Thursday, April 19, 2012

दिनेश केसकर, विक्रम राजाध्यक्ष, एकनाथ ठाकूर पहिल्या ‘मॅक्सेल’ पुरस्काराचे मानकरी

लोकसत्ता दिनांक 19 एप्रिल 2012: महाराष्ट्रातील व्यावसायिक नेतृत्त्वाची चळवळ म्हणून अलीकडेच स्थापित ‘मॅक्सेल फाऊंडेशन’ने आपल्या २०१२ या पहिल्या वर्षांच्या ‘मॅक्सेल’ पुरस्काराचे मानकरी जाहीर केले आहेत. वेगवेगळ्या पाच वर्गवारीतील सर्वश्रेष्ठ अशा १० मानकऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

मॅक्सेल अवॉर्ड -व्यावसायिक नेतृत्त्व प्रावीण्य’ (Maxell Award for Excellence in Business Leadership) वर्गवारीचा पुरस्कार गेल्या तीस वर्षांत देशापरदेशातील अनेक विख्यात संस्थांच्या अत्युच्च पदावर कार्य केलेले बोईंग इंडियाचे अध्यक्ष दिनेश केसकर यांना तसेच टाटा स्टील लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत नेरूरकर यांना प्रदान केला जाणार आहे. बँक अधिकाऱ्यांचे सर्वोत्तम संघटक ते बँक व्यवहाराचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे जनक आणि एक यशस्वी बँकर अशा भूमिका लीलया निभावून या क्षेत्रातील एक आदर्श ठरलेले सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांना पहिला ‘मॅक्सेल जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

मॅक्सेल अवॉर्ड - उद्योजकीय प्रावीण्य’तेचा (Maxell Award for Excellence in Entrepreneurship) पुरस्कार म्हणून निर्लेप सूमहाचे संस्थापक-संचालक असलेल्या राम भोगले, मुकुंद भोगले आणि नित्यानंद भोगले अशा तिघांची निवड करण्यात आली आहे. याच वर्गवारीतील दुसरा पुरस्कार तब्बल ९० दशलक्ष अमेरिकी डॉलरची उलाढाल असलेल्या डीएलझेड कॉर्पोरेशन या अमेरिकेत स्थापित कंपनीचे अध्यक्ष विक्रम राजाध्यक्ष यांना दिला जाणार आहे. ‘मॅक्सेल नाविन्यता प्रावीण्य’ पुरस्कार (Maxell Award for Excellence in Innovation) क्विक हिल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि मुख्याधिकारी कैलास काटकर आणि संजय काटकर यांना प्रदान केला जाईल, तर ‘मॅक्सेल उदयोन्मुख प्रावीण्य’ (Maxell Award for Emerging Excellence) पुरस्काराच्या प्लाझ्मा इंडियाच्या कार्यकारी संचालिका अरुंधती जोशी या मानकरी ठरल्या आहेत.

केवळ व्यावसायिक निष्ठा, नाविन्यतेचा आग्रह, उद्योग-उपक्रमामागी हेतू आणि परस्पर सहकार्य तसेच सहनिर्मितीम्धील योगदान या निकषांवरच यंदाच्या पुरस्काराचे १० मानकरी निवडले गेले आहेत, असे ‘मॅक्सेल फाऊंडेशन’चे संस्थापक विश्वस्त नितीन पोतदार यांनी सांगितले. तरीही यंदा योगायोगाने सर्व विजेत्या व्यक्ती मराठीच आहेत.  तथापि पुढील वर्षांपासून महाराष्ट्र ही कर्मभूमी मानून येथे उद्योग व्यवसाय उभारणाऱ्या अमराठी व्यावसायिकांनाही पुरस्कारासाठी विचारात घेतले जाईल, असे पोतदार यांनी स्पष्ट केले. उद्योगजगताला आजवर अनेक कल्पक उद्योजक आणि उद्योजकीय नेतृत्त्व देणाऱ्या महाराष्ट्रातून आपल्या उद्योजकीय कतृत्त्वाने एक ना अनेक शिखरे गाठत अमीट ठसा उमटविणाऱ्या ‘मॅक्सेल’ पुरस्कारार्थीच्या निवडीचे कठीण काम पार पाडल्याबद्दल पोतदार यांनी पुरस्कार सल्लागार समितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्कारांचे वितरण ६ मे २०१२ रोजी मुंबईत  एन.सी.पी.ए नरिमन पॉईट येथे (फ्क्त निमंत्रितासाठी) समारंभपूर्वक केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मॅक्सेल अवॉर्ड्स बद्द्ल अधिक माहिती साठी लॉग ऑन करा. http://www.maxellfoundation.org/.

No comments: