Sunday, January 29, 2012

माझं Tweet.....जपानी गुडिया डॉ. प्राजक्ता भावे-खरे

२९ जानेवारी २०१२:  मित्रांनो गेला एक महिना खुपच धावपळीचा गेला.  अजुनही संपला जानेवारी अस म्हणु शकत नाहीयं.   गेल्या आठवड्यात महाराष्ट्र टाईम्स मधे डॉ. प्राजक्ता भावे-खरे यांनी जपान मधे केलेल्या कर्तृत्वाची बातमी वाचली आणि लगेच ब्लॉग वर टाकायची ठरवली.    एक मराठी मुलगी  किती मोठ मोठी काम करू शकते ह्याच मला मना पासुन फारच अभिमान आनि कौतुक वाटल म्हणुन हा ब्लॉग.  

आज हा ब्लॉग लिहिताना मला जास्त आनंद होत आहे ह्याच कारण म्हणजे, (१) डॉ. प्राजक्ता ही मुलुंडची - माझा जन्म सुद्दा मुलुंडचाच;  (२) प्राजक्ताने अर्थशास्त्रात बी.ए. केलं मी ही अर्थशास्त्रात बी. ए. केलं;  (३) तीने प्रेंच भाषा शिकली मी ही प्रेंच भाषा शिकलो (आता विसरलो इतकचं);  (४)  जपानमधील माशिको सिरॅमिक क्लस्टरमधील कारागिरांचं जीवन मार्चमधील भूकंप व त्सुनामी यांनी उद्ध्वस्त केलं  त्या कारागिरांनी एकत्रित  आपले उद्योगधंदे पुन्हा उभारण्यासाठी कशा प्रकारे तांत्रिक सुधारणा केल्या व आथिर्क पाठबळही कसं मिळवलं, हा प्राजक्ताच्या प्रेझेंटेशनचा विषय होता, मी तर मार्च मधे जपान मधे झालेला भुकंप आणि त्सुनामी प्रत्यक्ष अनुभवलेल आहे.  तिथल्या लोकांना सावरताना मी जवळुन बघितलं, आणि (५)  सध्या डॉ. प्राजक्ता टोकियोमधील हितोत्सुबाशी या युनिव्हसिर्टीमध्ये 'एस. एम. इ. क्लस्टर्स इन जपान - लेसन्स फॉर इंडिया' (SME Clustter in Japan - Lessons for India) या विषयावर संशोधन (पोस्ट डॉक्टरेट रिसर्च) करीत आहे.  मी ही Japanese Investment भारता मधे जास्त्तित जास्त कशी येईल या साठी दोनदा जपान मधे जाऊन आलो आणि अजुनही प्रयत्नशील आहे.   किती योगा योग.   डॉ. प्राजकता तुम्ही करीत असलेले काम माझ्या पेक्षा खरचं खुप मोठं आहे,  पुन्हा एकदा तुमच अभिनंदन आणि तुम्हाला माझ्या खुप खुप शुभेच्छा!

टीप:  दुर्दैवाने माझ्या कडे डॉ. प्राजक्ताचा एकही फोटो नसल्या मुळे तो इथं देउ शकलो नाही.   तरी जपान मधील सिरॅमिक क्लस्टरमधील कारागिरांचं घर कशी असतात त्याच एक चित्र देत आहे.
_____________________________________________________________________________

जपानी गुडिया - डॉ. प्राजक्ता भावे-खरे!

लहानपणी प्राजक्ताला आईच्या मैत्रिणी जपानी गुडिया म्हणून चिडवत असत. बघता बघता ही मराठी गुडिया खरोखरच जपानला गेली आणि त्या परक्या देशात आपली स्वतंत्र ओळख तिने निर्माण केली...

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयआयटी - मुंबई, आयआयटी - कानपूर आणि एस. जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 'एन्टरप्रेनरशीप अँड टेक्नॉलॉजिकल इनोवेशन' या विषयावर दुसऱ्या वाषिर्क ग्लोबल कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्फरन्समध्ये पहिल्या पुरस्काराची मानकरी ठरली डॉ. प्राजक्ता भावे-खरे. प्राजक्ताच्या पेपर प्रेझेंटेशनचा विषय होता 'एक्सोजिनस शॉक अँड कलेक्टिव्ह एफिशियन्सी इन एस. एम. इ. (स्मॉल अँड मिडीयम एन्टरप्राईज) क्लस्टर.'   जपानमधील माशिको सिरॅमिक क्लस्टरमधील कारागिरांचं जीवन मार्चमधील भूकंप व त्सुनामी यांनी उद्ध्वस्त केलं. त्यांच्या सिरॅमिक भट्ट्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. परंतु कारागिरांच्या एकत्रित प्रयत्नाने या संकटावर मात केली व त्यांचे उद्योगधंदे उभारण्यास मदत झाली. आपले उद्योगधंदे पुन्हा उभारण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे तांत्रिक सुधारणा केल्या व आथिर्क पाठबळही कसं मिळवलं, हा प्राजक्ताच्या प्रेझेंटेशनचा विषय होता. सध्या ती टोकियोमधील हितोत्सुबाशी या युनिव्हसिर्टीमध्ये 'एस. एम. इ. क्लस्टर्स इन जपान - लेसन्स फॉर इंडिया' (SME Clustter in Japan - Lessons for India) या विषयावर संशोधन (पोस्ट डॉक्टरेट रिसर्च) करीत आहे. संशोधनासाठी फेलोशिप मिळालेली ती पहिली परदेशी विद्याथिर्नी आहे.

मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून २००१ साली प्राजक्ताने अर्थशास्त्रात बी.ए. केलं. त्यानंतर इंडस्ट्रीयल आणि फायनान्शियल इकॉनॉमिक्समध्ये एम.ए. केलं. कॉलेजमध्ये तीन वर्ष फ्रेंच भाषेचा अभ्यास केला होता. त्यानंतर जॅपनीज भाषेतील चित्रलिपीबद्दल उत्सुकता वाटल्यामुळे तिने जपानी भाषेच्या अभ्यासाला सुरवात केली.   डॉक्टरेटसाठी भारत व जपानमधील लघु उद्योजकांच्या समूहांचा (क्लस्टर) तुलनात्मक अभ्यास हा विषय तिने निवडला. त्यावेळी जपानला जाण्याची संधी मिळावी हा तिचा उद्देश होता.  दरम्यान 'दी दमास' या ज्वेलरी ब्रँडसाठी जपानी भाषेतील दुभाषाचं काम करायची संधी तिला मिळाली.   मुंबईतील कारागिरांना जपानहून आलेल्या कारागिरांकडून ज्वेलरी तयार करण्यातील बारकावे समजावून सांगणं हे तिचं काम होतं. खरंतर दुभाषा म्हणून केलेलं हे पहिलंच काम असूनदेखील तिच्या कामातील सफाईदारपणा पाहून दी दमासच्या त्यावेळच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तिला जपानला पाठविण्याची इच्छा प्रदशिर्त केली. प्राजक्ताने मिळालेल्या संधीचा फायदा उठवला व जाने. २००४मध्ये ती जपानला रवाना झाली. तेथे तिच्याबरोबर १० जपानी व ४ भारतीय काम करीत होते. त्यांच्यामधील दैनंदिन कामकाजासाठी दुभाषाचं काम तिला करावं लागत असे. जपानमधील स्वच्छता, जपानी लोकांमधील नम्रता, त्यांची आतिथ्यशीलता, कुठल्याही कामाला कमी न लेखण्याची वृत्ती, डेडिकेशन, वेळेचं महत्त्व जाणण्याची वृत्ती या गोष्टी तिला खूपच भावल्या. त्यामुळे जपानमध्येच करियर करावं व त्यासाठी आयुष्याचा जोडीदार जपानमध्ये स्थायिक झालेला भारतीय असावा असं तिला वाटू लागलं. नोव्हेंबरमध्ये परत आल्यावर प्राजक्ता जपानी भाषेची दुसऱ्या लेव्हलची परीक्षा उत्तीर्ण झाली व तिने वझे-केळकर कॉलेजमधील प्रो. डॉ. लीना थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डीचा अभ्यास सुरू केला. सिटी ग्रुपमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या अमित खरेशी तिचं जून २००५मध्ये लग्न झालं. दर तीन महिन्यांनी जपान-मुंबई-जपान असा प्रवास करत २००९ साली प्राजक्ताने पी.एच.डी पूर्ण केली.

पीएच.डी करीत असतानाच युजिसीतफेर् 'कॉम्पिटीटिव्ह स्टडी ऑफ स्मॉल अँड मिडीयम स्केल इंडस्ट्रीज' या प्रॉजेक्टसाठी रिसर्च अॅसिस्टंट म्हणूनही तिने काम केलं. पीएच.डीचे सटिर्फिकेट मिळेपर्यंतच्या कालावधीत प्राजक्ताने टोकियोमधील शाळेत इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. या निमित्ताने जपानमधील शाळांविषयी जाणून घेण्याची संधी तिला मिळाली. ग्लोबलायझेशनमुळे जपानी लोकांना आता इंग्रजीचं महत्त्व वाटू लागलं आहे. काही जपानी कंपन्यांनी कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीची निवड केली आहे. त्यामुळे जपानमधील शाळांत इयत्ता पहिलीपासून इंग्रजी हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. 'जपान ब्रॉडकास्टिंग कॉपोर्रेशन' या नॅशनल चॅनेलवरून त्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमामध्ये इंग्रजी कसं शिकवायचं यासाठी मॉडेल टीचर म्हणून प्राजक्ताला खास आमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात २०११मध्ये 'भारत व जपानमधील औद्योगिक क्लस्टरच्या पॉलिसिज' या विषयावर मलेशियातील आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये तसंच ग्रीस येथील आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये 'ऑटो कॉम्पोनन्ट क्लस्टर' या विषयावर पेपर वाचण्याची संधी तिला मिळाली. प्राजक्ता म्हणते, 'अशा कॉन्फरन्सना उपस्थित राहिल्यामुळे आपल्या विषयात संशोधन करणाऱ्या लोकांबरोबर संपर्क वाढण्यास मदत होते. तसंच अनुभवांची देवघेव झाल्यामुळे, आपलं संशोधन योग्य दिशेने सुरू आहे का हे देखील आजमावता येतं.'

मार्च २०११मध्ये जपानमध्ये झालेल्या भयंकर भूकंपाच्यावेळी ती मुंबईत सुट्टीवर आली होती. पण मार्चमध्येच ती परत गेली. भूकंपानंतरच्या काही महिन्यांच्या काळात जपानी लोकांनी दाखविलेली शिस्त, संयम, एकजूट कौतुकास्पद होती असं ती आवर्जून सांगते. खाद्यपदार्थ, प्यायचं पाणी यामधून अजूनही रेडिएशनचा धोका जाणवत असतानादेखील जपानमध्येच राहण्याचा त्या दोघांचाही निर्णय पक्का आहे.

लहानपणी प्राजक्ताला आईच्या मैत्रिणी जपानी गुडिया म्हणून चिडवत असत. बघता बघता ही मराठी गुडिया खरोखरच जपानला गेली आणि त्या परक्या देशात आपली स्वतंत्र ओळख तिने निर्माण केली.

टीप: जपान कसा कडवट शिस्तीचा देश आहे आणि मार्च २०११ मधे झालेला भुकंप या विषयी माझा अनुभव वाचण्यासाठी क्लिक करा

http://www.myniti.com/2011/03/tweet_10.html

http://www.myniti.com/2011/03/tweet_18.html

सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स - प्रियांका मोकाशी

No comments: