Wednesday, December 28, 2011

माझं tweet.....धीरूभाई अंबानी

28 डिसेंबर 2011: आज धीरुभाई अंबानीं यांचा 79वा जन्मदिवस -  लोकांनी कितीही नावं ठेवली, जहरी टीका केली तरी यशासारखं दुसरं यश जगात कुठलंही असुच शकतं नाही हे त्रिवार सत्य आहे.  Nothing can succeed success!  हे धीरुभाईंच्या उद्दोगविश्वाकडे बघितल्यावर कळतं.   इतक मोठं सामराज्य उभं करण्यासाठी स्वप्न हवं की दुरदृष्टी?  मेहनत हवी की नशिब हे सगळं कळण्यापलिकडे आहे.   त्यांच्या वर खुप टीका झाली आणि  भविष्यात देखिल होईल.  पण एकुणच धीरूभाईंच्या आयुष्याकढे आणि त्यांनी उभारलेल्या उद्दोगविश्वाकडे एक विध्यार्थी म्हणुन बघितलं तर मला वाटतं आपल्याला खुप  काही शिकायला मिळु शकतं.    त्यांच्या उद्दोगविश्वासारखाच आज त्यांचा फोटो देखिल जरा मोठाच देत  आहे!

धीरुभाईंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने यंदाच्या मुक्तशब्दया दिवाळी अंकासाठी मी लिहिलेला धीरुभाई अंबानी व नारायण मुर्ती वरील लेख खाली देत आहे. 

एक कर्माचा सागर! तर एक योगयोगेश्वर!

सौजन्य मुक्तशब्द - नितीन पोतदार

खरं तर धीरूभाई अंबानी व नारायण मूर्ती यांच्यात तुलना करणं पूर्णपणे चुकीचे आहे. याचं कारण म्हणजे अंबानींची रिलायन्स इंडस्ट्री आणि मूर्तींची इन्फोसिस या दोन्ही उद्योगांचे उत्पादन, उलाढाल आणि उत्पन्न या कुठल्याही बाबतीत तुलनाच होऊ शकत नाही. पण दोघेही आपल्या आपल्या परीने कर्तबगार आहेत, मोठे आहेत व यशस्वी आहेत! आणि साम्य आहे ते म्हणजे दोघांनी सामान्य परिस्थितीतून सुरवात केली. दोघांनीही सुरवातीला अत्यंत कठीण काळ बघितला, कठोर परिश्रम केले, अपमान, अवहेलना सहन केली आणि अपयश बघितले. तरीही दोघांनीही कोट्यावधींची उलाढाल करणार्याल कंपन्या उभारल्या, स्वत: कोट्याधीश झाले, शिवाय कंपनीच्या समभागधारकांनाही कोट्याधीश केले. पण दुर्दैवानेå हे साम्य इथेच संपते! त्यांच्या उद्योगक्षेत्रात, त्यांच्या उद्योग चालवण्याच्या पध्दतीत, त्यांच्या त्यांच्या वेळच्या परिस्थितीत, त्यांच्या व्यक्तीमत्वात व इतरही अनेक बाबतीत फार मोठा फरक दिसून येतो. त्यांची तुलना करणे म्हणजे खरं तर दोघांवरही अन्याय केल्यासारखे होईल. एक दुध बनविण्याची फॅक्टरी तर एक दुध देणारी गाय यांची तुलना करणे होईल! आपण दोघांच्या सुरवातीपासूनच्या ते मोठे उद्योजक होईपर्यंतच्या प्रवासाकडे नजर टाकू व त्या अनुषंगाने काय चित्र समोर येते बघू.

धीरूभाई अंबानी हे एका गुजराथी शाळा शिक्षकाचे तिसरे अपत्य. मॅट्रीकची परिक्षा दिल्याबरोबर वयाच्या सोळाव्या वर्षीच उदरनिर्वाहासाठी त्यांना येमेनमधील अडेनला जावे लागले. ए.बेसे ह्या एका फार मोठ्या व्यापारी कंपनीत त्यांनी तिथे कारकुनाची नोकरी करायला सुरवात केली. ही कंपनी अनेक वस्तूंचा व्यापार करायची, त्यात शेल या पेट्रोलियम कंपनीच्या पदार्थांचाही व्यापार करायची. अडेनला ते कमोडीटी ट्रेडींग करायलाही शिकले व त्यात प्राविण्य मिळवले. त्यांच्या लक्षात आले ह्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आपल्याला रुची आहे. उसने पैसे घेऊन ते असे कमोडीटी ट्रेडींग करायचे व त्यातून त्यांनी पैसे मिळवले. हा केवळ नशिबाचा भाग नव्हता किंवा त्यांच्यात किलर इन्स्टींक्ट होता म्हणून केवळ त्यांना यश मिळाले नाही तर त्यामागे त्यांचा अभ्यास होता. कमोडीटी व्यवहारासंबंधी ते जे मिळेल ते सतत वाचत राहायचे. याचाच पुढे त्यांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर व्यवहार करताना फायदा झाला. दरम्यान येमेनचे रियाल हे चलन त्यावेळेस शुध्द चांदीचे असे. ती नाणी ज्या मूल्याची असत, त्यापेक्षा ती नाणी वितळवून, त्यातून जी चांदी मिळे, त्याची किंमत जास्त असायची. यातून त्यांनी काही लाख रुपये मिळवले. बढती मिळून अडेनला त्यांची एका पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून नेमणूक झाली, त्याचवेळी त्यांच्या मनात पक्के ठरले होते एक दिवस आपली स्वत:ची पेट्रोलियम कंपनी असेल!

येमेनवरून ते भारतात परत आले व १५००० रुपयांच्या भांडवलावर रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन ही कंपनी सुरू केली. कंपनीचा कारभार होता पॉलीस्टर यार्न आयात करणे व मसाले निर्यात करणे. हा व्यवसाय चांगला चालत होता, पैसा गाठीशी येत होता. १९६६मध्ये त्यांनी नरोडा इथे कापड गिरणी सुरू केली. पॉलीस्टर यार्नपासून या मिलमध्ये कापड बनवले जाई. त्याला त्यांनी विमल असे ब्रॅंड नाव दिले व लवकरच ते नाव घराघरात पोचले. एका जागतिक दर्जाची टेक्सटाईल मिल म्हणून अंबानींच्या या मिलची खुद्द वर्ल्ड बॅंकेच्या टीमकडून तारीफ झाली होती. १९७७मध्ये त्यांनी रिलायन्सचा आयपीओ आणला, म्हणजे या कंपनीचे शेअर-समभाग विक्रीस आणले. त्यावेळेस शेअर मार्केट इतके विकसित झालेले नव्हते. किरकोळ गुंतवणूकदार खूप नव्हते व सक्रीयही नव्हते. पण या कंपनीचे शेअरना सबस्क्राईब करावे यासाठी धीरूभाईंनी गुजराथमधील छोट्या गुंतवणूकदारांवर भिस्त ठेवली. त्यांना या आयपीओकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले व तसेच भारताच्या विविध भागातून सुमारे ५८,००० गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतवले. भारतात स्टॉक मार्केट अनेक वर्षांपासून अस्तित्वा होते. पण त्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय खर्याट अर्थाने जाते धीरूभाईंना. १९८०च्या सुमारास ते अंदाजे १०० कोटी रुपये संपत्तीचे मालक झाले होते. १९८२मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज अंशत: परिवर्तनीय रोखे बाजारात आणणार होती. रिलायन्सच्या शेअरचा भाव खाली असेल तर या रोख्यांची खरेदी होणार नाही, त्यामुळे कंपनी व अंबानी कंपनीच्या शेअरच्या भावात काय चढ-उतार होत आहे यावर लक्ष ठेवून होती. त्यांना सुगावा लागला, मंदीवाले काही ब्रोकर हे शेअर शॉर्ट करत होते. पण अंबानींनी त्यांच्या खेळात त्यांनाच अशी धोबीपछाड दिली की हे मंदीवाल्यांची हाडे पार खिळखिळी झाली. यावेळेस इतकी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती की, स्टॉक मार्केटचे व्यवहार ३ दिवस चक्क बंद ठेवावे लागले होते. आणि धीरूभाईंनी हे सगळे केले ते कायद्याच्या कक्षेत राहून, फार तर कायदे स्वत:ला हवे तसे वाकवले किंवा त्यातील पळवाटांचा वापर केला म्हणता येईल.

पुढे १९८२मध्ये त्यांनी पॉलीस्टर यार्न बनवण्याचा कारखाना सुरू केला. नंतर ते रसायने, पेट्रोकेमिकल्स, प्लास्टीक्स, वीज अशा अनेक क्षेत्रात गेले. म्हणजेच अनेक उद्योगक्षेत्रात कार्यरत असणारा हा एक मोठा समूह कॉन्ग्लोमोरेट झाला. १९९०नंतर त्यांनी पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात कंपनीचा धडाक्याने विस्तार केला. तसेच ते टेलिकॉम्यूनिकेशन क्षेत्रातही गेले. आज तर ही देशातील एक अतिबलाढ्य कंपनी आहे. अर्थात कंपनीची ही झेप साधी सोपी नव्हती. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेक विवादांना तोंड द्यावे लागले. त्याची माहिती आपण पुढे घेऊ, त्याआधी नारायण मूर्ती व त्यांच्या इन्फोसिस कंपनीच्या वाटचालीकडे नजर टाकू.

नारायण मूर्ती व इन्फोसिसची वाटचाल:

धीरूभाई अंबानींसारखेच, नारायण मूर्तीही सामान्य घरातील. पण अंबानींना जसे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तितकी वाईट परिस्थिती मूर्तींची नव्हती. त्यांनी बीई (इलेक्ट्रीकल)ची पदवी मिळवली व नंतर आयआयटी या देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेतून एम.टेक.ही केले. म्हणजेच ते उच्चशिक्षित आहेत. आधी आयआयएम (अहमदाबाद) व नंतर पटणी कॉम्पुटर सर्व्हिसेस या कंपनीच्या पुणे कार्यालयातून १९७०च्या सुमारास त्यांनी करिअरची सुरवात केली. १९८१ मध्ये आपल्या सहा सॉफ्टवेअर सहकार्यांुसह त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. त्यासाठी त्यांना आवश्यकता होती १०,००० रुपये भांडवलाची आणि ते त्यांनी गोळा केले बायकोकडून पैसे उसने घेऊन!

त्यावेळेस देशात आर्थिक सुधारणांचा काळ अजून सुरू व्हायचा होता. साधे फोन कनेक्शन मिळणे कठीण होते. नेटवर्कची बोंब. अमेरिकेत इंजिनिअर पाठवून तिथे कामे करावी लागत. ८७साली इन्फोसिसने अमेरिकेत पहिले ऑफिस थाटले. तरीही ८९साली कंपनीपुढे गंभीर समस्या होत्या. पण काम नेटाने सुरू ठेवले. ९१नंतरच्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्या. त्याचा परिणाम दिसू लागले. ९३साली कंपनी पब्लीक लिमिटेड झाली. आयपीओ आणला. पण त्याला लोकांनी काही खूप प्रतिसाद दिला नाही. कर्मचार्यांाना स्टॉक ऑप्शन म्हणजे शेअर दिले. ९९पर्यंत कंपनीने खूप कारभार वाढवला. ह्या वर्षी कंपनीचे वार्षिक उत्पन १० कोटी अमेरिकन डॉलर झाले. तसेच कंपनीची अमेरिकेतील नॅसडॅक या एक्सचेंजवर नोंदणी झाली. यानंतर लगेच पुढील वर्षी उत्पन २० कोटी अमेरिकन डॉलर अशा रितीने वाढत गेले. रुपयात सांगायचे तर २००२साली २६०० कोटी रुपये उत्पन होते ते वाढत जाऊन २०१० साली २२,७०० कोटी इतके अफाट वाढले. कंपनीत १ लाखाच्या वर कर्मचारी आहेत. स्टॉक ऑप्शनमुळे कर्मचारीवर्गाला शेअर मिळाले, त्या शेअरचे मूल्य प्रचंड वाढल्यामुळे कंपनीचे ड्रायव्हर करोडपती झाले, अशा कथा ऐकायला यायला लागल्या.

इन्फोसिसच्या उत्पनाचे विश्लेषण केले तर दिसेल, तिच्या उत्पनापैकी सुमारे ६५ टक्के उत्पन अमेरिकेतून, २३ टक्के युरोपातून व फक्त १.२ टक्के भारतातून मिळालेले आहे. तसेच त्यांच्या ग्राहक कंपन्यांना सर्व्हिस देऊन यापैकी ९५.८ टक्के तर प्रॉडक्ट विकून ४.२ टक्के उत्पन मिळालेले आहे.

तुलना

वर म्हंटल्या प्रमाणे अंबानी व मूर्ती यांच्यात तुलना करायची म्हणजे केवळ या दोन व्यक्तींत तुलना करणे चुकीचे आहे. तरी ही तुलना करताना ती त्यांनी सुरू केलेल्या कंपन्यांसहच करावी लागेल. प्रथमच एक बाब म्हणजे इन्फोसिसपेक्षा रिलायन्स अक्षरश: दहापटीपेक्षा जास्तने मोठी आहे. इन्फोसिसचे २०१०चे वार्षिक उत्पन्न आहे २२,७०० कोटी रुपये तर रिलायन्सचे २ लाख ३० हजारापेक्षा जास्त. इन्फोसिस आयटी ह्या एकाच क्षेत्रात – सेवाक्षेत्रात काम करते, त्यातही आयटीमधील फक्त सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करते. हे कामही परदेशी कंपन्यांच्या कारभाराचे संगणकीकरण अशा स्वरूपाचे आहे. रिलायन्स मात्र केमिकल्स, पेट्रोकेमिकल्स, ऑईल व गॅस अशा अनेक उद्योगक्षेत्रात काम करते व हे अवजड क्षेत्रातील उद्योग आहेत. शिवाय आयटीपेक्षा रिलायन्सच्या उद्योगक्षेत्रांना प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. तसेच त्यात जास्त आर्थिक धोका आहे.

मुख्यत: अंबानींच्या वेळच्या आणि मुर्तींच्या वेळच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. रिलायन्सने १९६६साली कापड गिरणी सुरू करून सुरवात केली, १९७७ साली आयपीओ आणून भांडवल उभारले, ८२ पासून स्टॉक एक्सचेंजवर तिच्या नावाचा दबदबा निर्माण झाला, ९० पासून पेट्रोकेमिकल्समध्ये धडाक्याने विस्तार केला, ह्या ठळक टप्प्यावरून दिसेल की ६६ ते ९० म्हणजे तब्बल २४ वर्षे कंपनीने देशात जेव्हा लायसन्स-परमिट राज्य होते त्या काळात उद्योग वाढीस नेला आहे. ९० नंतर आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण यांचे धोरण जाहिर झाले, ते प्रत्यक्षात अंमलात यायला आणखी बरीच वर्षे जावी लागली. ९०च्या आधी खाजगी कंपन्या, कारखाने यांना परवानगी होती, टाटा, बिर्ला व इतरही अनेक उद्योगसमूह, कंपन्या देशात काम करत होत्या. पण या कंपन्यांची उत्पादनक्षमता किती असावी, कच्च्या मालाचा पुरवठा व त्याच्या किंमती, उत्पादनाच्या किंमती, भांडवल बाजार या सर्वावर बव्हंशी सरकारचे सक्त नियंत्रण होते. अनेक क्षेत्रे तर खाजगी उद्योगांना खूली नव्हती. वातावरण उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे मुळीच नव्हते. आयत-निर्यातीवर अनेक प्रकारची बंधने होती. समाजवादाचे भूत देशाच्या मानगुटीवर होते. नफा शब्दाचा जणू तिटकारा होता. उद्योजक म्हणजे शोषण करणारे ही धारणा होती. पायाभूत सुविधा क्षेत्राकडे लक्ष न दिल्याने दळणवळण, संपर्कसेवा यांचीही वानवा होती. सर्व काही सरकारी नियंत्रणाखाली होते. पदोपदी सरकारी परवानग्यांची गरज भासायची. नोकरशाही, लालफितशाहीचे वर्चस्व होते. धीरूभाई अंबानींनी यश मिळवले ते या सर्वावर मात करून. प्रत्येक प्रोब्लेम मधेच प्रमोशन असतं ही त्यांची धारणा होती! ब्युरोक्रसीच्या लाल फितीचा आणि त्यातुन निर्माण होण्याऱ्या एक सिस्टमचा त्यांनी आपल्या फायद्यासाठी वापर करून घेतला असेही म्हणता येईल. राजकीय लागेबांधे त्यानी निर्माण केले व त्याद्वारे सरकारची धोरणे आपल्याला अनुकूल व आपल्या प्रतिस्पर्धी कपंन्यांना प्रतिकूल राहतील असा फायदा घेतला असा एक आरोप धीरूभाईंवर सातत्याने केला गेला. पण त्याकाळात उद्योग करण्याची तीच रित होती नव्हे अजुनही ती तशीच आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. आपण ज्याला “भ्रष्टाचार” म्हणतो त्याला जगात “लॉबिंग” म्हणतात आणि त्यात गैर अस काहीच नाही तेंव्हा सर्व नाड्या शासनाच्या हातात होत्या. अनेक उद्योजक हाच मार्ग स्वीकारत होते. धीरूभाई त्यात सर्वात हुशार निघाले असे म्हणता येईल. या सरकारी बंधनांच्या अडथळ्यांशिवाय जुनाट विचारांचे उद्योजक, तसेच रिलायन्समुळे ज्यांच्या उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत होता असे उद्योजक यांच्याशी धीरूभाईंना खूप संघर्ष करावा लागला. इंडियन एक्सप्रेस समुहाने तर रिलायन्सविरुध्द आघाडी उघडली. रिलायन्सने फॅक्टरी स्मगल केली असा आरोप इंडियन एक्सप्रेसने केला होता. या सर्व विवादांचा धीरूभाईंना प्रचंड मनस्ताप झाला. उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला. पण शेवटी या सगळ्याला ते पुरून उरले. त्यावेळचे त्यांचे विरोधक, अगदी इंडियन एक्सप्रेस समुहाचे त्यावेळचे संपादक अरूण शौरी यांनी आमचे चुकले अशी जाहिर कबूली काही वर्षांपूर्वी दिली. निवळं जिद्द, चिकाटी आणि दुर्दैम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यश खेचून आणलं!

याउलट नारायण मूर्ती व इन्फोसिसला सरकारी धोरणांचा अडथळा नव्हताच. अडथळा दूरच, उलट आयटी क्षेत्राचे सरकारकडून, समाजाकडून फार कोडकौतूक झाले. अनेक वर्षे हे क्षेत्र पुर्णपणे करमुक्त होते. सोयीसवलती मिळाल्या. या दृष्टीकोनातून विचार केला तर केवळ इन्फोसिस नव्हे तर भारतीय आयटी क्षेत्राने हवी तशी झेप घेतलीच नाही. भारत संगणकक्षेत्रात महासत्ता होणार याची काही वर्षांपूर्वी सतत चर्चा असायची, पण वास्तवात तसं घडल नाही. त्यावेळेसही खुद्द संगणकक्षेत्रातील माहितगार लोक मात्र या चर्चेवर हसायचे. याचे कारण जगभर संगणकक्षेत्रात जी उलाढाल होते त्यापैकी नगण्य हिस्सा आपला आहे. आपल्या कंपन्या, त्यात इन्फोसिसही आली ज्याप्रकारचे काम करतात ते मोठ्या प्रमाणात दुय्यम दर्जाचे आहे. इतर देशातील कंपन्यांची कामे स्वस्तात करून देणे असे या त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप आहे. इंटेल, गुगल यांचे उत्पन्न, त्यांचे जगभरचे प्रभावशाली अस्तित्व याच्या जवळपासही आपल्या आयटी कंपन्या जाऊ शकत नाहीत. मायक्रोसॉफ्ट, अॅपल, आयबीएम दुरच. तसेच इन्फोसिसचे उत्पन्न बघितले तर स्पष्ट दिसते, देशांतर्गत व्यवसायातून त्यांना जेमतेम २ टक्के प्राप्ती होते. देशातील कंपन्यांची कामे व शासनाची आयटीची कामे याचा व्यवसाय या क्षेत्रातील छोट्या कंपन्या करतात. याचे कारण उघड आहे की परदेशातील कंपन्याबरोबर व्यवहार करणे जास्त सुलभ आहे. अर्थात जिथे जास्त फायदा व सुलभ व्यवसाय तिकडे उद्योजक गेले हा दोष नाही किंवा त्यांना त्याबाबत नावे ठेवता येणार नाहीत. पण रिलायन्सच्या तुलनेत त्यांचा व्यवसाय बराच सोपा होता असे ठामपणे सांगता येईल.

एकूणच विचार केला तर तुलनेने धीरूभाईंना खुप संघर्ष करावा लागला, त्यावेळची परिस्थिती खूप प्रतिकूल होती. त्या सगळ्यावर मात करून त्यांनी प्रचंड मोठे साम्राज्य उभारले. इन्फोसिसने त्यामानाने मात्र परिस्थिती अनुकूल असूनही एका मर्यादेपर्यंतच प्रगती केली. धीरूभाईकडे धडाडी होती, धोका पत्करण्याची वृत्ती, दोन हात करण्याची खुमखूमी होती. काही लोक त्यांना स्ट्रीट-स्मार्ट म्हणायचे, पण माझ्या मते ते खरे बिझिनेसमन होते. मूर्ती हे तसे शांत, संयमी व कॉन्झर्व्हेटीव्ह. इन्फोसिस दर वर्षी जो गायडन्स मार्केटला देते, तो कॉन्झर्व्हेटीव्ह असतो. म्हणजे पुढच्या वर्षी कंपनी कशी कामगिरी करेल याबाबत कमीत कमी उत्पन्नाचे व नफ्याचे आकडे जाहिर करायचे म्हणजे त्यापेक्षा जास्त कामगिरी करून दाखवता येईल. मूर्ती व इन्फोसिससह इतर मोठ्या आयटी कंपन्या टाटाची टीसीएस, अझीम प्रेमजी यांची विप्रो यांच्यामुळे भारताचे जगात नाव झाले. तसेच आयटीमुळे मध्यमवर्गाला संपन्नता मिळाली, अनेक तरुणांना परदेशात नोकर्याग मिळाल्या ह्या जमेच्या बाजू. पण या कंपन्यांनी स्वत:चे प्रॉडक्ट डेव्हलप केले नाही ही फार मोठी उणीव. इन्फोसिसचे उत्पन्न ९५.८ टक्के सर्हिस देऊन व केवळ ४.२ टक्के प्रॉडक्ट विकून मिळते ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. देशातील सर्वात गुणवत्तापूर्ण इंजिनिअर्सची फौज त्यांच्या दिमतीला असताना त्याबाबत मूर्तींनी पुढाकार घ्यायला हवा होता. प्रॉडक्ट बाजूला ठेवू. इन्फोसिसनंतर अनेक वर्षांनी फेसबुक अस्तित्वात आले. पण त्याचे जगभर मिळून सुमारे कोट्यावधी सदस्य आहेत. त्याचा अर्थ असा की त्याप्रकारची सुविधा-अप्लिकेशन ही पूर्ण जगात युनिक आहे व इतर कोणी तशीच सुविधा देत असले तरी प्रत्यक्षात अशा अप्लिकेशनबाबत फेसबुकचा एकछत्री अंमल - अक्षरश: जगभर साम्राज्य आहे. जगभर आपले वर्चस्व असेल असेही काही इन्फोसिसने शोधलेले नाही. मूर्ती यांची प्रतिमा म्हणजे ते अतिशय स्वच्छ आहेत. उद्योग करताना भ्रष्टाचार करुन तो मिळवत नाही अशी. पण त्यांनी जो व्यवसाय केला तो देशाबाहेरच्या कंपन्यांबरोबर. देशांतर्गत व्यवसाय करताना भ्रष्टाचाराचा मुद्दा जास्त लागू होतो. देशातील शासन कारभाराचे संगणकीकरण किंवा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे, बॅंकाचे संगणकीकरण हा व्यवसाय त्यांनी कधी केलाच नाही. या परिक्षेला ते कधी बसलेच नाहीत. आपली प्रतिमा त्यांना महत्वाची वाटली, पण धीरूभाईंनी मात्र प्रतिमेचा विचार केला नाही तर उद्योग वाढवणे हेच त्यांचे ध्येय होते. माझे काम होण्यासाठी सरकारी कचेरीतील शिपायालाही मी सलाम करेन, हे त्यांचे उद्गार प्रसिध्द आहेत. धीरूभाईंचे राजकीय नेत्यांबरोबर सख्य होते, पण त्यांना राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. मूर्तींबाबत मात्र त्यांना राष्ट्रपती करावे अशी चर्चा झाली.

इन्फोसिसने देशात व्यवसाय केला नाही, विशेषत: शासनाची कामे घेतली नाहीत. असे असूनही केंद्र शासनाने प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देण्यासाठी जी आधार योजना काढली त्यासाठी प्रमुख म्हणून इन्फोसिसचेच संस्थापक व मूर्तींचे सहकारी नंदन निलेकेणी यांची नेमणूक केली. आता आज दि.२९/९/११ ला बातमी आली नियोजन आयोगाच्या अध्यक्षांनी – मॉन्टेकसिंग यांनी आधारच्या कामात आर्थिक शिस्तपालन असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या आधार योजनेचे काम ज्या प्रकारे व ज्या गतीने सुरू आहे ते बघता हे आव्हाने पेलण्यात निलेकेणी यशस्वी होतील का याबाबत प्रश्नचिन्हच आहे. याचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण असे की सगळ्या कंडिशन्स फेव्हरेबल असताना इन्फोसिसला यश मिळाले. पण आता ही कठीण परिक्षा आहे व निलेकेणी काय करतात ते बघू.

धीरूभाईंचे २००२मध्ये निधन झाले. त्याआधी अनेक वर्षे ते पक्षाघाताच्या व्याधीने बेजार होते. त्यामुळे उदारीकरणाच्या काळाचा त्यांना पुरेपुर लाभ घेता आला नाही.  आज ते असते तर काय हा जरतरचा प्रश्न आहे.   अंबानी व मूर्ती दोघांच्या बाबतीत शेवटी म्हणता येईल – ते आपल्या आपल्या काळाचे प्रतिनिधी होते!

टीप:  धीरुभाई आणि मूर्तीं यांनी आपल्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे उद्योग केला व त्या प्रमाणात यश मिळवले. अंबानींचे यश अफाट आहे पण मूर्तींचे यशही उत्तुंग आहे. २५००० कोटी रुपये उत्पन्न असलेले कंपनी ही मोठीच असते. जे.आर.डी टाटा, गोदरेज (पारसी), बिरला, बजाज (मारवाडी), शंतनूराव किर्लोसकर, आबासाहेब गरवारे (मराठी), धीरुभाई अंबानी (गुजराती), नारायण मूर्ती (कानडी), विजय माल्या (तेलगू), सुनिल मित्तल (पंजाबी), असे गेल्या तीन चार दशकांतील मोठे उद्दोजक बघितले तर आपल्याला अस दिसतं की उद्दोग करणं किंवा त्यात मोठं यश मिळवणं हे कुण्या एका समाजाच्या/जातीच्या माणसांची मक्तेदारी मुळीच नसते. त्यामुळे तरूण मराठी उद्दोजकांनी या पैकी कुणाचीही पायवाट धरली तरी काहीच हरकत नाही. फक्त मराठी असल्याने आपल्यामध्ये उद्योग करण्याची प्रवृत्तीच नाही हा विचार मात्र टाकून द्यावा! कारण शेवटी यशाला कुठलीच जात किंवा भाषा नसते!

No comments: