभरात ५० हजार शब्दमर्यादा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या लेखकांच्या हस्तलिखिताची प्रूफं तपासलेली पेपरबॅक प्रत तयार करून देण्यासाठी 'क्रिएटस्पेस' या कंपनीने पुढाकार घेतला आहे.

अमेरिका आणि युरोपमध्ये या उपक्रमाला तुफान प्रतिसाद मिळतोच आहे पण यात सहभागी होणाऱ्या भारतीयांची संख्याही हळूहळू वाढते आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, कोचिन, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये 'नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंथ'मध्ये भाग घेणाऱ्यांचे ग्रुप्स तयार झाले आहेत. त्यांच्या आपसात भेटीगाठी होऊ न साहित्यिक चर्चाही होत असते. विशेषत: पश्चिम बंगाल आणि केरळमधले तरुण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमात भाग घेत असल्याचं दिसून आलं आहे. अर्थात याद्वारे लेखनाची सुरुवात करून पुढे एखादं पुस्तक प्रकाशित झाल्याचं उदाहरण भारतात तरीअद्याप दिसून आलेलं नाही.

No comments: