Sunday, November 20, 2011

माझं Tweet.....जपान सावरतोय!

१९ नोव्हेंबर २०११:   ११ मार्च २०११चा जपान मधील प्रलयकारी भुकंप अनुभवल्यावर जपान सोडताना वाटल होत सुटलो!  आता दोन ते तीन वर्ष तरी पुन्हा जपानला जायलाच नको!  पण काही कामानिमित्ताने मागच्या आठवड्यात पुन्हा जपानला जायचा योग आला.  गेल्या रविवारी मुंबई-बॅन्कॉक-टोकियो असा विमान प्रवास करत टोकियो जपान गाठलं.   या वेळी मेट्रो ट्युब ट्रेनच होम वर्क पुर्ण केल होतं.   प्रत्येक ठिकाणचा पुर्ण पत्ता जपानी भाषेत गुगल वरुन ट्रन्सलेट केला, गुगल मॅप्सवरुन प्रत्येक ठिकाणच्या लोकेशनचा मॅप प्रिंट करुन घेतला.   रविवारी दुपारी जपानच नारिटा एअर पोर्टवर उतरलो आणि नारिटा एक्सप्रेस ते शिनागावा आणि पुढे शिनागावा ते गोटांडाया स्टेशनचं तिकीट काढल (म्हणजे सांताक्रुज ते दादर आणि पुढे दादर ते घाटकोपर जस स्टेशन बदलतो तसा प्रकार) .  विचारत विचारत गोटांडा स्टेशनसमोरील "होटेल टोको" गाठलं - चेकईन केलं.  साधारण ८० स्वेअरफुटची होटेल रुम, दरवाज्यातुन थेट बिछान्यातच पाय टाकायचा, बाजुला एक छोटशी बाथरुम.  उभं रहायला म्हणुन जागा नव्हती.  रिसेप्शन मधे जरा मोठी रुम आहे का म्हणून चौकशी केली, तर कळलं सगळ्या रुम्स अशाच आहे.  हो नाही करत रिसेप्शन मधे कळलं की एक मोठी रुम आहे, म्हणजे त्या रुमला दरवाज्यातुन आत गेल्यावर एक छोटा पॅसेज आहे.  म्हणजे साधारण ६ फुट जागा जास्त, पण तेवढ्यासाठी १००० येन जास्त मोजावे लागणार.  म्हटंल नको.   पण हो होटेलच्या बेसमेंट मधे एक २४ तास सुरु असणारं एक  फॅमिली स्टोअर होतं.   खुप भुक लागली होती म्हणुन, बॅगा तशाच टाकुन खाली गेलो, हार्ड-बॉइल्ड अंडी, ऑरेन्ज ज्युस, ब्रेड, सॅलाड घेतल, आणि सगळ्यात खुष करणारी गोष्ट म्हणजे रेडी चहाची पाकिट मिळाली.  आता रोज निदान आपला चांगला चहा मिळणार होता.  आता म्हटंल रुम लहान असली तरी हे फॅमिली स्टोअर फारच छान आहे.  इथच राहुया.....
या वेळेस ठरवलं होतं की कुठेच टॅक्सी ने प्रवास करायचा नाही.  ट्युब ट्रेनच प्रवास करायचा, जास्तित जास्त जपानी माणसांशी संवाद करण्याचा प्रयत्न करायचा.   भुकंपानंतर जपानी माणसांची नेमकी काय मानसिकता आहे हे मला जाणुन घेण्याची खुपच उत्सुकता होती.  विचारत विचारत संपुर्ण चार दिवस जपानमधे ट्युब ट्रेनने प्रवास केला;  मागच्या खेपेसारखा या खेपेस देखिल एक जबरदस्त अनुभव आला;  कुणालाही पत्ता विचारलं की जपानी माणसं हातातलं सगळं काम सोडुन कुणालाही अगदी आपुलकीने प्रेमाने पत्ता समजावुन सांगतात.  प्रत्येक जपानी माणूस इतरांना मदत करायला इतका तत्पर कसा असु शकतो ह्याच मला काही केल्या उल्गडल नाही.  

चार दिवस टोकिओ मधे भारता मधे जपानी उध्योगांनी गुंतवणुक का आणि कशी करावी या विषयावरील २ सेमिनार्स आणि ३ चर्चा सत्रात मधे माझी भाषणं होती.  सगळी सेमिनार्स अगदी डॉट वेळेवर सुरु होऊन बरोबर वेळेत संपत.  दिल्ली-मुंबई कॉरिडोअर (एक्सप्रेस वे) जो भारत आणि जपानी सरकार बांधणार आहे त्याच भांडवल करीत मी प्रत्येक वेळेस सांगत होतो की जपानी उद्दोगांनी आता मोठ्या प्रमाणात भारता मधे गुंतवणुक केली पाहिजे.  सुझुकी, निस्सान, टोयोटा, सोनी, पॅनॅसोनिक, कॅनन, हिटाची..... अशी सगळी मातब्बर बॅण्डस आज भारतामधे यशस्वी असताना त्यांच्या पाठोपाठ आता इतर कंपन्यांनी देखिल आलं पाहिजे अस मी आवर्जुन सांगत होतो.   भारतामधील परदेशी गुंतवणुक धोरणं, खुली अर्थव्यवस्था, बाजारपेठ, नविन श्रीमंत मध्यम वर्ग, इंग्रजी बोलणारा समाज असे नेहमीचे मुद्दे मी मांडले.   चायना पेक्षा भारताला त्यांनी का प्राधान्य दिलं पाहिजे हे मी विविध मुद्दे आणि उदाहरण देऊन सांगितल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया खुपच पॉझिटिव्ह होत्या.   सेमिनार्स आणि मिटींग्स मधे येणारा प्रत्येक जपानी माणूस शाळेतील मुलांसारखा डिटेल्ड नोट्स काढत असे.   त्यांचा प्रत्येक प्रश्न हा विचारपुर्वकच असायचा आणि मी उत्तर दिल्यावर हसुन धन्यवाद देत असे.  त्यांच्या प्रत्येक कृतीतुन आदरभाव व्यक्त होत होता.  कित्येक वेळा अस वाटायच की ह्या सेमिनार्स आणि मिटिंग्स संपुच नये!

एका मोठ्या कार कंपनीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर माझी मिटिंग होती, विविध विषयांवर बोलणं झाल्यावर विषय निघाला म्हणुन मी सांगितलं की मार्चमधे जेंव्हा भुकंप झाला तेंव्हा मी जपान मधेच होतो;  त्यांना माझ्या ब्लॅक्बेरी मधे तेंव्हा रेकॉर्ड केलेली भुकंपाची क्लिप दाखवल्यावर तर ते थक्कच झाले.    "भुकंपानंतर जपान खुपच सावरलेल दिसतं" मी म्हणालो.  "हो.  आमच्यासाठी तेंव्हाचा काळ  खुपच कठिण होता.  सगळ्यात कहर म्हणजे पिण्याच्या पाण्यात रेडियेशन्स आहेत हे समजल्यावर आम्हाला प्यायला पाणीच नव्हतं.  आणि बॉट्ल्ड वॅटरचा तुटवडा निर्माण झालेला होता.  देवाने आमची खरच परिक्षा बघितली".   पण गेले ते दिवस म्हणत त्यांनी श्वास सोडला.

पाचच महिन्यापुर्वी जगातील सगळ्यात मोठा भुकंप आणि सुनामी भोगली असेल अशी पुसटची शंका देखिल तिथल्या लोकांच्या चेहऱ्या वर दिसत नव्हती.   वरील एकच चित्र पुरावा म्हणुन बस आहे.  पुन्हा पुन्हा मला एकच प्रशन पडत होता आणि तो म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी सारखे प्रलयकारी बॉम्ब स्फोट, सततचे होणारे भुकंप, सुनामी इतकं असुरक्षित वातावरण असताना सुध्दा जपान इतकी प्रगती कशी करु शकला असेल.  त्याच उत्तर मला तिथल्या माणसांच्या एकाच गुणात सापडत ते म्हणजे "संयम"!   

टीप:  चार दिवसाच्या जपान भेटीत मी आणखी एक अनोखा प्रयोग करायच ठरवलं होतं.   माझ्या भाषणाची सुरुवात मी जपानी भाषेत "कुनिशिवा" (Good Afternoon) अस म्हणत मी करायचो त्याला उपस्थित सगळे "कुनिशिवा" म्हणुन दाद देत.  पुढे मी सांगायचो की "नी-होन-गोह हाना शिमासेन - म्हणजे I dont know Japanese", आणि "यु-कुडी हाना-शियोनी शिमास - I will try to speak slowly". अस म्हटंल्यावर सगळ्यांचे चेहरे एकदम खुलायचे.  "My knowledge of Japanese language ends here!" अस मई म्हटंल्यावर एकच हशां व्हायचा.  आणि शेवटी मिटींग संपली की मी म्हणायचो "Wait I have learnt one more Japanese word - "अलीगाटो- गोझाइमाशिता" म्हणजे Thank you very much! सगळे पुन्हा मनापासुन खुश होत.   जानेवारी २०१२ मधे जर्मनीला जायचा योग आहे,  बघतो जर्मन भाषा शिकता येते का?

No comments: