Wednesday, September 12, 2012

माझं Tweet.....महाराष्ट्राला हवा होता एक वर्गीस कुरियन!

12 स्पटेंबर 2012:    एखादया  देशाचा एक   कर्तबगार   माणुस कधी सोडुन जाऊच नये असं आपल्याला वाटत असतं त्यात मिल्क मॅन - डॉ, वर्गीस कुरियन हे होते!   देशातली शेतकरी सहकारी चळवळ आज पोरकी झाली!  लाखो गुजराती शेतकर्र्यांना यशस्वी व्यवसाय करायला शिकवणारा हा कदाचित एकमेव बिगरगुजराती माणूस असावा!  म्हणुन त्यांच मला खुपच जास्त कौतुक व  अभिमान आहे.  

पंचवीशीतला एक तरुण क्रिश्चन इंजिनियर स्वातंत्र्याचा दोन वर्षानंतर म्हणजे 13 मे, 1949 रोजी आणंदमध्ये जातो काय आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत तिथं राहुन देशसेवा करतो काय!   हे खुपच कौतुकास्पाद आहे।   त्यांनी अहोरात्र काम करून "अमूल'ची उभारणी केली. "अमूल्य' या संस्कृत शब्दापासून "अमूल' हा ब्रॅण्ड त्यांनी तयार केला, आणि सुमारे 33 लाख शेतकरी व सोळा हजार दूध उत्पादक संस्थां मार्फ्त दररोज 90 लाख लिटर दूध संकलित करून  देशभरातील हजारो घाऊक विक्रेत्यांच्या नेट्वर्कमधेउन "अमूल'च्या विविध उत्पादनांचे वितरण केलं.   व्यवस्थापनेचे कुठलेही धडे गिरवलेले नाहीत अशा अंगठा बहादुर शेतकर्र्यांना बरोबर घेउन करोडो रुपयांचा व्यवसाय उभा केला।  एका  बाहुलीलाच्या  जोरावर परदेशी कंपन्यांनाच्या करोडोरुपयांच्या जाहिरातींची भिंत  मोडून काढली !  किती मोठं आणि आफाट कर्तृत्व!   महाराष्ट्र टाईम्स ने त्यांचा विषयी लिहीलेला अप्रतिम अग्रलेख खाली देत आहे. 
 
खरं तर देशातील शेतकर्र्यांना सहकार तत्त्वावर काम करायला सर्वप्रथम शिकवलं ते महाराष्टाने! पण आज आपल्या सहकारक्षेत्राच काय चित्र आपल्या समोर आहे - तर आत्महत्या करणारे शेतकरी, कर्जबाजारी झालेले सहकारी कारखाने आणि श्रीमंतीत लोळणारे त्यांचे संचालक!  महाराष्ट्रात कापुस व साखरेचे असंख्य सहकारी कारखाने असुन देखिल आपण 'अमुल' सारखा, महाराष्ट्राल्या शेतकर्र्यांना आणि जगाला  जोडण़ारा   'महासेतू'  निर्माण करु शकलो नाही हे महाराष्ट्राचं आणि देशाचं सुद्दा दुर्दैवं!   

डॉ. कुरियनच्या यशावर मला दोन मुद्दे मांडायचे आहेत.   पहिला मुदा असा - आपण सातत्याने गुजराथ म्हणजे उद्योजकांचा प्रांत, गुजराथी म्हणजे उद्योजक असे समीकरण जोडत असतो.  पण या माहितीवरून काय दिसते? कुरियन ह्या केरळी ख्रिश्चन व मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या व्यक्तीने गुजराथी लोकांना गुजराथमध्ये जाऊन धंदा कसा करायचा व तो यशस्वी कसा करायचा याचे धडे दिले.  इतकेच नाही तर तेथील जे गुजराथी दलाल होते त्यांची मक्तेदारी मोडून काढली व दुध उत्पादकांना फायदा करून दिला. तसेच जर ३१ लाख दुध उत्पादक रोज दुध आणतात तर ते छोटे शेतकरी  आहेत, उत्पादक आहेत, ते काही उद्योजक नव्हेत.  म्हणजे प्रत्येक गुजराथी उद्योजक असतो ही आपली समजूतही चुकीची आहे. 
 
दुसरा महत्वाचा मुदा म्हणजे - अमूलच्या यशाचा मोठा वाटा आहे तो अमूल बेबी या नावाने ओळखल्या जाणार्र्या अमूलच्या जाहिरातीतील लोभस मुलीचा.  युस्टस फर्नांडिस या अ‍ॅडगुरुने याची निर्मिती केली व आपल्या भारत दाभोळकरानी काही वर्ष त्यात जीव ओतला   अमूलच्या जाहिराती व ही मुलगी खूप लोकप्रिय झाले व आहेत.   मार्केटिंगचे सर्व गणित अमुलने मोडीत काढ्ले. जाहिराताक्षेत्रात सेलिब्रेटींना आणुन कुठलही उत्पादन हमखास यशस्वी करता येतं ही समजुत अमुलच्या चुमुरडीने साफ खोडुन काढलं.  "LUX" च्या महागड्या जाहिरातीसाठी  प्रत्येकवर्षी हिंदी सिनेमातली एक नवी नटी घेतली जाते, पण अमुलची चिमुरडी अजुनही टिकुन आहे.   इतके वर्षे एक साधं कार्टुन एका मोठ्या कंपनीला यशाच्या शिखरावर ठेवते ही जगातली पहिलीच घटना असेल.

डॉ. वर्गीस कुरियन  यांच काम अजरामर आहे!  त्यांचे "आय टू हॅड अ ड्रीम' हे आत्मचरित्र प्रत्येक कर्तृत्ववान  तरूणाने ज्याला आयुष्यात काही तरी करायच आहे त्यांनी ते वाचावयाला हव.   ......त्यांच्या वर महाराष्ट्र टाईम्स मधे आलेला अग्रलेख देत आहे.

धवलगंगेचा भगीरथ!

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली नवभारताच्या नवनिर्माणाचा जो भगीरथ प्रकल्प सुरू झाला, त्याची गोमटी फळे आज अनेक क्षेत्रांत दिसत आहेत. या क्षेत्रांत अणुऊर्जा आहे, तसे अंतराळविज्ञान आहे. हरितक्रांती आहे, तशी दुधाची श्वेतक्रांती आहे. आयटीची हनुमानउडी आहे, तसे ऊर्जा व जलसंधारणाचे प्रचंड काम आहे. या साऱ्या नवनिर्माणाचे शिल्पकार होते, जे.आर.डी टाटा, डॉ. होमी भाभा, डॉ. एम. एस. स्वामीनाथन आणि डॉ. वर्गिस कुरियन यांच्यासारखे मोजके अलौकिक प्रतिभावंत. या महावीरांनी जवळपास प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याला संजीवक स्पर्श केला. आपल्या असामान्य कर्तबगारीने त्याचे आयुष्य अनेक पायऱ्या उंच नेले.  लौकिक अर्थाने त्याला सुखी केले. डॉ. वर्गिस कुरियन यांच्या निधनाने असा अभूतपूर्व इतिहास घडविणारा नवभारताचा एक शिल्पकार हरपला आहे.

कुरियन हे मुळात केरळातल्या कोझिकोडचे. मेकॅनिकल इंजिनीअर. मिशिगन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेऊन परतल्यावर ते आणंदमध्ये आले आणि त्यांनी काही वर्षांतच गुजरातचे रूपच पालटून टाकले. ' पोल्सन ' या दूधभुकटी बनविणाऱ्या परदेशी कंपनीच्या तडाख्यात दूधशेतकरी तेव्हा सापडले होते.  त्यांना या कचाट्यातून सोडविण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी कुरियन यांच्यावर सोपवले. ते तर त्यांनी यशस्वी केलेच; पण काही वर्षांतच' अमूल' हा ब्रँँड राष्ट्रीय पातळीवर नेला. महाराष्ट्रात साखर कारखानदारीत सहकाराची चळवळ वेग घेत होती; नेमक्या त्याच काळात कुरियन यांची धवलक्रांती गुजरातचे गोकुळ बनवत होती. राष्ट्रीयत्वाची भावना, सहकाराच्या चळवळीला देशभर फुटणारे धुमारे, राजकारणाचा मध्यबिंदू असलेले सामान्य माणसाचे जगणे आणि कर्तबगार तरुणांची समाजाला वाहून घेण्याची ऊर्मी यांचा उत्कट संगम स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात दिसतो. कुरियन यांचे लखलखीत कर्तृत्व हे या काळाचे अपत्य होते .

त्यांचे काम पाहून लालबहादूर शास्त्री यांनी दिल्लीत या आणि नवजात ' नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डा ' चे नेतृत्व करा, असे आमंत्रण दिले . तेव्हा ' नवी दिल्लीत मला माझा शेतकरी कसा भेटेल ?' असा सवाल त्यांनी केला. शास्त्रीजी खरे लोकनेते असल्याने त्यांनी या ' नॅशनल बोर्डा ' चे मुख्यालयच आणंदला नेले. याच काळात डॉ. स्वामीनाथन यांच्या आग्रहावरून शास्त्रीजींनी गव्हाचे संकरित बियाणे आयात केले. त्यांच्या छोट्याशा कारकीर्दीत एकीकडे हरित व दुसरीकडे धवलक्रांती अशी दोन्ही रोपटी तरारून फुलली. यामुळेच, शास्त्रींबद्दल कुरियन यांच्या मनात अपार कृतज्ञता होती. नेत्यांचा विश्वास जिंकण्याची युक्ती कुरियन यांच्याकडे होती, असे म्हटले जाई. पण ही युक्ती त्यांच्या कर्तबगारीत लपलेली होती. 

लक्षावधी गुजराती कुटुंबांची आयुष्ये त्यांनी बदलून टाकली. मुख्य म्हणजे, गाजावाजा न करता महिलांना समर्थ केले. आणंद व अमूल यांनी समाजात काय काय बदल घडविले, याचा जगभरच्या अर्थशास्त्री, समाजशास्त्र्यांनी वेध घेतला आहे. त्यावर अनेक प्रबंध झाले.  डॉक्युमेंटरी झाल्या. शाम बेनेगलांचा नितांतसुंदर ' मंथन ' झाला. या साऱ्यातून एकच गोष्ट पुनःपुन्हा अधोरेखित झाली.  ती म्हणजे, कुरियन यांची अस्सल व समग्र विकासदृष्टी.  माणसांचे आयुष्य बदलवून टाकण्याची गुरुकिल्ली त्यांना तिथे दुधात सापडली. या गुरुकिल्लीने शिक्षण, आरोग्य, पोषण, जीवनमान, महिलाकल्याण या साऱ्यांचे दरवाजे धडाधड उघडले.

कुरियन हे अनेकदा दूध उत्पादने व चॉकलेट बनविणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उघड उल्लेख करून 'अमूलने त्यांना धडा शिकविला.  अजूनही शिकवेल .' अशी आक्रमक भाषा करत. या भाषेमागे त्यांच्या प्राणांत मुरलेला आणि रक्तातून वाहणारा सहकाराचा मंत्र असे. ' अमूल ' ची चळवळ सहकाराची आहे आणि म्हणूनच ती कुणा एकाच्या मालकीची नाही. तिचे ३५ लाख मालक आहेत, ही त्यांची दृष्टी होती. ' अमूल ' चा प्रयोग सहकाराचा आहे. तो तसाच राहायला हवा. त्याचे कंपनीकरण होता कामा नये, ही कुरियन यांची तळमळ होती . त्यांच्या या आग्रहातून गैरसमज झाले. त्यांना ' नॅशनल डेअरी बोर्डा ' तून जावे लागले. पण सहकाराच्या मंत्राला आधुनिक विज्ञान - तंत्रज्ञान, उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि पारदर्शक व्यवहार यांची जोड दिली तर काय चमत्कार होऊ शकतो, याचे ' अमूल ' हे जगातले सर्वांत मोठे उदाहरण आहे. कुरियन यांचा सर्जनशील सहकार अंगात मुरवला तर विकासाचा पान्हा अगदी दुर्गम खोपटातही नेणे अशक्य नाही . या खऱ्याखुऱ्या ' भारतरत्ना ' ने तोच वसा - वारसा आपल्याला देऊन अखेरचा श्वास घेतला आहे !

सौजन्य: अशोक पानवलकर (संपादक)
महाराष्ट्र टाईम्स दि. 11.09.2012
 

No comments: