Friday, June 1, 2012

विश्वासार्हता हा महाराष्ट्राचा मोठां ब्रॅण्ड आहे!

नुकत्याच झालेल्या मॅक्सेल पुरस्कार सोहळ्यात मॅक्सेल फाउंडेशनचे फाउंडर ट्रस्टी या नात्याने मी केलेल्या

भाषणाचा हा अंश...

'लोकांकडून जे मिळते ते पुन्हा लोकांकडेच जायला हवे... ' असे जे. आर. डी. टाटा यांनी म्हटले आहे. तोच विचार मनात ठेवून 'मॅक्सेल अवॉर्ड्स-2012' चे आयोजन करण्याचे ठरवले.

मॅक्सेल म्हणजे संस्था नाही की निव्वळ एक पुरस्कार सोहळा नाही. हा इव्हेंट तर नक्कीच नाही. हा निश्चित दिशेने एक प्रवास आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पुढच्या पिढीमधून उद्याचे बिझनेस लीडर आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक घडवण्यासाठी त्यांना अधिक सक्षम करण्यासाठीची ही चळवळ आहे. राज्यातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आजच्या पुरस्कारविजेत्यांच्या यशोगाथांशिवाय प्रभावी पर्याय कोणता असणार!

मॅक्सेल पुरस्कारांचा अर्थ आणि उद्दिष्ट थोडक्यात सांगायचे झाल्यास 'One recognition billion inspiration' असे म्हणता येईल. लोकांना केवळ निरीक्षण करण्यास प्रवृत्त करण्यापेक्षा अंतर्मुख बनवणे हा आमचा हेतू आहे. एका व्यक्तीचा सन्मान केलातरी त्यामध्ये आणखी लक्षावधी जणांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असते, असे आमचे ब्रीदवाक्य सुचवते. केवळ प्रोत्साहन या एकाच गोष्टीच्या आधारे यश खेचून आणता येत नाही. शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी म्हटले आहे की, विद्वान किंवा प्रतिभाशाली व्यक्तीच्या यशामागे प्रोत्साहनाचा वाटा केवळ एक टक्का असतो, बाकी ९९ टक्के त्याच्या मेहनतीचे फळ असते.

मॅक्सेलच्या चळवळीची ही नुकती सुरुवात आहे. जास्तीत जास्त लोकांसाठी आणखी बरेच काही करण्याची गरज आहे. पण त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग आणि प्रयत्न आवश्यक आहेत. भांडवल , सहयोग , ब्रँडिंग अशा अनेक विषयांवर भर देता येईल. आमचे याकडे बारकाईने लक्ष असून योग्य वेळी आम्ही एक एक विषय निश्चित समोर आणू.

राज्यातील उद्योजकांच्या दृष्टीने दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत - एक म्हणजे, Actionable Knowledge (कृतीत आणण्याजोगे ज्ञान) आणि दुसरे म्हणजे, ब्रँड पोझिशनिंग.

हे बदलांचे युग आहे. उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये कमालीचे बदल झाले आहेत. आर्थिक उदारीकरण , जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे बिझनेस करण्याच्या पद्धतीत जगभरात कमालीचे बदल झालेले दिसतात. माहिती तंत्रज्ञानाची पुरती जादू तर अजून दिसायची आहे.

Today 'Idea is capital' - सध्याच्या काळात कोणताही व्यवसाय उभा करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना हेच मोठे भांडवल असते. अन्य मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसते. उद्योजक बनण्यासाठी विशिष्ट धर्माचे वा विशिष्ट प्रदेशातील असण्याचीही गरज नसते. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, अ‍ॅपलचे स्टीव्ह जॉब्स आणि फेसबुक झुकेरबर्ग यांच्या उदाहरणांनी आपल्याला हे दाखवून दिलेले आहे. आजच्या काळात उद्योजकता ही मोजक्या लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही. कृतीत आणता येईल असे ज्ञान तुमच्यातील उद्योजक विकसीत करत असते. महाराष्ट्राच्या घराघरात सरस्वतीचे अधिष्ठान आहे आणि हेच अधिष्ठान आपल्याला जगात पुढे नेणार आहे. आपल्याकडे गरिबातील गरीब व्यक्तीलाही आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, असे वाटते. म्हणूनच आपण याही पुढे जाऊन आपल्याकडील शिक्षणाचे रूपांतर कृतीत आणण्याजोग्या ज्ञानामध्ये करणे गरजेचे आहे. त्याचा उपयोग आपल्या कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी होऊ शकेल. सचोटी आणि कुशाग्रबुद्धी या नेहमीच मराठी मंडळींच्या प्रमुख क्षमता राहिल्या आहेत. आणि महाराष्ट्रातील तरुण यामध्ये मागे राहतील, असे मला वाटत नाही. सध्याच्या डिजिटल युगात सर्जनशीलतेला अजिबात मर्यादा नाहीत. मराठी तरुणांनी ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या युगातील आव्हाने स्वीकारून आपल्या क्षमतेच्या जोरावर यशाची नवी क्षितिजे गाठायला हवीत.

सचोटी आणि कुशाग्रबुद्धीसोबतच ब्रँडिंग आणि त्याचे योग्य मार्केटिंगही अतिशय गरजेचे आहे. ब्रँडमध्ये आपल्या मूल्यांचे प्रतिबिंब दिसते. व्यक्तीपासून संस्थेपर्यंत, संकल्पनेपासून देशापर्यंत प्रत्येकाला ब्रँडची गरज असते. आपण काय चांगले करू शकतो, आपल्या क्षमता काय आहेत, हे त्यातून प्रत्येकाला अधोरेखित करायचे असते. ब्रँडमुळे आपल्याला वेगळीच उंची प्राप्त होते. परंतु, अनेकांचे ब्रँडिंगकडे दुर्लक्ष होताना दिसते. अनेक जण आपली मूल्ये कसण्यावर अधिक भर देतात आणि त्याचे योग्य प्रकारे मार्केटिंग करण्याचे विसरून जातात. काही वेळा तितके प्रभावी मार्केटिंग केले जात नाही. पारदर्शकता, सचोटी, कल्पकता या केवळ आपल्या क्षमताच नाहीत, तर 'सेलिंग पॉइंट' ही असतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ते सगळे एका 'ब्रँड' अंतर्गत एकत्र आणायला हवे. चिनी वस्तूंबद्दल आपल्याला शंका असते. त्या डुप्लिकेट असतील, असे वाटते. महाराष्ट्रातील उद्योजकांविषयी मात्र 'ही माणसे कुणाला फसवणार नाहीत' असे म्हटले जाते. म्हणजे, विश्वासार्हता, सचोटी हा आपल्या राज्याचा मोठा ब्रँड आहे. त्याचे ब्रँडिंग झाले पाहिजे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात ब्रँडिंग हा कोणत्याही व्यवसायाचा पाया आहे. त्यावर भर देऊन उद्याचे उद्योजक घडवूया!

मॅक्सेल अवॉर्ड्सच्या संपुर्ण माहितीसाठी क्लिक करा www.maxellfoundation.org