Tuesday, July 24, 2012

माझं Tweet.....यश टिकवायचं कसं?

24  जुलै 2012:   मित्रांनो गेली सहा महिने मी "मॅक्सेल" अवॉर्ड्स बद्दल लिहीत होतो कारण त्या विषयी इतकं सांगण्यासारखं होत आणि अजुनही आहे,  इतके दिवस त्यातुन मला बाहेरच पडता आलं नाही.    पण गेल्या काही दिवसात दोन दुर्दैवी घटना घडल्या,  आपले आवडते राजेश खन्ना आणि मॅनेजमेंट गुरु स्टीफन कोवे आपल्याला सोडून गेले.    मला दोघेही अत्यंत महत्वाचे वाटतात कारण मी teenager असताना राजेश खन्ना लोकप्रियतेच्या शिखरावर होता आणि मी त्याचा एक मोठा फॅन होतो, तेंव्हा त्याचा आनंद हा चित्रपट बघताना मी खुप रडत असे, खुप भावूक होत असे, पण नंतर खरा राजेश खन्ना जिवंत आहे अस मनाला सांगुन मी स्वत:ला सावरायचो.  आता आनंद पुन्हा कधीच बघु शकणार नाही!  आनंद मधील "कही दुर जब दिन ढल जायें....." हे गाणं अजुनही मनाला त्रास देतं...त्या गाण्यातल्या राजेश खन्नाची एक पोझ देत आहे!

आता गेली दहा बारा वर्ष मी स्टीफन कोवेचा फॅन आहे!  त्याचे लिडरशीप बद्दलचे विचार मला खुपच पटतात ते असे.... "Leadership has nothing to do with position. That's management. Leadership comes from moral authority.  It comes from primary greatness.  Primary greatness means character and contribution.  Secondary greatness is prestige and wealth and position.  Few have both.  The key is primary greatness.  Become a contributor. Contribute in everything that you do, and you will literally cultivate such moral authority that it will spread and influence, and bless the lives of countless people."  कोवेचा हा बेसिक विचार की आपण contributor झालो तरच एक moral authority येऊ शकते हा मला खुपच मोलाचा वाटतो. 

राजेश खन्ना आणि स्टीफन कोवे या दोघां दिग्गजांबद्द्ल मला लिहावस वाटत असताना आज लोकसत्ता मधे प्रशांत दीक्षित यांनी "दीर्घ यशाचे गमक.."  या मथळ्या खाली स्टीफन कोवे यांनी सांगितलेली यशाची व्याख्या व यश हे क्षणिक असता कामा नये, त्याला स्थायी स्वरूप कस दिले पाहिजे हे राजेश खन्ना आणि अमिताभ यांच्यात  झाल्येल्या संवादावरुन स्पष्ट केलं आहे.   मला हा लेख खुपच आवडला म्हणुन तो खाली देत आहे.   जे विचार मला जास्त महत्वाचे वाटले त्याला मी underline केल आहे.


दीर्घ यशाचे गमक.....

प्रशांत दीक्षित.
सौजन्य: लोकसत्ता दि. 24 जुलै 2014.
 
यश अनेकांच्या हाती लागते, पण यशाला स्थिरता देणे फारच थोडय़ांना जमते. असे का होते याचे कारण माणसाच्या स्वभावात दडलेले आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तुलनेतून हे चटकन लक्षात येईल.


स्टीफन कोवे हे एक नावाजलेले लेखक. गेल्याच आठवडय़ात त्यांचे निधन झाले. स्टीफन कोवे हेही व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल बोलत असत.

मात्र त्यांची यशाची व्याख्या वेगळी होती. यश हे क्षणिक असता कामा नये, त्याला स्थायी स्वरूप दिले पाहिजे याकडे त्यांचे लक्ष असे. क्षणिक यश हे कोणत्याही प्रयत्नाविनाही मिळते. कधी ती दैवी देणगी असते तर कधी निव्वळ योगायोग. मात्र यशाला स्थिर स्वरूप देण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. विशेष प्रयत्न करावे लागतात. कोवे यांनी यावर भर दिल्यामुळे त्यांची पुस्तके ही व्यक्तिमत्त्व विकासापेक्षा व्यवस्थापन शास्त्रात जास्त लोकप्रिय ठरली.

यश हा माणसामधील गुणसमुच्चयाचा परिणाम असतो, असे कोवे मानत. अचानक लाभणारे यश हा माणसातील गुणांचा एकत्रित परिणाम असतोच असे नव्हे. बहुधा अंगी असलेल्या लहानशा गुणाला मिळालेला तो अकल्पित प्रतिसाद असतो. या गुणाची तीव्रताही कमी असते. साहजिकच अशा गुणाच्या प्रकटीकरणातून मिळणारे यश फारसे टिकत नाही. परंतु, परस्परपूरक अशा अनेक चांगल्या गुणांचा समुच्चय माणसाजवळ असेल, तर त्या गुणांपासून मिळणारे यश टिकाऊ असते. अर्थात गुण असूनही अपयशी राहिलेल्यांची संख्या कमी नाही. परंतु अशा अपयशी व्यक्तींचाही बारकाईने अभ्यास केला, तर त्यांच्यात एखाद-दुसऱ्या अतिशय महत्त्वाच्या गुणाची कमतरता आढळून येते. शिस्त, मेहनत, चिकाटी हे गुण बहुधा या व्यक्तींकडे कमी असतात. या गुणांची कमतरता व्यक्तीला अपेक्षेइतके यश मिळवून देत नाही.

आणखी एक अवगुण व्यक्तीचा घात करतो.  यशाला कितीही स्थिरता देण्याचा प्रयत्न केला, तरी सतत बदलणे हा तर प्रकृतीचा नियम आहे.  साहजिकच यशाबरोबर अपयशाची साथ ही ठरलेली असते. वारंवार येणारे अपयश सहन करणे एकवेळ सोपे, पण यशापाठोपाठ येणारे अपयश सहन करणे भल्याभल्यांना कठीण जाते. यशापाठोपाठ येणाऱ्या अपयशाच्या कालखंडात व्यक्तिमत्त्वाचा कस लागतो. हे अपयश पचवून पुन्हा यशाकडे एकाग्र होण्यामध्ये व्यक्तिमत्त्वाचे सामथ्र् असते.

व्यक्तीच्या अंगातील गुणांचा समुच्चय वाढविता येतो. त्यासाठी काही सवयी अंगी बाणवाव्या लागतात. सवयींमुळे स्वभाव बनतो. माणसाने काही तत्त्वे मनाशी घट्ट धरली, तर त्यानुसार वागण्याची वृत्ती वारंवार जोर पकडू लागते. या वृत्तींमधूनच सवयी बनतात. यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या सात चांगल्या सवयींची ओळख कोवे याने करून दिली. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, डायरी लिहिणे असल्या या सवयी नाहीत. या सवयी म्हणजे जगण्याची एक दृष्टी आहे.  उदाहरणार्थ, ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह’ बनणे ही कोवे यांच्या मते एक सवय आहे. ही सवय अंगी बाणवलेला माणूस प्रत्येक प्रसंगात पुढाकार घेतो. पुढाकार घेतल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो नवनवीन गोष्टी शिकू शकतो. कोवे यांनी नमूद केलेल्या अन्य सवयी अभ्यासण्यासाठी त्यांची पुस्तके विचारपूर्वक वाचली पाहिजेत.

गुणसमुच्चयाची ही कल्पना नवीन नाही. व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण कसे वाढवित नेले याचे तपशीलवार वर्णन बेंजामिन फ्रॅन्कलीनने आत्मचरित्रात केले आहे. फ्रॅन्कलीन याने चांगल्या गुणांची यादीच तयार ठेवली होती. प्रत्येक आठवडय़ाला एका गुणाचा तो मनापासून सराव करी. त्या वेळी अन्य गुणांकडे लक्ष देत नसे व आपल्यातील अवगुण लपविण्याचाही प्रयत्न करीत नसे. मात्र त्या आठवडय़ात हाती घेतलेला गुण प्रत्येक प्रसंगात जास्तीत जास्त उत्कटतेने आचरणात आणण्याचा तो प्रयत्न करी. हे एक प्रकारचे व्रतपालनच होते. आपले व्यक्तिमत्त्व लक्षणीय घडविण्यात या पद्धतीचा त्याला खूप उपयोग झाला.

राजेश खन्ना यांच्या निधनाची बातमी व त्यानंतरच्या प्रतिक्रिया वाचताना स्टीफन कोवे यांच्या यशासंबंधीच्या मांडणीची आठवण होते. राजेश खन्ना यांच्याकडे अभिनयाचे विलक्षण गुण होते. तथापि, या गुणांना स्थायी स्वरूप देणे त्यांना कधीही जमले नाही. सहज, सुंदर, निरागस अभिनयाची दैवी देणगी त्यांना होती. पण ही देणगी टिकवून धरणारे अन्य पूरक गुण त्यांच्याकडे नव्हते. अभिनयातून त्यांना अफलातून यश मिळाले. सलग चौदा चित्रपट हिट देण्याचा अद्याप अबाधित राहिलेला विक्रम त्यांनी नोंदला. परंतु, या यशाला पेलण्यासाठी आवश्यक असणारे अन्य गुणांचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ त्यांच्या स्वभावात नव्हते.

याउलट अमिताभ बच्चन यांचा स्वभाव आहे. उच्च अभिनयाचे दैवी दान त्यांच्याही बाजूने पडले होते. मात्र त्याला अन्य अनेक चांगल्या गुणांची जोड मिळाली होती. शिस्त, मेहनत, कष्टाळूपणा, चिकाटी आणि हेवा वाटावा असा संयम या गुणांचे मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर अमिताभ बच्चन यांच्याजवळ होते. अभिनयात ते मागे पडले की हे अन्य गुण त्यांना तोलून धरीत. यशापशाचे चढउतार त्यांच्या आयुष्यातही अनेकदा आले. पण अपयशाच्या कालखंडातही इंडस्ट्रीवरील त्यांचा प्रभाव ओसरला नाही. शिस्त, मेहनत, चिकाटी अशा ‘ग्लॅमर’ नसलेल्या गुणांमुळेच ग्लॅमरस दुनियेत ते टिकून राहिले. ते कलाकार होतेच. या गुणांमुळे ते व्यावसायिक कलाकार बनले. याउलट राजेश खन्ना हे फक्त कलाकार राहिले.

माणसाने स्वतमधील चांगल्या गुणांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली, की तीन टप्प्यांत माणसाचा विकास होतो असे कोवे म्हणतात. गुण क्षीण असतात तेव्हा तो परिस्थिती व अन्य माणसांवर अवलंबून असतो. गुण वाढीस लागले की त्याला स्वातंत्र्याची अनुभूती येऊ लागते. काही काळाने तो स्वतंत्र वृत्तीने काम करू लागतो. मात्र इथेच अहंकार निर्माण होण्याचा धोका असतो. अहंकार वाढला की अवनती ठरलेली.   म्हणून स्वातंत्र्यानंतर त्यापुढील टप्पा गाठायचा असतो. हा टप्पा असतो परस्परावलंबित्वाचा.  आपण सर्व जण एकमेकांवर अवलंबून आहोत व आपल्या यशात प्रत्येकाचा थोडा ना थोडा वाटा आहे ही जाणीव अंगात मुरलेली असली, तरच त्या यशाला स्थैर्य येते व अपयशाचा सामना करण्याचे सामथ्र्य येते.

चित्रपटसृष्टीतील यश हे एकटय़ाचे नसून सामूहिक यश असते ही बाब अमिताभ कधीही विसरले नाहीत तर राजेश खन्ना यांनी ही बाब कधीही मान्य केली नाही. ‘बॉलीवूड प्रेझेन्ट्स’ या संकेतस्थळावर अमिताभ व राजेश खन्ना यांची एकत्रित मुलाखत वाचायला मिळते. मुलाखतीचा हा कार्यक्रम कुठे झाला याचा उल्लेख तेथे नाही. बहुधा परदेशातील पारितोषिक समारंभात ती झाली असावी. मात्र या दोन उत्तम अभिनेत्यांच्या स्वभावावर या मुलाखतीत स्वच्छ प्रकाश पडतो आणि तेथेच एकाच्या यशाची तर दुसऱ्याच्या अपयशाची कारणे सापडतात. या मुलाखतीतील एक अंश..

राजेश खन्ना : ‘दीवार’च्या यशाचा तुझ्यावर काय परिणाम झाला. मी हा प्रश्न मुद्दाम करतो आहे. कारण स्टारडम म्हणजे काय हे मी अनुभवले आहे.

अमिताभ : काहीही परिणाम झाला नाही. कारण माझे यश पटकथा, दिग्दर्शक, सहकलाकार यांच्यावर अवलंबून असते असे मी मानतो. मी त्यातील एक भाग असतो इतकेच.

राजेश : हा तांत्रिक भाग झाला. आपल्या योगदानाचे काय? दिग्दर्शकाने स्टार्ट, साऊंड अ‍ॅक्शन असे एकदा म्हटले की त्यानंतर फक्त अ‍ॅक्टर असतो. अन्य कोणीही नाही. स्टारडम गोज टू अ‍ॅक्टर..

अमिताभ : मी या गोष्टीत लक्ष घातलेले नाही.

राजेश : म्हणजे तू अपयशाचीही जबाबदारी उचलत नाहीस. ना यशाची, ना अपयशाची.

अमिताभ : होय. मला तसेच वाटते.

राजेश : तू स्वत:कडे क्रेडिट घेत नाहीस व ठपकाही ठेवत नाहीस?

अमिताभ : अगदी बरोबर. मी असाच आहे.

राजेश : माझे तसे नाही. यश मला झपाटून टाकते. यश मिळाले की आय फेल्ट नेक्स्ट टू गॉड. यश सर्व शरीरभर पसरते. यश असे झपाटून टाकत नसेल तर तुम्ही माणूस असूच शकत नाही. यशाने मी आश्चर्यचकित होतो, रडतो.. तुझ्यावर यशाचा परिणाम होत नाही आणि अपयशही तुला विचलित करीत नाही हे ऐकून मी थक्क होतो. कारण यशानंतर मला अपयशाने घेरले तेव्हा मी बाटलीचा आश्रय घेतला. मी सुपर ह्य़ूमन नाही. मी ख्रिस्त वा गांधी नाही. मी माणूस आहे. एका रात्रीची याद आहे. रात्रीचे तीन वाजले होते. मी अतोनात प्यायलो होतो. कारण मी अपयश पचवू शकत नव्हतो. एकापाठोपाठ सात चित्रपट फ्लॉप. मला ते सहनच होत नव्हते. त्या रात्री धुवाधार पाऊस कोसळत होता. गच्चीत मी एकटा होतो. माझा संयम सुटला. मी भीतीने, दुखाने विव्हळत राहिलो. परवरदिगार, हम गरीबोंका इतना सख्त इम्तिहान मत ले. मी मोठमोठय़ाने आक्रोश करीत होतो. डिंपल धावत आली. मी वेडा झालो असे तिला वाटले.. यश मी मनाला इतके लावून घेतले होते की अपयश मी पचवू शकलो नाही. अमित, तुझ्याबाबत असे कधी घडले नाही का?

अमिताभ : कधीच नाही. मी स्वतबाबत काहीसा निराशावादी आहे. मी इथपर्यंत कसा आलो याचेच मला आश्चर्य वाटते. ईशकृपा, लोकांच्या शुभेच्छा वा इष्टग्रहांचा परिणाम हा असावा असे मला वाटते. प्रत्येक क्षणी मला असे वाटते की संपले, उद्याचा दिवस माझा नसेल. यशापयशात माझी कधीच भावनिक गुंतवणूक झाली नाही. राजेश, याबाबत मी तुझ्यासारखा पॅशनेट नाही..

हा संवाद वाचला की राजेश आपल्याला खूप जवळचा वाटतो. त्याच्याबद्दल अतीव आत्मीयता वाटते. पण त्याचवेळी अमिताभचे सामथ्र्यही जाणवते. एकाचे यश अल्पजीवी का ठरले आणि नवनवीन आव्हाने झेलत दुसरा अद्याप का टिकून राहिला हेही लक्षात येते. दोघांनाही विविध आजारांनी ग्रासले. एक जण आजारात खचला तर दुसरा पुन: पुन्हा त्यावर मात करीत राहिला.

राजेश खन्नाच्या अंत्ययात्रेत तरुणाच्या तडफेने चालणारा अमिताभ आठवा.

स्टीफन कोवे काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल.

********

No comments: