Sunday, March 25, 2012

मॅक्सेल फाउंडेशनची स्थापना - महाराष्ट्र टाईम्स

मॅक्सेल फाउंडेशनची स्थापना
http://www.maxellfoundation.org/
महाराष्ट्र टाईम्स दिनांक 24 मार्च 2012:  महाराष्ट्रातील उद्योजक आणि बिझनेस लीडर्स यांना पुरस्कार देऊन त्यांना समाजापुढे आणण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या मॅक्सेल फाउंडेशनची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी स्थापना झाली. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेचा पाया महाराष्ट्रात असून तो अधिक मजबूत करण्याकरिता मॅक्सेल फाउंडेशन प्रयत्न करील, असे उद्गार माशेलकर यांनी यावेळी काढले. येत्या ६ मे रोजी उद्योजकांना गौरवण्यात येणार आहे.


मॅक्सेल फाउंडेशनचे निमंत्रक व संस्थापक विश्वस्त अॅड. नितीन पोतदार यांनी सांगितले की, भारताने १९९१ साली खुल्या अर्थव्यवस्थेची कास धरल्यावर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला गती प्राप्त झाली आणि माहिती आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात एक देदीप्यमान कामगिरी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. तरुण पिढीने त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, याकरिता उद्योजक आणि बिझनेस लिडर्स यांचा ६ मे रोजी एनसीपीएच्या जहांगीर भाभा सभागृहात गौरव करण्यात येणार आहे. त्याकरिता मॅक्सेल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, कुमार केतकर, वाय. एम. देवस्थळी, सुनील देशमुख, न्या. अरविंद सावंत हे फाउंडेशनच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कारप्राप्त मान्यवरांची घोषणा केली जाणार असल्याचे पोतदार यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या उद्योजक आणि बिझनेझ लीडर्सना मॅक्सेलच्या या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे, असे पोतदार यांनी स्पष्ट केले. भारतीय बड्या कंपन्यांमधील बिझनेस लीडर, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील बिझनेस लीडर, महाराष्ट्रातील उद्योजकाने विदेशात घेतलेली गरूडभरारी, महिला उद्योजक अथवा बिझनेस लीडर्सची कामगिरी आणि पहिल्या पिढीतील इनोव्हेटीव्ह उद्योजक यांचा गौरव करण्याची फाउंडेशनची कल्पना आहे.

No comments: