Monday, November 4, 2013

दिवाळी 2013 - Let's Accept Change!

4 नोव्हेंबर 2013:  मित्रांनो खुप महिन्यांनी ब्लॉग लिहायला घेतला आहे....  हल्ली खरचं वेळ मिळतं नाही म्हणून निदान फेसबुक वरुन इमेजेस सकट मेसेजेस पाठवत असतो. दुधाची तहान ताकावर!  काल पासुन सुरु झालेली दिवाळी! नेहमी प्रमाणे यंदाही भरपुर दिवाळी ई-ग्रीटिंग्स आणि शुभेच्छा पाठवल्या, काहींना न चुकता फोन केले,  टिव्ही वर काही खास कार्यक्रम पाहिले आणि ठरवलं आज हा ब्लॉग़ लिहायचाच. विषय तसा म्हटंल तर साधा आहे आणि म्हटंल तर  गंभीर!

Wednesday, October 2, 2013

माझं tweet.....Greatness was in his Simplicity

2 ऑक्टोबर 2013:   बरेच दिवस काही लिहिलेल नाही.  आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती.... मला आठवल की त्यांच्या बद्द्ल मी ट्विट लिहिलेला होता तोच पुन्हा  इथं देत आहे.... काहीही बदललेलं नाही... आपण अजुनही तिथेच आहोत किंबहुना परिस्थिती जास्त बिकट होत आहे...मी इतकचं म्हणेज आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनातील प्रत्येक प्रशनाचं उत्तर साधेपणात आहे.

३० जानेवारी, २०१०: मित्रांनो सकाळ पासुन विचार करत होतो की आपल्या पुज्य गांधीजीबद्दल काय लिहु! साधेपणामुळे त्यांनी जग जिंकल, आणि दुर्दैवने आमची पिढी साधं राहूच शकत नाही! सगळं समजत? पण उमजत नाही!

'Greatness of this man was in his simplicity.................. जास्त काय लिहू?

Friday, August 30, 2013

माझं Tweet...अमेरिका अमेरिकंस आणि आपण

30 ऑगस्त 2013:  मित्रांनो तीन आठवड्यांचा माझा अमेरिका दौरा आटपुन मी आलो, तेंव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या दु:खाच सावट मुंबईत आणि सर्व महाराष्ट्रात पसरलेलं होतं आणि अजुनही आहे..

एक विलक्षणं योगायोग म्हणा हवं तर पण मी तिथं असताना अमेरिकेच्या सुब्ततेची, तिथल्या माणसांची आणि एकुणच तिथल्या वातावरणाची आणि आपण भारतात जस राहतो त्याची नकळत का होईना पण मनातल्या मनात तुलना करीत होतो.  सगळ्यात पहिले मला अगदी प्रकर्षाने जाणवणारी गोष्टी होती, ती म्हणजे मला कुठल्याही फुटपाथवर, नाक्यावर, किंवा कुठल्याही मोठ्या इमारतीत त्यांच्या देवी दैवतांची, त्यांच्या संतांची किंवा कुठल्याही बाबा-बुआंचे देऊळं दिसलं नाही... लोक उपवास करताना, सकाळी ऑफिसला जाताना कुणाची पुजा करताना, त्यांची एखादी Prayer (आरती किंवा स्त्रोत्र) म्हणताना, मंत्र जपताना, एखादी Candle (तुपाचा किंवा तेलाचा दिवा) एखादी गरबत्ती लावताना दिसले नाहीत.   तिथं सत्यनारायणाची पुजा, ग्रह शांत, जप-मंत्र, मोठ-मोठे यज्ञ असं तिथं काहीच नसतं.  टिव्हीच्या चॅनेल्सवरुन सकाळी किंवा दिवसभारात कधीही कुठला बापु, बाबा, दादा, किंवा मॉं चे प्रवचन, भविषवाणी, संदेश, उपदेश किंवा लिंबु, नारळ, धागा दोरा यावर कुठलीही चर्चा बघायला मिळाली नाही. मग मला प्रश्न पडला कि अमेरिकन लोक नास्तिक आहेत का? काही लोकांना मी विचारायचा प्रयत्न केला तर ती म्हणली की आमचा देवावर विश्वास आहे आणि आम्ही दर रविवारी सकाळी चर्च मधे जातो बस इतकचं.  म्हणजे त्यांचा देखिल त्यांच्या देवावर विश्वास आहे पण ते त्याचा बाजार किंवा आपल्या सारख अवडंबर माजवित नाहीत इतकचं. 

Friday, July 26, 2013

डेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची!

मुंबई सकाळ  26 जुलै 2013 Good Morning: ‘डेट्रोइट’ या अमेरिकेतील विख्यात शहराच्या नशिबी नुकतीच दिवाळखोरी आली आहे.  लोकसंख्येच्या दृष्टीने देशांतील चौथ्या क्रमांकाचे असलेले शहर आणि मोटारनिर्मितीची अव्वल राजधानी असलेले हे शहर एक श्रीमंत शहर म्हणून ओळखले जात होते. पण काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, जगाची अर्थनीती बदलली आणि या सगळ्यात डेट्रोइट हे शहर मागे पडत गेले.  ’श्रीमंत व्यापारी शहर’ आणि ‘वाहनांचा जन्मपाळणा’ म्हणून लौकिक मिरवणारे हे शहर इतके रोडावले की त्याची सारी रयाच निघून गेली. तिथली कारखानदारी नव्या काळात टिकली नाही आणि त्याच्याशी जोडलेली लोकसंख्या शहर सोडून निघून गेली.  एकेकाळी १६-१७ लाख लोकसंख्या असलेले हे शहर आता अवघ्या ७ लाखांना पोटी धरून आहे. या शहराची आज आर्थिक अवस्था आज मरणासन्नतेला पोहोचली आहे .   शहराच्या तिजोरीत जमा होणारा महसूल आटला, कारखानदारी संपली, अर्धे शहर ओस पडले म्हणून शहर मरणपंथी झाले. असे झाले याचे एकमेव कारण म्हणजे त्या शहराच्या पालकांचे शहर-नियोजन चुकले, काळाची पावले ओळखण्यात ते चुकले, कारखानदारी एककेंद्रीच ठेवली आणि शहराच्या संपूर्ण विकासाचे भान त्यांनी ठेवले नाही.... तशा योजनाही त्यांनी आखल्या नाहीत... अशा स्थितीत आज झाले त्यापेक्षा वेगळे काही होण्याची शक्यताही नव्हती.

अशाच आपल्या देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा 2013-14 सालचा अर्थसंकल्प 27,578 कोटींचा – पण या  मुंबईत आपण कित्येक वर्ष काय बघतो -  दिवसागणिक मुंबईला गिळणारी अनधिकृत झोपडपटी... दहा बाय दहाच्या खोलीच्या कोंडमार्र्यात जगण्यासाठी धडपडणारी हजारो कुटुंब...  जनावरांसारखे रोज रेल्वेने प्रवासकरणारे लाखो चाकरमानी...  ट्राफिक मधे 24 तास गुदमरलेली हजारो वाहन... मंत्रालयासमोरुन जाणार्र्या क्विन्स नेकलेस सकट सगळ्या रस्त्यांवर पसरलेले खड्यांचे सामराज्य... रेल्वेच्या प्रत्येक स्थानकाबाहेरील फुटपाथ काबिज करणारे हजारो फेरिवाले,  उरलेल्या फुटपाथवर शेकडो देव-देवतांची दुकाने... प्रत्येक सिग्नलवर गर्दुल्ले आणि भिकार्र्यांचा गराडा, वाढतं प्रदुषणं ... तर  दुसरी कडे मंत्रालयातील आणि महापालिकेत प्रत्येक टेबलांवर जन्म दाखल्यापासुन ते रॅशन कार्ड पर्यंत प्रत्येक गोष्टींसाठी सतत पैशासाठी पसरलेले हात...  आणि शेवटी मुंबईचा हरवलेला मराठी चेहरा 
आपण पैशाने श्रीमंत असु पण ही वैचारिक दिवाळखोरी मुंबईला घातक ठरलेली आहे.  पेडर रोडच्या एका फ्लाय ओवरचा निर्णय आम्ही दहा दहा वर्ष घेऊ शकत नाही..  पण मुंबईच्या कुठल्याही सरकारी भुखंडावर कसल्याही परवानगीशिवाय इथं आदर्श उभे राहु शकतात!  सामान्य माणसांना सकाळी चालणासाठी जॉगिंगट्रकच्या  नावाखाली पालिकेच्या भुखंडावर नगरसेवक क्लब्स बांधु शकतात पण मुंबई महानगरपालिकेच्या समोर असलेला फुटपाथ मोकळा होऊ शकत नाही.  मुंबईला कुरुप करणार्र्या पोस्टर्सवर बंदी असो की शाळा, खुली मैदाने आणि हॉस्पिटल्सचा सायलेंस झोन शाबुत ठेवण्यासाठी, प्रत्येक वेळी मुंबई उच्च न्यायालयाची मदत घ्यावी लागते ही आपली खरी शोकांतिका.  गेल्या काही वर्षात उत्सवी मुंबईत आणखी एका उत्सवाची भर पडली आहे, ती म्हणजे नाक्या नाक्यावर उभ्या रहाणार्र्या राजकीय दहिहंड्या आणि शेवटी कुठल्याही कारणास्तव कर्कश बेंजोसहित निघणार्र्या मिरवणुका- ट्रफिक जॅम आणि हजारो लोकांचा खोळंबा?  कुणीतरी ठरावुन मुंबईतची वाताहत करीत आहे का असा संशय यावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.  प्रत्येकजण त्रस्त आहे.  साध्या जगण्यासाठी सुद्दा लागणारे प्रत्येक निर्णय जर कोर्टाला घ्यावे लागत असतील तर कशाला हवी आहे महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकार? 
एकुणचं मुंबईचा नियोजनबध्द सर्वांगिण विकासाचा विचार कुणी करताना दिसत नाही.  इथं प्रत्येकाला घाई आहे ती कुठल्याही मार्गाने पैसा आणि प्रसिद्दी कमावण्याची!  मग तो राजकीय नेता असो, उच्चपदस्थ अधिकारी असो, बिल्डर असो, उद्दोगपती असो की  अंडर्वर्ल्डचे मोठे नायक...  मुंबई स्टॉक एक्सचेंज प्रमाणे प्रत्येकाला स्वत:चा सेंन्सेक्स वाढवायचा आहे पण मुंबईच्या सुखाच्या सेंन्सेक्सचा विचार करायला कुणीकडेही वेळ नाही... पण त्यांनी एक लक्षात घ्यावं की the higher the rise, the bigger the fall. 

nitinpotdar@yahoo.com

Friday, July 19, 2013

बॉस ऑफ द साउंड..

मुंबई सकाळ  19 जुलै 2013 Good Morning:  ‘बोस कॉर्पोरेशन स्टिरिओ फोनिक साउंडच्या जगातील एक मोठं नाव!  Better sound through research हे त्यांच ब्रीद वाक्य.  बोस कॉर्पोरेशनचे बॉस अमर बोस हे खर्र्या अर्थाने साउंडाच्या जगाचे बॉस होते;  आणि त्यांच ब्रीद वाक्य ते आयुष्यभर शब्दश: जगले...

कर्तृत्ववान माणसांची जगात एक वेगळीच जातकुळी असते, एक वेगळी श्रेणी असते.  अशी माणसे कधी अत्यंत मनस्वी असतात, तर कधी ती अतिशय एकलकोंडे जीवन जगत असतात.  जगातील अनेक प्रज्ञावंत तत्ववेत्ते, शास्त्रज्ञ, महान कलावंत हे कधी एककल्ली दिसतात तर कधी विशाल समुदायात वावरत असूनही ते स्वतःच्या एका तंद्रीत जगत असतात. अशी माणसे विविध कारणांनी लक्षवेधक ठरत असतात. लोक त्यांच्याविषयी चर्चा करत राहिले तरी ही एका अर्थाने देवदत्त माणसे आपले अंगीकृत कार्य सर्व चर्चांकडे दुर्लक्ष करून एका अपार निष्ठेने कायम करत राहातात.  अशा प्रज्ञावंत आणि कर्तृत्ववंत जातकुळीत ज्यांची गणना होत होती ते ‘ बॉस ऑफ द साउंड’ म्हणून गौरवले गेलेले अमर बोस परवाच या नादाने भरलेल्या जगाचा निरोप घेऊन एका विशुद्ध महानादाचा अनुभव घेण्यासाठी प्रवासाला निघाले.  वयाच्या ८३ व्या वर्षी आपले महत्तम काम जगाच्या उपयोगी पडते आहे हे पाहात—एका कृतकृत्य भावनेने, तृप्ती आणि समाधानाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला असावा असं मानायला काही हरकत नाही.

अमर बोस हे स्वातंत्र्यसैनिक नोनी गोपाळ बोस यांचे चिरंजीव. वडील जसे भौतिक शास्त्रज्ञ तसे अमर बोस हे सुद्धा भौतिक शास्त्रज्ञच होते. अमेरिकेत जन्माला आलेल्या अमर बोस यांचे सारे शिक्षण अमेरिकेत झाले आणि पुढे आयुष्याची तब्बल चाळीस वर्ष ते जगद्विख्यात एमआयटी विद्यापीठात अध्यापन करत होते. ‘साउंड इंजीनियरिंग’ या विषयातले ते केवळ प्राध्यापक नव्हते तर एक विचक्षण असे संशोधक होते. आवाजाच्या विशुद्धतेचा ध्यास घेतलेल्या बोस यांनी त्यासाठी अथक संशोधन केले, त्यासाठी अपार चिकाटीने निरंतर कष्ट केले आणि रेडीओसह इतर ध्वनीसंबंधीत उपकरणे अधिकाधिक शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी ‘बोस कॉर्पोरेशन’ची स्थापना केली आणि आपल्या संशोधनाच्या जोरावर आपल्या विषयात अभिनव तंत्रज्ञान आणण्याचा आणि यशस्वीपणे रुजविण्याचा सर्वोत्तम यत्न केला. त्यांनी विकसित केलेल्या साउंड टेक्नोलॉजीचा अंतर्भाव असलेल्या ध्वनी-उपकरणांचा वापर आज अक्षरशः विश्वाच्या सर्व देश आणि खंडात होतो आहे. रस्त्यावर धावणाऱ्या मोटारीमधील ध्वनी- उपकरण हे जसे ‘बोस कॉर्पोरेशन’चे असते तसेच जगभरातील संगीतगृहे, सभागृहे , रेडीओ येथील ध्वनीयंत्रणाही बोसचीच असते. ध्वनीच्या शुद्धीकरणासाठी आणि त्याच्या स्वर्गीय आविष्कारासाठी अमर बोस यांनी जे संशोधन केले ते अतीव मोलाचे तर आहेच पण ते ध्वनी बद्दलचा विचार विस्तारणारे आहे. एमआयटी ही अमर बोस यांची विद्याभूमी, कर्मभूमी, संशोधनभूमी तर होतीच पण ही संस्था म्हणजे त्यांची प्रेरणा – शक्ती आणि जणू मुक्तीही होती.
महान माणसे आपल्या कार्याने महत्तेला पोहोचलेली असतात हेच खरे! अमर बोस हे थोर तर होतेच पण ते खरे संशोधनप्रेमी, विज्ञानप्रेमी आणि शिक्षणप्रेमी होते... म्हणूनच त्यांनी आपल्या कंपनीचे मोठे समभाग त्यांच्या मुलाला न देता एमआयटी या शिक्षणनिष्ठ आणि संशोधननिष्ठ संस्थेच्या नावे करून ठेवले.  या गडगंज निधीतून या संस्थेत विविध प्रकारचे संशोधन आणि शिक्षण प्रकल्प हाती घेतले जावेत आणि मानवपयोगी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी नवी शिखरे गाठावीत अशी कल्पना आहे. एक विद्यार्थी, तळमळीचा संशोधक, जगाच्या उन्नततेची आणि विशुद्धतेची आकांक्षा बाळगणारा नागरिक-शिक्षक यापेक्षा अधिक काय बरं करू शकेल?.  

आपल्या देशातले उद्योगपती, अति धनवान सरकारी अधिकारी, नामवंत राजकारणी , अल्पावधीत अब्जोपती होणारे महान खेळाडू संशोधनासाठी, शिक्षणासाठी अशी दानशूरता कधी दाखवतील का?  आपण पुढच्यापिढीचं काहीतरी देणं लागतो हे त्यांना कधी तरी समजेल का?  निदान अमर बोस यांच्या कार्याचा आतला आवाज  त्यांच्या पर्यंत पोहोचेल, हीच अपेक्षा!

nitinpotdar@yahoo.com

Friday, July 12, 2013

वर्तन-परिवर्तन..आणि बिघडलेली स्थिती?

मुंबई सकाळ  12 जुलै 2013 Good Morning:  शिक्षणातून वर्तन परिवर्तन

साध्य होणे अपेक्षित असताना आज समाजात अत्यंत बिघडलेली स्थिती पहायला मिळते, अशी खंत सुप्रीम कोर्टाने मागच्या आठवड्यात व्यक्त केली.  पुर्वीच्या काळात साक्षरतेचं प्रमाण फारसे नसतानाही मानवी मूल्यांना किंमत होती.  1947 साली साक्षरतेचे प्रमाणं 12 टक्के होते आणि कालांतराने देशात सामाजिक आणि आर्थिक बदल झाले आणि 2011च्या जनग़णनेत साक्षरतेचा दर 74.04 टक्के इतका झाला.  74.04 टक्के लोकं साक्षर असताना देखील अशा व्यक्तिंकडून अपेक्षित असलेल्या वर्तनाच्या पहिला टप्पातही अजुन आपण पोहोचलेलो नाही अशी खंत कोर्टाने व्यक्त केली.  शिक्षणं व्यवस्था आपली अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करण्यात अपयशी ठरली म्हणून शिक्षणसंस्था, शिक्षक, पालक, विद्दार्थी आणि समाजाने पुढाकार घेऊन संपूर्ण व्यवस्था बदलण्याची गरज आहे असं कोर्टाला वाटते. 

बिघडलेली स्थिती म्हणतो म्हणजे नेमकं काय? तर समाजात सर्व स्तरात आणि सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पसरलेला भ्रष्टाचार;  महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, कुपोषणं, दहशतवादी हल्ले, गगनाला भिडलेली महागाई त्यात मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप, आणि मोटारगाड्यांचे रोज बदलणारे मॉडेल्स आणि स्टेटससाठी वाढवलेल्या आपल्या गरजा!  चुकीच्या शिक्षणं पद्दतीमुळे तयार झालेल्या बेरोजगारांच्या फौजा,  टिव्ही चॅनेल्स वरुन सतत दाखविल्या जाणार्‍या भडक बातम्या...  घर आणि लग्न या संस्थेलाच सुरुंग लावणार्‍या सासु-सुनांच्या टिव्ही सिरियल्स!   इंटरनेटच्या माध्यमातून वाहणारी माहिती आणि सोशल-वेबसाईट्स वरुन तरूणांमधे तयार होणारे तकलादू नाते संबध, त्यांचे विचार आणि जनमत.  म्हणजे भ्रष्टाचार, महगाई, तरूणांना आलेलं अपयश आणि माणसांच अनैतिक वागणं म्हणजे मानवी मुल्यांची घसरणं!  या अर्थाने एकुणचं स्थिती बिघडलेली आहे असं आपण समजतो.  खरचं स्थिती इतकी भयावहं आहे का? याला आपण स्वत: किती जबादबार आहोत?  आणि हे सगळं फक्त शिक्षणं पद्दती बदलून होणार आहे का?  

Friday, July 5, 2013

संघटित व्हा; मोठे व्हा...

मुंबई सकाळ  5 जुलै 2013 Good Morning:   पुण्याच्या काही मराठी बांधकाम व्यावसायिकांनी 2001 साली एकत्र येऊन “मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन” (MBVA) स्थापन केली – त्यांच उद्दिष्ट मराठी बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणुन त्यांचे प्रश्न सोडवणे व एकमेकांच्या सहकार्याने आपला व्यवसाय यशस्वी करणे हे आहे.  MBVAने आयोजित केलेल्या एज कॉन नॉलेज मॅनेजमेंट 2013च्या शानदार परिषदेत मला विजन 2020 या विषयांवर मार्गदर्शन करायला आमंत्रित केल होतं.  Amby Valley मध्ये दोन दिवस ही परिषद अगदी एखाद्या मोठ्या मल्टिनॅशंनल कंपनी किंवा दिल्ली मुंबईत होणार्या परिषदांसारखी भव्य,  देखणी आणि प्रोफेशनली आयोजित केल्या बद्द्ल त्यांच्या पदाधिकार्र्यांचे अभिनंदन.  परिषदेची मांडणी, निवडलेले विषय, प्रेझेंटेशंस, प्रत्येक विषयांवर मुक्त चर्चा आणि प्रश्न उत्तरांमुळे परिषद नक्कीच यशस्वी म्हणावी लागेल.  या परिषदेत तरूणांचा सहभाग मोठा होता हे विशेष.  गेल्या वर्षी दादरच्या मराठी व्यावसायिक उद्दोजक व्यापारी मित्रमंडळाचे संमेलन देखिल असचं प्रोफेशनल आणि विचारांनी भरलेलं झालं होतं. हळु हळु इतर उद्दोगात देखिल आपण संघटित होत आहोत आणि हेच मोठं यश आहे.  आज गुजरती मारवाडी, कच्छी आणि सिंधी समाजासारखे इतर मराठी उद्दोजक आणि व्यावसायिक खास करुन आपले तरूण एकत्र येताना दिसतात आणि नुसतचं एकत्र नाही तर एकमेकांना मदतीचा हात ध्यायला पुढे होत आहेत ही फारच आनंदाची गोष्ट आहे.  आज जागतिकीकरणामुळे येणार्र्या देशी आणि विदेशी स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्यायच असेल तर संघटित होण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही हे आपण लक्षात घेतल पाहिजे. 

Friday, June 28, 2013

उत्तराखंडचे उत्तर…

मुंबई सकाळ  28 जुन 2013 Good Morning:   उत्तराखंडमध्ये आलेल्या अस्मानी संकटात देशातील हजारो भाविकांचे जे हाल झाले ते आपण गेले दहा दिवस बघितले.. आपण आपल्या धर्मस्थानांची त्याच्या भोवती असलेल्या निसर्गाची कशी दयनीय अवस्था केलेली आहे हे आपण बघितलं. परिस्थिती फारच वाईट आहे आणि अशा बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याकडे जवानांशिवाय कुठलाही पर्याय नसतो हे आपलं दुर्दैव!  आता त्यात घाणेरडं राजकारणं होईल.  तरी कालांतराने आपण सगळं विसरुन जाऊ. आणि पुन्हा नव्याने तीर्थयात्रा करु...
आज तिरुपती-बालाजी, पंढरपुर, शिर्डी-साईबाबा, अमरनाथ, सिद्धिविनायक, कुंभमेळा, जगन्नाथ पुरी, काशी, प्रयाग, चारधाम-यात्रा, हरीद्वार-ऋशीकेष, मथुरा आणि अशा अनेक धार्मिक स्थानांना लाखो लोक दर वर्षी नित्य नियमाने जातात. आपला देश धार्मिक आहे त्याला खुप जुनी परंपरा आहे... भाविकांसाठी ही धार्मिक स्थाने म्हणजे त्यांच्या कठोर श्रध्येचा विषय आहे.  आज प्रत्येक धार्मिक संस्थांकडे करोडो रुपये आहेत, सरकारी अधिकारी आहेत. असे असुन देखिल आज जवळपास प्रत्येक ठिकाणी सगळे कायदे धाब्यावर बसवुन आणि पर्यावरणाची कसलीही पर्वा नकरता हजारो अनाधिकृत हॉटेल्स, घाणेरडी अतिथिगृहे, अस्वछ धर्मशाळा-आश्रम, जिथं साधं शुद्ध पिण्याच्या पाण्याची देखिल सोय नसते अशी बांधलेली आहे.   

Sunday, June 23, 2013

ऐका पुढल्या हाका...

मुंबई सकाळ  21 जुन 2013 Good Morning:  गेल्या दोन दशकात पोस्टकार्डाची जागा प्राईव्हेट कुरिअर ने घेतली, तारेची जागा फॅक्सने, फॅक्सची जागा ईमेलने,  ईमेलची SMSने, आणि SMSची जागा ट्विट्टर, फेसबुक आणि Whats Appने केंव्हा घेतली आपल्याला कळलचं नाही.  प्रत्येक नविन आविष्कार त्या त्या वेळी नाविण्यपुर्ण आणि खुप उपयुक्त होता आपण लक्षात घेतलं पाहिजे.  

दैनंदिन जीवनात वेळेची बचत करणारी आणि जगाशी जलदगतीने संपर्क साधायला हमखास उपयुक्त ठरणारी अनेक उपकरणे शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांनी जगाला दिली.    अशा शास्त्रज्ञांमध्ये सॅम्युअल मोर्स या अमेरिकन शास्त्रज्ञाने संदेश जलदगतीने पोहचविण्यासाठी एक संकेतभाषा तयार केली आणि त्यामार्फत कम्युनिकेशनच्या प्रणालीत एक आमूलाग्र क्रांती घडवून आणली.   ज्या काळात दूरध्वनीसेवा अगदी प्राथमिक अवस्थेत होती आणि ती सेवा केवळ ‘निवडक’ लोकांसाठी उपलब्ध होती त्या काळात सॅम्युअल मोर्स यांनी ‘टेलिग्राम’ उर्फ ‘तार’सेवा समाजातील सर्व लोकांसाठी उपलब्ध करून दिली.   रात्रीबेरात्री दार वाजवणारा ‘तारवाला’ हा जणू यमदूतच असल्याची ‘आम आदमी’ची भावना होती,  आजही आहे.  तारेचे अनेक प्रकार असले तरी मध्यरात्रीची तार म्हणजे आप्तांचा मृत्यू यांचे नाते गेली १७५ वर्ष कायम आहे.  आज कम्युनिकेशनच्या तंत्रज्ञानात इतकी विलक्षण प्रगती झाली आहे की आजच्या मध्यमवयीन आणि तरुण वर्गाला ‘तार ऽऽऽ‘ हा शब्द आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या हर्ष-शोकादी भावना यांचा अनुभवच येऊ शकत नाही.    आज १७५ वर्षे उलटल्यावर पोस्टाने ही ‘तारे’वरची कसरत बंद करणे कालानुरूप  जरी योग्य असलं  तरी या तारेने  प्रचंड प्रमाणात लोकसेवा केलेली आहे, हे विसरुन चालणार नाही. 

Sunday, June 16, 2013

माझं Tweet.....'मारू नका, मला शाळेत येऊ द्या..'

16 जुन 2013:    मित्रांनो गेले सहा महिने मी मुंबई सकाळ मधे Good Morning दर शुक्रवारी लिहितो ते सुद्दा माझ्या या ब्लॉग वर पोस्ट करतो.  म्हणुन माझं Tweet  लिहायला वेळ मिळतं नाही.   पण आज 'मारु नका, मला शाळेत येऊ द्या'..हे शाहीर लेखक आणि संगितकार संभाजी भगत यांचा लेख लोकसत्ते मधे वाचला  आणि खुपच मनाला चुटपुट लागली म्हणुन तुमच्या साठी खाली देत आहे.

कालच बारावी आणि दहावीचे निकाल लागले, 80% आणि 90% टक्के मिळवणार्र्यांच्या वृतपत्रातुन आणि टिव्ही चॅनेल्सावरुन मुलाखती प्रसिद्ध होतील...त्यांची काळजी घेण्यासाठी त्या नशीबवान मुलांचे पालक, शिक्षक, खासगी क्लासेस, नातेवाईक, शेजारी व मित्र परीवार सदैव असतातचं....साधारणं 50% टक्के मिळवणार्र्या मुलांच्या सुद्दा आयुष्यात यशाचे व सुखाचे दरवाजे त्यांचे पालक आणि शिक्षक उघडतील ....पण ज्यांना शाळेचा दरवाजाच दिसला नाही त्यांच काय?   आजही देशात हजारो मुलं-मुली अशा आहेत ज्यांना शाळेची श्रीमंती अनुभवायला मिळत नाही.....शिक्षणं हा मुलभुत अधिकार हे जरी भारतीय घटनेने मान्य केलं तरी ते देण्यासाठी लागणारं बेसिक इंफ्रास्टकचर कुठे आहे... कारणं कदाचित आपण बेसिक Priority ठरवण्यात चुकलो...ते चुकतच गेलो.

Friday, June 14, 2013

अमर्त्य सेन आणि आपला देश..

मुंबई सकाळ 14 जुन 2013 Good Morning:   नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी  जर्मनी येथे आयोजित ‘ आंतरराष्ट्रीय वाहतूक परिषदे’चे उदघाटन करत असतांना फार मोलाचे विधान केले.  ते असं म्हणाले की, “कोणत्याही राष्ट्राच्या धोरणांची आंखणी आणि अंमलबजावणी करतांना केवळ तिथल्या सरकारला काय  हवे आहे  याचा विचार करून चालणार नाही;  तर त्या देशातील जनतेला काय हवे आहे त्याला प्राधान्य दिलेच पाहिजे!”  हे विधान करतांना त्यांच्या नजरेपुढे त्यांची मातृभूमी- अर्थात भारत- तर आहेच, पण अन्य विकासशील आणि विकसित देशही असणार.  

लोकांना काय हवं आहे ते लोकांनी सरकारला सांगावे आणि त्यानुसार विकासाची धोरणे आणि गती सरकारने ठरवावी, लोकांना हव्या असलेल्या गोष्टींचा प्राधान्यक्रम सरकारने जाणावा अशी अमर्त्य सेन यांची सूचना आहे. “जनतेला प्राधान्याने अधिक शाळा, अधिक महाविद्यालये, आरोग्यकेंद्रे, उत्तम दर्जाचा सकस आहार या गोष्टी हव्या असतील तर सरकारने त्यानुसार धोरणे आखली पाहिजेत” असे सेन यांना वाटते. प्रश्न असा आहे की लोकांनी सरकारला सागांवे म्हणजे नेमकं कुणी सांगायचे? 

Friday, June 7, 2013

'टाप'ला गेलेला बाप माणूस


मुंबई सकाळ 7 जुन 2013 Good Morning:  डॉ. नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं आमचा बाप आन आम्ही या आत्मचरित्राच्या आजपर्यंत  १६१  आवृत्या म्हणजे १, ६०,०००  प्रती  विकल्या गेल्या आहेत.  मराठी साहित्यात एकजात सारे विक्रम मोडून काढणाऱ्या  या पुस्तकाचा  आजवर देशी आणि परदेशी अशा वीस  भाषांमधे अनुवाद झाला असून, त्याच्या सुमारे सहा लाखांहून अधिक प्रती  जगभर विकल्या गेल्या आहेत.... परवा २ जूनला  त्यांच्या षष्ट्याब्दीपूर्तिच्या निमित्ताने प्रस्तुत  पुस्तकाची १६१ वी आवृती प्रकाशित झाली आणि त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं याचा मला अतिशय आनंद झाला. जगभर नावाजलेला एक मराठी लेखक म्हणून डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विषयी आदर आणि अभिमानही वाटला. जगातील नाना भाषिक वाचकांना परस्परांशी ‘कनेक्ट’ करणारा असा लेखक विरळा!  
मुंबई विद्यापीठातून १९७६ साली संख्याशात्र या विषयात बी.एस्सी (फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन); पुढे अर्थशास्त्रात एम. ए; आधी स्टेट बॅंकेत (तीन वर्ष) आणि पुढे रिझर्व्ह बॅंकेत तब्बल तीन दशके नोकरी (तरूण रिसर्च ऑफिसर म्हणुन विक्रम);  त्यातच नॅशनल स्कॉलरशिप घेउन अमेरिकेच्या ‘इंडियाना विद्यापीठात अर्थशास्त्रातील डॉक्टरेट (तिथं सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून विशेष बहुमान प्राप्त ) – मोहमायी अमेरिकेत उत्कर्षाच्या अनेक संधी हात जोडून समोर उभ्या असताना मातृभूमी आणि कौटुंबिक ऋणानुबंध यांना पर्याय नसतो म्हणून डॉ. जाधव  मायदेशी परत आले.  पुढे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या जागतिक वित्तसंस्थेमध्ये  साडेचार वर्ष आर्थिक सल्लागार म्हणून भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी अतिशय प्रभावीपणे केले.  इथोओपिया व अफगाणिस्तान यासारख्या मागासलेल्या देशांच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी तेथे  महत्वपूर्ण कामगिरी बजावली. अर्थशास्त्र आणि सामाजिक विषयांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये एकुण बारा ग्रंथ आणि  वेगवेगळ्या विषयांवर शंभरपेक्षा जास्त शोधनिबंध ही त्यांची मोठीच कामगिरी मानावी लागेल. आणि महत्वाचे म्हणजे कवितेवर निस्सीम प्रेम असलेल्या जाधवांनी ‘रवींद्रनाथ  टागोर-समग्र जीवनदर्शन’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे’ ही महत्वपूर्ण  ग्रंथसंपदा मनस्वीपणे निर्माण करून एक मोठे योगदान दिले आहे.  सध्या केंद्रीय नियोजन आयोग (अध्यक्ष: डॉ. मनमोहन सिंग) तसेच राष्ट्रीय सल्लागार परिषद (अध्यक्षा: श्रीमती सोनिया गांधी) या दोन शिखर संस्थांचे ते सन्माननीय सदस्य आहेत. या दोन नेमणूकींतून डॉ. जाधवांचे देशातील स्थान पुरेसे स्पष्ट होते.

Friday, May 31, 2013

राष्ट्रीय चारित्र्य ?

मुंबई सकाळ 31 मे 2013 Good Morning: शनिवार आणि रविवारी अहमदाबादला काही कामा निमित्ताने गेलो होतो.  संपुर्ण दिवस आयपीएलच्या बातम्यांनी डोक बधिर केले होतं, म्हणुन म्हटंल संध्याकाळी महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमास जाऊन येऊ.   सायंकाळचे सात वाजले होते अंधार होता तरी तेथिल सुरक्षा रक्षकाने मला जाऊ दिलं... वीज निर्मितीत आज गुजरात राज्य सरप्लस असताना गांधीजींच्या घरात अंधार कसा, मी त्या सुरक्षा रक्षकाला थोडा नाराजीच्या स्वरात प्रश्न विचारला, तो चेहर्र्यावर कसलाही ताण ना आणता म्हणाला इधर ऐसाही है....

त्या आयपीएलच्या अंधाराचा मी आणखी वेध घेण्याचा प्रयत्न केला.   माझ्या पिढीचं बोलायचं झालं तर मी भ्रष्टाचाराची सुरुवात हर्षद मेहता आणि केतन पारिख यांनी केलेला स्टॉक एक्सचेंज मधील घोटाळा पाहिली पुढे  टु-जी,  कॉमन वेल्थ, तेलगी, सत्यम, बोफोर्स, चारा (फॉडर), संसदेतला कॅश-फॉर-वोट, आदर्श गृह संकुल, हवाला आणि कालचा आयपीएल... सत्ते मधे असलेल्या काही मुठ भर लोकांनी अती श्रीमंतांच्या जोडीने केलेला हजारो लाखो कोटींचा घोटाळा आज न्युज चॅनेल्स आणि वृतपत्रातुन बघितला की संपुर्ण देशच हा आकंठ भ्रष्टाचारात बुडाला आहे का?  असा प्रश्न कुणलाही पडेल.   त्यांच्या बरोबरीने रॅशन ऑफिस, महानगर पालिका ते मंत्रालय आणि शेवटी सिग्नलवर उभा असलेल्या ट्रॅफिक हवालदारा पर्यंत इथंला प्रत्येक माणुस हा पैसे खाणारच अशी आपली समजुत झालेली आहे?  खरचं आपला संपुर्ण देशच भ्रष्ट आहे का?  आणि या पुढे आपण एक भ्रष्टाचारी देश म्हणुन ओळखले जाउ का?   आपलं राष्ट्रीय चारित्र्य खरचं इतक वाईट होत चाललं आहे का? 

Friday, May 24, 2013

Cricket is not the game for silent spectators..


मुंबई सकाळ 24 मे 2013 Good Morning: क्रिकेट हा कधीतरी सभ्य लोकांचा खेळ होता आणि कधीतरी देशोदेशीचे खेळाडू जीवाचे रान करून या खेळाला अधिकाधिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी झटत होते ही आज केवळ एक ऐतिहासिक अफवा ठरली आहे... साहेबांच्या खेळाची इतकी वाईट अवस्था आज खरचं बघवत नाहीय.  माझ्या पिढीने अजित वाडेकरांचे यश्स्वी नेतृत्व पाहिले, नंतर सुनिल गावस्करची स्ट्रेट ड्राईव्ह पाहिली, चंद्रा बेदी आणि प्रसन्नाच्या फिरकीची जादु पाहिली... आणि फॉर्वर्ड शॉर्ट-लेगला जिवाची पर्वा नकरणारा एकनाथ सोलकर बघितला!  कॉमेंट्री बॉक्स मधे आपल्या करारी शब्दांची सिक्सर मारणारे विजय मर्चंट... खरोखरं सोन्याचे दिवस!  मला वाटतं 1984 साली कपिल देव ने वर्ल्ड-कप जिंकल्यानंतर आपले क्रिकेट्पटु हळू हळू क्रिकेट सोडुन सर्व काही करायला लागले आणि तिथंच घात झाला त्याला एकमेव अपवाद फक्त होता तो म्हणजे सचिन तेंडूलकर!   
आयपीएलच्या नावाखाली या सभ्य खेळाचे जेव्हा पद्धतशीर व्यापारीकरण सुरु झाले तेव्हांच त्याच्या सुसंस्कृततेची आणि बाळबोध सभ्यतेची मृत्यूघंटा वाजायला सुरुवात झाली. गेल्या दशकात ही मृत्यूघंटा इतक्या उच्च स्वरात वाजायला लागली की ‘क्रिकेट म्हणजे सर्व अनाचारांचं आगर, महाआगार’ ही नवी व्याख्या म्हणा वा नवी ओळख रुजायला सुरुवात झाली. यंदाची आयपीएल आयोजित सहावी क्रिकेट स्पर्धा म्हणजे या खेळाच्या सर्वंकष अधोगतीची अगदी पक्की अदा आहे..  
‘राजस्थान रॉयल’चे पकडण्यात आलेले तीन खेळाडू हे हिमनगाचे टोक आहे असेही म्हणवत नाही, याचे कारण हा हिमनग एवढा महाकाय आहे की त्याचे दिसणारे-असणारे टोक इतके क्षुल्लक असूच शकत नाही.  क्रिकेटमधला अतिरिक्त पैसा आणि त्याच्या पटीत वाढणारे अनाचार, त्याविषयी रकाने भरभरून येणारा चित्तथरारक मजकूर, ज्यांना अटक झाली त्यांनी उपयोगात आणलेली सिग्नल यंत्रणा आणि केलेली बेताल खरेदी पाहिली की भाबडा क्रिकेट रसिक पार चक्रावून जाण्यापेक्षा पण हताशही होतो आहे. अर्थात त्याची ही हताशतासुद्धा खोटी, पोकळ आणि दांभिक ठरते आहे.
तो खराच हताश आणि झालेल्या फसवणूकीमुळे व्यथित असता तर तो प्रत्यक्षात वेगळा वागला असता.  पण आज जे चित्र दिसते आहे ते विपरीत आहे.   क्रिकेटचा चाहता वर्ग म्हणा की ग्राहकवर्ग म्हणा तो इतका बदलला आहे की त्याचे लक्ष खेळापेक्षा त्या खेळाशी निगडीत जी बाजारपेठ उदयाला आली आहे तिचा एक अपरिहार्य घटक होण्यात गुंतले आहे. शुद्ध स्वरूपातल्या खेळाची त्याची अपेक्षा आज इतकी विकृत झाली आहे की आपण बघतो आहोत ते क्रिकेटचे मोठे सोंग आहे याची जाणीवच त्याला उरलेली नाही...पाच दिवसांच्या मॅच वरुन  आपण घसरलो ते थेट चार तासांच्या टुकार सिनेमां पेक्षाही वाईट अस्वथेत.  
आज जगभरातले आणि भारतातले क्रिकेट हा सगळी सभ्यता बासनात गुंडाळून ठेवणारा आणि काही लाख कोटींची उलाढाल करणारा एक जुगाराचा खेळ झाला आहे.  क्रिकेट हे क्रिकेट न राहता ते  काळ्या पैशाचे व्यवस्थापन करणारे आणि अक्षरशः मूठभरांची समृद्धी गगनाला नेणारे माध्यम झाले आहे.  ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’, बीसीसीआय, क्रिकेटच्या सर्व शाखा, सर्व क्लब्जनां त्यांच्या पदधिकार्र्यांना  याची काहीच कल्पना नव्हती असं जर कुणी म्हणत असेल तर ते या देशाच मोठं दुर्दैव! 
खरे तर खेळ खेळाच्या परंपरेत आणि चौकटीतच राहायला हवा.  क्रिकेट लोकप्रिय आहे म्हणून त्याच्या मूळ चौकटीला धक्का लावणे, त्याचे नियम हवे तसे वाकवणे, त्यात मनमानी बदल करणे, कसोटीला लोक कंटाळले आहेत अशी हाकाटी करून चार तासांच्या टी-20 सारख्या थिल्लर प्रकारांचा सिलसिला रुजवणे हाच मूळात नैतिक अपराध आहे.   हे आपल्याकडे झाले कारण तशी बाजाराची आणि सट्टेबाजांची मागणी होती आणि आहेही.  आपण त्या खेळाच्या परंपरेचा आणि तिच्याशी निगडीत सभ्यतेचा, नैतिकतेचा राजरोस  खून करून उजळपणे वावरतो आहोत. त्याला आपले जुने विश्वविख्यात आणि चारित्र्यवान खेळाडूही विरोध करत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे...  आज विजय मर्चंट असते तर ते नक्कीच कडाडले असते की....Cricket is not the game for silent spectators.  I will not allow it to get killed in the hands of unscrupulous people.  Let’s get together and fight this out.

Sunday, May 19, 2013

मॅक्सेल अवॉर्डस 2013चा दिमाखदार सोहळा!

महाराष्ट्र टाईम्स दि. 13 मे 2013: उद्योगजगतातील मराठी नवरत्नांनी आपली कल्पकता उद्याच्या पिढीला  राजकारण, समाजकारणासह सर्वच क्षेत्रांत कर्तृत्ववान पिढी दिसेल. ग्रामीण भागात शालेय शिक्षण अधिकाधिक किफायतशीर चांगल्या दर्जाचे करण्यामध्ये या नवरत्नांनी आपली कल्पकता ऊर्जा यांचे योगदान द्यावे , त्यांची ज्ञानाधारित नावीन्यता हाच गरिबीनिर्मूलनाचा पाया ठरेल , अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मराठी उद्यमशीलते गौरव करणाऱ्या ' मॅक्सेल पुरस्कार ' सोहळ्यात व्यक्त केली.

सातासमुद्रापार मराठी कार्यकतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या उद्योगपतींचा तसेच, सार्वजनिक क्षेत्राला कलाटणी देणाऱ्या नेतृत्वाचा रविवारी सायंकाळी भाभा सभागृहातील दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला . प्रत्येक मुलाला समान संधी आणि दर्जेदार शिक्षण मिळावे , खेडेगावातील वंचितांना इंग्रजीचे धडे मिळावेत , यासाठी या यशस्वी उद्योजकांनी योगदान द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.   विविध वित्तीय बाजारांच्या वाढीत योगदान देणारे फायनान्शिअल टेक्नॉलॉजिसचे जिग्नेश शाह हेही मराठी नावीन्यतेला अभिवादन करण्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . डॉ . रघुनाथ माशेलकर, अमेरिकास्थित उद्योगपती सुनील देशमुख, न्या. अरविंद सावंत, पत्रकार कुमार केतकर यांनी कल्पकता बुध्दिसंपदा हीच आजच्या युगात विकासाची गुरूकिल्ली कशी आहे , याबाबत मार्गदर्शन केले.   तर मॅक्सेल पुरस्कारांचे योजक कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार  यांनीही कल्पकता हेच भांडवल असून शालेय अभ्यासक्रमातही इतिहास - भूगोलाप्रमाणेच उद्योजकतेचाही समावेश व्हावा , अशी अपेक्षा व्यक्त केली . हे पुरस्कार नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आहेत , असे ते म्हणाले . महिलांची शक्ती ओळखण्यात आपले उद्योगक्षेत्र अजूनही कमी पडले आहे , असे मत सुनील देशमुख यांनी नोंदविले .

मालेगावला इथेनॉलच्या प्रयोगाने हरितऊर्जेची सुरुवात करणारे नंतर ५० हून अधिक देशांपर्यंत बायोफ्युएल उद्योगाचा विस्तार करणारे आयआयटीतील उच्चविद्याविभूषित प्रमोद चौधरी हे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले . मासळी व्यवसायाला विशाल उद्योगात रुपांतरित करणारे मरीन एक्सपोर्ट्स कंपनीचे दीपक गद्रे , हवाई वाहतूक , एरोस्पेस संरक्षण सामग्री क्षेत्रात अमेरिकेत आपला ठसा उमटविणारे यूएस एअरोटीमचे सीईओ सुहास काकडे , मर्सिडीझ - बेन्झ कंपनीच्या कॉर्पोरेट अफेअर्स एचआर विभागाचे संचालक सुहास कडलस्कर , सध्या कोलकात्यापर्यंत आपला आवाज नेणाऱ्या अलाहाबाद बँकेच्या अध्यक्ष शुभलक्ष्मी पानसे , महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानयुगाचे प्रवर्तक ठरलेले महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे संचालक डॉ . विवेक सावंत तसेच कोल्हापूरमधून हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स पुरविणाऱ्या मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या अश्विनी दानीगोंड या पुरस्कारप्राप्त उद्योगपतींच्या यशोगाथांना मॅक्सेल पुरस्कारांच्या रुपाने उपस्थितांनी मनःपूर्वक दाद दिली

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स.

Friday, May 3, 2013

उद्योग क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव - मॅक्सेल अवॉर्डस 2013.

महाराष्ट्र टाईम्स दि. 3 मे 2013:   उद्योग क्षेत्रात आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने विविध शिखरे गाठणाऱ्या महाराष्ट्रातील उद्योजकांच्या कार्याचा गौरव ' मॅक्सेल फाउंडेशन ' ही ' ना नफा ' तत्त्वावरील धर्मादाय संस्था करीत असून , त्याअंतर्गत येत्या १२ मे रोजी मुंबईत ' मॅक्सेल अॅवार्ड्स ' प्रदान करण्यात येणार आहेत .

या कर्तृत्ववान उद्योजकांचा वारसा पुढील पिढीला मिळावा व उद्याचा सक्षम महाराष्ट्र घडावा या उद्देशाने ' मॅक्सेल फाउंडेशन ' हे पुरस्कार देत आहे . ' मॅक्सेल अॅवार्ड्स फॉर कॉर्पोरेट एक्सलन्स ' ची संकल्पना कॉर्पोरेट लॉयर व ' मॅक्सेल फाउन्डेशन ' चे संस्थापक - व्यवस्थापकीय विश्वस्त नितीन पोतदार यांनी मागील वर्षी मांडली व शास्त्रज्ञ डॉ . रघुनाथ माशेलकर , निवृत्त न्याधीश अरविंद सावंत , अमेरिकेतील उद्योगपती सुनील देशमुख , ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर ,  L&T Finance Holdingsचे चेअरमन वाय एम देवस्थळी  यांच्या सल्लागार मंडळाने ती उचलून धरली .

यंदाच्या ' मॅक्सेल अॅवार्ड्स ' चे मानकरी असेः ' मॅक्सेल लाइफटाइम अचिव्हमेन्ट अॅवार्ड ' हा जीवनगौरव पुरस्कार प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांना जाहीर झाला आहे . श्री . चौधरी यांची गणना नवनव्या कल्पनांना जन्म देणारे ' मास्टरमाइंड ' म्हणून केली जाते . गेली ३५ वर्षे ते व्यवसाय आणि उद्योजकतेची नवनवी शिखरे पादाक्रांत करीत आहेत . जगप्रसिद्ध ' फोर्ब्स ' नियतकालिकानेही ' प्राज ' ला ' बेस्ट इन एशिया ' या सन्मानाने गौरविले आहे .
' मॅक्सेल अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन बिझनेस लीडरशिप ' या पुरस्कारासाठी ' मर्सिडिज बेन्झ इंडिया ' चे कॉर्पोरेट व्यवहार व मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक सुहास कडलासकर व अलाहाबाद बँकेच्या विद्यमान अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका शुभलक्ष्मी पानसे यांची निवड करण्यात आली आहे . कडलासकर यांना ' वर्ल्ड एचआरडी काँग्रेस ' मध्ये त्यांना ' फ्लेम ' हा गौरवशाली पुरस्कार मिळालेला आहे . श्रीमती पानसे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सेवेला प्रारंभ केला होता .

' मॅक्सेल अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन आन्त्रप्रेन्युअरशिप ' या पुरस्कारांसाठी उद्योजक दीपक गद्रे व सुहास काकडे यांची निवड करण्यात आली आहे . श्री . गद्रे यांना आतापर्यंत सात वेळा राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची सागरी निर्यातीबद्दलची ' मरिन एक्स्पोर्ट्स ' पारितोषिके मिळाली आहेत . ' कॉर्पोरेट मॅनेजमेन्ट ' च्या विस्ताराला सखोलतेला अनेक पैलू प्राप्त करून देणारे काकडे ' युएस एअरोटीम ', ओहायो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत .
' मॅक्सेल अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन इनोव्हेशन ' पुरस्कारासाठी विवेक सावंत व श्रीमती अश्विनी दानीगोंड यांची निवड करण्यात आली आहे . श्री . सावंत यांच्या नेतृत्वाखाली ' महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन ' ने मोठी झेप घेतली असून महाराष्ट्रात ' आयटी ' शिक्षण व ' ई लर्निंग ' चे जाळे विणण्यात यश मिळविले आहे . ' मनोरमा इन्फोसोल्युशन्स ' च्या अध्यक्षा अश्विनी दानीगोंड यांना ' बेस्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रोव्हायडर ' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त मिळालेला आहे .

पुरस्कार सोहळा

' मॅक्सेल फाउंडेशन ' चे हे पुरस्कार येत्या रविवारी नरीमन पॉइन्ट येथील ' एनसीपीए ' संकुलातील जमशेद भाभा थिएटरमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या समारंभात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून पद्मभूषण डॉ . रघुनाथ माशेलकर यांचे यावेळी बीजभाषण होईल . हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे .

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स दि.3 मे 2013.