Saturday, November 26, 2011

माझं Tweet.....नऊ कोटींचा फ्रेश ज्युस

२६ नव्हेंबर २०११:     मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह आपल्या सर्वांना माहीत आहे.  "स्वच्छ" या शब्दावर त्यांचा जोर होता व अजुनही आहे.   आता "स्वच्छ" या एका शब्दा मधे काय जादु आहे ते बघा.   चेन्नईतही या स्वच्छ शब्दामुळे एका फळांच्या रस विक्रेत्याने झेप घेतली ती थेट नऊ कोटी रुपयाच्या वार्षिक उलाढालीपर्यंत त्याची ही रसपूर्ण कहाणी अशी -

मुंबईत आणि महाराष्ट्रात सर्वत्र आपण ऊसाच्या रसाची दुकानं बघतो तिथं वर्षभर लहान मुलांपासुन ते आजीआजोबांपर्यंत सगळ्यांची गर्दी असते.  अशा दुकानांच्या नावाकडे आपण बारकाईने बघतो का?  नाही.   एखाद्या अशा दुकानांच्या मालकाने ऊसाच्या रसाला "ब्रॅण्ड" करुन एखादी अशा दुकानांची चेन उघडलेली माझ्या माहितीत नाही.  त्याच बरोबर  आपण सर्वत्र फळांच्या रसाची सुद्दा दुकानं बघतो, पण त्याची एखादी चेन होऊ शकते अस आपल्याला वाटणार सुद्दा नाही.  कारण प्रश्न असा आहे की त्याला आपण कशी "ब्रॅण्ड" करणार?  प्रत्येक रस निराळा! 

चेन्नाईचे एम. के. हॅरीस अब्दुल्ला आणि एम. सी. मोहम्मद सलिम हे दोघे खरेतर प्लायवूड व टिंबरचे व्यापारी.  पण त्यांच्या मनात नेहमीच इच्छा असायची आपण एक "स्वच्छ" ज्यूस पार्लर चालवावे.  आपले स्वप्न कधी पूर्ण होईल अशी आशा त्यांना नव्हती.  पण त्यांच्या एका मित्राने १९९५ मध्ये चेन्नईच्या प्रसिद्ध माऊंट रोडच्या बाजूला असलेल्या ग्रीमस रोडवर त्यांना २५० चौ.फू.चे दुकान दिले.  या दोघांनी हिंमत केली, दोन लाख रुपये टाकले आणि "फ्रूटस शॉप ऑन ग्रीमस रोड" (Fruit Shop on Greams Road) या नावाने ज्यूस सेंटर सुरू केले.
हे चालवायचा त्यांना काही अनुभव नव्हता. पहाटे चार वाजता उठून ते फळ बाजारात जात, तिथून ताजे फळे आणत आणि काम चाले ते मध्यरात्रीपर्यंत. हॉटेलमध्ये जसा शेफ महत्वाचा तसे ज्यूस सेंटर चालवायचे तर ज्यूस मास्टर महत्वाचा.   म्हणुन त्यांनी एक चांगले ज्यूस बनवू शकणारा एक ज्यूस मास्टर आणि दोन कामगार घेऊन त्यांनी सेंटर सुरू केले, पण काय त्यांच नशीब, पाच दिवसांनी हे तिघेही अपघातात सापडले. या दोन भागीदारांनीच मग दुकानातील सर्व कामे स्वत:च करावी लागली.  ज्यूस बनवण्यापासून ते ग्राहकांना सर्व्हिस देण्यापर्यंत.  त्याचा फायदा असा झाला की ग्राहकांशी संवाद साधता आल्याने त्यांच्या काय अपेक्षा आहेत कळले, मागणीप्रमाणे माल तयार करता आला. एका महिन्यात रोजचे ५०० रुपये उत्पन्न पासून त्यांनी रोजचे ३००० रुपये उत्पन्न अशी मजल मारली. एका वर्षाच्या आत ते नफा कमवू लागले.

आरोग्यपूर्ण वातावरणात, चांगला ज्यूस व वाजवी भाव हे त्यांच्या यशाचे रहस्य असे ते सांगतात. ताजा आणि केवळ ताजा ज्यूस ते देतात. डब्यातील, फ्रीज केलेला ज्यूस द्यायचा त्यांनी कधी विचारही केला नाही.

१९९५ नंतर तीन वर्षात आणखी एक सेंटर सुरू केल, नंतर आणखी एक.  साधारणं २००३ मध्ये त्यांच्या ऑडिटरने त्यांना सहज विचारलं की तुमचे इतके नाव आहे, उत्तम व्यवसाय सुरू आहे आणि त्याला मागणी आहे, मग टुकूर टुकूर काय विचार करत बसता, मोठे होण्याचे स्वप्न बघा.  त्या दोघांनी जास्त विचर न करता झपाटुन काम करायचं ठरवलं आणि धडाक्याने विस्तार करणे सुरू केले. ठिकठिकाणी शाखा उघडल्या.  कर्ज घेऊन मॉलमध्येही शाखा सुरू केली.  दुबईतही फ्रंचायझीच्या माध्यमातून चार सेंटर सुरू केले.  आज त्यांच्या सेंटरमध्ये १२० प्रकारचे ज्यूस मिळतात. वार्षिक उलाढाल ७.२ रुपये वरून ते ९ कोटीवर नेणार आहेत आणि आता तर त्यांना भारतभर ज्युस सेंटर सुरू करायचे आहेत! 

खरं तर कुठल्याही चांगल्या उत्पादनाइतकीच म्हणजे साबण, शॅम्पु, फ्रीज, टेलिव्हिजन, मोटार-गाड्या बरोबर विविध सर्व्हिसेसची सुद्दा म्हणजे हॉटेल्स, ट्रावल आणि टुरिझम, इन्शुअरन्स, बॅन्किंग, सिनेमा- ऎण्टर-टेन्मेंटची सुद्दा ब्रॅण्डस तयार होऊ शकतात आणि त्याची मागणी निर्माण करता येऊ शकते. सर्व्हिस सेकटर मधे नुसत्या सर्व्हिसचच नव्हे तर ती सर्व्हिस देण्याच्या "पध्दतीचं" सुद्दा आपण ब्रॅण्ड करु शकतो आणि त्याच्या जोरावर उद्दोग उभा होऊ शकतो. मामा काणे जेंव्हा म्हणतात की आमचं उपहारगृह "स्वच्छ" आहे म्हणजे ते "स्वच्छ" या पध्दतीच मार्केटिंग करतात आणि त्याच्या जोरावर लोकांना आकर्षित करतात. आपले मराठी ज्वेलर्स (सोनार) जेंव्हा सांगतात की आमच्याकडे "चोख" सोन मिळतं तेंव्हा ते त्याच्यां विश्वासाहर्तेच मार्केटिंग करतात सोन्याचं नव्हे हे लक्षात घ्या.

भारताच्या जीडीपी मधे आणि एकुणच प्रगतीमधे सर्व्हिस सेक्टरचा वाटा जवळपास ५५ ते ६० टक्या पर्यंत वाढला आहे आणि तो आणखी वाढतच जाणार. गेल्या पंधरा ते वीस वर्षांत इतक्या नविन नविन कल्पना सर्व्हिस सेकटर बघायला मिळतात की आपण ऎकुन देखिल थक्क होतो. आपल्या रोजच्या गरजा जर आपण नीटपणे तपासुन बघितल्या तरी आपल्याला कळुन येईल की अजुन किती अशा गोष्टी आहेत ज्या कमर्शियली म्हणजे व्यवसाईकपणे केल्या तर त्याचा एक मोठा उद्दोग निर्माण होऊ शकतो.  आणि वर म्हटंल्या प्रमाणे एखाद्या सर्व्हिस बरोबर ती देण्याच्या पध्दतीचे सुद्दा ब्रॅण्ड करता येते!   फक्त गरज आहे ती शांतपणे नीट अभ्यस करण्याची. 

टीप:   ऑस्कर पर्यंत गेलेला मराठी चित्रपट "श्वास"चे एक निर्माते अरूण नलावडे, यांनाही श्वास सिनेमाची निर्मिती करायला प्रेरित केले ते त्यांच्या ऑडिटरने.  ते ही नलावडेंना म्हणाले की इतकी वर्षे अभिनयक्षेत्रात आहात, नाव अजरामर होईल अशी कलाकृती द्या. मग सातजण एकत्र आले, मराठी सिनेमात केवळ इतिहास घडला नाही तर त्याचे भविष्यही बदलले!  ऑडिटर म्हणजे फक्त हिशोब चोख ठेवणे, यापलिकडे जात तो किती महत्वाची भूमिका निभावू शकतो बघा. व्यावसायिक सल्ला किती महत्वाचा का ते तुमच्या लक्षात आले असेलच.  त्रयस्थ नजरेतून बघणारा, पण व्यवसायाची माहिती असलेला, जाण असलेला असा ऑडिटर प्रत्येक उद्योजकाला मिळो!  

No comments: